{"product_id":"nisargane-dila-anandkand-natures-blessings-dr-madhav-gadgil","title":"निसर्गाने दिला आनंदकंद | Nature’s Blessings | Dr Madhav Gadgil","description":"\u003ch5\u003eलेखकाचे मनोगत \u003c\/h5\u003e\n\u003cp\u003eकाव्य, शास्त्र, विनोद, कला-क्रीडा ज्ञान-विज्ञानाने रेलचेल भरलेल्या घरात मी वाढलो. बाबा व्यवसायाने अर्थशास्त्रज्ञ होते. पण चतुरस्त्र बुद्धीचे. एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचे होते. घरात प्रचंड ग्रंथसंग्रह होता; मुख्यतः मराठी व इंग्लिश! यात सर्व प्रकारची पुस्तके होती. ज्ञानेश्वर, तुकाराम, मोरोपंत, केशवसुत, मर्ढेकरांपासून विंदा करंदीकर, वसंत बापटांपर्यंतच्या पद्यरचना; महानुभाव, जोतिबा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकरांपासून हरी नारायण आपटे, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडेंपर्यंतच्या गद्यरचना; मराठ्यांच्या बखरी; इतिहासाचार्य राजवाड्यांचे निबंध; श्रीधर व्यंकटेश केतकर, इरावती कर्वे यांची समाजशास्त्रीय रचना; ज्योतिर्विलास आणि म. वि. आपट्यांचे पक्षीदर्शन; प्लेटोचे रिपब्लिक; आणि मार्क्सच्या कॅपिटलपासून अनेक ग्रंथांचे मराठी अनुवाद. असा कोणताच विषय नसेल; ज्यावरची उत्तमोत्तम मराठी पुस्तके आमच्या घरी नव्हती. मी मराठी माध्यमातून अकरावीपर्यंतचे शालेय शिक्षण घेतले. त्यामुळे या मराठी ग्रंथसंपदेतून मला वाचनाचा आणि अशा सगळ्याच विषयांचा नाद लागला. मला कुठलाही विषय समजणार नाही, हे मला मान्य नव्हते. प्लेटोच्या रिपब्लिकचा अनुवाद वाचला तेव्हा मी मराठी पाचवीत असेन. माझी १० वर्षांनी मोठी, बी.ए.ला शिकणारी बहीण म्हणाली, ‘हे काय वाचतोयस? तुला कसे काय समजेल?’ मी म्हटले, ‘उगीच बोलू नकोस. या पुस्तकाबद्दल कुठलाही प्रश्न विचार. बघ मी नीट उत्तर देतो की नाही!’\u003cbr\u003eबाबा स्वतःही इंग्लिशमध्ये, मराठीत बरेच लेखन करत. आमच्या शेजारीच इरावती कर्वे राहायच्या. त्या समाजशास्त्रावर तर लिहीतच; पण मराठीत सुंदर लघुनिबंध लिहीत. त्यांची मुलगी, पुढे स्वतः लेखिका बनलेली, गौरी देशपांडे माझ्याच वयाची होती. आम्ही दोघेही नऊ-दहा वर्षांचे असल्यापासून काहीतरी लिहायचो. शाळेत वर्षाकाठी एक हस्तलिखित मासिक काढले जायचे. त्यात सुरुवातीपासून मी बारीकसारीक लेख लिहू लागलो. निसर्गप्रेमी बाबांनी मला पक्षिनिरीक्षणाचा नाद लावला. पुढे काय व्यवसाय करावा याचा विचार करता, फारसा काही प्रश्न पडला नाही. बाबा त्यांच्या विद्याव्यासंगात—उघडच—खुशीत होते. ‘तू हेच कर’ असा काहीही उपदेश ते करत नव्हते. मला पक्षिनिरीक्षणाचा छंद फार भावला. त्या संबंधीची खूप पुस्तकेही घरी होती. तीसुद्धा वाचली. त्यातले एक होते ज्युलियन हक्सलेचे—पक्षिनिरीक्षण आणि पक्षांचे आचरण. हक्सले सांगतो, ‘एकदा का आपण निसर्गनिरीक्षणाच्या छंदाने वेडे झालो, की जगात आपल्या आसपास मित्र नाहीत, असे आपल्याला कधीच होत नाही. जिथे तिथे झाडेझुडपे, किडेमकोडे, शंखशिंपले, बेडूक-पक्षी, कुत्रे-गाढवे, कोणी ना कोणी जिव्हाळ्याचे सोबती आपल्याला भेटत राहतात.’ तो आणखीही सांगतो की, ‘जो आपल्या आवडत्या छंदाला आपला व्यवसाय बनवू शकतो, तो खरा भाग्यवान, तो उभा जन्म आनंदात घालवू शकतो.’ मी विचार करायला लागलो... आपणही जीवशास्त्रज्ञ का बनू नये?\u003cbr\u003eचौदाव्या वर्षी मराठी नववीत जाईपर्यंत पक्के ठरवले, जीवशास्त्रज्ञ बनायचे. बाबा म्हणाले, “उत्तम, मग जे काय निसर्गनिरीक्षण करतोस ते जरा पद्धतशीर लिहून काढायची सवय लावून घे.” मला ही कल्पना खूपच भावली. मधूनमधून व्यवस्थित टिपणे ठेवू लागलो. यातूनच माझे पहिले लेखन छापून आले. शेजारचे दिनकरराव कर्वे सृष्टीज्ञान मासिकाचे संपादक होते. म्हणाले, “तुला जर पक्षांची, प्राण्यांची आवड आहे, तर तू या विषयांवर मराठीत काहीतरी शास्त्रीय लेख लिहीत जा.” खुश झालो. वयाच्या १५व्या वर्षी सुरुवात करून सृष्टीज्ञानात ‘प्राणिमानसशास्त्र’ या विषयावर ११ लेख लिहिले. उन्हाळ्याच्या सुट्टीत महाबळेश्वरला जायचो. तिथल्या घनदाट जंगलातल्या रस्त्यांवरून चिकार पायपीट करायचो. कुतूहलाने पुण्यात कधीच न दिसणारे पक्षी पाहायचो. या अनुभवाच्या जोरावर माझा पहिला स्वतःच्या निरीक्षणावर आधारित ‘महाबळेश्वरचे काही पक्षी’ हा लेख सृष्टीज्ञानात प्रकाशित केला. पुन्हा वाचल्यावर जाणवले की, या सगळ्या शालेय वयातील लिखाणात मी फार क्लिष्ट, संस्कृतप्रचुर पारिभाषिक शब्द वापरले आहेत. सरळ, सुबोध मराठीत लिहायचा पुरेसा प्रयत्न केलाच नाही. पण, सुरुवात तर मजेत केली. शिवाय, या लेखात स्वतः हाताने काळ्या शाईने रेखाटने काढून अंतर्भूत केली. अशी सुरू झाली माझी आणि माझ्या लेखणीची प्रेमकहाणी!\u003cbr\u003eपंधराव्या वर्षी लेखणीची अशी आराधना सुरू केली आणि ठरवल्याप्रमाणे मी जीवशास्त्रात बी.एस्सी. करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. शिवाय, माझ्या खात्यात मुंबई राज्याचा १६ वर्षांखालील, पुणे विद्यापीठाचा उंच उड्यांचा विक्रम होता. तेव्हा अभ्यास आणि खेळ यांच्यात मग्न होऊन गेल्यावर लेखनात खंड पडला. मग एम.एस्सी.ला मत्स्यजीवनावर एक छोटासा शोधनिबंध लिहिण्यापासून एका वेगळ्या प्रकारच्या शास्त्रीय संशोधनात्मक लिखाणाची सुरुवात झाली. हे २२व्या वर्षी सुरू झालेले वैज्ञानिक संशोधनावर आधारित लेखन गेली ५० वर्षे अप्रतिहत चालू आहे.\u003cbr\u003eमाझ्यावर ज्या शास्त्रज्ञांनी खास छाप पडली, त्यात प्रमुख होते पक्षीतज्ज्ञ सलीम अली आणि विसाव्या शतकातील अग्रगण्य उत्क्रांतीशास्त्रज्ञ जे.बी.एस. हाल्डेन. सलीम अलींनी हौशी पक्षिनिरीक्षकांसाठी लिहिलेल्या सचित्र बुक ऑफ इंडियन बर्ड्सचा मी भरपूर उपयोग करत होतो. जे.बी.एस. हाल्डेननेही सर्वांपर्यंत शास्त्राचा संदेश पोहोचवण्यासाठी मुबलक लेखन केले होते. असे आदर्श डोळ्यांसमोर असल्यामुळे आपण संशोधनात्मक निबंध तर लिहायचेच; पण सर्वसामान्य लोकांपर्यंतही शास्त्रीय विषय पोहोचवायलाच पाहिजेत, असे पहिल्यापासूनच ठरवले होते. एकोणतिसाव्या वर्षी पुण्यात डॉ. वर्तकांबरोबर देवरायांवर संशोधन सुरू केले. या निसर्गसंरक्षण परंपरेला सांभाळायला हवे, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे वाटू लागले. सलीम अलींच्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे शास्त्रीय नियतकालिक अनेक निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचायचे. त्यात संशोधनात्मक निबंधांच्या जोडीला सामान्य वाचकांसाठीही लेख असायचे. तेव्हा, माझा देवरायांवरचा लेख या नियतकालिकात प्रसिद्ध करावा म्हणून उत्साहाने पाठवला. पण हा वेगळाच विषय संपादकांना रुचला नाही. सुदैवाने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे मानद सचिव झफर फतेहअली यांना तो खूप आवडला. त्या वेळी खुशवंत सिंगांच्या नेतृत्वाखाली इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया जोरात चालत होते. त्यांनी खुशवंत सिंगांची ओळख करून देऊन देवरायांवर झकास रंगीत चित्रांसह एक इंग्लिश लेख छापून आणला. हा होता माझा पहिलाच सामान्य वाचकांसाठीचा इंग्लिश लेख. त्याच्याच जोडीने मराठीतही देवरायांवर एक लेख लिहिला. असा माझा शिक्षण संपल्यावरचा गेल्या ४३ वर्षांचा लेखनप्रवास पुनश्च सुरू झाला. मग बंगळुरूला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये रुजू झालो. डेक्कन हेरल्ड हे बंगळुरूचे लोकप्रिय इंग्लिश दैनिक होते. त्यात बंदीपुरा ते नागरहोळे या सलग मोठ्या जंगलाच्या पट्ट्यात तीन दिवस केलेल्या पायी भटकंतीच्या अनुभवाच्या आधारावर १९७४मध्ये दोन लेख लिहिले. त्यात काही भागात मूळचे वैविध्यसंपन्न अरण्य तोडून लावलेल्या सागवानाच्या एकसुरी जंगलात किती मोठ्या प्रमाणात बांडगुळे आहेत, याचा उल्लेख होता. सरकारवर काहीही टीका केल्यास बाबूंच्या नाकाला लागलीच मिरच्या झोंबतात, आणि अशा प्रामाणिक टीकाकारांच्या मुसक्या बांधल्याच पाहिजेत म्हणून त्यांचे हात शिवशिवायला लागतात. तसेच काही झाले असावे. कारण, हा लेख प्रसिद्ध होता होता आणीबाणी जाहीर झाली. लागलीच प्रमुख वनसंरक्षकांच्या कचेरीतून मला पत्र आले. यापुढे कोणताही लेख प्रकाशित करण्याआधी आमच्याकडून संमती घेतलीच पाहिजे. मी ते पत्र आमचे संचालक सतीश धवन यांना दाखवले. ते म्हणाले, “काळजी करू नकोस. तुला योग्य वाटते ते लिहीत राहा. बघू काय करतात ते.” मी प्रचंड खुश झालो. छोटेमोठे लेख लिहीत राहिलो.\u003cbr\u003eजे काय लिहायचे, ते अभ्यासपूर्वक लिहायला पाहिजे अशी माझी पक्की धारणा होती. असाच मी लिहिला राजस्थानतल्या बिश्नोई समाजाच्या संस्थापकांवरचा, जांभोजींवरचा लेख. माझे पूर्ण देशभर मित्र होते. त्यांच्याकडून बिश्नोई या निसर्गसंरक्षणाच्या उज्ज्वल परंपरा असलेल्या पंथाबद्दल ऐकले होते. पण त्यावर हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये काहीही प्रकाशन उपलब्ध नव्हते. तेव्हा, १९८०मध्ये मला जोधपूरला जायची संधी मिळाल्यावर मित्रांबरोबर सायकलवर आरूढ झालो, आणि बिश्नोईंनी जिथे आत्मबलिदान केले त्या खेजडली गावाला पोहोचलो. तिथल्या लोकांकडून त्यांच्या पंथाचा रोमांचकारी इतिहास समजून घेतला. हिंदी जांभोजी पुराणाची एक प्रत पैदा करून या कथेवर इंग्लिशमध्ये दिल्लीच्या हिंदुस्तान टाइम्समध्ये व मराठीत हाकारा मासिकात लेख प्रसिद्ध केला.\u003cbr\u003eडेक्कन हेरल्ड, इंडियन एक्सप्रेस, हिंदू अशा निरनिराळ्या इंग्लिश वर्तमानपत्रांतून अधूनमधून, मुख्यतः पर्यावरणाच्या संदर्भात लेखन चालू होते; इकॉनॉमिक टाइम्समध्ये नियमित स्तंभलेखन करत होतो. आता रामचंद्र गुहांबरोबर भारतीय पर्यावरणाच्या इतिहासावर एक पुस्तक लिहायला लागलो. This Fissured Land हे भारताच्या पर्यावरणीय इतिहासावरचे पहिलेच पुस्तक होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याची मल्याळम, हिंदी, बंगाली आणि चिनी भाषेत भाषांतरे झाली. आजतागायत २० वर्षे पुनःपुन्हा पुनर्मुद्रणे होत राहिली आहेत. अनेक विद्यापीठांत इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमांत हे पाठ्यपुस्तक म्हणून वापरले जाते आहे.\u003cbr\u003eमला इंग्लिश कवितांचा बुक ऑफ नॉनसेन्स व्हर्सेस हा संग्रह खूप आवडायचा. त्याची नक्कल करत चारोळ्या डोक्यात यायच्या. त्या लिहायला लागलो माझ्या मुलीच्या मागणीवरून! ती पत्रकार होती. घरी परतायला तिला रात्रीचे दीड-दोन वाजायचे. म्हणाली, ‘परत आल्यावर माझे स्वागत करणारे एक पत्र तयार असायला पाहिजे!’ मी एखाद्या प्राण्याचे रेखाटन करून त्याखाली एक वात्रटिका लिहायचो. बऱ्याच गोळा झाल्या. मग मी हिंदू वृत्तपत्राला विचारले, “तुम्ही प्रकाशित कराल का?” ते म्हणाले, “अवश्य. आमच्या ‘हिंदू यंग वर्ल्ड’ या बालवाचकांसाठीच्या पुरवणीत दर दोन आठवड्यांनी एक सदर प्रकाशित करू या—‘सेन्स अॅण्ड नॉनसेन्स’. थोडक्यात, १७० शब्दांत एखाद्या जीवाजातीबद्दल माहिती लिहायचो, त्याच्या जोडीला एक चित्र आणि एक वात्रटिका. पाच वर्षे हे स्तंभलेखन चालले. आता त्याच मुलीच्या दोन मुली ‘रात्री झोपताना गोष्टी सांग, आणि नवनव्या तूच रचून सांग’ असा आग्रह करायच्या. त्यांच्यासाठी ‘मुचकुंद मुंज्या’ नावाचे एक अद्भुत शक्ती असलेले पात्र निर्माण केले. या मुचकुंदच्या चार कहाण्या प्रकाशित झाल्या आहेत. एक मधमाश्या-अस्वलांच्या जगात, एक प्रवाळांच्या बेटांवरच्या माशांच्या विश्वात, एक देवमाशांच्या दुनियेत, आणि एक जपानी लालतोंड्या माकडांच्या दुनियेत. चारही कहाण्यांमध्ये निसर्गाच्या वेगवेगळ्या पैलूंचे चित्रण केले आहे.\u003cbr\u003eसन २००४मध्ये मी आणि सुलोचना निवृत्त झाल्यावर गाशा गुंडाळून बंगळुरूवरून पुण्याला परतलो. पुण्याचे लोकप्रिय दैनिक ‘सकाळ’. त्याचे एक उपसंपादक म्हणाले, “आमच्यासाठी संपादकीय पानाववरचे दर महिन्याला एक सदर लिही.” मी म्हटले, “अवश्य.” ४० वर्षे महाराष्ट्राबाहेर काढली होती; तरी मराठीचे वाचन कायम चालू होते. आता लिहिण्याची सवय करू या. विषय शास्त्रीय, पण भाषा बिलकूल क्लिष्ट असता कामा नये. साध्या, सुबोध मराठीत सगळे विषय मांडू या. मला मराठी कवितांची खूप आवड आहे. चपखल बसणाऱ्या काव्यपंक्ती वापरू या. ‘सकाळ’मधील लेखमालेस २००७च्या जानेवारीपासून सुरुवात केली. प्रथम सगळे इंग्लिशमध्ये डोक्यात यायचे. विचार करत नीट मराठीत उतरवायला थोडे कष्ट व्हायचे. पण हळूहळू हे बदलले. मराठीतच विचार करत मराठीत लिहायला लागलो. वेग वाढला, ओघ आला. सुलोचनालाही मराठीची आवड आहे. ती मनापासून वाचून सामान्य वाचकाला समजेल अशी नीट मांडणी करण्याच्या दृष्टीने खूप चांगले सुचवत राहते.\u003cbr\u003eमाझ्या पोतडीत भरपूर विषय आहेत. सारखे नवनवे विषय सुचत राहतात. त्सुनामीच्या लाटांचा तडाखा बसल्यानंतर माझ्या एका मित्राने सेवाभावी संस्थांबरोबर काम केले होते. तो म्हणाला, ‘आम्ही समजावून घ्यायला पाहत होतो की कोण वाचले, आणि कशामुळे?’ एक स्पष्ट होते, झाडांवर चढण्यात तरबेज होते ते सहज वाचले. मला लहानपणी झाडांवर चढण्याचा प्रचंड शौक होता. आमच्या घरात मोठमोठी झाडे होती. लहानपणी खूप वेळ त्यांच्यावर चढून बसून घालवला होता. १५ ऑगस्टला मी ज्या प्राथमिक शाळेत शिकलो तिथे स्वातंत्र्यदिनाचा पाहुणा म्हणून मला बोलावले. मुलांना काय उपदेश द्यायचा? मी त्यांना ही त्सुनामीची गोष्ट सांगितली आणि म्हणालो, ‘जेव्हा जेव्हा संधी मिळेल, तेव्हा तेव्हा झाडांवर चढा!’ मग यांच्यावरच लेख लिहिला. आमच्या घराजवळच्या किराणा भुसार मालाच्या दुकानात गेलो होतो. एक तरुण बाई त्यांच्या नऊ-दहा वर्षांच्या मुलासोबत आल्या होत्या. त्यांनी आपणहून ओळख करून घेतली. मुलाला म्हणाल्या, ‘झाडावर चढ म्हणून तुला एक लेख दाखवला ना, त्याचेच हे लेखक!’\u003cbr\u003eअलीकडे गोरे बनवण्याच्या मलमांच्या जाहिरातींचे पेव फुटले आहे. मग मी मानवाच्या त्वचेच्या रंगाची उत्क्रांती कशी झाली याचा अभ्यास केला. अगदी स्पष्ट आहे की, आपल्या देशातल्या उन्हापावसाला काळ्या-सावळ्या रंगाची त्वचाच आरोग्यप्रद आहे. महाभारतातली अद्वितीय लावण्यवती द्रौपदी कृष्णवर्णा होती. कालिदासाचा यक्ष आपल्या अलकानगरीतल्या प्रेयसीचे वर्णन करताना म्हणतो, ‘तन्वी श्यामा, सडपातळ आणि सावळी.’ मग एक लेख लिहिला : ‘रंगात रंग हा श्याम रंग!’ माझ्या परिचयाच्या एक महिला म्हणाल्या, ‘मी माझ्या सावळ्या मुलीला मुद्दाम वाचून दाखवला. तिचा न्यूनगंड जरा कमी झाला असेल अशी आशा आहे.’ दुसऱ्या एक शाळेतल्या मुलींबरोबर काम करणाऱ्या बाई मुद्दाम भेटायला आल्या. म्हणाल्या, ‘आम्ही हा लेख आमच्या सर्व विद्यार्थिनींना वाचा म्हणून आग्रहाने सांगितले आहे.’ अधूनमधून छोट्याशा कविताही रचून लेखांत वापरतो. लहानपणापासून पक्षांची, खेळांची आवड आहे. आता तर नवनव्या साहसक्रीडा शक्य झाल्या आहेत. मध्यंतरी हिमाचल प्रदेशात पॅराग्लायडिंगचा चित्तथरारक अनुभव घेतला. चक्क आकाशात उडत होतो, आणि एक गिधाड माझ्या १० फूट वर तरंगत होते. मग लेखात एक कविता समाविष्ट केली : वावडी वाहात ही अन् मी गिधाडांच्या सवे, शुद्ध निर्मल शीत वायू, भाग्य मोठे ह्या हवे!\u003cbr\u003eनिसर्गाच्या कलाने, लोकांच्या साथीने विकास कसा साधावा, हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याबद्दल मी सातत्याने लेखन करत आलेलो आहे. परंतु २०१०मध्ये माझ्या अध्यक्षतेखालील पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाच्या कामामुळे मला याबाबत जास्त खोल समज आली आहे; आणि या अहवालासंदर्भात झालेल्या विचारमंथनामुळे तो विषय लोकांपुढे जास्त तीव्रतेने आलेला आहे. या संदर्भात भारतात तीन महत्त्वाचे कायदे मंजूर करण्यात आलेले आहेत. पिकांच्या वाणांचे व शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण, जैवविविधता आणि वनाधिकार. हे कायदे बनताना झालेल्या विचारमंथनात, त्या कायद्याचे मसुदे व नियम बनवण्यात मी सहभागी होतो. त्यांचीच पार्श्वभूमी असलेल्या पंचायत राज्यव्यवस्थेबद्दलच्या प्रयोगांतही मी भाग घेतला होता. विशेषतः केरळ शास्त्र साहित्य परिषदेबरोबर सायलेंट व्हॅलीपासून ते पंचायत पातळीवर नियोजन करण्याच्या प्रयोगांपर्यंत. या सर्व अनुभवांच्या संदर्भात आधी राम गुहांबरोबर इ़कॉलॉजी अॅण्ड इक्विटी हे पुस्तक लिहिले होतेच. आता लोकांच्या सहभागाने त्यांच्या नैसर्गिक संसाधनविषयक ज्ञानाचे, विकासासंबंधीच्या इच्छा आकांक्षांचे नीट संकलन करून निसर्ग नियोजन कसे करावे, याचा आराखडा बनवला. त्या संदर्भात इंग्लिशमध्ये व मराठीतही पुस्तिका लिहिल्या. वनाधिकार कायद्याचे विवेचन ‘बहरू दे हक्काची वनराई’ या लेखमालेत व नंतर एका इंग्लिश व मराठी पुस्तिकेत केले. जुना क्रम बदलून आधी मराठी पुस्तिका लिहिली. मग तिचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले. माझ्या स्फुट लेखनातही या संबंधी अनेक लेख लिहिले. त्याचा गाभा ‘आम्हांला विश्वकर्मा हवा, दुःशासन नको’ या स्फुट लेखात छान उतरला आहे.\u003cbr\u003e‘मी कोण आहे?’ असा स्वतःला प्रश्न विचारला, तर मला वाटते मी निसर्गातील, मानवी समाजातील, कलेतील, वाङ्मयातील, ज्ञानविज्ञानातील, सर्व प्रकारच्या सौंदर्याचा उपासक आहे. पंधराव्या वर्षांपासून ७६व्या वर्षांपर्यंत काहीतरी सुंदर लिहावे म्हणून झटत आहे. विशेषतः गेली १२ वर्षे मराठीत नियमित लेखन करायला लागल्यापासून हा सर्जनशीलतेचा आनंद उत्कटतेने अनुभवायला मिळतो आहे. मर्ढेकरांच्या शब्दांत म्हणावेसे वाटते, सौंदर्याचे पसरे बघ हे जगावरी चांदणे, राहिले काय आता मागणे!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eडॉ. माधव गाडगीळ\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\u003cbr\u003e\u003c\/h5\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57176266539311,"sku":null,"price":350.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/B9BF7F24-6BBB-45DE-895F-73C135419F7D.png?v=1777090458","url":"https:\/\/pipagro.com\/products\/nisargane-dila-anandkand-natures-blessings-dr-madhav-gadgil","provider":"PIP AGRO","version":"1.0","type":"link"}