प्राचीन भारतीय कृषि विज्ञान | The Science of Agriculture in Ancient India | Dr.Rajni Joshi

Scientific depth & contemporary relevance of ancient Indian agricultural wisdom found in Sanskrit literature

| 35 Reviews
₹ 150.00

MRP (Incl. of all taxes)

Check Delivery Availability
USP badge
USP badge
USP badge
USP badge
प्राचीन भारतीय कृषि विज्ञान | The Science of Agriculture in Ancient India | Dr.Rajni Joshi
प्राचीन भारतीय कृषि विज्ञान | The Science of Agriculture in Ancient India | Dr.Rajni Joshi ₹ 150.00
1 / 8
प्रस्तावना


डॉ. रजनी जोशी या संस्कृत विषयाच्या प्राध्यापिका आहेत. पण केवळ साहित्य व तत्त्वज्ञान या विषयावर लक्ष केंद्रित न करता संस्कृतमधील कृषीविज्ञानावर त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले.
वेदकाळापासून ते लोकोपकार ग्रंथापर्यंत संस्कृत साहित्यात जे-जे कृषि-वनस्पतिविषयक संदर्भ आलेले आहेत, त्या सर्वांचा साकल्याने विचार प्रस्तुत पुस्तकात केलेला आहे. वेदवाङ्मय व अन्य संस्कृत साहित्य, महाभारत, पुराणे, बौद्ध व जैन वाङ्मय या सर्व प्राचीन ग्रंथांमधून जो कृषिशास्त्राचा व वनस्पतिशास्त्राचा विचार केला गेला आहे, त्याचे महत्त्वाचे संदर्भ लेखिकेने या पुस्तकात संकलित केलेले आहेत.
नक्षत्रे, वृक्षारोपण, बियांची काळजी, पिकांची निगा, कृषिसंवर्धनासाठी महत्त्वाचे उपाय, फळांची काळजी, प्राचीन जलव्यवस्थापन, जमिनीची निगा, कृषिकर्म या सर्व गोष्टींचा विचार प्रस्तुत पुस्तकात आला आहे.
प्राचीन ऋषींची कृषीकडे पाहण्याची दृष्टी अत्यंत पवित्र होती. माता आणि पुत्राचे नाते त्यांच्यामध्ये होते. हा विचार सुरपालांचा ‘वृक्षायुर्वेद’ वाचताना प्रकर्षाने जाणवतो. त्याचबरोबर वृक्ष-वनस्पतींची पूजा हा विषय महत्त्वाचा वाटतो. प्राचीन कृषीविज्ञानातील काही विशेष संदर्भ आजच्या काळात उपयुक्त ठरले आहेत.
प्राचीन भारतीय कृषि विज्ञान हे पुस्तक लिहिताना इक्रिसॅटचे चेअरमन डॉ. वाय. एल. नेने यांचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना लाभले. तसेच या विषयातील अनेक तज्ज्ञांच्या कृषि-विषयक विचारांचा परामर्श घेता आला. हा विषय 'दैनिक ॲग्रोवन'मध्ये लेखरूपाने प्रसिद्ध झाला होता. त्याचे आज पुस्तकरूपात होणारे रूपांतर अतिशय आनंददायी आहे. लेखनकार्यात रजनी जोशी यांना त्यांचे कृषी क्षेत्रातील जाणकार पती श्री. रामचंद्र जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. ते स्वतः एक प्रगतिशील शेतकरी आहेत.
भारतीय कृषि विज्ञान केवळ प्राचीन म्हणून दुर्लक्षून चालणार नाही; तर त्यातील अनेक महत्त्वपूर्ण व मौलिक गोष्टींचे संदर्भ आजही किती उपयुक्त ठरणारे आहेत, यावर या पुस्तकाने निश्चितच प्रकाश पडेल, याची मला खात्री आहे.
संस्कृतमधील विज्ञान जनसामान्यांसमोर आणण्याची रजनी जोशींची तळमळ लक्षणीय आहे. या पुस्तकाने भारतीय कृषी क्षेत्राला एक दिशा मिळेल, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. ‘सकाळ प्रकाशन’ने त्यांना या कामी जे मोलाचे सहकार्य केले आहे, ते स्पृहणीय आहे.
डॉ. कल्याण काळे
सेवानिवृत्त मराठी विभागप्रमुख, पुणे विद्यापीठ


विषयप्रवेश

आज आपण शेती हा एक व्यवसाय म्हणून पाहतो. प्राचीन काळामध्ये शेती हा एक निसर्गाचा भाग आहे, असा दृष्टिकोन ऋषीमुनींचा होता. त्यामुळे आजूबाजूच्या वृक्षवल्लींसह पक्षी, प्राणिमात्रांचा विचार त्यांनी केल्याचे दिसून येते.
प्राचीन वैदिक वाङ्मयाचा विचार करताना ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, ब्राह्मणग्रंथ, आरण्यके व काही उपनिषदांमधून प्राचीन कृषी व वृक्ष-वनस्पतींचे संदर्भ सापडतात. ‘सुश्रुतसंहिता’, ‘चरकसंहिता’, ‘सूत्रसंहिता’, महाभारत, पुराणे, बौद्ध व जैन वाङ्मय, ‘कृषी पराशर’, ‘कौटिलीय अर्थशास्त्र’, पाणिनीची ‘अष्टाध्यायी’, तमीळ भाषेतील ‘संगम साहित्य’, ‘मनुस्मृती’, वराहमिहिराची ‘बृहत्संहिता’, अमरसिंहाचा ‘अमरकोश’, ‘काश्यपीय कृषिसुक्ती’, ‘उपवनविनोद’, ‘काश्यपसंहिता ज्ञानकांड’ व सुरपालांचा ‘वृक्षायुर्वेद’ या सर्व प्राचीन साहित्यातून कृषी व वनस्पती यांचे अत्यंत विपुल व महत्त्वाचे संदर्भ मिळतात, ते संदर्भ अत्यंत मौलिक असून आजही मार्गदर्शक आहेत.
मनुष्य व सभोवतालचा निसर्ग हे वेगवेगळे नाहीत. मानव हा अतिविशाल निसर्गातील एक लहानसा घटक असून, निसर्गातील प्रत्येक घटकाचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. या निसर्गाचा भूतकाळातील, वर्तमान काळातील स्थितीचा अभ्यास व निरीक्षण यातून मानवी जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न प्राचीन विचारवंतांनी, शास्त्रज्ञांनी, ऋषीमुनींनी केला. निसर्गसृष्टी, कृषी, वृक्षवनस्पती, पशुपक्षी व पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश ही पंचमहाभूते यांच्या अनेक वर्षांच्या चिंतनातून विज्ञानाधिष्ठित तत्त्वज्ञान मांडले. त्याचे फलरूप म्हणजे प्राचीन ‘कृषिविज्ञान’!
त्या वेळी उपकरणे, सामग्री यांची भौतिक प्रगती प्राथमिक अवस्थेतील असली, तरी निरीक्षण व त्यातून उपलब्ध झालेल्या कार्यकारणभावातून भौतिक सृष्टीचे समाजाला हितावह होईल असे नियमन ऋषींनी केले. त्यांचे निष्कर्ष प्राचीन संस्कृत वाङ्मयातून विखुरले आहेत. त्यातून सृष्टिविज्ञानाचे अभ्यासपूर्ण दर्शन घडते.

सृष्टीतील संक्रमणावस्था
सर्व चराचर सृष्टीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या निरीक्षणातून ऋषींना लक्षात आले, की कोणतीही निर्माण झालेली वस्तू एकूण सहा अवस्थांमधून संक्रमित होत जाते. त्या सहा अवस्था म्हणजे जायते (वस्तू जन्माला येते), अस्ति  (वस्तूला सत्ता प्राप्त होते), वर्धते (ती वस्तू वाढू लागते), विपरिणमते (तिच्यात बदल होतात), अपक्षीयते (ती वस्तू हळूहळू क्षय पावते), विनश्यति (शेवटच्या अवस्थेत नाश पावते). या सहा अवस्थांमधून मनुष्य, पशुपक्षी, वृक्ष, वनस्पती या सर्व सचेतनांना संक्रमण करावे लागते.


आज मानवाची कृषीकडे पाहण्याची दृष्टी
आज मानव कृषी विषयाकडे एक व्यवसाय म्हणून पाहतो. प्राचीन काळी ती त्याची जीवनशैली होती. प्राचीन ऋषींनी वर्तवलेले पावसाचे अंदाज आजही तंतोतंत ठरतात. कोणत्या नक्षत्रात पेरणी करावी, कोणत्या नक्षत्रातील पाऊस चांगले असतात व कोणत्या नक्षत्रातील नसतात; उदाहरणार्थ, विशाखा नक्षत्रात पडणाऱ्या पावसाने उंदरांची संख्या जमिनीत वाढते व नंतरच्या नक्षत्रात येणाऱ्या मांजऱ्या पावसामुळे त्या उंदरांचा नायनाट होतो, हे प्राचीन ऋषींचे निरीक्षण आजही बरोबर आहे. नक्षत्रांचा लोखंडी चरणात पडणारा पाऊस जमीन लोखंडासारखी बनवतो. प्राचीन ऋषींनी मांडलेली नांगरांची मापे, बैलांच्या अवजारांची शास्त्रोक्त मापे आजही बरोबर आहेत. आजही ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी पर्जन्यवृष्टीच्या अंदाजाबद्दल बोलताना किंवा इतर शेतीकामाबद्दल बोलताना नक्षत्रांचा उल्लेख करतात.


प्राचीन ऋषींचे जाणतेपण
डॉ. पंचमुखी यांच्या मतानुसार, प्राचीन ऋषी ‘शास्त्रज्ञ’ होते. यांत्रिक प्रगती नसलेल्या काळात सूक्ष्म निरीक्षण, परीक्षण, अभ्यास व अनुभव यांवरून ऋषींनी स्वतंत्र शास्त्रे तयार केली. प्राचीन ऋषींचे ‘जागृत ज्ञान’ विज्ञानाच्या सर्व कक्षा प्रकट करणारे आहे. मानवी जीवनाचा प्राण असलेल्या, अन्न देणाऱ्या वृक्ष, वनस्पती आणि पाणी या विषयावर प्राचीन ऋषींनी अत्यंत सूक्ष्म व अभ्यासपूर्ण दृष्टीने विचार केला आहे.


संस्कृत भाषेतील विज्ञान
संस्कृत भाषेत विज्ञानाची बीजे लपलेली आहेत. वनस्पतिशास्त्र, ग्रहगणितशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, धनुर्वेद, संगीतशास्त्र, यज्ञशास्त्र, पंचमहाभूतांचे शास्त्रीय विवेचन, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान, कृषिशास्त्र, जलशास्त्र, धर्मशास्त्र, दंडनीतिशास्त्र, नीतिशास्त्र, भाषाशास्त्र, संख्याशास्त्र, वास्तुशास्त्र, प्राणिशास्त्र, नृत्यशास्त्र, नाट्यशास्त्र यांमधून संस्कृत विज्ञानाचा विस्तार झाला आहे. समृद्ध संस्कृत भाषेतील या विज्ञानाची ओळख करून घेणे आज काळाची गरज आहे. प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर व प्रदीर्घ चिंतनातून शास्त्रीय पायावर केलेल्या संशोधन, सूत्राची आधुनिक विज्ञानाच्या निकषांवर घासून त्यातील शास्त्रीयता पडताळून पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

कृषिमहत्त्व
शेतीचे पृथ्वी, गो म्हणजे बैल, बीज, स्वामी हे चार स्तंभ असून, यातील एक जरी स्तंभ नसेल तर ती कृषी निष्फळ असल्याचे मत पराशरांनी व्यक्त केले.


वृक्षायुर्वेद विचार
वृक्षाच्या सचेतनत्वाचे व उपयुक्ततेचे संदर्भ वेदात ठिकठिकाणी सापडतात. महाभारतात मोक्षधर्म पर्वात भृगू भारद्वाज ऋषींच्या संवादातून समग्र चिंतन व्यक्त झाले आहे. वराहमिहिरची बृहत्संहिता, काश्यप ऋषींची काश्यपसंहिता (ज्ञानकांड), अग्निपुराण, सुरपालांचा वृक्षायुर्वेद, उपवनविनोद विश्ववल्लभ या संहिता व ग्रंथांमधून वृक्षायुर्वेदाचा सर्वांगीण विचार केला आहे.
‘वृक्षायुर्वेद’ म्हणजे वृक्षाचे मूळ, साल, पान, फूल व फळ हे पंचांग मानून त्यांची चिकित्सा करणारे शास्त्र. या पाच अंगांपैकी कोणत्याही एका अंगाला कोठेही रोग होऊ शकतो. रोगामुळे वृक्ष नष्ट झाले तर नवीन वृक्ष लावून त्याची फळे मिळेपर्यंत फार मोठा काळ जावा लागतो. त्याऐवजी रोगग्रस्त वृक्षाची चिकित्सा करून उपाययोजना करण्याविषयी मार्गदर्शन केले आहे. या शास्त्रात कलम करणे (रोपण), एका जागेवरून दुसऱ्या जागेवर संपूर्ण वृक्षाचे मुळासकट रोपण करणे (संक्रमण विरोपण) यांसारख्या विषयांनाही स्पर्श केला आहे. वेदापासून ते सुरपालांच्या वृक्षायुर्वेदापर्यंत वनस्पतिशास्त्राचा आध्यात्मिक, आधिदैविक व आधिभौतिक स्तरांवर विचार केला आहे.


सर्वात महत्त्वाचे
आपल्या जनन्याचे व्यवस्थापन आपल्या पित्यावर सोपवता येईल, स्वयंपाकघराचे व्यवस्थापन आपल्या मातेवर सोपवता येईल, गुराढोरांचे व्यवस्थापन बरोबरीच्या व्यक्तीवर सोपवता येईल. मात्र, आपले शेत स्वतः शिवाय दुसऱ्या कुणाच्याही देखभालीखाली ठेवू नये, हा अत्यंत महत्त्वाचा विचार कृषी पराशर ग्रंथात आला आहे.