{"title":"The Living Earth Library","description":"","products":[{"product_id":"sacred-plants-of-india-nanditha-krishna","title":"Sacred plants of India | भारतातील पवित्र वनस्पती | Nanditha Krishna \u0026 M. Amirthalingam","description":"\u003ch5\u003eप्रस्तावना\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारत हा जैववैविध्याने समृद्ध देश आहे. प्राणी आणि वनस्पतींच्या जनुकीय संपत्तीच्या देणगीला किमान चार मुख्य घटक जबाबदार आहेत; ते म्हणजे - सांस्कृतिक विविधता (आध्यात्मिक मूल्यांसह), पाककलेतील विविधता, औषधोपचारांची विविधता ( औषधी वनस्पतींच्या असंख्य प्रजाती) आणि परिसंस्थांची विविधता. यातील आध्यात्मिक मूल्यांनी अनेक महत्त्वाच्या वृक्ष-वनस्पतींच्या संरक्षणाला योगदान दिले आहे. भारतातील अनेक पवित्र वनस्पती आणि वृक्षराजींविषयीची चित्तवेधक माहिती या पुस्तकाने वाचकांसमोर ठेवली आहे. निवडक वनस्पतींना पावित्र्य बहाल करण्यासाठी प्राचीन काळापासून केल्या गेलेल्या प्रयत्नांचा उल्लेखही या पुस्तकात आहे. मंदिरांचे स्थळ वृक्ष हे आपला जैविक वारसा साजरा करण्याच्या परंपरेचे उत्तम उदाहरण आहे. हे पुस्तक वाचत असताना मला जॉईस किलमर यांची कविता आठवली -\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003eI think that I shall never see\u003cbr\u003eA poem as lovely as a tree.\u003cbr\u003e\u003cbr\u003eA tree whose hungry mouth is press\u003cbr\u003eAgainst the earth’s sweet flowing breast;\u003cbr\u003e\u003cbr\u003eA tree that looks at God all day,\u003cbr\u003eAnd lifts her leafy arms to pray;\u003cbr\u003e\u003cbr\u003eA tree that may in summer wear\u003cbr\u003eA nest of robins in her hair;\u003cbr\u003e\u003cbr\u003eUpon whose bosom snow has lain;\u003cbr\u003eWho intimately lives with rain.\u003cbr\u003e\u003cbr\u003ePoems are made by fools like me,\u003cbr\u003eBut only God can make a tree.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e१९७६ मध्ये मी भारतातील प्राचीन झाडांचा अभ्यास हाती घेतला. मी सगळ्या राज्यांच्या मुख्य वनसंरक्षकांना पत्र लिहून त्यांच्या राज्यातील सर्वात प्राचीन झाडांविषयीची माहिती कळवण्याची विनंती केली. बहुतेक उत्तरे वटवृक्षाविषयीची होती. त्यात चेन्नई येथील थिऑसॉफिकल सोसायटीच्या वटवृक्षाचाही समावेश होता. अनेक प्रसिद्ध वटवृक्ष संत आणि मंदिरांशीही संबंधित होते. चिदंबरम येथील प्रसिद्ध नटराज मंदिराच्या Excoecaria agallocha या मंदिर-वृक्षांसारख्या अनेक वृक्षांची पूजा होत आली, ती एकूणच जगण्यासाठी आणि उपजीविकेसाठी असलेल्या त्यांच्या महत्त्वामुळे. उदाहरणार्थ, चिदंबरम येथील हा मंदिर- वृक्ष आहे खारफुटी किनारी प्रदेशातील वादळे आणि त्सुनामीपासून संरक्षण देणाऱ्या सुरक्षाकवचाची भूमिका खारफुटी पार पाडत असल्यामुळे मंदिर-वृक्षाचे स्थान या वनस्पतीला दिले गेले असावे. भारतातील सर्वाधिक प्राचीन वृक्षाविषयीच्या माझ्या अभ्यासातून तुती (Morus serrata) या प्रजातीचा वृक्ष सर्वात प्राचीन (१२०० वर्षांहून जास्त) असू शकतो, हे स्पष्ट झाले. जोशी मठाच्या परिसरात एका भव्य मलबेरी वृक्षाखाली आद्य शंकराचार्यांनी ध्यानधारणा केली होती. ज्या वेळी शंकराचार्यांनी या झाडाखाली उपदेश केला, त्या वर्षापासूनच आपण या झाडाचे वय मोजू शकतो. याचाच अर्थ, आपला आध्यात्मिक इतिहास आणि पवित्र वृक्षांचा इतिहास यांच्यामध्ये घट्ट नाते आहे (Indian Farming, फेब्रुवारी, १९७७). प्रस्तुत पुस्तकात भारताच्या अत्यंत सुंदर अशा जीवशास्त्रीय आणि आध्यात्मिक वारशाचे कवडसे दाखवल्याबद्दल नंदिता कृष्णा आणि एम. अमिर्तलिंगम या दोघांचे आपण सर्वांनीच मन:पूर्वक आभार मानायला हवेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eचेन्नई\u003cbr\u003e प्रा. एम. एस. स्वामिनाथन\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003eलेखकाचे मनोगत \u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eसकाळी उठून मी खिडकीबाहेर बघते, तेव्हा प्रथम मला दिसतो, तो कैलासपतीचा वृक्ष. त्याच्या विस्कटलेल्या फांद्या फुलांच्या झुबक्यांचे वजन न पेलवून जमिनीकडे झुकलेल्या असतात. जमिनीवरही गळून पडलेल्या फुलांचा सडा असतो. माझा माळी ही फुलं काळजीपूर्वक गोळा करून डायनिंग टेबलवरच्या पाण्यानं भरलेल्या मोठ्या वाडग्यात ठेवतो. यामुळे मनावरचा ताण हलका होतो. कैलासपतीच्या फुलांचा तो गुणधर्मच आहे. माझा जन्म एका जुन्या ब्रिटिशकालीन बंगल्यात झाला. माझ्या वाडवडिलांपासूनचं मद्रासमधलं ते घर 'द ग्रोव्ह' म्हणून ओळखलं जायचं. घराभोवतीच्या बागेच्या लांबलचक पट्ट्यात एक पिंपळाचं झाड होतं, आजही आहे. या झाडाखाली वेगवेगळ्या आकाराच्या लहान-मोठ्या पाच नागशिळा आणि एक गणपतीची उठावाची मूर्ती होती. नागशिळा माझ्या आजीनं १९०३ ते १९०५ या काळात स्थापन केल्या होत्या. गणपती पल्लव कालखंडातला होता. पिंपळाला, गणपतीला आणि नागशिळांना प्रदक्षिणा घालून दररोज सकाळी माझ्या मॉर्निंग वॉकची सुरुवात होते. सोमवारच्या दिवशी पौर्णिमा यायची, तेव्हाचे दिवस मला अजून आठवताहेत. तिनांपेट गावातल्या बायकांचे घोळकेच्या घोळके या झाडाला १०८ प्रदक्षिणा घालण्यासाठी यायचे. माझी आजीही हा नवस बोलली होती; पण तिची तब्येत बरी नसल्यामुळे तिला ते शक्य होत नव्हतं. म्हणून मग तिच्याऐवजी मी प्रदक्षिणा घालायचे आणि ती पिंपळाच्या झाडाखाली बसून प्रार्थना म्हणत राहायची आणि ध्यानधारणा करायची. आणि सर्वत्र संचार असणारी तुळस तर आजही घराच्या मधल्या खुल्या चौकात अभिमानपूर्वक आपलं स्थान टिकवून आहे. भारताच्या प्राचीन भूतकाळातल्या या पवित्र वनस्पती माझ्या व्यक्तिगत परंपरेचा असा अतूट भाग होऊन राहिल्या आहेत. त्यामुळेच आपला समृद्ध वारसा समजून घेण्यासाठीचं पुढचं संशोधन माझ्यासाठी आवश्यक ठरणं अटळच होतं. मी भारतभरात अनेक ठिकाणच्या पवित्र वनस्पती पाहिल्या आहेत. हृषिकेशमधला पिंपळ, वृंदावनातली तुळस, कुंभकोणममधल्या वैदिश्वरन मंदिराचा औषधी कडुनिंब आणि राजस्थानातल्या देवरायांमधलं खेजडीचं झाड! या वनस्पती पाहताना आपल्या प्राचीन परंपरेचं ज्ञान जाणवून मी थक्क झाले. या पुस्तकात सांगितलेल्या अनेक कथा मला माझ्या कुटुंबातल्या ज्येष्ठांकडून आणि मला किंवा अमिर्तलिंगमला आमच्या प्रवासांत भेटलेल्या वयस्कर व्यक्तींकडून कळल्या. उरलेल्या काही कथा संस्कृत आणि तामिळ साहित्यातल्या किंवा त्या-त्या मंदिरांच्या स्थळ पुराणांतल्या (स्थानिक इतिहास) आहेत. या सगळ्या मौखिक परंपरा आहेत आणि त्यांनीच आपल्या भारतीय समाजाला एका सूत्रात ओवलं आहे. एम. अमिर्तलिंगम वैज्ञानिक आहेत. सी. पी. आर. एनव्हिरॉनमेंटल एज्युकेशन सेंटरमध्ये ते पर्यावरणशिक्षण अधिकारी आहेत. तामिळनाडूमधल्या आणि तामिळ साहित्यातल्या देवराया आणि पवित्र वनस्पतींच्या दस्तावेजीकरणाचं अतिशय अजोड असं काम त्यांनी केलं आहे. हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी माझ्यासोबत महत्त्वाचं काम केलं आहे. थोडक्यात, हे पुस्तक म्हणजे इतिहासतज्ज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञ, संस्कृततज्ज्ञ आणि तामिळतज्ज्ञ यांच्या एकत्रित संशोधनाचा परिपाक आहे. ज्येष्ठ वैज्ञानिक आणि हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांनी या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याचं मान्य केलं, हा आमचा मोठा सन्मान आहे. आम्ही त्यांचे मनापासून ऋणी आहेत. या पुस्तकासाठी अनेक जणांची अनेक प्रकारे मदत झाली आहे. डॉ. पी. सुधाकर यांनी फोटो काढले आणि वर्गीकरण तपासलं. विशेषतः लॅटिन नावं, वनस्पतितज्ज्ञांनी शोधलेल्या वनस्पतींची नावं याविषयी त्यांनी खात्री करून घेतली. वाय. वेंकटेश आणि प्रेमा श्रीनिवासन यांनी रेखाचित्रं काढली. जी. बालाजी आणि आर. सत्यनारायणन यांनी रेखाचित्रं आणि छायाचित्रं यांवर आवश्यक संगणकीय प्रक्रिया केली. सी. पी. आर. एनव्हिरॉनमेंटल एज्युकेशन सेंटरच्या ग्रंथपाल एस. पी. विजयाकुमारी आणि सी. पी. रामस्वामी अय्यर फाऊंडेशनचे ग्रंथपाल व्ही. कामेश राज यांनी आम्हांला हव्या असलेल्या पुस्तकांचा आणि लेखांचा शोध घेऊन ती मिळवली आणि एच. मणिकंदन यांनी आम्ही जमा केलेल्या साधनांचा अखंड पुरवठा काळजीपूर्वक सांभाळण्याचं काम केलं. पेंग्विन इंडियाचे उदयन मित्र आणि अमेय नागराजन, पेंग्विन इंडियात पूर्वी असलेले रवी सिंग यांनी या पुस्तकात दाखवलेला रस आणि उत्साह, यामुळेच हे पुस्तक प्रसिद्ध होऊ शकलं. पेंग्विन इंडियाच्या कॉपी एडिटर श्रुती नारायण यांनी खूप वेळ घालवून आणि कष्ट घेऊन या पुस्तकातला प्रत्येक शब्द आणि ओळ तपासली आणि पुस्तक सुधारण्यासाठी फार उत्तम सूचना केल्या. , शेवटी मला एवढंच सांगावंसं वाटतं की झाडं आणि जंगलं यांना पवित्र मानलं गेलं, कारण आपल्या पूर्वजांना पर्यावरणातील त्यांची महत्त्वाची भूमिका माहीत होती- झाडं आपल्याला प्राणवायू देतात, प्रदूषकं शोषून घेऊन हवा शुद्ध करतात, खायला अन्न देतात, घरं बांधण्यासाठी आवश्यक साहित्य देतात, पक्षी-प्राण्यांना राहायला निवारे देतात, आपल्याला औषधं देतात आणि आणखीही अनेक गोष्टी करतात. त्यांच्या जवळचं ज्ञान आणि वैज्ञानिक माहितीविषयी त्यांना असणारा आदर आपल्या ज्ञानापेक्षा आणि आदरापेक्षा कितीतरी जास्त होता. पर्यावरणावरच्या परिणामांचा विचारही न करता आपण झाडं तोडतो आणि जंगलं नष्ट करतो. यामुळे जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलासारख्या अनेक मोठ्या संकटांना आमंत्रण देऊन आपण पृथ्वीला कडेलोटाच्या बिंदूपर्यंत आणलं आहे. निसर्ग मनुष्यापेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे आणि तोच अंतिम युद्ध जिंकणार; हे लक्षात घ्यायला अजूनही उशीर झालेला नाही. आपल्या स्वतःच्याच हितासाठी, निसर्गातील अनेकानेक सुंदर वनस्पतींचं संवर्धन करण्याची गरज आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eचेन्नई नंदिता कृष्णा\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003eहे पुस्तक का वाचावे?\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतुम्ही कधी विचार केला आहे का, आपल्या पूर्वजांनी पिंपळ, वड किंवा तुळशीला केवळ 'देव' का मानले असेल? हे निव्वळ अंधश्रद्धा नसून, त्यामागे एक खूप मोठे \u003c\/span\u003e\u003cspan\u003e'शास्त्रीय आणि पर्यावरणीय विज्ञान'\u003c\/span\u003e\u003cspan\u003e दडलेले आहे. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनंदिता कृष्णा\u003c\/span\u003e\u003cspan\u003e आणि \u003c\/span\u003e\u003cspan\u003eएम. अमृता लिंगम\u003c\/span\u003e\u003cspan\u003e यांचे 'भारतातील पवित्र वनस्पती' (सकाळ प्रकाशन) हे पुस्तक म्हणजे केवळ कागदांची बांधणी नसून, ती आपल्या हजारो वर्षांच्या समृद्ध संस्कृतीची गुरुकिल्ली आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक का वाचावे? काही रंजक कारणे:\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e१. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eनिसर्गाची भाषा:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e आपण आज कोणताही विचार न करता झाडे तोडतोय, पण या पुस्तकातून आपल्याला कळेल की, प्रत्येक वृक्षाचा स्वतःचा एक 'प्राण' आणि 'हेतू' आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e२. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eधार्मिकतेचा वैज्ञानिक दृष्टीकोन:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e देवाच्या पूजेत आपण बिल्वपत्र किंवा दुर्वा का वापरतो? यामागे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषधी गुणधर्म कसे दडलेले आहेत, याचे रहस्य उलगडते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e३. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eविस्मृतीत गेलेला इतिहास:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e ही झाडे नेमकी कुठे तयार झाली? त्यांचा प्रवास कसा झाला? आपल्या ऋषीमुनींनी त्यांचे पूजन करताना पर्यावरणाचे रक्षण कसे केले? हे वाचून तुम्ही थक्क व्हाल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e४. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eआरोग्याचा कणा:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e आपली आरोग्याची समस्या, मग ती साधी सर्दी असो किंवा दीर्घकालीन आजार, निसर्गाच्या या पवित्र वनस्पतींमध्येच उत्तर आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e५. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसंस्कृतीचा वारसा:\u003c\/span\u003e\u003cspan\u003e हे पुस्तक म्हणजे आपल्या पिढीसाठी एक 'कॉल टू ॲक्शन' आहे. आपण निसर्ग नष्ट करत नाही, तर स्वतःचे अस्तित्वच धोक्यात आणत आहोत, हे या पुस्तकातून प्रकर्षाने जाणवते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक म्हणजे केवळ माहितीचा साठा नाही, तर निसर्गाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोन आहे. आपण जर या वनस्पती जपल्या नाहीत, तर पुढील पिढीला आपण काय देणार? चला, या पवित्र वारशाचा पुन्हा शोध घेऊया.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eहे पुस्तक वाचा, कारण ते केवळ झाडांबद्दल नाही, तर आपल्या अस्तित्वाच्या मुळांबद्दल आहे!\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":55946157162799,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/C8570486-D344-410B-8876-553CED127FD1.jpg?v=1774763292"},{"product_id":"nisargane-dila-anandkand-natures-blessings-dr-madhav-gadgil","title":"निसर्गाने दिला आनंदकंद | Nature’s Blessings | Dr Madhav Gadgil","description":"\u003ch5\u003eलेखकाचे मनोगत \u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eकाव्य, शास्त्र, विनोद, कला-क्रीडा ज्ञान-विज्ञानाने रेलचेल भरलेल्या घरात मी वाढलो. बाबा व्यवसायाने अर्थशास्त्रज्ञ होते. पण चतुरस्त्र बुद्धीचे. एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचे होते. घरात प्रचंड ग्रंथसंग्रह होता; मुख्यतः मराठी व इंग्लिश! यात सर्व प्रकारची पुस्तके होती. ज्ञानेश्वर, तुकाराम, मोरोपंत, केशवसुत, मर्ढेकरांपासून विंदा करंदीकर, वसंत बापटांपर्यंतच्या पद्यरचना; महानुभाव, जोतिबा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकरांपासून हरी नारायण आपटे, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडेंपर्यंतच्या गद्यरचना; मराठ्यांच्या बखरी; इतिहासाचार्य राजवाड्यांचे निबंध; श्रीधर व्यंकटेश केतकर, इरावती कर्वे यांची समाजशास्त्रीय रचना; ज्योतिर्विलास आणि म. वि. आपट्यांचे पक्षीदर्शन; प्लेटोचे रिपब्लिक; आणि मार्क्सच्या कॅपिटलपासून अनेक ग्रंथांचे मराठी अनुवाद. असा कोणताच विषय नसेल; ज्यावरची उत्तमोत्तम मराठी पुस्तके आमच्या घरी नव्हती. मी मराठी माध्यमातून अकरावीपर्यंतचे शालेय शिक्षण घेतले. त्यामुळे या मराठी ग्रंथसंपदेतून मला वाचनाचा आणि अशा सगळ्याच विषयांचा नाद लागला. मला कुठलाही विषय समजणार नाही, हे मला मान्य नव्हते. प्लेटोच्या रिपब्लिकचा अनुवाद वाचला तेव्हा मी मराठी पाचवीत असेन. माझी १० वर्षांनी मोठी, बी.ए.ला शिकणारी बहीण म्हणाली, ‘हे काय वाचतोयस? तुला कसे काय समजेल?’ मी म्हटले, ‘उगीच बोलू नकोस. या पुस्तकाबद्दल कुठलाही प्रश्न विचार. बघ मी नीट उत्तर देतो की नाही!’\u003cbr\u003eबाबा स्वतःही इंग्लिशमध्ये, मराठीत बरेच लेखन करत. आमच्या शेजारीच इरावती कर्वे राहायच्या. त्या समाजशास्त्रावर तर लिहीतच; पण मराठीत सुंदर लघुनिबंध लिहीत. त्यांची मुलगी, पुढे स्वतः लेखिका बनलेली, गौरी देशपांडे माझ्याच वयाची होती. आम्ही दोघेही नऊ-दहा वर्षांचे असल्यापासून काहीतरी लिहायचो. शाळेत वर्षाकाठी एक हस्तलिखित मासिक काढले जायचे. त्यात सुरुवातीपासून मी बारीकसारीक लेख लिहू लागलो. निसर्गप्रेमी बाबांनी मला पक्षिनिरीक्षणाचा नाद लावला. पुढे काय व्यवसाय करावा याचा विचार करता, फारसा काही प्रश्न पडला नाही. बाबा त्यांच्या विद्याव्यासंगात—उघडच—खुशीत होते. ‘तू हेच कर’ असा काहीही उपदेश ते करत नव्हते. मला पक्षिनिरीक्षणाचा छंद फार भावला. त्या संबंधीची खूप पुस्तकेही घरी होती. तीसुद्धा वाचली. त्यातले एक होते ज्युलियन हक्सलेचे—पक्षिनिरीक्षण आणि पक्षांचे आचरण. हक्सले सांगतो, ‘एकदा का आपण निसर्गनिरीक्षणाच्या छंदाने वेडे झालो, की जगात आपल्या आसपास मित्र नाहीत, असे आपल्याला कधीच होत नाही. जिथे तिथे झाडेझुडपे, किडेमकोडे, शंखशिंपले, बेडूक-पक्षी, कुत्रे-गाढवे, कोणी ना कोणी जिव्हाळ्याचे सोबती आपल्याला भेटत राहतात.’ तो आणखीही सांगतो की, ‘जो आपल्या आवडत्या छंदाला आपला व्यवसाय बनवू शकतो, तो खरा भाग्यवान, तो उभा जन्म आनंदात घालवू शकतो.’ मी विचार करायला लागलो... आपणही जीवशास्त्रज्ञ का बनू नये?\u003cbr\u003eचौदाव्या वर्षी मराठी नववीत जाईपर्यंत पक्के ठरवले, जीवशास्त्रज्ञ बनायचे. बाबा म्हणाले, “उत्तम, मग जे काय निसर्गनिरीक्षण करतोस ते जरा पद्धतशीर लिहून काढायची सवय लावून घे.” मला ही कल्पना खूपच भावली. मधूनमधून व्यवस्थित टिपणे ठेवू लागलो. यातूनच माझे पहिले लेखन छापून आले. शेजारचे दिनकरराव कर्वे सृष्टीज्ञान मासिकाचे संपादक होते. म्हणाले, “तुला जर पक्षांची, प्राण्यांची आवड आहे, तर तू या विषयांवर मराठीत काहीतरी शास्त्रीय लेख लिहीत जा.” खुश झालो. वयाच्या १५व्या वर्षी सुरुवात करून सृष्टीज्ञानात ‘प्राणिमानसशास्त्र’ या विषयावर ११ लेख लिहिले. उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वरला जायचो. तिथल्या घनदाट जंगलातल्या रस्त्यांवरून चिकार पायपीट करायचो. कुतूहलाने पुण्यात कधीच न दिसणारे पक्षी पाहायचो. या अनुभवाच्या जोरावर माझा पहिला स्वतःच्या निरीक्षणावर आधारित ‘महाबळेश्वरचे काही पक्षी’ हा लेख सृष्टीज्ञानात प्रकाशित केला. पुन्हा वाचल्यावर जाणवले की, या सगळ्या शालेय वयातील लिखाणात मी फार क्लिष्ट, संस्कृतप्रचुर पारिभाषिक शब्द वापरले आहेत. सरळ, सुबोध मराठीत लिहायचा पुरेसा प्रयत्न केलाच नाही. पण, सुरुवात तर मजेत केली. शिवाय, या लेखात स्वतः हाताने काळ्या शाईने रेखाटने काढून अंतर्भूत केली. अशी सुरू झाली माझी आणि माझ्या लेखणीची प्रेमकहाणी!\u003cbr\u003eपंधराव्या वर्षी लेखणीची अशी आराधना सुरू केली आणि ठरवल्याप्रमाणे मी जीवशास्त्रात बी.एस्सी. करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. शिवाय, माझ्या खात्यात मुंबई राज्याचा १६ वर्षांखालील, पुणे विद्यापीठाचा उंच उड्यांचा विक्रम होता. तेव्हा अभ्यास आणि खेळ यांच्यात मग्न होऊन गेल्यावर लेखनात खंड पडला. मग एम.एस्सी.ला मत्स्यजीवनावर एक छोटासा शोधनिबंध लिहिण्यापासून एका वेगळ्या प्रकारच्या शास्त्रीय संशोधनात्मक लिखाणाची सुरुवात झाली. हे २२व्या वर्षी सुरू झालेले वैज्ञानिक संशोधनावर आधारित लेखन गेली ५० वर्षे अप्रतिहत चालू आहे.\u003cbr\u003eमाझ्यावर ज्या शास्त्रज्ञांनी खास छाप पडली, त्यात प्रमुख होते पक्षीतज्ज्ञ सलीम अली आणि विसाव्या शतकातील अग्रगण्य उत्क्रांतीशास्त्रज्ञ जे.बी.एस. हाल्डेन. सलीम अलींनी हौशी पक्षिनिरीक्षकांसाठी लिहिलेल्या सचित्र बुक ऑफ इंडियन बर्ड्सचा मी भरपूर उपयोग करत होतो. जे.बी.एस. हाल्डेननेही सर्वांपर्यंत शास्त्राचा संदेश पोहोचवण्यासाठी मुबलक लेखन केले होते. असे आदर्श डोळ्यांसमोर असल्यामुळे आपण संशोधनात्मक निबंध तर लिहायचेच; पण सर्वसामान्य लोकांपर्यंतही शास्त्रीय विषय पोहोचवायलाच पाहिजेत, असे पहिल्यापासूनच ठरवले होते. एकोणतिसाव्या वर्षी पुण्यात डॉ. वर्तकांबरोबर देवरायांवर संशोधन सुरू केले. या निसर्गसंरक्षण परंपरेला सांभाळायला हवे, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे वाटू लागले. सलीम अलींच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे शास्त्रीय नियतकालिक अनेक निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचायचे. त्यात संशोधनात्मक निबंधांच्या जोडीला सामान्य वाचकांसाठीही लेख असायचे. तेव्हा, माझा देवरायांवरचा लेख या नियतकालिकात प्रसिद्ध करावा म्हणून उत्साहाने पाठवला. पण हा वेगळाच विषय संपादकांना रुचला नाही. सुदैवाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे मानद सचिव झफर फतेहअली यांना तो खूप आवडला. त्या वेळी खुशवंत सिंगांच्या नेतृत्वाखाली इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया जोरात चालत होते. त्यांनी खुशवंत सिंगांची ओळख करून देऊन देवरायांवर झकास रंगीत चित्रांसह एक इंग्लिश लेख छापून आणला. हा होता माझा पहिलाच सामान्य वाचकांसाठीचा इंग्लिश लेख. त्याच्याच जोडीने मराठीतही देवरायांवर एक लेख लिहिला. असा माझा शिक्षण संपल्यावरचा गेल्या ४३ वर्षांचा लेखनप्रवास पुनश्च सुरू झाला. मग बंगळुरूला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये रुजू झालो. डेक्कन हेरल्ड हे बंगळुरूचे लोकप्रिय इंग्लिश दैनिक होते. त्यात बंदीपुरा ते नागरहोळे या सलग मोठ्या जंगलाच्या पट्ट्यात तीन दिवस केलेल्या पायी भटकंतीच्या अनुभवाच्या आधारावर १९७४मध्ये दोन लेख लिहिले. त्यात काही भागात मूळचे वैविध्यसंपन्न अरण्य तोडून लावलेल्या सागवानाच्या एकसुरी जंगलात किती मोठ्या प्रमाणात बांडगुळे आहेत, याचा उल्लेख होता. सरकारवर काहीही टीका केल्यास बाबूंच्या नाकाला लागलीच मिरच्या झोंबतात, आणि अशा प्रामाणिक टीकाकारांच्या मुसक्या बांधल्याच पाहिजेत म्हणून त्यांचे हात शिवशिवायला लागतात. तसेच काही झाले असावे. कारण, हा लेख प्रसिद्ध होता होता आणीबाणी जाहीर झाली. लागलीच प्रमुख वनसंरक्षकांच्या कचेरीतून मला पत्र आले. यापुढे कोणताही लेख प्रकाशित करण्याआधी आमच्याकडून संमती घेतलीच पाहिजे. मी ते पत्र आमचे संचालक सतीश धवन यांना दाखवले. ते म्हणाले, “काळजी करू नकोस. तुला योग्य वाटते ते लिहीत राहा. बघू काय करतात ते.” मी प्रचंड खुश झालो. छोटेमोठे लेख लिहीत राहिलो.\u003cbr\u003eजे काय लिहायचे, ते अभ्यासपूर्वक लिहायला पाहिजे अशी माझी पक्की धारणा होती. असाच मी लिहिला राजस्थानतल्या बिश्नोई समाजाच्या संस्थापकांवरचा, जांभोजींवरचा लेख. माझे पूर्ण देशभर मित्र होते. त्यांच्याकडून बिश्नोई या निसर्गसंरक्षणाच्या उज्ज्वल परंपरा असलेल्या पंथाबद्दल ऐकले होते. पण त्यावर हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काहीही प्रकाशन उपलब्ध नव्हते. तेव्हा, १९८०मध्ये मला जोधपूरला जायची संधी मिळाल्यावर मित्रांबरोबर सायकलवर आरूढ झालो, आणि बिश्नोईंनी जिथे आत्मबलिदान केले त्या खेजडली गावाला पोहोचलो. तिथल्या लोकांकडून त्यांच्या पंथाचा रोमांचकारी इतिहास समजून घेतला. हिंदी जांभोजी पुराणाची एक प्रत पैदा करून या कथेवर इंग्लिशमध्ये दिल्लीच्या हिंदुस्तान टाइम्समध्ये व मराठीत हाकारा मासिकात लेख प्रसिद्ध केला.\u003cbr\u003eडेक्कन हेरल्ड, इंडियन एक्सप्रेस, हिंदू अशा निरनिराळ्या इंग्लिश वर्तमानपत्रांतून अधूनमधून, मुख्यतः पर्यावरणाच्या संदर्भात लेखन चालू होते; इकॉनॉमिक टाइम्समध्ये नियमित स्तंभलेखन करत होतो. आता रामचंद्र गुहांबरोबर भारतीय पर्यावरणाच्या इतिहासावर एक पुस्तक लिहायला लागलो. This Fissured Land हे भारताच्या पर्यावरणीय इतिहासावरचे पहिलेच पुस्तक होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याची मल्याळम, हिंदी, बंगाली आणि चिनी भाषेत भाषांतरे झाली. आजतागायत २० वर्षे पुनःपुन्हा पुनर्मुद्रणे होत राहिली आहेत. अनेक विद्यापीठांत इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमांत हे पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते आहे.\u003cbr\u003eमला इंग्लिश कवितांचा बुक ऑफ नॉनसेन्स व्हर्सेस हा संग्रह खूप आवडायचा. त्याची नक्कल करत चारोळ्या डोक्यात यायच्या. त्या लिहायला लागलो माझ्या मुलीच्या मागणीवरून! ती पत्रकार होती. घरी परतायला तिला रात्रीचे दीड-दोन वाजायचे. म्हणाली, ‘परत आल्यावर माझे स्वागत करणारे एक पत्र तयार असायला पाहिजे!’ मी एखाद्या प्राण्याचे रेखाटन करून त्याखाली एक वात्रटिका लिहायचो. बऱ्याच गोळा झाल्या. मग मी हिंदू वृत्तपत्राला विचारले, “तुम्ही प्रकाशित कराल का?” ते म्हणाले, “अवश्य. आमच्या ‘हिंदू यंग वर्ल्ड’ या बालवाचकांसाठीच्या पुरवणीत दर दोन आठवड्यांनी एक सदर प्रकाशित करू या—‘सेन्स अॅण्ड नॉनसेन्स’. थोडक्यात, १७० शब्दांत एखाद्या जीवाजातीबद्दल माहिती लिहायचो, त्याच्या जोडीला एक चित्र आणि एक वात्रटिका. पाच वर्षे हे स्तंभलेखन चालले. आता त्याच मुलीच्या दोन मुली ‘रात्री झोपताना गोष्टी सांग, आणि नवनव्या तूच रचून सांग’ असा आग्रह करायच्या. त्यांच्यासाठी ‘मुचकुंद मुंज्या’ नावाचे एक अद्भुत शक्ती असलेले पात्र निर्माण केले. या मुचकुंदच्या चार कहाण्या प्रकाशित झाल्या आहेत. एक मधमाश्या-अस्वलांच्या जगात, एक प्रवाळांच्या बेटांवरच्या माशांच्या विश्वात, एक देवमाशांच्या दुनियेत, आणि एक जपानी लालतोंड्या माकडांच्या दुनियेत. चारही कहाण्यांमध्ये निसर्गाच्या वेगवेगळ्या पैलूंचे चित्रण केले आहे.\u003cbr\u003eसन २००४मध्ये मी आणि सुलोचना निवृत्त झाल्यावर गाशा गुंडाळून बंगळुरूवरून पुण्याला परतलो. पुण्याचे लोकप्रिय दैनिक ‘सकाळ’. त्याचे एक उपसंपादक म्हणाले, “आमच्यासाठी संपादकीय पानाववरचे दर महिन्याला एक सदर लिही.” मी म्हटले, “अवश्य.” ४० वर्षे महाराष्ट्राबाहेर काढली होती; तरी मराठीचे वाचन कायम चालू होते. आता लिहिण्याची सवय करू या. विषय शास्त्रीय, पण भाषा बिलकूल क्लिष्ट असता कामा नये. साध्या, सुबोध मराठीत सगळे विषय मांडू या. मला मराठी कवितांची खूप आवड आहे. चपखल बसणाऱ्या काव्यपंक्ती वापरू या. ‘सकाळ’मधील लेखमालेस २००७च्या जानेवारीपासून सुरुवात केली. प्रथम सगळे इंग्लिशमध्ये डोक्यात यायचे. विचार करत नीट मराठीत उतरवायला थोडे कष्ट व्हायचे. पण हळूहळू हे बदलले. मराठीतच विचार करत मराठीत लिहायला लागलो. वेग वाढला, ओघ आला. सुलोचनालाही मराठीची आवड आहे. ती मनापासून वाचून सामान्य वाचकाला समजेल अशी नीट मांडणी करण्याच्या दृष्टीने खूप चांगले सुचवत राहते.\u003cbr\u003eमाझ्या पोतडीत भरपूर विषय आहेत. सारखे नवनवे विषय सुचत राहतात. त्सुनामीच्या लाटांचा तडाखा बसल्यानंतर माझ्या एका मित्राने सेवाभावी संस्थांबरोबर काम केले होते. तो म्हणाला, ‘आम्ही समजावून घ्यायला पाहत होतो की कोण वाचले, आणि कशामुळे?’ एक स्पष्ट होते, झाडांवर चढण्यात तरबेज होते ते सहज वाचले. मला लहानपणी झाडांवर चढण्याचा प्रचंड शौक होता. आमच्या घरात मोठमोठी झाडे होती. लहानपणी खूप वेळ त्यांच्यावर चढून बसून घालवला होता. १५ ऑगस्टला मी ज्या प्राथमिक शाळेत शिकलो तिथे स्वातंत्र्यदिनाचा पाहुणा म्हणून मला बोलावले. मुलांना काय उपदेश द्यायचा? मी त्यांना ही त्सुनामीची गोष्ट सांगितली आणि म्हणालो, ‘जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा झाडांवर चढा!’ मग यांच्यावरच लेख लिहिला. आमच्या घराजवळच्या किराणा भुसार मालाच्या दुकानात गेलो होतो. एक तरुण बाई त्यांच्या नऊ-दहा वर्षांच्या मुलासोबत आल्या होत्या. त्यांनी आपणहून ओळख करून घेतली. मुलाला म्हणाल्या, ‘झाडावर चढ म्हणून तुला एक लेख दाखवला ना, त्याचेच हे लेखक!’\u003cbr\u003eअलीकडे गोरे बनवण्याच्या मलमांच्या जाहिरातींचे पेव फुटले आहे. मग मी मानवाच्या त्वचेच्या रंगाची उत्क्रांती कशी झाली याचा अभ्यास केला. अगदी स्पष्ट आहे की, आपल्या देशातल्या उन्हापावसाला काळ्या-सावळ्या रंगाची त्वचाच आरोग्यप्रद आहे. महाभारतातली अद्वितीय लावण्यवती द्रौपदी कृष्णवर्णा होती. कालिदासाचा यक्ष आपल्या अलकानगरीतल्या प्रेयसीचे वर्णन करताना म्हणतो, ‘तन्वी श्यामा, सडपातळ आणि सावळी.’ मग एक लेख लिहिला : ‘रंगात रंग हा श्याम रंग!’ माझ्या परिचयाच्या एक महिला म्हणाल्या, ‘मी माझ्या सावळ्या मुलीला मुद्दाम वाचून दाखवला. तिचा न्यूनगंड जरा कमी झाला असेल अशी आशा आहे.’ दुसऱ्या एक शाळेतल्या मुलींबरोबर काम करणाऱ्या बाई मुद्दाम भेटायला आल्या. म्हणाल्या, ‘आम्ही हा लेख आमच्या सर्व विद्यार्थिनींना वाचा म्हणून आग्रहाने सांगितले आहे.’ अधूनमधून छोट्याशा कविताही रचून लेखांत वापरतो. लहानपणापासून पक्षांची, खेळांची आवड आहे. आता तर नवनव्या साहसक्रीडा शक्य झाल्या आहेत. मध्यंतरी हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंगचा चित्तथरारक अनुभव घेतला. चक्क आकाशात उडत होतो, आणि एक गिधाड माझ्या १० फूट वर तरंगत होते. मग लेखात एक कविता समाविष्ट केली : वावडी वाहात ही अन् मी गिधाडांच्या सवे, शुद्ध निर्मल शीत वायू, भाग्य मोठे ह्या हवे!\u003cbr\u003eनिसर्गाच्या कलाने, लोकांच्या साथीने विकास कसा साधावा, हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याबद्दल मी सातत्याने लेखन करत आलेलो आहे. परंतु २०१०मध्ये माझ्या अध्यक्षतेखालील पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाच्या कामामुळे मला याबाबत जास्त खोल समज आली आहे; आणि या अहवालासंदर्भात झालेल्या विचारमंथनामुळे तो विषय लोकांपुढे जास्त तीव्रतेने आलेला आहे. या संदर्भात भारतात तीन महत्त्वाचे कायदे मंजूर करण्यात आलेले आहेत. पिकांच्या वाणांचे व शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, जैवविविधता आणि वनाधिकार. हे कायदे बनताना झालेल्या विचारमंथनात, त्या कायद्याचे मसुदे व नियम बनवण्यात मी सहभागी होतो. त्यांचीच पार्श्वभूमी असलेल्या पंचायत राज्यव्यवस्थेबद्दलच्या प्रयोगांतही मी भाग घेतला होता. विशेषतः केरळ शास्त्र साहित्य परिषदेबरोबर सायलेंट व्हॅलीपासून ते पंचायत पातळीवर नियोजन करण्याच्या प्रयोगांपर्यंत. या सर्व अनुभवांच्या संदर्भात आधी राम गुहांबरोबर इ़कॉलॉजी अॅण्ड इक्विटी हे पुस्तक लिहिले होतेच. आता लोकांच्या सहभागाने त्यांच्या नैसर्गिक संसाधनविषयक ज्ञानाचे, विकासासंबंधीच्या इच्छा आकांक्षांचे नीट संकलन करून निसर्ग नियोजन कसे करावे, याचा आराखडा बनवला. त्या संदर्भात इंग्लिशमध्ये व मराठीतही पुस्तिका लिहिल्या. वनाधिकार कायद्याचे विवेचन ‘बहरू दे हक्काची वनराई’ या लेखमालेत व नंतर एका इंग्लिश व मराठी पुस्तिकेत केले. जुना क्रम बदलून आधी मराठी पुस्तिका लिहिली. मग तिचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले. माझ्या स्फुट लेखनातही या संबंधी अनेक लेख लिहिले. त्याचा गाभा ‘आम्हांला विश्वकर्मा हवा, दुःशासन नको’ या स्फुट लेखात छान उतरला आहे.\u003cbr\u003e‘मी कोण आहे?’ असा स्वतःला प्रश्न विचारला, तर मला वाटते मी निसर्गातील, मानवी समाजातील, कलेतील, वाङ्मयातील, ज्ञानविज्ञानातील, सर्व प्रकारच्या सौंदर्याचा उपासक आहे. पंधराव्या वर्षांपासून ७६व्या वर्षांपर्यंत काहीतरी सुंदर लिहावे म्हणून झटत आहे. विशेषतः गेली १२ वर्षे मराठीत नियमित लेखन करायला लागल्यापासून हा सर्जनशीलतेचा आनंद उत्कटतेने अनुभवायला मिळतो आहे. मर्ढेकरांच्या शब्दांत म्हणावेसे वाटते, सौंदर्याचे पसरे बघ हे जगावरी चांदणे, राहिले काय आता मागणे!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eडॉ. माधव गाडगीळ\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\u003cbr\u003e\u003c\/h5\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57176266539311,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/B9BF7F24-6BBB-45DE-895F-73C135419F7D.png?v=1777090458"},{"product_id":"prachin-bharatiya-krushi-vigyan-ancient-indian-agriculture-dr-rajni-joshi","title":"प्राचीन भारतीय कृषि विज्ञान | The Science of Agriculture in Ancient India | Dr.Rajni Joshi","description":"\u003ch5\u003eप्रस्तावना\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eडॉ. रजनी जोशी या संस्कृत विषयाच्या प्राध्यापिका आहेत. पण केवळ साहित्य व तत्त्वज्ञान या विषयावर लक्ष केंद्रित न करता संस्कृतमधील कृषीविज्ञानावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.\u003cbr\u003eवेदकाळापासून ते लोकोपकार ग्रंथापर्यंत संस्कृत साहित्यात जे-जे कृषि-वनस्पतिविषयक संदर्भ आलेले आहेत, त्या सर्वांचा साकल्याने विचार प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे. वेदवाङ्मय व अन्य संस्कृत साहित्य, महाभारत, पुराणे, बौद्ध व जैन वाङ्मय या सर्व प्राचीन ग्रंथांमधून जो कृषिशास्त्राचा व वनस्पतिशास्त्राचा विचार केला गेला आहे, त्याचे महत्त्वाचे संदर्भ लेखिकेने या पुस्तकात संकलित केलेले आहेत.\u003cbr\u003eनक्षत्रे, वृक्षारोपण, बियांची काळजी, पिकांची निगा, कृषिसंवर्धनासाठी महत्त्वाचे उपाय, फळांची काळजी, प्राचीन जलव्यवस्थापन, जमिनीची निगा, कृषिकर्म या सर्व गोष्टींचा विचार प्रस्तुत पुस्तकात आला आहे.\u003cbr\u003eप्राचीन ऋषींची कृषीकडे पाहण्याची दृष्टी अत्यंत पवित्र होती. माता आणि पुत्राचे नाते त्यांच्यामध्ये होते. हा विचार सुरपालांचा ‘वृक्षायुर्वेद’ वाचताना प्रकर्षाने जाणवतो. त्याचबरोबर वृक्ष-वनस्पतींची पूजा हा विषय महत्त्वाचा वाटतो. प्राचीन कृषीविज्ञानातील काही विशेष संदर्भ आजच्या काळात उपयुक्त ठरले आहेत.\u003cbr\u003eप्राचीन भारतीय कृषि विज्ञान हे पुस्तक लिहिताना इक्रिसॅटचे चेअरमन डॉ. वाय. एल. नेने यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. तसेच या विषयातील अनेक तज्ज्ञांच्या कृषि-विषयक विचारांचा परामर्श घेता आला. हा विषय 'दैनिक ॲग्रोवन'मध्ये लेखरूपाने प्रसिद्ध झाला होता. त्याचे आज पुस्तकरूपात होणारे रूपांतर अतिशय आनंददायी आहे. लेखनकार्यात रजनी जोशी यांना त्यांचे कृषी क्षेत्रातील जाणकार पती श्री. रामचंद्र जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. ते स्वतः एक प्रगतिशील शेतकरी आहेत.\u003cbr\u003eभारतीय कृषि विज्ञान केवळ प्राचीन म्हणून दुर्लक्षून चालणार नाही; तर त्यातील अनेक महत्त्वपूर्ण व मौलिक गोष्टींचे संदर्भ आजही किती उपयुक्त ठरणारे आहेत, यावर या पुस्तकाने निश्चितच प्रकाश पडेल, याची मला खात्री आहे.\u003cbr\u003eसंस्कृतमधील विज्ञान जनसामान्यांसमोर आणण्याची रजनी जोशींची तळमळ लक्षणीय आहे. या पुस्तकाने भारतीय कृषी क्षेत्राला एक दिशा मिळेल, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ‘सकाळ प्रकाशन’ने त्यांना या कामी जे मोलाचे सहकार्य केले आहे, ते स्पृहणीय आहे.\u003cbr\u003eडॉ. कल्याण काळे\u003cbr\u003eसेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख, पुणे विद्यापीठ\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\n\u003cbr\u003eविषयप्रवेश\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eआज आपण शेती हा एक व्यवसाय म्हणून पाहतो. प्राचीन काळामध्ये शेती हा एक निसर्गाचा भाग आहे, असा दृष्टिकोन ऋषीमुनींचा होता. त्यामुळे आजूबाजूच्या वृक्षवल्लींसह पक्षी, प्राणिमात्रांचा विचार त्यांनी केल्याचे दिसून येते.\u003cbr\u003eप्राचीन वैदिक वाङ्मयाचा विचार करताना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके व काही उपनिषदांमधून प्राचीन कृषी व वृक्ष-वनस्पतींचे संदर्भ सापडतात. ‘सुश्रुतसंहिता’, ‘चरकसंहिता’, ‘सूत्रसंहिता’, महाभारत, पुराणे, बौद्ध व जैन वाङ्मय, ‘कृषी पराशर’, ‘कौटिलीय अर्थशास्त्र’, पाणिनीची ‘अष्टाध्यायी’, तमीळ भाषेतील ‘संगम साहित्य’, ‘मनुस्मृती’, वराहमिहिराची ‘बृहत्संहिता’, अमरसिंहाचा ‘अमरकोश’, ‘काश्यपीय कृषिसुक्ती’, ‘उपवनविनोद’, ‘काश्यपसंहिता ज्ञानकांड’ व सुरपालांचा ‘वृक्षायुर्वेद’ या सर्व प्राचीन साहित्यातून कृषी व वनस्पती यांचे अत्यंत विपुल व महत्त्वाचे संदर्भ मिळतात, ते संदर्भ अत्यंत मौलिक असून आजही मार्गदर्शक आहेत.\u003cbr\u003eमनुष्य व सभोवतालचा निसर्ग हे वेगवेगळे नाहीत. मानव हा अतिविशाल निसर्गातील एक लहानसा घटक असून, निसर्गातील प्रत्येक घटकाचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. या निसर्गाचा भूतकाळातील, वर्तमान काळातील स्थितीचा अभ्यास व निरीक्षण यातून मानवी जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न प्राचीन विचारवंतांनी, शास्त्रज्ञांनी, ऋषीमुनींनी केला. निसर्गसृष्टी, कृषी, वृक्षवनस्पती, पशुपक्षी व पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश ही पंचमहाभूते यांच्या अनेक वर्षांच्या चिंतनातून विज्ञानाधिष्ठित तत्त्वज्ञान मांडले. त्याचे फलरूप म्हणजे प्राचीन ‘कृषिविज्ञान’!\u003cbr\u003eत्या वेळी उपकरणे, सामग्री यांची भौतिक प्रगती प्राथमिक अवस्थेतील असली, तरी निरीक्षण व त्यातून उपलब्ध झालेल्या कार्यकारणभावातून भौतिक सृष्टीचे समाजाला हितावह होईल असे नियमन ऋषींनी केले. त्यांचे निष्कर्ष प्राचीन संस्कृत वाङ्मयातून विखुरले आहेत. त्यातून सृष्टिविज्ञानाचे अभ्यासपूर्ण दर्शन घडते.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसृष्टीतील संक्रमणावस्था\u003cbr\u003eसर्व चराचर सृष्टीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या निरीक्षणातून ऋषींना लक्षात आले, की कोणतीही निर्माण झालेली वस्तू एकूण सहा अवस्थांमधून संक्रमित होत जाते. त्या सहा अवस्था म्हणजे जायते (वस्तू जन्माला येते), अस्ति  (वस्तूला सत्ता प्राप्त होते), वर्धते (ती वस्तू वाढू लागते), विपरिणमते (तिच्यात बदल होतात), अपक्षीयते (ती वस्तू हळूहळू क्षय पावते), विनश्यति (शेवटच्या अवस्थेत नाश पावते). या सहा अवस्थांमधून मनुष्य, पशुपक्षी, वृक्ष, वनस्पती या सर्व सचेतनांना संक्रमण करावे लागते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eआज मानवाची कृषीकडे पाहण्याची दृष्टी\u003cbr\u003eआज मानव कृषी विषयाकडे एक व्यवसाय म्हणून पाहतो. प्राचीन काळी ती त्याची जीवनशैली होती. प्राचीन ऋषींनी वर्तवलेले पावसाचे अंदाज आजही तंतोतंत ठरतात. कोणत्या नक्षत्रात पेरणी करावी, कोणत्या नक्षत्रातील पाऊस चांगले असतात व कोणत्या नक्षत्रातील नसतात; उदाहरणार्थ, विशाखा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाने उंदरांची संख्या जमिनीत वाढते व नंतरच्या नक्षत्रात येणाऱ्या मांजऱ्या पावसामुळे त्या उंदरांचा नायनाट होतो, हे प्राचीन ऋषींचे निरीक्षण आजही बरोबर आहे. नक्षत्रांचा लोखंडी चरणात पडणारा पाऊस जमीन लोखंडासारखी बनवतो. प्राचीन ऋषींनी मांडलेली नांगरांची मापे, बैलांच्या अवजारांची शास्त्रोक्त मापे आजही बरोबर आहेत. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी पर्जन्यवृष्टीच्या अंदाजाबद्दल बोलताना किंवा इतर शेतीकामाबद्दल बोलताना नक्षत्रांचा उल्लेख करतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eप्राचीन ऋषींचे जाणतेपण\u003cbr\u003eडॉ. पंचमुखी यांच्या मतानुसार, प्राचीन ऋषी ‘शास्त्रज्ञ’ होते. यांत्रिक प्रगती नसलेल्या काळात सूक्ष्म निरीक्षण, परीक्षण, अभ्यास व अनुभव यांवरून ऋषींनी स्वतंत्र शास्त्रे तयार केली. प्राचीन ऋषींचे ‘जागृत ज्ञान’ विज्ञानाच्या सर्व कक्षा प्रकट करणारे आहे. मानवी जीवनाचा प्राण असलेल्या, अन्न देणाऱ्या वृक्ष, वनस्पती आणि पाणी या विषयावर प्राचीन ऋषींनी अत्यंत सूक्ष्म व अभ्यासपूर्ण दृष्टीने विचार केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eसंस्कृत भाषेतील विज्ञान\u003cbr\u003eसंस्कृत भाषेत विज्ञानाची बीजे लपलेली आहेत. वनस्पतिशास्त्र, ग्रहगणितशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, धनुर्वेद, संगीतशास्त्र, यज्ञशास्त्र, पंचमहाभूतांचे शास्त्रीय विवेचन, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, कृषिशास्त्र, जलशास्त्र, धर्मशास्त्र, दंडनीतिशास्त्र, नीतिशास्त्र, भाषाशास्त्र, संख्याशास्त्र, वास्तुशास्त्र, प्राणिशास्त्र, नृत्यशास्त्र, नाट्यशास्त्र यांमधून संस्कृत विज्ञानाचा विस्तार झाला आहे. समृद्ध संस्कृत भाषेतील या विज्ञानाची ओळख करून घेणे आज काळाची गरज आहे. प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर व प्रदीर्घ चिंतनातून शास्त्रीय पायावर केलेल्या संशोधन, सूत्राची आधुनिक विज्ञानाच्या निकषांवर घासून त्यातील शास्त्रीयता पडताळून पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकृषिमहत्त्व\u003cbr\u003eशेतीचे पृथ्वी, गो म्हणजे बैल, बीज, स्वामी हे चार स्तंभ असून, यातील एक जरी स्तंभ नसेल तर ती कृषी निष्फळ असल्याचे मत पराशरांनी व्यक्त केले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eवृक्षायुर्वेद विचार\u003cbr\u003eवृक्षाच्या सचेतनत्वाचे व उपयुक्ततेचे संदर्भ वेदात ठिकठिकाणी सापडतात. महाभारतात मोक्षधर्म पर्वात भृगू भारद्वाज ऋषींच्या संवादातून समग्र चिंतन व्यक्त झाले आहे. वराहमिहिरची बृहत्संहिता, काश्यप ऋषींची काश्यपसंहिता (ज्ञानकांड), अग्निपुराण, सुरपालांचा वृक्षायुर्वेद, उपवनविनोद विश्ववल्लभ या संहिता व ग्रंथांमधून वृक्षायुर्वेदाचा सर्वांगीण विचार केला आहे.\u003cbr\u003e‘वृक्षायुर्वेद’ म्हणजे वृक्षाचे मूळ, साल, पान, फूल व फळ हे पंचांग मानून त्यांची चिकित्सा करणारे शास्त्र. या पाच अंगांपैकी कोणत्याही एका अंगाला कोठेही रोग होऊ शकतो. रोगामुळे वृक्ष नष्ट झाले तर नवीन वृक्ष लावून त्याची फळे मिळेपर्यंत फार मोठा काळ जावा लागतो. त्याऐवजी रोगग्रस्त वृक्षाची चिकित्सा करून उपाययोजना करण्याविषयी मार्गदर्शन केले आहे. या शास्त्रात कलम करणे (रोपण), एका जागेवरून दुसऱ्या जागेवर संपूर्ण वृक्षाचे मुळासकट रोपण करणे (संक्रमण विरोपण) यांसारख्या विषयांनाही स्पर्श केला आहे. वेदापासून ते सुरपालांच्या वृक्षायुर्वेदापर्यंत वनस्पतिशास्त्राचा आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक स्तरांवर विचार केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eसर्वात महत्त्वाचे\u003cbr\u003eआपल्या जनन्याचे व्यवस्थापन आपल्या पित्यावर सोपवता येईल, स्वयंपाकघराचे व्यवस्थापन आपल्या मातेवर सोपवता येईल, गुराढोरांचे व्यवस्थापन बरोबरीच्या व्यक्तीवर सोपवता येईल. मात्र, आपले शेत स्वतः शिवाय दुसऱ्या कुणाच्याही देखभालीखाली ठेवू नये, हा अत्यंत महत्त्वाचा विचार कृषी पराशर ग्रंथात आला आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e \u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57176504795439,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/DB0670EF-26C9-4D8F-A449-BCBE7A3C01AB.png?v=1777090563"},{"product_id":"sahyadri-nisargacha-anamol-theva-purnima-fadke-sharmila-dev","title":"सह्याद्री - निसर्गाचा अनमोल ठेवा | Sahyadri: Nature's Invaluable Treasure | Purnima Fadke \u0026 Sharmila Dev","description":"\u003ch5\u003eप्रस्तावना\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eलेखक व शास्त्रीय माहितीचे संकलक अशा दुहेरी भूमिकेतून आम्ही या पुस्तकाची मांडणी केली आहे. पश्चिम घाटाच्या महाराष्ट्रातील डोंगर-पर्वतरांगांना आपण सह्याद्री म्हणतो. सह्याद्री परिसरात अनेकजण पर्यावरण संवर्धन व त्याची जपणूक या विषयांशी संबंधित काम शाळांमधून किंवा गावकऱ्यांसोबत करू इच्छितात. अशा इच्छुकांना डोळ्यांसमोर ठेवून हे पुस्तक तयार केले आहे. प्रत्यक्ष निसर्गातच राहणारे रहिवासीच तिथल्या निसर्गाला जपूं शकतील, त्याची काळजी घेऊ शकतील, असे आम्हाला तीव्रतेने जाणवत होते. त्यांना लहानपणापासून इतर शिक्षणाबरोबरच पर्यावरणाचे शिक्षण देणे गरजेचे आहे, हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणायचा ठरवला.\u003cbr\u003eजिथे निसर्ग अजूनही थोड्या प्रमाणात टिकला आहे अशा भीमाशंकर येथील अभयारण्याच्या जवळील टोकावडे व तेरुंगण येथील आश्रमशाळेत जून २००८ साली काम सुरू केले. प्रत्यक्ष मुलांबरोबर काम करायचे व त्याचबरोबर तिथल्या स्थानिक, जरा मोठ्या मुलांना प्रशिक्षक म्हणून तयार करायचे - ज्यायोगे हे काम प्रकल्प संपल्यावर पुढे चालू राहील, अशी योजना होती.\u003cbr\u003eशहरापासून दूर, एका जंगलातील आश्रमशाळेत तीन वर्षे काम करताना निरनिराळे अनुभव आले, विचारांची देवाणघेवाण झाली. त्यातून प्रशिक्षकांसाठी काही साहित्य तयार केले गेले व नंतर हे लिखाण आणखी इतरांना, जे या पर्यावरण-जागृती व पर्यावरण शिक्षण क्षेत्रात काम करू इच्छितात त्यांना पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावे अशी कल्पना मनात आली. पर्यावरणाबद्दल जनजागृती म्हणजे नक्की काय करायचे, मुलांबरोबर कुठले विषय चर्चेला घ्यायचे, कुठली शास्त्रीय माहिती कार्यकर्त्यांना असायला हवी, त्यांचा क्रम काय असावा, त्यात किती खोलवर जायचे; ही उत्तरे शोधायला हे पुस्तक मदत करेल असे आम्हाला वाटते. आपल्या देशात सुरू झालेल्या पर्यावरण चळवळीला या पुस्तकाचा हातभार लागेल अशी आशा आहे.\u003cbr\u003eभीमाशंकरच्या आश्रमशाळेत काम करायला लागल्यावर हळूहळू अनेक गोष्टी लक्षात यायला लागल्या. शहरांमधील शाळेतील मुले व आश्रमातील मुले यांची बुद्धिमत्ता, आकलनशक्ती यादृष्टीने काहीच फरक नव्हता. पण बाह्यजगातील विचार, समस्या इत्यादींशी त्यांचा अजून फारसा संबंध आला नव्हता. त्यांची ही पार्श्वभूमी आम्ही लक्षात ठेवली. शिक्षणाच्या ज्या नव्या पद्धती आम्ही वापरणार होतो, त्या अंगवळणी पडायला वेळ लागणार होता. त्यांच्यात मिसळणे, त्यांना आपलेसे करणे हे एक आव्हान होतेच; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ही मुले जंगलात राहत होती. जातायेता रोजच त्यांचा संबंध जंगल, ओढे, नद्या, पक्षी-प्राणी यांच्याशी येत होता. या सर्वांवाबतची आपुलकी, त्यांच्या अस्तित्वाचे महत्त्व व त्यांच्या जपणुकीची आवश्यकता, अशी दृष्टी त्यांच्यात निर्माण करायची, हेही एक आव्हान होते.\u003cbr\u003eमुलांना पारंपरिक शिक्षणपद्धतीची सवय होती. आमच्या पद्धतीत त्यांचा सहभाग मोठा व जास्त महत्त्वाचा ठरणार होता. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळणार होती. शिवाय खेळ-गाणी-चित्रे अशा वेगळ्या माध्यमांशी त्यांचा परिचय होणार होता. या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही कामाची आखणी केली.\u003cbr\u003eभाषा :  प्रथम ठरवले भाषेबद्दल. भाषा अगदी सोपी, शक्यतो बोलीभाषा वापरायचे ठरवले. शास्त्रीय माहिती देताना शास्त्रीय शब्द 'ज्ञान' म्हणून दिले; पण त्या कल्पना सोप्या शब्दात मांडल्या.\u003cbr\u003eपद्धत : माहिती म्हणून महत्त्वाचा कुठलाच मुद्दा वगळला जाऊ नये याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष काम करताना आपण सांगतो ते मुलांना समजते का त्याची पडताळणी केली. सर्व विषयांची माहिती संवादाच्या माध्यमातून दिली. खेळ, गाणी, कोडी, फिल्म्स, स्लाइड्स, भटकंती इ. मार्गांनी त्यांना अनुभव द्यायचा, निरीक्षण करायला प्रवृत्त करायचे ठरवले.\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\n\u003cbr\u003eपुस्तकाची रचना\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eविभाग १ : पहिल्या विभागात पर्यावरणाच्या मूलभूत कल्पना स्पष्ट केल्या आहेत.\u003cbr\u003eविभाग २ : दुसऱ्या विभागात सह्याद्री परिसरासंबंधित पर्यावरणाच्या दृष्टीने निरनिराळ्या मुद्द्यांची चर्चा केली आहे. ही चर्चा करताना सह्याद्री परिसरातील उदाहरणे निवडली आहेत. 'सह्याद्रीचा परिसर' ही या पुस्तकाची पार्श्वभूमी ठरते. आवश्यक वाटेल तिथे मात्र भारताच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ, परिसंस्थेसंबंधी चर्चा करताना भारतातील इतर ठिकाणच्या परिसंस्थांचा जरी उल्लेख आला असला तरी जंगल आणि नद्यांसारख्या परिसंस्थांबाबत सह्याद्रीतील परिस्थिती लक्षात घेऊन अधिक माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जीवविविधतेला असलेले धोके आणि जीवविविधता संवर्धन हे जरी पहिल्या विभागातले मुद्दे असले तरी त्या मुद्द्यांबाबत सखोल माहितीसाठी सह्याद्रीची विविधता या विषयाची चर्चा करून मगच ही प्रकरणे घेतली आहेत. या पुस्तकात केस स्टडी म्हणून भीमाशंकरची उदाहरणे दिली आहेत. प्रत्येक प्रकरणानंतर कृती करण्यासाठी काही खेळ, कोडी दिली आहेत. त्यावरून प्रशिक्षकाने आपल्या कल्पनेनुसार नव्या कृती करून घेणे अपेक्षित आहे.\u003cbr\u003eविषयाची निवड : स्थानिक विषयांना प्राधान्य दिले. उदाहरणार्थ, भीमाशंकरचे जंगल, तिथल्या नद्या-ओढे, तिथले पक्षी, वन्य प्राणी इत्यादी. त्याचबरोबर पुढची पायरी म्हणून या सर्वांचा आपल्या राज्यातील, देशातील व जगातील निसर्गाशी कसा संबंध आहे ते सूचित केले. पण सुरुवात मात्र त्यांच्या अनुभवविश्वाशी घट्ट निगडित ठेवली. निसर्गाबद्दल ज्ञान होईल असे विषय तर निवडलेच, शिवाय त्याच्या अस्तित्वाचे महत्त्व अधोरेखित केले, त्याची जपणूक करणे गरजेचे आहे ही जाणीव निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवले.\u003cbr\u003e२१ व्या शतकातील जगाच्या नागरिकाचे व्यक्तिमत्त्व कसे असावे, त्याला कुठल्या जाणिवा असायला हव्यात याचे उत्तर देताना त्याने पर्यावरण जपण्यासंबंधी जागरूक असावे हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. ही काळाची गरज आहे. जागृत तर असायला हवेच, पण कृतिशीलतेला आम्ही तितकेच महत्त्व देतो; हे जाणीवपूर्वक नमूद करावेसे वाटते.\u003cbr\u003eया पुस्तकाचा वापर करणाऱ्यांकडून आमची अपेक्षा : पर्यावरण शिक्षण देताना 'पास-नापास, कमी-जास्त गुण' या चक्रात मुलांना न अडकवता त्यांच्यात पर्यावरणाबद्दलची आपुलकी, निसर्ग जपणुकीची दृष्टी निर्माण करायची हे ध्येय असावे. आपण निसर्गसंवर्धनात सहभागी व्हावे, अशी प्रेरणा त्यांना मिळायला हवी. 'पर्यावरण-शिक्षण' या उपक्रमाचे मूल्यमापन नेहमीपेक्षा वेगळे असेल. विद्यार्थी निसर्गाचा मित्र व रक्षक झाला आहे का ते त्याच्या वागण्यातून, व्यवहारातून, जीवनशैलीतून पारखावे लागेल. निसर्गाच्या अस्तित्वाला, निसर्गचक्रांना बाधा येईल असे रोजच्या जीवनातील छोटेछोटे प्रसंग निवडून मुलांना विचार करायला सांगावे : 'या परिस्थितीत आपण एक निसर्गमित्र म्हणून काय करायला हवं?' त्यांच्यात एकत्र काम करायची, पुढाकार घ्यायची वृत्ती निर्माण करावी, हीदेखील एक अपेक्षा आहे. पुढच्या जीवनात व्यवहार करताना ते निसर्गाचे मित्र, रक्षक म्हणूनच राहतील व आपली जीवनशैली निसर्गसंवर्धनाला अनुसरून ठेवतील, हेच आमचे लक्ष्य आहे.\u003cbr\u003eपूर्णिमा फडके आणि शर्मिला देव\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57219262153007,"sku":null,"price":490.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/0407FC0C-FAA2-4FF1-9ECF-26109252D8B4.jpg?v=1777091920"},{"product_id":"saad-ranwatanchi-call-of-wild-trails-marathi-nature-book","title":"साद रानवाटांची | The Call of the Wild Trails | Anuj Suresh Khare","description":"\u003ch5\u003eसाद अरण्यवाटांची\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eअग्निपंखांची नक्षी उमटे पाहा तिथे आकाशी\u003cbr\u003eनव्या घराचा हट्ट धरे सुगरण आपल्या सख्याशी\u003cbr\u003eदूर दाट जंगलामधुनी कस्तुर तो वाजवी पावा\u003cbr\u003eदूरदेशीचे पक्षी येऊनी, पुन्हा जाती आपल्या गावा\u003cbr\u003eकधी वर कधी खाली, वेडा राघू दावी कसरती\u003cbr\u003eकुठे दयाळ तर कुठे सुभग छेडितो मधुर सूर साती\u003cbr\u003eकुणी हेमंताची वार्ता सांगे, कुणी वर्षाचा सांगावा\u003cbr\u003eउंच भरारी घेऊन कोणी नभावरी आपला हक्क सांगावा\u003cbr\u003eपक्ष्यांची या भाषा समजुनी त्यांच्या दोस्तीचा छंद जडावा\u003cbr\u003eविहंगगानात स्वर मिसळूनी अवघा जन्म समृद्ध व्हावा\u003cbr\u003eहिरव्या रंगाची जादू चढता कुठे मृगांची माळ फुले\u003cbr\u003eदोन तरूंची भेट घडवी कपिकबिल्याचे गगनझुले\u003cbr\u003eकुठे फळांचा सडा पाहुनी गजराजाची उडते घाई\u003cbr\u003eकधी नजरेची परीक्षा पाही धूर्त बिबळ्याची चतुराई\u003cbr\u003eरानकुत्र्यांचा संघ सांगे ऐक्याला कधी मात नसे\u003cbr\u003eपदस्पर्शाने भूमी जिंकता कुठे वाघाचा डौल दिसे\u003cbr\u003eअरण्यवाटांची साद ऐकुनी चला निसर्गाची कास धरू\u003cbr\u003eत्याच्या रक्षणाचा ध्यास घेऊनी आपलेच भविष्य उजळ करू\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eओंकार पांडुरंग बापट\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e \u003cbr\u003eनिसर्गवाचनाचा श्रीगणेशा\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eपूर्वी आम्ही जंगलात फिरायला जातोय असं सांगितल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया मजेशीर असायच्या. काय करणार जंगलात जाऊन? काय बघणार? किंवा अगदी ‘ह्या... जंगलात काय जायचं?’ इथपर्यंत आमच्या कानावर पडायचं. मग हळूहळू आम्ही जंगलात जाऊन काय करतो, काय मजा येते, काय आनंद घेता येतो हे कळल्यावर समोरच्याच्या चेहऱ्यावरील रेषांमध्ये थोडा फरक पडायचा. पण तरीही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव ठेवून समोरचा मनुष्य निघून जायचा. या काळात निसर्ग पर्यटनाची व्याप्ती बंद गाडीतून जंगलदर्शन करण्याएवढीच मर्यादित होती. मात्र आता दिवस बदललेत. निसर्ग पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. किंबहुना आताच खरी निसर्ग जबाबदारीने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. खरं तर निसर्ग ही नुसती पाहण्याची गोष्ट नसून, त्याच्यापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.\u003cbr\u003eमला वाटतं, आपलं निसर्गाशी एक खास नातं आहे. कधी तो आपला गुरू असतो, कधी तो आपला सखा असतो. आपण ज्या चष्म्यातून त्याच्याकडे बघू तसा आपल्याला सापडणारा हा निसर्ग. निसर्गावर प्रेम करणारा मनुष्यप्राणी न सापडणे विरळाच. अगदी लहानपणापासून आपल्याला निसर्गाची ओढ असतेच. अगदी वृद्धापकाळातही निसर्ग आपल्याला बालपणाची आठवण करून देतो. म्हातारपण विसरायला लावतो. म्हणूनच प्रत्येकाचं निसर्गाशी आपलं स्वतःचं असं नातं आहे. निसर्गात माणूस त्याचं वय, समाजातील स्थान, आर्थिक स्थिती, सगळं सगळं विसरतो. अगदी लहान मुलाला आपण जरा एकटं सोडलं, की आपल्या इवल्या डोळ्यांनी सभोवतालचा निसर्ग मनसोक्त पिण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याला त्याचा अर्थ समजत नसला तरीही. मोठे झाल्यावर तर आपल्या निसर्गाबद्दलच्या विचारांना वेगळे आयाम मिळतात. जसजसं वय वाढत जाईल, तसतसं आपले निसर्गाबद्दलचे विचार आणि त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते.\u003cbr\u003eमी गेली २४ वर्षं निसर्गात भटकतो आहे. मी माझ्या स्वतःच्या बाबतीत जरी विचार केला तरी मला निसर्गाने बऱ्याच गोष्टी शिकवल्या. अगदी मुंगीपासून ते हत्तीपर्यंत मी निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून काही तरी शिकलो आहे. मुंग्या आपल्याला कठीण परिश्रमांचं मोल शिकवतात. पाण्यात एका पायावर उभं राहून तपश्चर्या केल्यासारखी आपल्या भक्ष्याची वाट पाहणारा बगळा आपल्याला संयमाचं महत्त्व पटवतो. समूहाने शिकार करण्यात तरबेज असणारी रानकुत्री आपल्याला एकसंघ होऊन काम करण्याची शिकवण देतात तर उंच अवकाशात उडणारे फ्लेमिंगो पक्षी एकमेकांमध्ये असलेला समन्वय दाखवून देतात. पावलापावलाला भूमी पादाक्रांत करणारा वाघ आपल्याला स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याचं शिक्षण देतो तर स्वतःचं कुटुंब सांभाळून राहणारे हत्ती एकमेकांबद्दल घ्यायची काळजी दर्शवतात.\u003cbr\u003eसर्वात मुख्य म्हणजे माणूस सोडून निसर्गातील इतर सर्व घटक निसर्गाने घालून दिलेल्या नियमांना धरूनच वागतात. स्वार्थी वृत्ती ही जीवनाला अधोगतीकडे नेते. आपण अगदी आपल्या परिसंस्थेतील सर्वोच्च घटकाचे म्हणजेच वाघाचे जरी उदाहरण घेतले तरी आपल्या हे लक्षात येईल, की प्राणी निसर्गाच्या नियमांचं किती काटेकोरपणे पालन करतात. भूक लागेल तेव्हाच शिकार करणे हा मांसाहारी प्राण्यांचा स्थायीभाव आहे. किंबहुना निसर्गाने आपला समतोल राखून ठेवण्यासाठी घातलेला तो नियम आहे. मी अनेकदा चितळांच्या कळपाशेजारून शांतपणे जाणारा वाघ पाहिला आहे. अशा वेळी भूक लागलेली नसल्याने तो त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्या अनुभवानुसार खूप चांगल्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. बहुतेक वेळा त्या निसर्गाचा आधार घेऊनच सांगितल्या आहेत.\u003cbr\u003eप्राण्यांना त्यांच्या भावना कधीच लपवून ठेवता येत नाहीत. आईचं आपल्या पिलांबद्दल असलेलं प्रेम वादातीत आहे. कुठल्याही प्राणी, पक्ष्याच्या आईकडून आपल्या पिलाचं संगोपन भाव ओतून केलं जातं. तुम्ही धनेश पक्ष्याचं उदाहरण घ्या. धनेश पक्ष्याची मादी, पिलांना जन्म देण्याआधी ढोलीत स्वतःला बंद करून घेते. अंडी उबवणे, पिल्लं बाहेर आल्यावर त्याचं संगोपन करणे, घरट्याची नियमित साफसफाई करणे ही कामं ती ढोलीत राहून करते. तितकंच कौतुक नर धनेश पक्ष्याचं आहे. जितके दिवस मादी ढोलीत राहते, तितके दिवस ती तिच्या अन्नासाठी पूर्णपणे नरावर अवलंबून असते. मादी ढोलीच्या बाहेर येईपर्यंत, नर धनेश पिल्लांबरोबरच मादीलाही अन्न पुरवतो आणि पिल्लं आणि मादी यांची काळजी घेतो.\u003cbr\u003eमार्जारकुळामध्ये तर आईने शिकवल्याशिवाय पिलांना त्यांच्या पुढील आयुष्यात शिकार करता येत नाही. आईजवळ असेपर्यंत पिल्लं संपूर्णपणे आईवर अवलंबून असतात. या काळात त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम पाहण्यासारखं असतं. वाघांच्या अशा आई आणि पिलांचं निरीक्षण करण्यात मी अनेक वेळा तासन् तास घालवले आहेत. पिलांचं एकमेकांबरोबर खेळणं, आईच्या अंगावर उड्या मारणं, आईचं अनुकरण करणं, आईने त्यांची काळजी घेणं हे पाहण्यात जो आनंद मिळतो, त्याची तुलना इतर कोणत्याही गोष्टीशी करता येणार नाही. वाघांमध्ये आईने आपल्या पिलांच्या रक्षणासाठी तिच्यापेक्षा जास्त ताकदीच्या नराशी दोन हात केल्याची उदाहरणंही आहेत.\u003cbr\u003eप्राण्यांमध्ये एक वृत्ती अगदी सहजतेने आढळून येते ती म्हणजे सावधानता. चितळं अगदी मोकळ्या मैदानात चरत असली तरी कमालीची सावध, चौकस असतात. कोणताही धोका दिसला, जाणवला तरी आपल्या इतर बांधवांना सावध करण्याचं काम ती चोख करतात. अशी सावधानता बाळगली तरच आपण टिकून राहू शकू, जगू शकू हे त्यांना पक्कं माहीत असतं. आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये आवश्यक बदल करण्याची कला प्राण्यांनी उत्तम राखली आहे. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत स्वतःला ढाळून घेण्याच्या क्रियेत माहीर असणारा बिबट्या त्याचं उत्तम उदाहरण आहे. असे बदल केले नाहीत तर आपली जात टिकून राहणार नाही, ती नामशेष होईल हे प्राण्यांना उमजलं आहे.\u003cbr\u003eपूर्वी आम्ही जेव्हा जंगलात जायचो, तेव्हा त्या पर्यटनाला जंगल पर्यटन यापेक्षा निसर्ग शिबिराचं स्वरूप असायचं. त्यात आम्ही किमान तीन-चार दिवस त्या जंगलात राहत असू. जंगलातील प्रत्येक बाबीवर प्रकाश टाकण्याचा, त्याचा अभ्यास करण्याचा आमचा प्रयत्न असायचा. बर्डिंग सेशन, बोटॅनिकल सेशन, नेचर गेम्स, आकाश दर्शन, जंगल सफारी, इ. अनेक सत्रांनी ही शिबिरं भरलेली असायची. याशिवाय पाणवठ्यावर होणाऱ्या घडामोडींचं निरीक्षण करण्यासाठी एखाद्या पाण्याकाठच्या मचाणावर बसण्याचीही मुभा असे. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे साहजिकच शिबिराला आलेल्या प्रत्येकाचं निसर्गाशी वेगळं नातं तयार होत असे. एकदा का ही नाळ जुळली की त्यातून निसर्ग-अभ्यासक तयार व्हायचे. आता अशा प्रकारचे कार्यक्रम असलेली शिबिरे घेणाऱ्यांची संख्याच कमी झाली आहे. बहुतेक सर्व पर्यटन हे केवळ वाघ दिसण्यावर अवलंबून राहायला लागले आहे.\u003cbr\u003eनिसर्ग पर्यटनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मध्य प्रदेशमधील आणि राजस्थानमधील जंगलं कायमच आघाडीवर होती. निसर्ग पर्यटनाचा विकास या राज्यांत मोठ्या प्रमाणावर आणि काही वर्षांपूर्वीच झाला होता. याउलट निसर्ग पर्यटनाच्या वाढीसाठी आपल्या महाराष्ट्रात थोडे उशिरा प्रयत्न करण्यात आले. मात्र गेल्या काही वर्षांत आपल्याकडेही निसर्ग पर्यटन बहरास आलं आहे. हळूहळू बंद गाड्यांची जागा खुल्या जिप्सींनी घेतली. जंगलाचा आस्वाद पर्यटकांना खुलेपणाने घेता यायला लागला. या खुल्या गाड्यांमधून वाघ पाहण्याची, त्यातील थरार अनुभवण्याची मजा पर्यटकांना कळायला लागली आणि निसर्ग पर्यटन वाढीस लागलं.\u003cbr\u003eया सर्वाचा सर्वात महत्त्वाचा फायदा हा स्थानिक आदिवासी लोकांना झाला. त्यांचं जंगलावर असणारं अवलंबित्व थोड्या प्रमाणावर कमी झालं. त्यांना अधिक रोजगार विविध माध्यमातून मिळायला लागला. गाईड बनून पर्यटकांना जंगलाची ओळख करून देणं, आलेल्या पर्यटकांची राहण्याची आणि खानपानाची व्यवस्था करणं असे अनेक रोजगाराचे पर्याय स्थानिक आदिवासी लोकांसमोर खुले झाले. त्यामुळे साहजिकच वनविभागाला त्यांचं जंगलाबाहेर पुनर्वसन करणं सोपं झालं. या वाढलेल्या पर्यटनाचा हॉटेल व्यवसायालाही तेवढाच फायदा झाला. जंगलाच्या बाहेरच्या भागात नवीन हॉटेल निर्माण झाली आणि यामुळे हॉटेल व्यवसायातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. भारतातल्या निसर्गाने परदेशातील निसर्गप्रेमींनाही भुरळ घातली आणि हळूहळू त्यांची पावलंही भारतातील जंगलांकडे वळायला लागली. जागतिक पर्यटन वाढीस लागल्यामुळे साहजिकच भारताच्या आर्थिक गंगाजळीतही वाढ व्हायला लागली. आज भारतातले पर्यटक भारतातील व्याघ्र प्रकल्पांना ज्या संख्येने भेट देतात, तेवढेच परदेशी पर्यटकही भारतातील जंगलांना भेट द्यायला लागले आहेत.\u003cbr\u003eमहाराष्ट्रातील वाढलेल्या या निसर्ग पर्यटनाचा ओघ काही अंशी इतर बाजूंकडे वळवण्यात वनविभागाला यश आले आहे. ताडोबासारख्या जंगलात मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद पाहून कोअर भागाबरोबरच बफर भागातही वनविभागाने पर्यटन सुरू केलं. कोअर झोन म्हणजे एखाद्या अभयारण्याचा अथवा व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य गाभा तर बफर झोन म्हणजे या भागाबाहेर असलेलं राखीव जंगल. ताडोबासारख्या ठिकाणी कोअर झोन हाउसफुल्ल व्हायला लागल्यावर पर्यटकांची पावलं या बफर भागांकडे वळायला लागली. हळूहळू या भागातील पर्यटनही वाढायला लागलं आहे. वनविभागाने या भागात निसर्ग भ्रमंती, सायकल पर्यटन, वनविभागाच्या हत्तींना तलावावर आंघोळ घालणे असे पर्यटनाचे प्रयोग सुरू केले आहेत आणि यालाही पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.\u003cbr\u003e‘पर्यटन’ आणि त्यातून महसूल निर्मिती हा वनविभागाचा निसर्गाकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन आहे. ‘निसर्गसंवर्धन’ याच बाबीला आजवर वनविभागाने प्राधान्य दिलं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास सर्व जंगलांतील पर्यटनाचे दर वनविभागाने समान ठेवले पाहिजेत, असं माझं मत आहे. तसेच हे दर सर्वसामान्य जनतेला परवडतील असेच असायला हवेत. सर्वसामान्य माणसाला आपण जेवढं निसर्गाच्या जवळ नेऊ, तेवढाच तो निसर्ग संरक्षणाचा शिलेदार बनेल.\u003cbr\u003eया वाढत्या पर्यटनाचा अभ्यास केल्यावर माझ्या असं लक्षात आलं, की हे सर्व पर्यटन केवळ आणि केवळ वाघाभोवती फिरत आहे. पर्यटकांचाही जंगलात जाण्याचा दृष्टिकोन वाघ बघायला जायचं हाच व्हायला लागला आहे. पर्यटकांच्या या बदललेल्या मानसिकतेमुळे येणाऱ्या पर्यटकांना वाघ कसा दाखवता येईल, यावरच गाईड आणि जिप्सी चालकांचं लक्ष केंद्रित व्हायला लागलं आहे. त्यामुळे येणाऱ्या अनेक पर्यटकांच्या तोंडून मी अनेकदा अशी वाक्यं ऐकली आहेत, ‘जंगलात वाघ दिसला नाही. कसलं फालतू आहे हे जंगल.’, ‘इतके पैसे खर्च करून जंगलात आलो पण वाघ काही दिसला नाही.’ या पर्यटकांना निसर्गाच्या प्रत्येक बाबीची ओळख करून देण्याचे जास्त प्रयत्न या जंगलांत फिरवणाऱ्या गाईडनी करायला हवेत. तसेच येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने जंगलाचा पुरेपूर आनंद आपल्याला कसा लुटता येईल हे पाहिले पाहिजे. या बाबतीत पर्यटकांना अधिक ‘साक्षर’ करण्यात वनविभागानेही थोडा पुढाकार घ्यायला हवा. पर्यटकांचं कुठं चुकतं किंवा पर्यटकांनी काय करू नये, हे सांगण्यापेक्षा पर्यटकांनी काय करायला हवं, हे वनविभागाने पर्यटकांना अधिक समजावून सांगायला हवं.\u003cbr\u003eवाढत्या पर्यटनामुळे निसर्गाबद्दल अधिकाधिक प्रचार जनमानसात व्हायला हवा. त्याचा निसर्गाला फायदा व्हायला हवा. व्याघ्रकेंद्रित पर्यटनामुळे निसर्गाला फटकाही बसू शकतो या आधारावर मा. सर्वोच्च न्यायालयाने व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागात (गाभा क्षेत्रात) निसर्ग पर्यटन बंद करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी दिला होता. मात्र या पर्यटनावर असलेले स्थानिक लोकांचे अवलंबित्व लक्षात घेऊन हा निर्णय शिथिल करण्यात आला आणि हे पर्यटन किती प्रमाणावर असावे, यावर निर्बंध घालण्यात आले. आज व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्राच्या २०% भागात आपण निसर्ग पर्यटन करू शकतो. व्याघ्र संरक्षणाचं काम वनविभागाने करावं हे जरी खरं असलं तरी ती जबाबदारी केवळ वनविभागावर टाकणं व्यवहार्य नाही. वनविभागाचा या कामात मोठा वाटा असला तरी ती जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. फक्त वनविभागावर हे काम सोडून देणं म्हणजे आपण आपल्या कर्तव्यापासून पाठ फिरवण्यासारखं होईल. पण हे पर्यटन पूर्ण बंद करणंही उचित होणार नाही. या निसर्ग पर्यटनावर अनेक लोकांचे जीवन अवलंबून आहे हे लक्षात घ्यायला हवे. तसंच मला वाटतं, की एक जिप्सी जंगलात गेली तर त्याबरोबर जास्तीत जास्त ६ लोक, १ गाईड आणि १ जिप्सी चालक असे ८ लोक जंगलात जातात. त्यामुळे साहजिकच एका जिप्सीमधील १६ डोळे जंगलावर बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यामुळे जंगलात काय चालू आहे याची इत्थंभूत माहिती वनविभागाला मिळत असते. त्यामुळे जंगलात आपोआपच एकप्रकारे गस्त घातली जाते.\u003cbr\u003eनिसर्गाकडे बारकाईने पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, की घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काही तरी अर्थ आहे. निसर्ग आपल्याला वर्तमानपत्रासारखा वाचता यायला हवा. ती दृष्टी घेऊनच आपण कायम निसर्गात फिरलं पाहिजे. ते खरं निसर्ग पर्यटन आहे. आजकाल निसर्ग पर्यटन म्हणजे केवळ आकर्षण, वेड बनलं आहे. निसर्गात फिरताना इथे पूर्वी राहत असलेल्या बैगा, गोंडसारख्या आदिवासींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. निसर्गाच्या समतोलाला कोणत्याही प्रकारचा धक्का बसणार नाही याची काळजी त्यांच्याकडून पुरेपूर घेतली जात असे. आज हेच लोक आपले खरे मार्गदर्शक आहेत. आज जंगलाबाहेर स्थाईक झालेल्या या लोकांना सोबत घेऊन, त्यांचा आधार घेऊन, त्यांनाही फायदा होईल आणि निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी घेऊन केलेलं पर्यटन हीच जबाबदारीने केलेली भ्रमंती म्हणायला हवी आणि तेच शाश्वत पर्यटन आहे.\u003cbr\u003eभारतात आपल्याला ज्या जंगलात निसर्ग पर्यटन करता येते, त्यापैकी काही जंगलांची माहिती देणारी आमची लेखमाला दै. ‘सकाळ’ने चालवली होती. या वेळी आम्ही भारतातील ५० जंगलांची माहिती या लेखमालेच्या माध्यमातून दिली होती. रविवारच्या ‘सप्तरंग’ पुरवणीमध्ये २०२१मध्ये ही लेखमाला प्रकाशित झाली होती. आता दै. सकाळच्या पुढाकारानेच त्याचे पुस्तकात रूपांतर होत आहे. यात आपण त्या जंगलात गेल्यावर कोणते प्राणी, पक्षी पाहू शकतो याची यादी दिली आहे. येथे दिसणाऱ्या सर्वच प्राणी-पक्ष्यांची यादी देणं काही शक्य नाही. त्यामुळे काही प्राणी-पक्ष्यांचा उल्लेख त्यात केलेला आहे. तसेच पुस्तकात नमूद केलेली व्याघ्र प्रकल्पांची आकडेवारी आणि त्यांचे क्षेत्रफळ नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन ऑथॉरिटी (National Tiger Conservation Authority) या भारतातील व्याघ्र प्रकल्पांच्या कामकाजावर देखरेख ठेवणाऱ्या सर्वोच्च वैधानिक संस्थेच्या आकडेवारीनुसार दिलेली आहे. जशी वर्षं पुढे जातील तसा भारतातील व्याघ्र प्रकल्पांचा आकडाही वाढत जाईल. काही जुन्या व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रातही वाढ होत आहे. भारतातील व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे.\u003cbr\u003eबिनभिंतीच्या या निसर्गशाळेत आपण निसर्ग वाचायलाही शिकतो. निसर्ग समजून घेणं हाच निसर्गवाचनाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा आहे. निसर्ग आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं आयुष्यही बेरंगी होऊन जाईल. निसर्ग म्हणजे एक खुला कॅनव्हास आहे. त्याच्या पटलावर आपण जे रंग भरू तसा तो आपल्यालाच अधिक खुलून दिसेल. खरं तर हे रंगही त्याच्यातच दडलेले आहेत. हे रंग वेचण्याची कला अवगत असणं महत्त्वाचं. हे रंग वेचताना, भरताना आपणही समृद्ध होत जातो.\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57219337158959,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/A2683F44-3E7B-4E96-B1E7-6435367955C4.jpg?v=1777092490"},{"product_id":"aarogyadayi-ranbhajya-healthy-wild-vegetables-dr-madhukar-bachulkar","title":"आरोग्यदायी रानभाज्या | Healthy Wild Vegetables | Dr Madhukar Bachulkar","description":"\u003ch5\u003eमनोगत\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eअन्न, वस्त्र, निवारा तसेच आरोग्यादायी पर्यावरण या प्रमुख मूलभूत गरजांसाठी मानव संपूर्णतः वनस्पतीसंपदेवर अवलंबून आहे. मानवाच्या आहारात प्रामुख्याने, वनस्पतींपासून मिळणाऱ्या भाज्या, फळे, धान्य, कडधान्य हे मुख्य घटक असतात. वनस्पतीच्या विविध भागांचा आहारात भाजी म्हणून वापर केला जातो. मानवाच्या आहारात असणाऱ्या बहुतांश वनस्पतींची शेतात लागवड केली जाते. जंगलात आढळणाऱ्या अनेक वनस्पतीही मानवी आहाराचा भाग असतात. तसेच, शेतात, बागेत, ओसाड जमिनीवर, रस्त्यांच्या कडेने, परसदरी अनेक प्रकारची तणे, कंद, भाज्या, फळे ऋतुनुसार आपसूक वाढतात. काहींची आता लागवडही केली जाते. अशा 'रानभाज्यां'बाबतची पारंपारिक माहिती खेड्यांत, वनांत राहणाऱ्या, ग्रामीण, आदिवासी स्त्री-पुरुषांना असते. ते पारंपारिक पद्धतीने रानभाज्यांचा आपल्या आहारात सर्रास वापरही करतात. रानभाज्यांचे औषधी गुणधर्मही त्यांना माहिती असतात.\u003cbr\u003e'निसर्ग मित्र, कोल्हापूर' या सेवाभावी संस्थेच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी, २०१० मध्ये, आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्षानिमित्त रानभाज्यांच्या पाककृतींच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. एक नवीन उपक्रम म्हणून, ग्रामीण आणि शहरी भागात, याला मोठा प्रतिसाद मिळाला. रानभाज्यांचे, रानभाज्यांच्या विविध पाककृतींचे, रानभाज्यांपासून बनवण्यात आलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन भरवण्यात आले. प्रथम तीन क्रमांकाच्या विजेत्यांचा पारितोषिके देऊन सत्कार करण्यात आला.\u003cbr\u003eरानभाज्यांच्या या स्पर्धेतून आम्हास ज्ञात झालेल्या सर्व माहितीचे आम्ही संकलन केले. विविध रानभाज्यांचा वनस्पतीशास्त्रानुसार अभ्यास केला. कोल्हापुरातील आयुर्वेद वैद्य डॉ. अशोक वाली व डॉ. हरिश नांगरे यांच्या सहकार्याने रानभाज्यांच्या औषधी गुणधर्मांची, औषधी उपयोगांची उपयुक्त माहिती संकलित केली. रानभाज्यांची पोस्टर्स तयार करून, विविध उपक्रम व कार्यक्रमांतून रानभाज्या आणि त्यांच्या उपयुक्ततेबाबत जनजागृती केली. रानभाज्यांची शास्त्रीय ओळख, त्यांचा आहारातील उपयोग, औषधी गुणधर्म व वापर अशी सर्वंकष माहिती देणाऱ्या 'रानभाज्यांची ओळख' या आमच्या उपक्रमाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. या विषयावरील शोधनिबंधही डॉ. सर्जेराव साळुंखे (माजी विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) व मी (अध्यक्ष, निसर्ग मित्र, कोल्हापूर) यांनी कर्नाटक विद्यापीठ, धारवाड येथील राज्यस्तरीय पातळीवरील परिषदेमध्ये सादर केला व रिसर्च जर्नलमध्ये प्रसिद्ध केला.\u003cbr\u003eया उपक्रमातून आम्हास आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड इत्यादी तालुक्यातील ज्येष्ठ महिलांकडून अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली. अशी सर्व माध्यमातून गोळा होणारी रानभाज्यांची माहिती संकलित करून ती, 'ओळख रानभाज्यांची' या पुस्तकाच्या रूपात ऑक्टोबर, २०१२ मध्ये वन्यजीव सप्ताहात प्रसिद्ध केली. या पुस्तकास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्वात विशेष बाब म्हणजे कोल्हापूर शहरातील काही हॉटेल्समध्ये 'केना' या रानभाजीच्या पानांपासून तयार केली जाणारी भजी ग्राहकांना मिळू लागली आहे. सभोवतालच्या वनस्पती विविधतेची माहिती मिळाल्यास, त्याचा कसा वापर केला जाऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण निसर्ग मित्र संस्थेने जनतेसमोर ठेवले आहे.\u003cbr\u003eधुळे जिल्ह्यातील 'बारीपाडा' या लहानशा आदिवासी गावात, गेली अनेक वर्षे दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात 'रानभाज्या महोत्सव' घेतला जातो. हा महोत्सव पाहण्यासाठी व रानभाज्यांचा आस्वाद घेण्यासाठी, महाराष्ट्रातील विविध भागांतून अनेक जण दरवर्षी बारीपाड्याला भेट देतात. विशेष महत्त्वाचे म्हणजे, बारीपाडा येथील गावकऱ्यांनी गावात जैवविविधता मंडळाची स्थापना करून परिसरातील जैवविविधता संरक्षण - संवर्धन सुरू केले आहे. हा आदर्श प्रत्येक गावाने, शहराने घेणे आवश्यक आहे, तरच आपली समृद्ध जैवविविधता टिकून राहू शकेल.\u003cbr\u003eगेल्या दोन-तीन वर्षांत 'निसर्ग मित्र'च्या माध्यमातून महिला बचत गट, विविध सामाजिक संस्था तसेच दैनिक सकाळ, कोल्हापूर यांच्या सहकार्याने अनेक ठिकाणी रानभाज्यांची प्रदर्शने व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. सकाळ ॲग्रोवन या कृषी दैनिकाचे संपादक श्री. आदिनाथ चव्हाण यांच्या सूचनेनुसार जानेवारी २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत 'ओळख रानभाज्यांची' ही लेखमाला प्रसिद्ध करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातून या लेखमालेस मोठा प्रतिसाद मिळाला. यात सर्वसामान्य वाचक, शेतकरी, वनस्पती व कृषी तज्ज्ञ सर्वांचाच समावेश होता. काही हॉटेल व्यावसायिकांनी रानभाज्यांच्या निवडक पाककृती त्यांच्या हॉटेलमध्ये ग्राहकांना देण्याची इच्छा व्यक्त केली. रानभाज्यांची शेती करता येईल का, याबाबताही अनेक शेतकऱ्यांनी चौकशी केली. 'ॲग्रोवन'मधून प्रसिद्ध झालेल्या या लेखांचा संग्रह पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याबाबत सूचना सर्वांनीच केल्या.\u003cbr\u003e'ॲग्रोवन'च्या वाचकांची इच्छा व सकाळ माध्यम समूहाचे सहकार्य यातून 'आरोग्यदायी रानभाज्या' पुस्तकाची निर्मिती झाली आहे. या पुस्तकात ६१ रानभाज्यांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. प्रत्येक रानभाजीचे शास्त्रीय नाव, कुळ, स्थानिक नाव, इतर भाषेतील नावे, रानभाज्यांचे आढळस्थान, त्यांची शास्त्रीय ओळख, आरोग्यास पोषक ठरणारे गुणधर्म व विविध पाककृती याबाबतची परिपूर्ण माहिती आणि त्याबरोबरच रानभाज्यांची रंगीत छायाचित्रे पुस्तकात देण्यात आली आहेत. या पुस्तकास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.\u003cbr\u003e'निसर्गमित्र' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. सुरेश शिपूरकर तसेच श्री. अनिल चौगुले, श्री. अनिल वेल्हाळ, डॉ. अशोक वाली व डॉ. हरिश नांगरे या सर्वांचे मन:पूर्वक आभार. सकाळ प्रकाशनाचे श्री. आशुतोष रामगीर तसेच त्यांचे सहकारी या सर्वांचे पुस्तकाच्या उत्कृष्ट निर्मितीबाबत मी आभार मानतो.\u003cbr\u003eनिसर्गप्रेमी, आयुर्वेदप्रेमी, आहारतज्ज्ञ, विद्यार्थी, शिक्षक, शेतकरी, महिला व हॉटेल व्यावसायिक सर्वांनाच हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास वाटतो. वाचकांनी आपले अभिप्राय, सूचना अवश्य कळवाव्यात. धन्यवाद!\u003cbr\u003eडॉ. मधुकर बाचूळकर\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\n\u003cbr\u003eविषयप्रवेश\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eनिसर्गातील सजीव संपत्ती म्हणजेच जैवविविधता. कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीतून जैवविविधता पृथ्वीवर निर्माण होत गेली. आणि त्यातूनच पुढे मानवाचा जन्म झाला. भौगोलिक परिस्थिती, वातावरण व हवामान ज्याप्रमाणे बदलते, त्याचप्रमाणे सजीवांतील विविधता बदलते. उष्णकटिबंधीय प्रदेशात हवामान, वातावरण व भौगोलिक परिस्थितीत मोठी विविधता आहे, म्हणूनच या प्रदेशात जैवविविधता अत्यंत समृद्ध आहे. शीत कटिबंधीय किंवा ध्रुव प्रदेशात मात्र जैवविविधतेचे प्रमाण तुलनेने कमी आहे. पृथ्वीतलावावरील जैवविविधतेपैकी सुमारे ७० टक्के जैवविविधता उष्ण कटिबंधातील पर्जन्यवनांत आढळते.\u003cbr\u003eजैवविविधतेचा पहिला शास्त्रीय अभ्यासक कार्ल लिनियस (१७०७-१७७८) हा होय. लिनियसच्या अभ्यासानंतर सुमारे ३०० वर्षांचा कालावधी लोटला, पण जैवविविधतेचा अभ्यास अपूर्णच आहे. फक्त १८ ते २० टक्के सजीव प्रजातींचीच आपणास शास्त्रीय ओळख झाली आहे. अद्यापही सुमारे ८० टक्के सजीव सृष्टी आजच्या विज्ञान-तंत्रज्ञान युगातही मानवास अपरिचितच आहे. मानवाला आज सर्वसाधारणपणे साडेचार लाख इतक्या वनस्पतीच्या प्रजाती ज्ञात आहेत.\u003cbr\u003eमानवाच्या सर्वांगीण शाश्वत विकासात जैवविविधतेचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सजीव सृष्टीतील सर्व घटक, प्रत्येक घटक एकमेकांशी व मानवाशी संबंधित असल्याने जैवविविधतेतील प्रत्येक घटकाचे संरक्षण व त्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे. आपल्या सभोवताली असणारी जैवविविधता आपणास उपयुक्त आहे. अन्न, वस्त्र व निवारा तसेच आरोग्यादायी पर्यावरण या मूलभूत गरजांसाठी मानव संपूर्णपणे वनस्पतींवर अवलंबून आहे. निसर्गातील वनस्पती विविधता मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eभारतातील जैव विविधता\u003cbr\u003eपृथ्वीतलावावरील १७ देश जैवविविधतेने अत्यंत समृद्ध आहेत. अभिमानाची बाब म्हणजे या देशांत आपल्या भारताचा समावेश होतो. आपल्या देशातील उत्तर-पूर्व हिमालय भूप्रदेश (ईशान्य भारत), पश्चिम घाट परिसर, उत्तर-पश्चिम हिमालय भूप्रदेश व अंदमान-निकोबार बेटांचा परिसर हे भारतातील महत्त्वाचे जैवविविधता संपन्न भूप्रदेश म्हणून ओळखले जातात. आपल्या देशात सुमारे ४८ हजार वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली असून यापैकी १७,५०० प्रजाती सपुष्प वनस्पतींच्या आहेत. भारतात आठ हजार औषधी वनस्पतीच्या प्रजाती आहेत, तर गवतांच्या १२०० प्रजाती आहेत. भारत भू-भौतिक, भौगोलिक व वातावरणीयदृष्ट्या विविधता असणारा देश असल्यानेच आपल्याकडे वनस्पती व प्राण्यांची एक उच्च प्रतीची जैविक विविधता आहे. जगातील एकूण जैवविविधतेच्या ६.७ टक्के जैवविविधता भारतात आढळते. जगभरातील एकूण वनस्पती संपदेपैकी ७.१ टक्के वनस्पती तर एकूण प्राणी प्रजातींपैकी ६.७ टक्के प्राणी प्रजाती आपल्या देशात वास्तव्य करतात.\u003cbr\u003eजैवविविधतेच्या दृष्टीने भूतलावरील ३५ भूप्रदेश 'अतिसंवेदनशील' म्हणजेच शास्त्रीय भाषेत 'हॉट स्पॉट रिजन्स' म्हणून ओळखले जातात. या भूप्रदेशांत अति दुर्मिळ, संकटग्रस्त व प्रदेशनिष्ठ (इंडेमिक) प्रजातींचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे, पण या प्रदेशात मानवी हस्तक्षेप प्रचंड प्रमाणावर असल्याने तेथील सजीवांच्या प्रजाती नष्ट होण्याचे प्रमाण अत्यंत वेगवान व चिंताजनक आहे. आपल्या देशातील उत्तरपूर्व हिमालय भूप्रदेश व पश्चिम घाट परिसर जागतिक 'हॉट स्पॉट रिजन्स' म्हणून ओळखले जातात.\u003cbr\u003eमहाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच कोकण विभागातील ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे काही भूभाग या पश्चिम घाट परिसरात असून सुद्धा अत्यंत समृद्ध जैवविविधता आहे. या उत्तर पश्चिम घाटास आपण 'सह्याद्री' म्हणतो. या परिसरात महाराष्ट्रातील १२ जिल्हे व ६२ तालुके समाविष्ट आहेत व येथे अत्यंत समृद्ध जैवविविधता आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eवनस्पती विविधता आणि रानभाज्या\u003cbr\u003eअन्नासाठी माणूस विविध पिकांवर अवलंबून असल्याने या पिकांची तो शेतात लागवड करतो. भारतात आज विविध पिकांच्या सुमारे १६६ प्रमुख प्रजाती आहेत. आणि सुमारे ३२० प्रजाती, या पिकांच्या जंगली वाणांच्या आहेत. नवीन संकरित वाण तयार करण्यासाठी जंगली वाणांचा वापर केला जातो.\u003cbr\u003eमानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. वनस्पतींचे विविध भाग माणसाच्या आहारात भाजी म्हणून वापरले जातात. खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा भाजी म्हणून वापर केला जातो. भारतात भाज्यांच्या सुमारे ५५ प्रजाती आहेत. बटाटा, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांच्या अनेक प्रजाती विदेशी असून विविध देशांतून या प्रजाती शेकडो वर्षांपूर्वी भारतात आल्या आहेत. भाजीसाठी वापरल्या जाणाऱ्या बहुतांश वनस्पतींची शेतात लागवड केली जाते.\u003cbr\u003eअलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा शेतकरी वापर करीत आहेत. यामुळे उत्पादनात, भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, पण त्यांची नैसर्गिक चव, पोषणमूल्यांचे प्रमाण कमी होत चालले आहे. यामुळे पिकांवर जिवाणू, विषाणू, बुरशी व कीटकजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी शेतकरी पिकांवर मोठ्या प्रमाणात विषारी, रासायनिक जिवाणू-विषाणूनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके फवारतात. अशा भाज्यांच्या वापरामुळे माणसांमध्ये सांधेदुखी, कॅन्सर, अल्सर, घशाचे, पोटाचे विकार इत्यादी होऊ लागले आहेत. यासाठी सर्वांनी पारंपरिक भाजी पिकांना पर्याय म्हणून रानभाज्यांचा विचार अवश्य केला पाहिजे.\u003cbr\u003eआपल्या सभोवताली समृद्ध वनस्पती संपदा आहे. शेतात, ओसाड जमिनीवर, बागेत, परसात, जंगलात अनेक वनस्पती आहेत, काही तणे आहेत. यातील काहींचा आपणास रानभाज्या म्हणून वापर करता येतो. पण यासाठी आपल्या सभोवताली असणाऱ्या वनस्पतींची ओळख व त्यांचा उपयोग याबाबातची प्राथमिक स्वरूपाची माहिती असणे आवश्यक आहे.\u003cbr\u003eया प्रकारची माहिती खेड्यात, वनांत राहणाऱ्यांना, ग्रामीण भागातील महिलांना, ग्रामस्थांना असते. ते पारंपरिक पद्धतीने अशा वनस्पतींचा आपल्या आहारात भाजी म्हणून सर्रास वापर करतात. अशा रानभाज्यांची सर्वांना ओळख व्हावी व त्यांनी त्यांच्या आहारात रानभाज्यांचा वापर करावा या हेतूने 'आरोग्यदायी रानभाज्या' या पुस्तकाचे लिखाण केले आहे. या आगळ्यावेगळ्या विषयावरील पुस्तकास वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल असा विश्वास वाटतो. या पुस्तकात रानभाज्यांची माहिती, त्याची स्थानिक व शास्त्रीय नावे, त्यांचे शास्त्रीय कुळ, छायाचित्र, त्यांचे औषधी गुणधर्म व उपयोग आणि पाककृती याबाबतची माहिती दिली आहे.\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003eअनुक्रमणिका (रानभाज्यांची यादी)\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003e१. अळू\u003cbr\u003e२. आघाडा\u003cbr\u003e३. आंबाडा\u003cbr\u003e४. आंबुशी\u003cbr\u003e५. उंबर\u003cbr\u003e६. कपाळफोडी\u003cbr\u003e७. कमळकाकडी\u003cbr\u003e८. करमळ\u003cbr\u003e९. करटोली\u003cbr\u003e१०. करवंद\u003cbr\u003e११. कांडवेल\u003cbr\u003e१२. कामोणी\u003cbr\u003e१३. काटेकोळसुंदा\u003cbr\u003e१४. काटेमाठ\u003cbr\u003e१५. कुडा\u003cbr\u003e१६. कुरडू\u003cbr\u003e१७. केना\u003cbr\u003e१८. गोखरू\u003cbr\u003e१९. गोजिभ\u003cbr\u003e२०. गुळवेल\u003cbr\u003e२१. घेतुळी\u003cbr\u003e२२. घोटवेल\u003cbr\u003e२३. घोळ\u003cbr\u003e२४. चंदन बटवा\u003cbr\u003e२५. चिवळ\u003cbr\u003e२६. चुका\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228501221679,"sku":null,"price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/9BB63F99-686D-42A2-B1B4-DCE401635EAF.jpg?v=1777119777"},{"product_id":"healthy-wild-vegetables-prof-ashwini-chothe","title":"हेल्थी रानभाज्या | Healthy Wild Vegetables | Prof. Ashwini Chothe","description":"\u003ch5\u003eमनोगत\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eप्रत्येक ऋतूत विविध प्रकारे निसर्ग माणसाला भरभरून दान देत असतो. निसर्गाशी जवळीक साधणाऱ्या आदिवासी समाजाने तसेच आपल्या पूर्वजांनी निसर्गाच्या या दानाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे पूर्वीपासून त्यांच्या आहारात रानभाज्या होत्या. रानभाज्या म्हणजे रानात नैसर्गिकपणे उगवणाऱ्या भाज्या. दरवर्षी नियमितपणे ठराविक काळात या भाज्या उगवतात. त्यातल्या काही एखाद्या ऋतुपुरत्या, तर काही वर्षभर टिकणाऱ्या. कधी कोवळ्या पानांच्या वेली, कधी फुले-फळे तर कधी कंद-मुळे; भारतातील अनेक आदिवासी लोक तर याच रानभाज्यांवर आपला उदरनिर्वाह करत आले आहेत. काही वेळा ती भाजी औषधी असल्यामुळे तर, कधी उदरभरण म्हणून. या भाज्यांचे विविध उपयोग, त्यांचे औषधी गुणधर्म याबद्दल माहिती करून घेऊन हा अमूल्य ठेवा पुढच्या पिढ्यांनीही जपून ठेवला पाहिजे. मी केलेला रानभाज्यांचा अभ्यास हा याचाच एक प्रयत्न आहे.\u003cbr\u003eमी मूळची आदिवासी भागातीलच, म्हणजे मोखाडा या गावची राहणारी. आमचे गाव डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे अनेक नैसर्गिक झाडे, वनस्पतींनी समृद्ध आहे. अनेक रानभाज्या मला अगदी लहानपणापासूनच परिचयाच्या होत्या. माझी आजी पावसाळ्यात शेवूळ, भुईफोड, चाईचे वेल, कुरडू, बाफळी, माठ, करटूल, कवदर, डोंगरजीरा, तेरा अशा अनेक रानभाज्या विशिष्ट पद्धतीने करून आम्हाला खाण्यास देत असे. तेव्हा ती सांगत असे की, आदिवासी लोक पावसाळ्यात एकदा तरी या भाज्या खातातच. या भाज्यांमुळे त्यांना पोटाच्या विविध समस्या तसेच आम्ल, पित्त, वात अशा शरीराच्या अनेक तक्रारींवर आराम मिळतो. लहानपणी या भाज्या खायला नको वाटायचे. पण कालांतराने त्याचे आहारातील महत्त्व समजू लागले. योगायोगाने त्याच क्षेत्रातले शिक्षण घेऊन तशाच प्रकारचे संशोधन करण्याची संधी मला मिळाली.\u003cbr\u003eपदव्युत्तर शिक्षणानंतर मला 'बायफ' या संस्थेची स्पार्क फेलोशिप मिळाली होती. या फेलोशिपमध्ये १ वर्षासाठी ग्रामीण भागात राहून कुठल्याही एका विषयावर संशोधन करण्याची संधी मला मिळाली. मूळची आदिवासी भागातीलच असल्यामुळे तसेच रानभाज्यांमध्ये विशेष आवड असल्यामुळे मी रानभाज्या हाच विषय निवडला. सुरुवातीपासूनच काही भाज्या मला माहिती होत्या. पण संशोधनाच्या निमित्ताने काम करताना खूप नवीन भाज्या समजल्या, ज्या मी कधीच ऐकल्याही नव्हत्या. त्यासाठी विविध वयोगटातील लोकांशी चर्चा करताना जवळजवळ १२० च्या आसपास भाज्यांची नोंद मी केली. त्यापैकी ९५ भाज्या मी स्वतः पाहिल्या. तसेच कधी तिथल्याच स्थानिक लोकांच्या घरी त्या तयार करण्याच्या पद्धती पाहिल्या तर, कधी घरी आणून त्या त्यांच्याच पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. लोकांशी चर्चा करताना असे आढळून आले की पूर्वी मुबलक प्रमाणात येणाऱ्या, सापडणाऱ्या अनेक रानभाज्या आता कमी झाल्या आहेत. काही तर नामशेषही झाल्या आहेत. त्यासाठी अनेक कारणे आहेत. दरवर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेमुळे बिया, कंद यांची उगवण क्षमता कमी झाली आहे. तसेच रानभाज्यांची कोवळी पाने, देठे, फुले, कोवळी फळे खाण्यासाठी वापरल्यामुळे त्यांची शाकीय वाढ तसेच पुनरुत्पादीय वाढ होतच नाही. त्यामुळे बिया, कंद पक्व होत नाहीत. परिणामतः नवीन रोपे तयार होण्याचे प्रमाण कमी होते. रानभाज्यांची तोडही मोठ्या प्रमाणात होते. शिवाय, या भाज्या रानात, डोंगरावर, शेतात, माळरानावर आपोआप उगवत असल्यामुळे त्यांच्या लागवडीसाठी विशेष प्रयत्न केले जात नाहीत.\u003cbr\u003eमाझ्या संशोधनानंतरच्या काळात 'ॲग्रोवन' या दैनिकात 'आरोग्यदायी रानभाज्या' या सदराखाली लेख लिहिण्याची संधी मला मिळाली. या लेखमालेला महाराष्ट्र तसेच इतर राज्यांतूनही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. अनेक लोकांनी मला फोन, मेसेज, ई-मेल करून माझे अभिनंदन केले, माझ्या लिखाणाचे कौतुक केले. काही शेतकऱ्यांनी या रानभाज्यांची शेती करण्यासाठीही सहमती दर्शवली आहे. अनेक तज्ज्ञांनी रानभाज्यांच्या अशा विशेष लिखाणासाठी तसेच पाककृतीसाठी कौतुक केले. अनेकांनी या रानभाज्यांची संग्रहित माहिती पुरवण्याबद्दलही विचारणा केली होती. त्यामुळे ही सगळी माहिती एकत्र करून ती पुस्तक स्वरूपात प्रकाशित करण्याची इच्छा मी 'ॲग्रोवन'कडे व्यक्त केली. त्यांनीही अगदी सहजपणे त्याला सहमती दर्शवली. या लेखमालेमुळे रानभाज्यांमध्ये खरंच रुची असणाऱ्या लोकांची ओळख झाली. त्यांनीही त्यांच्या भागात आढळणाऱ्या रानभाज्यांची, त्यांची शिजवण्याच्या पद्धतीची तसेच त्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांबद्दलची माहिती सांगितली. रानभाज्यांची पारख जुन्या पिढीच्या लोकांना होती आणि आहेच. मात्र विज्ञानाच्या कसोटीवर सगळ्या गोष्टी तपासून पाहणाऱ्या तरुण वर्गाला आणि शहरातील लोकांना या रानभाज्यांच्या औषधी गुणधर्मांनी आकर्षित करणे शक्य आहे.\u003cbr\u003eरानभाज्या ओळखणे हे तसे कठीण काम. तसेच त्या बनवण्याच्या पद्धतीचेही विशेष ज्ञान नसल्यामुळे अनेक लोक सहसा या भाज्या आहारात घेण्यास टाळाटाळ करतात. काही भाज्या काही विशिष्ट पद्धतीने शिजवाव्या लागतात. काही भाज्यांमधील काही भाग काढून टाकावा लागतो. तसेच काही उकडून शिजवाव्या लागतात. शिवाय विशिष्ट वाढीच्याच भाज्या घ्याव्या लागतात. या सगळ्या शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टीने सोप्या पद्धतीने ही सगळी माहिती संकलित करण्याची कल्पना डोक्यात घोळू लागली आणि त्यातूनच हे पुस्तक साकारले गेले.\u003cbr\u003eया पुस्तकात दिलेल्या प्रत्येक वनस्पतीच्या सगळ्या भागांचे सखोल वर्णन करण्याचा विशेष प्रयत्न मी केला आहे. तसेच या भाज्या शिजवल्यानंतर कशा दिसतात हेही पुस्तकात दाखवलेले आहे. रानभाज्यांचे माहिती असलेले जास्तीत जास्त औषधी गुणधर्म देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाजीचा कोणता भाग उपयुक्त आहे, तो कसा वापरावा याची तपशीलवार माहिती दिलेली आहे. या रानभाज्या करण्याच्या स्थानिक लोकांच्या पद्धती अगदी सोप्या आहेत. मीठ, मिरची, कांदा, लसूण, फोडणीसाठीचे साहित्य अशा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातूनच या पाककृती तयार केल्या जातात. आदिवासी लोक या रानभाज्या जशा करतात तीच मूळ स्वरूपातील कृती आणि त्यांचेच प्रमाण पुस्तकात दिलेले आहे.\u003cbr\u003eरानभाज्यांच्या माहितीचे संकलित स्वरूपातील पुस्तक प्रकाशित करण्यास सहकार्य केल्याबद्दल मी 'ॲग्रोवन'चे संपादक अमित गद्रे, सकाळ प्रकाशनाच्या संपादिका ऐश्वर्या कुमठेकर आणि संपादनास सहकार्य केल्याबद्दल अपर्णा बोडस यांची मन:पूर्वक आभारी आहे. ही सगळी माहिती संकलित करण्यासाठी पालघर, नाशिक, अहमदनगर, पुणे येथील अनेक आदिवासी बांधव तसेच शेतकरी बांधव यांची खूप मदत झाली. 'बायफ' संस्थेचे संजय पाटील सर, डी. के. कुलकर्णी सर, योगेश नवले सर आणि प्रा. तुषार उगले यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच जव्हार व मोखाडा या आदिवासी भागातील कमल वहिनी व मावजी पवार दादा, वांगणपाडा, चौक, ब्राह्मणपाडा येथील बचत गटाच्या महिलांचे मोलाचे सहकार्य लाभले.\u003cbr\u003eमाझी आई आशालता चोथे व वडील अशोक चोथे यांच्या भक्कम पाठिंब्याशिवाय हे पुस्तक प्रत्यक्षात येणे शक्य नव्हते. त्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत. या पुस्तकात दिलेल्या बऱ्याचशा पाककृती माझ्या आईने स्वतः करून दिल्या आहेत. पुस्तकातील पाककृतींची छायाचित्रे तिच्या मेहनतीविना काढणे अशक्य होते.\u003cbr\u003eया पुस्तकातील माहितीमुळे शहरातील तसेच ग्रामीण भागातील लोकांना रानभाज्यांची नव्याने ओळख होईल, त्या पाककृती करून पाहण्यास प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे. या भाज्यांच्या संवर्धनासाठी अनेक उत्साही शेतकरी पुढे येतील व या अनमोल ठेव्याचे जतन करतील, अशी मला खात्री आहे. विद्यार्थी, निसर्गप्रेमी, अभ्यासक या साऱ्यांना ही माहिती उपयुक्त ठरेल अशी आशा करते. पुस्तक वाचल्यावर वाचकांनी त्यांचे अभिप्राय, सूचना मला अवश्य कळवाव्यात, ही विनंती.\u003cbr\u003eप्रा. अश्विनी अशोक चोथे\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228564267311,"sku":null,"price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/9CB8A63A-9766-42A9-8BCC-1B61365A6842.jpg?v=1777120695"},{"product_id":"varahamihirance-bhujal-vidnyan-groundwater-science-dr-rajni-joshi","title":"वराहमिहिरांचे भूजलविज्ञान | The Groundwater Science of Varahamihira | Dr Ranji Joshi","description":"\u003ch5\u003eमनोगत\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eपाण्याच्या क्षेत्रात मौलिक कामगिरी केलेले एक तज्ज्ञ विचारवंत होते. सूर्योपासक कुलात जन्मलेल्या वराहमिहिरांना शास्त्रीय विचारांची मांडणी कशी करावी, याबद्दलचा आदर्श मानता येईल. 'पंचसिद्धांतिका' आणि 'बृहत्संहिता' हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ. सृष्टी चमत्काराची आणि निसर्गातील घटनाक्रमांची संगती लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. बृहत्संहितेमध्ये त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे ही त्यांच्या शास्त्रीय दृष्टीची द्योतक आहेत. वराहमिहिरांच्या संशोधनापैकी जमिनीखालील पाण्याबद्दलच्या लेखनाची ओळख सोप्या भाषेत मराठी वाचकांना करून देण्यासाठी डॉ. रजनी रामचंद्र जोशी यांनी लिहिलेला शोधनिबंध ग्रंथरूपाने आज प्रसिद्ध होत आहे. या त्यांच्या प्रयत्नामुळे आपल्या परंपरेतील एक महत्त्वाचे उपयुक्त ज्ञान संस्कृत न जाणणाऱ्या मराठी वाचकाला उपलब्ध होत आहे, याबद्दल लेखिकेचे मन:पूर्वक अभिनंदन केले पाहिजे.\u003cbr\u003eडॉ. रजनी जोशी यांनी केवळ पारंपरिक संस्कृत संज्ञांचा वापर करून वराहमिहिर यांच्या ग्रंथांचा अनुवाद केलेला नाही. त्याऐवजी आज भूगर्भजलविज्ञानात वापरल्या जाणाऱ्या नव्या संज्ञा व पद्धती यांचाही योग्य त्या ठिकाणी उल्लेख केला आहे. त्यामुळे वाचकांना हा विषय समजणे अधिक सुलभ झाले आहे. त्यांची भाषा वाचकांना समजावून सांगणारी आहे आणि काही ठिकाणी दिलेले ताजे संदर्भ पुस्तकाचे मूल्य वाढवणारे आहेत.\u003cbr\u003eडॉ. रजनी जोशी या संस्कृतच्या प्राध्यापिका आहेत. संस्कृत शिक्षकांनी केवळ भाषा शिक्षणावर लक्ष केंद्रित न करता संस्कृतमधील उपयुक्त ज्ञानभांडार मराठी व इतर लोकभाषा जाणणाऱ्या वाचकांना खुले करून देण्याचेही कर्तव्य कसे पार पाडावे, याचे उदाहरण डॉ. जोशी यांनी या पुस्तकाद्वारे सादर केले आहे. वाचकांना ते उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास आहे.\u003cbr\u003eन्या. नरेंद्र चपळगावकर\u003cbr\u003eनिवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eटीप : या पुस्तकाचा उद्देश आचार्य वराहमिहिर यांनी संशोधित केलेल्या भूगर्भाखालील जलशोधक लक्षणांचा परिचय शेतकऱ्यांना व सर्वसामान्य वाचकांना करून देणे, हा आहे. येथे नमूद लक्षणांच्या आधारे जमिनीखालील पाण्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी काम सुरू करण्यापूर्वी भूवैज्ञानिकांचा सल्ला अवश्य घ्यावा.\u003cbr\u003eआचार्य वराहमिहिर यांनी प्रदीर्घ निरीक्षणांनंतर, परीक्षणांनंतर अनुभवसिद्धतेने 'बृहत्संहिता' या ग्रंथातील दकार्गलाध्यायात भूगर्भातील पाण्याविषयी विचार मांडले आहेत. दकार्गलाध्यायात वराहमिहिरांनी भूगर्भातील जलप्रवाह, त्यांच्या दिशा, भूमीत पाण्यापर्यंत गेलेली झाडे, वारूळे, मातीचे प्रकार, वेली, वनस्पती, खडक, पाणी या सर्वांचाही साकल्याने विचार केला आहे. याबरोबरच जमिनीत पाणी मुरल्यानंतर या पाण्याच्या वेगवेगळ्या चवी, पाण्याची साठवण, पाणी शुद्धीकरणाचे उपाय, या सर्वांचा मूलभूत विचारही केला आहे. प्रस्तुत 'जमिनीखालील पाण्याचा शोध' या पुस्तकात मी वराहमिहिरांनी दिलेल्या सूत्रांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. वराहमिहिर यांचा भूगर्भातील पाण्याचा प्रत्येक सिद्धांत विज्ञानाधिष्ठित आहे. जोपर्यंत या विश्वात माती, वनस्पती, पाणी, झाडे, प्राणी आहेत, तोवर 'दकार्गलाध्याय' शाश्वत राहणार आहे. त्यामुळे या ग्रंथाच्या अभ्यासाला अत्यंत महत्त्व आहे.\u003cbr\u003eआपल्या भूजल संशोधकांना, शेतकऱ्यांना, भूजल अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना आणि जिज्ञासू चिंतकांना या अभ्यासाचा भूजल शोधण्यासाठी निश्चितच उपयोग होईल असे दिसून येते.\u003cbr\u003eआज एकविसाव्या शतकात वराहमिहिर यांचे भूगर्भविज्ञान पूर्णपणे शास्त्रीय असून जमिनीखालील पाण्याचा (भूजलाचा) शोध लावण्यासाठी सिद्ध आहे, असे अनेक पाश्चात्य व पौर्वात्य शास्त्रज्ञांनी व जलसंशोधकांनी मान्य केले आहे. त्यानुसार आधुनिक जलशोधन पद्धती व वराहमिहिराची Geo-botanical Prospecting Method वापरून भूगर्भातील पाण्याचे साठे शोधण्याचे काम सुरू केले गेले आहे. या सर्व गोष्टींचा विस्ताराने या पुस्तकात विचार केला आहे.\u003cbr\u003eभूजल अभ्यासाच्या या प्रयत्नामध्ये मला ज्यांचे सहकार्य लाभले, त्यांचा उल्लेख येथे करणे मला महत्त्वाचे वाटते - डॉ. वसंतराव गोवारीकर, न्या. नरेंद्र चपळगावकर, श्री. मुकुंद घारे, श्री. माधवराव चितळे, श्री. दि. मा. मोरे, डॉ. रमेश आगाशे, डॉ. रविशंकर मेनन, वेदाचार्य कै. नानाजी काळे, श्री. रानडे, श्री. प्रतापराव चिपळूणकर, डॉ. वाय. एल. नेने, श्री. आदिनाथ चव्हाण, आचार्य सुभाषचंद्र, डॉ. रा. ल. जोशी, जलपुरुष राजेंद्रसिंह, श्री. मारुती चितमपल्ली, डॉ. आर. एस. मोरवंचीकर, श्री. विजय लेले, श्री. सतीश कुलकर्णी, डॉ. अजित वर्तक, डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. खान, डॉ. मच्छिंद्र घाडगे, श्री. अनंत भालेराव, डॉ. कल्याण काळे, डॉ. बी. वाय. यादव, कै. मधुकर फरताडे, श्री. मनोज देशपांडे, श्री. महेश देशपांडे, श्री. मंगेश देशपांडे, अॅड. रामचंद्र जोशी व परिवार, श्री. नारायणराव महानोर, प्रा. मिलिंद जोशी, श्री. चिन्मय वालवडकर, डॉ. बाळासाहेब देशपांडे, श्री. प्रभाकर पडतुरे, डॉ. श्रीकृष्ण माढेकर व श्री. रवींद्र देशपांडे.\u003cbr\u003eवराहमिहिर यांच्या या शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास करून आधुनिक जलशोधनाची पद्धती वापरून जर कोणाला भूगर्भातील पाणी मिळवता आले, तर हे पुस्तक लिहिण्याचे सार्थक झाले, असे वाटते. हे पुस्तक वाचून जर एखाद्या शेतकऱ्याला भूजलाची प्राप्ती झाली तर ते या पुस्तकाचे यश आहे, असे मी मानेन.\u003cbr\u003e- डॉ. रजनी जोशी\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\n\u003cbr\u003eप्रस्तावना\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eज्या राष्ट्रांना प्रदीर्घ सांस्कृतिक इतिहास असतो, त्या राष्ट्रांनी विविध कला आणि शास्त्रे यांचा उन्नतकाळ कधी ना कधी अनुभवलेला असतो. ज्ञानक्षेत्रात नवा विचार, नवे संशोधन, नवी मांडणी नेहमी होत असते. या विकासक्रमातसुद्धा भूतकाळाच्या इतिहासाला काही स्थान असते. सांस्कृतिक क्षेत्रातले नवे हे जुन्या मातीत पाय रोवून उभे असेल, तर ते अधिक सकस बनू शकते. साहित्यशास्त्र, शिल्प आणि संगीत यांसारख्या कला, ज्योतिष, खगोल, तर्कशास्त्र, न्यायासारखी दर्शने या सर्व क्षेत्रांत भारतीय परंपरेने विकसित केलेल्या वारशाला दुर्लक्षून या क्षेत्रात भारतीय विचार होऊच शकणार नाही. कित्येक वेळा हे सर्व विसरून नवा शास्त्रीय विचार मांडण्याचा प्रयत्न होतो. परंतु तो चुकीच्या मार्गाने जाण्याचा संभव असतो.\u003cbr\u003eपाणी हा पूर्वी विपुल असलेला आणि आता दुर्मिळ होऊ पाहणारा परिचित पदार्थ आहे. पाण्याचा शोध, पाण्याची सुलभ वाहतूक, पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर, शुद्धीकरणाचे उपाय, पाण्याचा वापरावर नियंत्रण ठेवण्याची शासनाची जबाबदारी अशा अनेक गोष्टींच्या संदर्भात आज गांभीर्याने विचार केला जात आहे. यातल्या काही बाबींसंबंधी तरी प्राचीन भारतीय विचारवंतांनी केलेले विचार उपलब्ध आहेत. या वैचारिक साठ्याकडे केवळ एक अभिमानाचा विषय म्हणून पाहण्याची गरज नाही, पण तो आजही काही मर्यादेपर्यंत उपयोगी पडू शकणारा असेल तर त्याकडे लोकांचे लक्ष वेधले पाहिजे.\u003cbr\u003eसुमारे १५०० वर्षांपूर्वी म्हणजेच इ. स. च्या पाचव्या शतकाच्या अखेरीस जन्मलेले आणि सहाव्या शतकात आपले लेखनकार्य केलेले 'वराहमिहिर' हे पाचव्या शतकात वराहमिहिर नावाचा प्रकांड ज्योतिषी व पर्यावरण शास्त्रज्ञ होऊन गेला. भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्याविषयी त्याने स्वतः संशोधन केलेच, शिवाय अन्य ऋषींचे संशोधनही आपल्या 'बृहत्संहिता' या ग्रंथात संस्कृत भाषेत लिहून ठेवले आहे. बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील अधिव्याख्याता डॉ. रजनी जोशी यांना हे संशोधन शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटले. आजच्या काळात त्याची सुसंगत जोड देता येईल किंवा सध्याच्या संशोधनात त्यातील काही सिद्धांतांचा, नियमांचा उपयोग होऊ शकेल असा त्यांना विश्वास आहे.\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\n\u003cbr\u003eविषयप्रवेश\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eनिसर्गातील अनेक सत्यांपासून आपण अजूनही अनभिज्ञ आहोत. कोणतेही नव्याने पुढे येणारे विषय हे आजही आपल्याला विचारप्रवृत्त करतात. नजीकच्या दशकांपर्यंत प्राचीन भारतीय विषयांवर मंथन होण्याची प्रक्रिया सुरू होती. या मंथनातून अशा विषयांचे पुनर्शोध संशोधन केले जात असे. याकरिता अनेकांचे संपूर्ण आयुष्य व्रतस्थपणे खर्ची पडे. आज ही प्रक्रिया पुन्हा थांबल्यासारखी वाटते. नवयुगातील शोध आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने मांडले जात असल्याने या प्राचीन सत्यशोधनाला खीळ बसली. परंतु प्रा. डॉ. रजनी जोशी या याला अपवाद ठरल्या आहेत.\u003cbr\u003eबार्शीतील शिवाजी महाविद्यालयात संस्कृतच्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. जोशी यांच्या 'वराहमिहिराचे जलसंशोधन' या शोधनिबंधावर आधारित सदर पुस्तक तयार करण्यात आले आहे. प्रा. डॉ. रजनी जोशी यांनी 'ॲग्रोवन'च्या माध्यमातून संस्कृतमधील हा खजिना मराठीत आणला. या मालिकेमुळे शेतकऱ्यांसह या क्षेत्रात काम करणारे संशोधक, अभ्यासक यांच्यात मंथनास सुरुवात झाली. लातूरमधील शेतकरी प्रकाश पाटील-वांजरखेडकर यांनी यातील लक्षणे आपल्या शेतातील साम्यस्थळांशी प्रत्यक्ष पडताळून पाहिली. ती बरोबर निघाल्याने उत्साही पाटलांनी लगेच तिथे बोअर खणायला घेतली. आज लाखो रुपये खर्च करूनही जमिनीखालील पाणी शोधणे अवघड होत चालले आहे. भूगर्भातील पाणी मिळवण्याला या अभ्यासामुळे चालना मिळाली आहे. उजाड माळरानावर साडेतीन इंच पाणी लागल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.\u003cbr\u003eपाचव्या शतकातील प्रकांड ज्योतिषी व पर्यावरण शास्त्रज्ञ 'वराहमिहिर' यांनी भूगर्भातील पाण्यावर संशोधन केले. अन्य ऋषींच्या संशोधनालाही आपल्या 'बृहत्संहिता' या ग्रंथात स्थान देऊन एक अमूल्य ठेवा त्यांनी उपलब्ध करून दिला. या शास्त्राचा सखोल अभ्यास प्रा. डॉ. रजनी जोशी यांनी केला. दीड हजार वर्षांपूर्वीच्या या लक्षणांचा आज झालेला उपयोग निश्चितच आशादायक आहे. आपल्या प्राचीन कृषिमुनींचे संशोधन निसर्गाधिष्ठित व आयुर्वेदावर आधारित होते. वनस्पतींच्या मुळांपासून ते देठांपर्यंतच्या विविध घटकांचे गुणधर्म, त्यांचा केवळ मानवच नव्हे तर पशुप्राण्यांवर होणारा प्रभाव, विविध वनस्पतींचे एकत्रित गुणधर्म आणि त्यांचा उपयोग व उपचार आयुर्वेदाने स्पष्ट केले आहेत. आयुर्वेदाचे महत्त्व आधुनिक जगाला पटू लागले आहे, याचे कारणही निसर्गाधिष्ठित संशोधन हेच आहे.\u003cbr\u003eवराहमिहिर यांनी भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी भूपृष्ठावरील लक्षणांना आपल्या संशोधनाचा आधार दिला. भूगर्भातील जलशिरामुळे भूपृष्ठावरील वनस्पती, माती आदींचा रंग, रूप लक्षणांवरून अंतर्गत जलशिरा शोधण्याचा मंत्र दिला. लक्षणे सहजगत्या लक्षात येणारी असली तरी त्यांच्या संशोधनासाठी वराहमिहिर यांना आपले आयुष्य खर्च करावे लागले. दीड हजार वर्षांपूर्वी आणि आज नैसर्गिक स्थितीत बराच बदल झाला आहे. अगदी पाणी, माती, यांच्या चव व रंगापासून ते समकालीन झाडांच्या संदर्भातही मोठा फरक आढळून येऊ शकतो. वराहमिहिर यांच्या लक्षणांचा पुनराभ्यास व सरकारी पातळीवर सर्वेक्षण होणे अपेक्षित आहे.\u003cbr\u003eपाणी ही मानव, प्राणी व वनस्पती यांची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे भूगर्भातील जलप्रवाहांचे संवर्धन व त्यांचा योग्य वापर यासाठी आचार्य वराहमिहिर यांचे संशोधन उपयुक्त ठरू शकते. जल पुनर्भरणच्या शासकीय योजनांमध्ये भौगोलिक रचनेनुसार येथे नमूद केलेल्या लक्षणांचा समावेश केल्यास पाणी टंचाईचे संकट कमी होण्यास मदत होऊ शकते. आज जरी नैसर्गिक स्थितीत बदल झाला असला, तरी भूपृष्ठावरील पाणी अडवताना वराहमिहिर यांच्या लक्षणांचा आधार घेतल्यास भूगर्भातील जलस्रोतांचा शोध घेणे शक्य आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गाधिष्ठित संशोधन करून भारतीय संस्कृतीचे वेगळेपण जपले. या परंपरेची काळानुरूप जपणूक व वृद्धी होणे आवश्यक वाटते.\u003cbr\u003eपावसाचा थेंब न् थेंब कसा साठवता येईल, भूजल पातळीत कशी वाढ करता येईल, या विषयाकडे आता गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. पाचव्या शतकात वराहमिहिर नावाचा प्रकांड ज्योतिषी व पर्यावरण शास्त्रज्ञ होऊन गेला. भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्याविषयी त्याने स्वतः संशोधन केलेच, शिवाय अन्य ऋषींचे संशोधनही आपल्या 'बृहत्संहिता' या ग्रंथात संस्कृत भाषेत लिहून ठेवले आहे. बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील अधिव्याख्याता डॉ. रजनी जोशी यांना हे संशोधन शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटले. आजच्या काळात त्याची सुसंगत जोड देता येईल किंवा सध्याच्या संशोधनात त्यातील काही सिद्धांतांचा, नियमांचा उपयोग होऊ शकेल असा त्यांना विश्वास आहे.\u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228622463279,"sku":null,"price":160.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/9F81FEE0-EB78-4725-B68F-0AF02B8CF7CD.jpg?v=1777124576"}],"url":"https:\/\/pipagro.com\/collections\/the-living-earth-library-books.oembed","provider":"PIP AGRO","version":"1.0","type":"link"}