{"product_id":"arogya-uvach-bhag-1-truth-about-health-dr-balaji-tambe","title":"आरोग्य उवाच भाग १ | Truth about Health | Dr Balaji Tambe","description":"\u003ch5\u003eमनोगत\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eडॉक्टरांकडे रुग्ण जातो तो जरासा शारीरिक त्रास होईल तेव्हा.तरीही रुग्ण आयुर्वेदिक डॉक्टरांकडे लगेचच जाईल असे नाही. सर्दी, ताप, जुलाब, पोटदुखी वगैरे साध्या साध्या विकारांवर रोग मुळांतून बरा करण्यापेक्षा रोगाची लक्षणे कमी करणाऱ्या उपचारांवर भर असल्याचे दिसते. लक्षणे कमी करण्याच्या दृष्टीने चटकन गुण येईल अशी औषधे घेण्याकडे कल असलेला दिसतो. चिवट, चिकट व लवकर बरे न होणारे रोग असताना वेदना कमी करण्यासाठी घेतली जाणारी औषधे दिवसेंदिवस लागू पडेनाशी होतात व त्यामुळे त्रास वाढू शकतात. अगदीच काही गुण येत नाही अशा वेळी रुग्ण आयुर्वेदिक इलाजपद्धतीकडे वळताना दिसतात. शल्यकर्म करून तसेच खूप महागडे औषधोपचार करूनही अपेक्षित गुण न आल्यामुळे रुग्ण बऱ्याच वेळा आयुर्वेद वा होमिओपॅथीकडे वळताना दिसतो. त्याचप्रमाणे अमुक एक चमत्कारी व्यक्ती, अमुक एका दिवशी, कोठल्यातरी आडगावात, काही विशिष्ट औषध देतो असे ऐकल्यावरून तेही उपाय याच्या आधी करून झालेले असतात.\u003cbr\u003eआयुर्वेद ही एक सर्वंकष उपचारपद्धती असल्यामुळे त्यात रुग्णाचाच नव्हे तर सर्व कुटुंबाचा, रोगाचाच नव्हे तर रुग्णाच्या प्रकृतीचा, लहानपणापासून झालेल्या सर्व शारीरिक अवस्थांचा, वंशपरंपरागत असलेल्या त्याच्या इतिहासाचा अभ्यास करून औषध देण्याची पद्धत आहे. हे सर्व पाहून अशाच प्रकारे सर्व प्रकारची माहिती घेऊन उपचार करणाऱ्या फॅमिली डॉक्टरची आठवण झाली व 'सकाळ' वर्तमानपत्रासोबत येणाऱ्या 'फॅमिली डॉक्टर' या साप्ताहिक पुरवणीची सुरुवात झाली.\u003cbr\u003eआयुर्वेदाची संपूर्ण शास्त्रशुद्ध माहिती आयुर्वेदाच्या पारिभाषिक शब्दांतून वा वैद्यकीय क्षेत्रात प्रचलित असलेल्या संकल्पनेनुसार दिली, तर ती सर्वसामान्यांना कळणे दुरापास्त होईल हे लक्षात घेऊन सामान्यांना कळेल अशा घरगुती भाषेत आयुर्वेदाचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा परिपाठ ठेवला. यामुळे सर्वसामान्यांना आयुर्वेदाची व्याप्ती लक्षात येण्यास मदत झाली. त्रास झाल्यास सर्वप्रथम आयुर्वेदाकडे जावे व गरज पडल्यास शल्यकर्म वा इतर चिकित्सेची मदत घ्यावी ही संकल्पना समजू शकली.\u003cbr\u003e'फॅमिली डॉक्टर'मध्ये आयुर्वेदाचा इतिहास थोडक्यात सांगितल्यानंतर आयुर्वेद ही केवळ एक भौतिक वा रसायन चिकित्सा नसून त्यात मनुष्याचा स्वभाव, मन, आत्मा यांनाही समाविष्ट केलेले असल्याने या सर्व शक्तींचे संचलन करणारी शक्ती व देवतांची ओळख करून दिल्यानंतर आयुर्वेदातील संकल्पना समजावण्यासाठी सुरुवात केली. आयुर्वेदातील वात, पित्तादी दोष व रस, रक्तादी धातूंविषयी माहिती घेताना लक्षात आले की या संकल्पनांची रोजच्या व्यवहारातील शब्दांबरोबर गल्लत होऊ शकते व गैरसमज वाढू शकतात. तेव्हा आयुर्वेदाच्या या संकल्पना नुसत्या शब्दांनी न समजावता त्यांना रोजच्या व्यवहारातील उदाहरणे घेऊन एका वेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न 'आयुर्वेद उवाच' या लेखमालेतून केला. याचा उपयोग केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे तर आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना व डॉक्टरांनाही झाला. हे सदर वाचल्यानंतर आयुर्वेदाचे ज्ञान केवळ शब्दात राहिलेले नसून त्याचा अनुभव घेण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरले.\u003cbr\u003e'आयुर्वेद उवाच' मध्ये विषय समजावत असताना शास्त्राबाहेर तर जायचे नाही, शास्त्राने जे सांगितले आहे तेच सांगायचे. पण त्यातील संकल्पना समजावत असताना भाषा सोपी व व्यवहारातील वापरावी असे धोरण ठेवले. 'आयुर्वेद उवाच' ह्या सदरातून आयुर्वेद सर्वांना कळेल अशा भाषेत लिहिला गेला. इतकेच नाही तर एखादे पाठ्यपुस्तक असावे अशा पद्धतीने विषय विद्यार्थ्यांनाही उपयोगी पडला. अशा रीतीने अनेकांना याचा उपयोग होतो आहे हे पाहिल्यावरून 'आयुर्वेद उवाच' हे पुस्तक प्रकाशित करण्याचे ठरविले.\u003cbr\u003eपहिल्या भागात आरोग्यरक्षणाच्या दृष्टीने आयुर्वेदाने सांगितलेले स्वस्थवृत्त, दिनचर्या, ऋतुचर्या वगैरे विषय अगदी साध्या भाषेत मांडले. नुसते मांडले असे नाही तर ते प्रत्यक्ष जीवनात कसे आणायचे याचेही मार्गदर्शन केले. वैद्याला रुग्णावर उपचार करत असताना उपयोग होईल, तसेच रुग्णालाही पूर्ण उपचार मिळतील असा विषय क्रमांकाने समजावला गेला. आयुर्वेदातील 'पिंडी ते ब्रह्मांडी' ह्या संकल्पनेनुसार जे काही शरीरात आहे तेच ब्रह्मांडात आहे व जे ब्रह्मांडात आहे तेच शरीरात आहे. सर्व विश्व ज्यांच्यातून तयार झाले ती पंचमहाभूतद्रव्ये सर्वांमध्ये सारखीच असतात. पृथ्वी म्हटल्यांनतर आपण राहतो ती पृथ्वी लोकांच्या डोळ्यासमोर येणे साहजिक आहे. मातीत थोडे पाणी मिसळल्यानंतर तयार होणाऱ्या चिखलापासून एखादी मूर्ती बनवायची असल्यास चिखल एक विशिष्ट मर्यादित घट्ट असणे तसेच त्यात योग्य चिकटपणा असणे आवश्यक असते. एखादी मूर्ती बनविण्यासाठी आत कठीण वस्तूचा सांगाडा असावा लागतो, अन्यथा मूर्ती लोळागोळा होऊन कोसळते. तसेच शरीरावर मांस वगैरे टिकावे म्हणून आत हाडांचा सांगाडा असतो. पृथ्वी म्हणजे माती व जलतत्त्व म्हणजे पाणी असा समज होण्याची शक्यता असते. पण पंचमहाभूतातील पृथ्वीतत्त्व म्हणजे केवळ माती असा अर्थ नसून ही संज्ञा सर्व जडवस्तूंसाठी लागू असते व जडत्व ही संकल्पना महत्त्वाची असते. लवचिकपणा, प्रवाहीपणा, वरून खाली वाहणे अशी जलतत्त्वाची संकल्पना आहे. अशा प्रकारे आयुर्वेदीय संकल्पनांची उकल समजावली गेल्याने आयुर्वेद हा विषय समजणे सोपे होऊ शकले. पंचतत्त्व व पंचीकरणानंतर त्रिदोष, सप्तधातू, मल, अग्नी तसेच द्रव्यगुण आणि दर्शनशास्त्र हे विषय मांडण्यात आले.\u003cbr\u003eएकंदरीत 'आयुर्वेद उवाच' हा विषय अनेक भागांतून पुस्तकरूपाने देण्याचे ठरले. त्यापैकी हे पहिले पुस्तक सर्वसामान्यांना व विद्यार्थ्यांनाही उपयोगी व्हावे ही प्रार्थना.\u003cbr\u003eडॉ. श्री बालाजी तांबे\u003cbr\u003eआत्मसंतुलन व्हिलेज\u003cbr\u003eकार्ला ४१० ४०५\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228352749871,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/D684EE0D-5600-4A29-9800-2140726567F2.jpg?v=1777116006","url":"https:\/\/pipagro.com\/products\/arogya-uvach-bhag-1-truth-about-health-dr-balaji-tambe","provider":"PIP AGRO","version":"1.0","type":"link"}