मंत्र जीवनाचा | The Life Mantra | Dr. Balaji Tambe

Mantra That Blossoms the Life | Collection of Ayurvedic wisdom & holistic insights designed to harmonize the body, mind, and soul for a life of pure joy and lasting health.

| 35 Reviews
₹ 260.00

MRP (Incl. of all taxes)

Check Delivery Availability
USP badge
USP badge
USP badge
USP badge
मंत्र जीवनाचा | The Life Mantra | Dr. Balaji Tambe
मंत्र जीवनाचा | The Life Mantra | Dr. Balaji Tambe ₹ 260.00
1 / 5
 मनोगत 

मनोगत जर दोन शब्दांत लिहिता आले, तर तो मंत्रच होईल! ज्याचे मनन केल्याने कोणताही भौतिक व आध्यात्मिक प्रकारचा लाभ होतो. संकटापासून रक्षण करून मनुष्यमात्राला सुखी होण्यासाठी जो मदत करतो, तो मंत्र. अशाच एखाद्या विषयातून तयार झालेला मंत्र विस्तृतपणे समजावून लिहिला, की त्यालाच मनोगत म्हणत असावेत. विशुद्ध स्वरूपाच्या मनोगतात मंत्राची सारी लक्षणे दिसतात ती म्हणूनच.

या पुस्तकात 'फॅमिली डॉक्टर' साठी लिहिलेल्या प्रस्तावना संपादित केलेल्या आहेत. हे प्रस्तावनांचे लेख लिहीत असताना उद्देश हा होता, की नुसते वैद्यकशास्त्रातील नव्हे तर रोगाचा, अनारोग्याचा, अशांततेचा किंवा माणसांमधील दुःखांचा इतर सर्व जीवनातील अंगांशी येणारा संबंध पाहून ते दुःख दूर करण्यासाठी जर काही कल्पना सुचली वा विचारसरणी दृढ झाली किंवा निदान सर्व सुस्पष्ट चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले तर चांगले. अशा दृष्टीने केवळ आयुर्वेदाच्या किंवा शरीराच्या आरोग्याचा विचार न ठेवता एकूणच मनुष्यत्वाचा विकास व शरीर, मन व आत्मा यांचे समत्व लाभावे व त्यासाठीच्या कल्पना मुक्तपणे लिहिता याव्यात या दृष्टीने या प्रस्तावना लिहिल्या होत्या.

आयुर्वेद हा शब्दच जेव्हा मंत्र होऊन समाजात काम करू लागला तेव्हा वेगवेगळ्या निमित्ताने भेटणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा आयुर्वेदावर कसा विश्वास आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला; पण आयुर्वेदावर म्हणजे नेमका कशावर विश्वास आहे? आयुर्वेद म्हणजे काय? असे प्रश्न विचारल्यानंतर त्याचे निश्चित उत्तर त्यांच्याकडून मिळू शकले नाही. एक लक्षात आले, की आयुर्वेद ही भारतीय परंपरा, भारतीय संपत्ती व भारतीय संस्कृती आहे आणि याचा सर्वांनाच अभिमान आहे. जसे अनेक संकटांना तोंड देऊन भारतीय संस्कृती टिकून राहिली तशाच पद्धतीने आयुर्वेदही टिकून आहे व तो जनसामान्यांनी घट्ट धरून ठेवलेला आहे; परंतु प्रत्यक्ष आयुर्वेदाची तपशिलात संकल्पना माहीत नसल्याने विश्वास आयुर्वेदावर पण प्रथम पसंती मात्र इतर सर्व आरोग्यव्यवस्थेवर असे परस्परविरोधी चित्र दिसू लागले. ते पाहिल्यानंतर पूर्वीच्या काळी अस्तित्वात असलेल्या, पण काळाच्या ओघात लुप्त झालेल्या, फॅमिली डॉक्टर या संकल्पनेला उचलून धरण्यासाठी 'फॅमिली डॉक्टर' ही पुस्तिका 'सकाळ'मधून प्रकाशित करण्याचे ठरले.

महाराष्ट्रातील संस्कृतीचे केंद्र असलेल्या पुणे शहरात व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात 'सकाळ' वर्तमानपत्र स्वतःची गुणवत्ता, लोकाभिमुखता, दर्जा टिकवून राहिलेले प्रमुख वर्तमानपत्र आहे. एका सामाजिक जबाबदारीतून आयुर्वेदासारख्या भारतीय पारंपरिक व भारतीयत्वात रुजलेल्या जीवनशास्त्राचा अभ्यास व्हावा, या उद्देशाने 'सकाळ'ने हे मोठे काम अंगावर घेतले. त्यातून 'फॅमिली डॉक्टर'चा उदय झाला.

डॉक्टर किंवा वैद्यक व्यवसाय करू इच्छिणारे ज्या तऱ्हेने आयुर्वेदाचा अभ्यास करतात तीच पद्धत सर्वसामान्य लोकांना समजू शकेल असे वाटत नाही. जीवनाच्या आरोग्याचा विचार करण्याच्या दृष्टीने सर्वसामान्यांना माहीत नसलेले विषय, तसेच पूर्वी अनुभव घेतलेले विषय हसत खेळत आत्मसात करता यावेत, या दृष्टीने या प्रस्तावना लिहिण्याचा प्रयत्न केला.

सर्वांनी अत्यंत प्रेमाने याचा स्वीकार केला. आमच्या जीवनात या प्रस्तावनांमुळे बदल झाले, शुक्रवारचा अंक हातात आला, की प्रथम प्रस्तावना वाचल्यानंतर पुढचा दिवस हसत-खेळत कसा जातो हे सांगणारी अनेक पत्रे आली. या सर्व प्रस्तावना केवळ आरोग्यासाठी नव्हे तर निखळ आनंदासाठी वारंवार वाचणारेही अनेक आहेत. या सर्व प्रस्तावना पुस्तकरूपाने प्रसिद्ध व्हाव्या अशी अनेक वाचकांनी इच्छा दर्शविली.

दमा, पोटदुखी वगैरे प्रत्यक्ष आयुर्वेदाशी संबंधित विषयांच्या प्रस्तावना एका भागात आणि मन, तारुण्य, प्रवास वगैरे आरोग्याशी निगडित असलेल्या इतर विषयांच्या प्रस्तावना दुसऱ्या भागात अशी वर्गवारी केली. अर्थात, या दोन्ही पुस्तकांतील प्रस्तावना वाचल्यानंतर हसत-खेळत विषय मनापर्यंत अवश्य पोहोचेल, त्याच्यावर मनन, चिंतन, चर्चा होऊन मन आनंदित झाल्यामुळेच आरोग्याचा लाभ होईल या हेतूने पुस्तकांना 'मंत्र जीवनाचा' व 'मंत्र आरोग्याचा' असे नामकरण केले. ही दोन्ही पुस्तके आज प्रसिद्ध होत आहेत याचा खूप आनंद होत आहे. या प्रस्तावना पुस्तकरूपाने प्रसिद्ध करतेवेळी पुनप्रत्ययाचा एक छान अनुभव आला.

'मंत्र आरोग्याचा' व 'मंत्र जीवनाचा' ही दोन पुस्तके प्रत्यक्षात आणण्याचे मुख्य श्रेय 'सकाळ'चे श्री. अभिजित पवार, श्री. संजीव लाटकर व श्री. अभिजित मुख्य मुळ्ये यांचे आहे. तसेच पुस्तक वेळेवर प्रसिद्ध करण्यात श्री. हेमंत वंदेंकर व श्री. श्रीकांत चव्हाण व श्री. सत्यराज यादव यांचेपण सहकार्य लाभले. तसेच या पुस्तकांचे मुद्रण व वितरण या महत्त्वाच्या कार्याची जबाबदारी घेतल्याबद्दल मी 'सकाळ पेपर्स' प्रा. लि. व पुस्तकांच्या प्रकाशनाची जबाबदारी घेतल्याबद्दल 'बालाजी तांबे फाउंडेशन'चा आभारी आहे. श्रीमती विजया कोल्हे यांनी 'फॅमिली डॉक्टर' मधील प्रस्तावनांच्या टंकलेखनाचे काम केले, त्यांचेही मी आभारी आहे.

आज धनत्रयोदशी-धन्वंतरी जयंतीच्या दिवशी 'फॅमिली डॉक्टर' या साप्ताहिक पुरवणीला चार वर्षे पूर्ण होत आहेत व त्याच दिवशी या पुस्तकांचे प्रकाशन होत आहे, हा सुमंगल योग होय.

श्री धन्वंतरींच्या कृपेने या मंत्रसंग्रहाचा आरोग्य व सुखसमृद्धीसाठी सर्वांनाच उपयोग व्हावा, ही प्रार्थना.

डॉ. श्री बालाजी तांबे

अश्विन वद्य त्रयोदशी, शके १९२९

(६ नोव्हेंबर २००७)