{"product_id":"swayampakagharatil-davakhana-natures-pharmacy-kitchen-dr-balaji-tambe","title":"स्वयंपाकघरातील दवाखाना | Nature’s Pharmacy in Your Kitchen | Dr Balaji Tambe","description":"\u003ch5\u003eमनोगत \u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cbr\u003e\u003c\/span\u003e\n\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वतःचे आरोग्य सांभाळावे हेच जीवनातील आद्य कर्तव्य आहे, असे भारतीय संस्कृतीने सांगितलेले आहे. आपल्या शरीरात शक्ती साठवली जाते व कार्य करण्यासाठी हीच शक्ती उपयोगात आणली जाते, तसेच प्रतिकार करण्यासाठी किंवा एखादी मोठी घटना कार्यान्वित करण्यासाठी जी शक्ती आवश्यक असते ती शरीरामार्फतच वापरावी लागते. शरीर अन्नापासून तयार होते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eघर म्हटलं की तेथे स्वयंपाकघर असते, झोपायची खोली असते, शौचकूप, स्नानघर असते, जमल्यास मुलांना खेळायला, मोठ्यांना बसायला अशी एखादी वेगळी खोली असते, सूर्याचे, आकाशाचे दर्शन घेता यावे या दृष्टीने एखादी बाल्कनी असते. स्वयंपाकघराची योजना अति प्राचीन काळापासून केलेली असे असे दिसते. मनुष्य जेव्हा गुहेत राहत होता तेव्हासुद्धा आतल्या कोपऱ्यात एका बाजूला अग्नी पेटता ठेवून स्वयंपाक करायची व्यवस्था असे. बाहेर जाऊन प्राण्याची शिकार करता यावी या साठी बाहेरच्या बाजूला काही हत्यारे टांगलेली असत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वयंपाकघरात अन्न तयार होते आणि अन्नापासून शरीर तयार होते. त्यामुळे शरीराला काही अपाय झाला किंवा शरीर नीट तयार होत नसले किंवा शरीराला वेगळ्या प्रकारे तयार करायचे असले तर याच स्वयंपाकघरातील वस्तूंचा, धान्यांचा, मसाल्यांचा उपयोग होईल हे साहजिक आहे. म्हणून स्वयंपाकघरातील दवाखाना ही कल्पना अस्तित्वात आली.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eस्वयंपाकघरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा काही ना काही उपयोग असतोच. आपल्याला असे वाटते की मसाल्याच्या वस्तूंचा म्हणजे लवंग, जिरे, धणे, तिखट, हळद वगैरेंचा खास उपयोग असेल. परंतु साधे तांदळा-गव्हाचे पीठ यांचाही इलाज करण्याच्या दृष्टीने उपयोग होतो. पोटिस करण्यासाठी पीठ उपयोगात येते. एकूणच स्वयंपाकघरात असलेल्या प्रत्येक वस्तूचा औषधी उपयोग असतो. या वस्तूंचे गुणधर्म लक्षात आल्यामुळे केलेला स्वयंपाक पचनाला अधिक सोपा व संतुलित होऊ शकेल. शिवाय, खाण्यामुळे कुणाला काही किरकोळ आजार झाला तर प्राथमिक घरगुती उपचार करण्यासाठी स्वयंपाकघरातील काही वस्तूंचा उपयोग करून घेता येईल. यासाठी स्वयंपाकघरातील वस्तूंच्या गुणधर्माबद्दल नीट माहिती पाहिजे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया घरगुती उपचारांची माहिती समाजातील अधिकाधिक व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी व्याख्याने दिली; 'फॅमिली डॉक्टर' मधूनही माहिती दिली. हे करताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की आयुर्वेद हा विषय अत्यंत वैज्ञानिक व सर्वंकष आहे. या विषयात आपल्या पिण्याच्या पाण्यापासून सगळ्याबद्दल सांगितलेले आहे. हे सर्व कळल्यावर लोकांचा आयुर्वेदावरचा विश्वास वाढला. आयुर्वेदिक औषधांमुळे बरे तर वाटतेच, परंतु या उपचारांचे कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत, हेही लोकांच्या प्रकर्षाने लक्षात आले. आयुर्वेदाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेदाचे उपचार नैसर्गिक द्रव्य वापरून केले जात असल्यामुळे या उपचारांदरम्यान कुठलेही विजातीय द्रव्य शरीरात जात नाही व पुढे त्रास होत नाही. त्यामुळे स्वयंपाकघरातील दवाखान्याचा महिमा वर्णावा तेवढा कमी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eया पुस्तकात स्वयंपाकघरात असलेल्या वस्तूंची ओळख करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातील बहुतांशी वस्तू सर्व जगभर असतात. काही ठिकाणी दोन-वेळा वस्तू वेगळ्या असतात. काही ठिकाणी ज्वारी वा बाजरी मिळाली नाही तर त्याहून निकृष्ट धान्य वापरलेले असते. प्रत्येक मनुष्याचे शरीर पांचभौतिक असते व त्यामुळे या पांचभौतिक शरीराला ताकद जगवण्यासाठी, देण्यासाठी सर्व ठिकाणी जवळजवळ सारख्याच स्वयंपाकाची योजना असते. त्या दृष्टीने एकाच्या स्वयंपाकघरातील दवाखाना दुसऱ्यालाही उपयोगी पडू शकतो. त्यामुळे स्वयंपाकघर हे आरोग्य टिकविणारे असून अत्यंत आवश्यक आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eकाळाच्या ओघात स्वयंपाकघर हळूहळू लहान लहान होत गेल्याचे दिसते. परंतु आज लोकांना अन्नाचे महत्त्व पटल्यामुळे पुन्हा स्वयंपाकघर मोठे होऊ लागलेले आहे. बाहेरच्या खाण्यात आनंद मानण्याची प्रवृत्ती सध्या कमी होताना दिसत आहे. त्या निमित्ताने स्वयंपाकघरातील दवाखाने अधिक सुसज्ज, अधिक सोयींनी युक्त होतील ही खात्री आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003ch5\u003e\u003cspan\u003eडॉ. श्री बालाजी वासुदेव तांबे परिचय\u003c\/span\u003e\u003c\/h5\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआध्यात्मिक क्षेत्रात मोठा अधिकार असलेल्या वेदशास्त्रसंपन्न श्री. वासुदेव तांबे शास्त्री यांच्या घरात बडोदा येथे डॉ. श्री बालाजी तांबे यांचा जन्म झाला. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांची रुची व गती उपजतच होती आणि घरातील वातावरण वेद, उपनिषदे, पुराणे, मंत्र-तंत्र यांच्या अभ्यासासाठी फारच अनुकूल होते. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच आध्यात्मिक अभ्यासाबरोबरच शालेय शिक्षणास सुरुवात करून त्यांनी अभियांत्रिकी व आयुर्वेदाचे पदवी शिक्षण पूर्ण केले. माता-पिता व सद्गुरु श्रीदत्तात्रेय यांच्या आशीर्वादामुळे दृश्य जगताबरोबरच सूक्ष्म जगताचाही अभ्यास व अनुभव घेता आला. त्यातूनच पुढे भारतीय परंपरा आणि वेद, आयुर्वेद, पुराणे, मंत्र-तंत्र, योग, ज्योतिष, संगीत यावर संशोधन करून त्यातील गूढार्थ समजून त्याचा जीवनाची विविध अंगे समृद्ध करण्यासाठी उपयोग केला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e१९६५ सालापासून 'ॐ स्वरूपा' या टोपणनावाने लेखन करून ध्यानयोग केंद्राची स्थापना केली व 'सोम' ध्यानयोग (Santulan Om Meditation yog - SOM Yog) ही ॐकार गुंजनाची दीक्षा देऊन अनेकांना आध्यात्मिक प्रगतीसाठी प्रेरणा दिली. सध्या भारतात व परदेशात डॉ. श्री बालाजी तांबे यांची दीक्षा घेतलेला मोठा साधकवर्ग उपासना करत असतो. या सप्तरंगी ध्यानपद्धतीचे महत्त्वाचे अंग म्हणजे सामाजिक सत्कृत्य सेवा आणि सामुदायिक ध्यान प्रार्थना होय. डॉ. श्री बालाजी यांनी १९७२ पासून दर वर्षी आषाढ महिन्यात सात दिवसांचे आध्यात्मिक विषयांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविणारे शिबिर घेऊन अभ्यासक्रम चालविला.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e'सोम' ध्यानयोग ही ध्यानपद्धती आणि 'संतुलन क्रियायोग' ही विशेष योगपद्धती श्री. बालाजी यांनी विकसित केली. आज भारतात व जगात अनेक साधक विविध केंद्रांवर या पद्धतींचा लाभ घेत आहेत. आपल्या प्राचीन ग्रंथातील ज्ञानाबरोबरच श्रीमद्भगवद्गीता, रामायण, महाभारत, आयुर्वेद आणि इतर भारतीय विद्या यावर गेली ४० वर्षे श्री. बालाजी प्रवचने देत आहेत. आयुर्वेद प्रचार व उपचार याबरोबरच स्वास्थ्यसंगीताचे भारतात व भारताबाहेर कार्यक्रम करून त्यांनी अनेकांना स्वास्थ्य प्रदान केले. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे सर्वंकष उपचार पद्धतीचे तंत्र डॉ. श्री बालाजी यांनी स्वतःच्या संशोधनाने व प्रयोगांनी पक्के केले आहे. आयुर्वेद आणि योगातील संयम डॉ. श्री बालाजी यांच्या रक्तात मुरलेला आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआत्म्याचे संतुलन करायला शिकवणारी 'आत्मसंतुलन पद्धती' त्यांनी सिद्ध केलेली आहे. ही पद्धती केवळ व्याधी दूर करत नाही, तर जीवनविषयक जाण व्यापक करते. यासाठी त्यांनी १९८२ मध्ये कार्ला येथे शांत, स्वच्छ, आध्यात्मिक वातावरण असलेल्या वैदिक गुरुकुल पद्धतीच्या 'आत्मसंतुलन व्हिलेज'ची स्थापना केली. आत्म्याचे संतुलन करायला शिकवणारी जीवनपद्धती त्यांनी विकसित केली. सध्याच्या तरुण पिढीला सुद्धा अवघड आध्यात्मिक विषय सोप्या भाषेत समजावण्याचा श्री. बालाजी यांचा हातखंडा आहे. आत्मसंतुलन व्हिलेज येथे आयुर्वेदातील वर्णनानुसार औषधांच्या निर्मितीसाठी आयुर्वेदिक फार्मसी उभी केली. संगीत निव्वळ मनोरंजनासाठी नसून ती एक उपचारपद्धती आहे, असे त्यांचे मत आहे. त्या दृष्टीने त्यांनी स्वास्थ्यसंगीताच्या अनेक ध्वनिफिती तयार केल्या आहेत. निरामय शरीराबरोबरच जीवनविषयक जाण व्यापक करून मानसिक व आत्मिक आनंदाचे कारंजे त्यांनी अनेकांच्या जीवनात फुलवले. टाइम्स म्युझिक व संतुलनच्या सर्व केंद्रांवर स्वास्थ्य संगीताचे अल्बम्स उपलब्ध आहेत. यातील काही अल्बम्स लाखांच्या संख्येत लोकांनी स्वीकारले आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eभारत तसेच परदेशातील आघाडीची वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमध्ये डॉ. श्री बालाजींचे योग, आयुर्वेद, फलज्योतिष, स्वास्थ्यसंगीत व अध्यात्म यावर लेख नियमितपणे प्रसिद्ध होतात. त्यांची आजपर्यंत 'संतुलन क्रियायोग' (इंग्रजी व मराठी), 'घरगुती आयुर्वेदिक उपचार' (मराठी व इंग्रजी), 'लिव्हिंग मेडिटेशन थ्रू ॐ स्वरूपा ध्यानयोग' (चार भाग), रामायणाचा गूढार्थ समजवणारे 'श्रीराम विश्वपंचायतन' (मराठी) - 'आत्मरामायण' (गुजराथी), 'आयुर्वेदीय गर्भसंस्कार' (मराठी, इंग्रजी व गुजराथी), शरीरातील षट्चक्रांबद्दल माहिती देणारे 'चक्र सुदर्शन' (मराठी व गुजराथी), आयुर्वेद उवाच (भाग १, २, ३), मंत्र जीवनाचा, मंत्र आरोग्याचा, श्री गीतायोग - शोध ब्रह्मविद्येचा (भाग १ ते १५), Peacock Feathers (Part 1 \u0026amp; 2), वातव्याधी, स्त्रीआरोग्य, स्वास्थ्याचे २१ मंत्र (भाग १ व २), चमत्कार पंचकर्माचा, The Untold Secrets of Life - Purushasuktam (इंग्रजी व जर्मन), Communication with the Self - The SOM Program (इंग्रिश व जर्मन) वगैरे अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. गेली अनेक वर्षे आत्मसंतुलन व्हिलेज येथून प्रकाशित होणाऱ्या 'एको' मासिकाचे ते संपादक आहेत. दैनिक 'सकाळ' या आघाडीच्या वृत्तपत्रातर्फे प्रकाशित होणाऱ्या 'फॅमिली डॉक्टर' या साप्ताहिक पुरवणीचे ते मुख्य सल्लागार आहेत. डॉ. श्री बालाजी यांनी 'साम मराठी' या वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रोज 'श्री गीतायोग-शोध ब्रह्मविद्येचा' या कार्यक्रमात श्रीमद्भगवद्गीतेच्या श्लोकांवर तसेच 'नमो भारतम्' या कार्यक्रमात समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आणि आयुर्वेद यावर निरूपण केले. सध्या 'श्रीकृष्णगीता-नवी दृष्टी, नवा विचार' या कार्यक्रमाद्वारे मार्गदर्शन करत आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Sakal Prakashan","offers":[{"title":"1 Book","offer_id":57228260966703,"sku":null,"price":240.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0848\/8065\/4639\/files\/BA157264-2935-4ED4-8E31-C31920BC2B73.jpg?v=1777113160","url":"https:\/\/pipagro.com\/products\/swayampakagharatil-davakhana-natures-pharmacy-kitchen-dr-balaji-tambe","provider":"PIP AGRO","version":"1.0","type":"link"}