साद रानवाटांची | The Call of the Wild Trails | Anuj Suresh Khare

An immersive journey through India's wilderness that transforms how you see, hear, and protect the natural world

| 35 Reviews
₹ 399.00

MRP (Incl. of all taxes)

Check Delivery Availability
USP badge
USP badge
USP badge
USP badge
साद रानवाटांची | The Call of the Wild Trails | Anuj Suresh Khare
साद रानवाटांची | The Call of the Wild Trails | Anuj Suresh Khare ₹ 399.00
1 / 5
साद अरण्यवाटांची


अग्निपंखांची नक्षी उमटे पाहा तिथे आकाशी
नव्या घराचा हट्ट धरे सुगरण आपल्या सख्याशी
दूर दाट जंगलामधुनी कस्तुर तो वाजवी पावा
दूरदेशीचे पक्षी येऊनी, पुन्हा जाती आपल्या गावा
कधी वर कधी खाली, वेडा राघू दावी कसरती
कुठे दयाळ तर कुठे सुभग छेडितो मधुर सूर साती
कुणी हेमंताची वार्ता सांगे, कुणी वर्षाचा सांगावा
उंच भरारी घेऊन कोणी नभावरी आपला हक्क सांगावा
पक्ष्यांची या भाषा समजुनी त्यांच्या दोस्तीचा छंद जडावा
विहंगगानात स्वर मिसळूनी अवघा जन्म समृद्ध व्हावा
हिरव्या रंगाची जादू चढता कुठे मृगांची माळ फुले
दोन तरूंची भेट घडवी कपिकबिल्याचे गगनझुले
कुठे फळांचा सडा पाहुनी गजराजाची उडते घाई
कधी नजरेची परीक्षा पाही धूर्त बिबळ्याची चतुराई
रानकुत्र्यांचा संघ सांगे ऐक्याला कधी मात नसे
पदस्पर्शाने भूमी जिंकता कुठे वाघाचा डौल दिसे
अरण्यवाटांची साद ऐकुनी चला निसर्गाची कास धरू
त्याच्या रक्षणाचा ध्यास घेऊनी आपलेच भविष्य उजळ करू

ओंकार पांडुरंग बापट

 
निसर्गवाचनाचा श्रीगणेशा


पूर्वी आम्ही जंगलात फिरायला जातोय असं सांगितल्यावर लोकांच्या प्रतिक्रिया मजेशीर असायच्या. काय करणार जंगलात जाऊन? काय बघणार? किंवा अगदी ‘ह्या... जंगलात काय जायचं?’ इथपर्यंत आमच्या कानावर पडायचं. मग हळूहळू आम्ही जंगलात जाऊन काय करतो, काय मजा येते, काय आनंद घेता येतो हे कळल्यावर समोरच्याच्या चेहऱ्यावरील रेषांमध्ये थोडा फरक पडायचा. पण तरीही चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव ठेवून समोरचा मनुष्य निघून जायचा. या काळात निसर्ग पर्यटनाची व्याप्ती बंद गाडीतून जंगलदर्शन करण्याएवढीच मर्यादित होती. मात्र आता दिवस बदललेत. निसर्ग पर्यटनाला सुगीचे दिवस आले आहेत. किंबहुना आताच खरी निसर्ग जबाबदारीने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. खरं तर निसर्ग ही नुसती पाहण्याची गोष्ट नसून, त्याच्यापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.
मला वाटतं, आपलं निसर्गाशी एक खास नातं आहे. कधी तो आपला गुरू असतो, कधी तो आपला सखा असतो. आपण ज्या चष्म्यातून त्याच्याकडे बघू तसा आपल्याला सापडणारा हा निसर्ग. निसर्गावर प्रेम करणारा मनुष्यप्राणी न सापडणे विरळाच. अगदी लहानपणापासून आपल्याला निसर्गाची ओढ असतेच. अगदी वृद्धापकाळातही निसर्ग आपल्याला बालपणाची आठवण करून देतो. म्हातारपण विसरायला लावतो. म्हणूनच प्रत्येकाचं निसर्गाशी आपलं स्वतःचं असं नातं आहे. निसर्गात माणूस त्याचं वय, समाजातील स्थान, आर्थिक स्थिती, सगळं सगळं विसरतो. अगदी लहान मुलाला आपण जरा एकटं सोडलं, की आपल्या इवल्या डोळ्यांनी सभोवतालचा निसर्ग मनसोक्त पिण्याचा त्याचा प्रयत्न असतो. त्याला त्याचा अर्थ समजत नसला तरीही. मोठे झाल्यावर तर आपल्या निसर्गाबद्दलच्या विचारांना वेगळे आयाम मिळतात. जसजसं वय वाढत जाईल, तसतसं आपले निसर्गाबद्दलचे विचार आणि त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते.
मी गेली २४ वर्षं निसर्गात भटकतो आहे. मी माझ्या स्वतःच्या बाबतीत जरी विचार केला तरी मला निसर्गाने बऱ्याच गोष्टी शिकवल्या. अगदी मुंगीपासून ते हत्तीपर्यंत मी निसर्गाच्या प्रत्येक घटकाकडून काही तरी शिकलो आहे. मुंग्या आपल्याला कठीण परिश्रमांचं मोल शिकवतात. पाण्यात एका पायावर उभं राहून तपश्चर्या केल्यासारखी आपल्या भक्ष्याची वाट पाहणारा बगळा आपल्याला संयमाचं महत्त्व पटवतो. समूहाने शिकार करण्यात तरबेज असणारी रानकुत्री आपल्याला एकसंघ होऊन काम करण्याची शिकवण देतात तर उंच अवकाशात उडणारे फ्लेमिंगो पक्षी एकमेकांमध्ये असलेला समन्वय दाखवून देतात. पावलापावलाला भूमी पादाक्रांत करणारा वाघ आपल्याला स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याचं शिक्षण देतो तर स्वतःचं कुटुंब सांभाळून राहणारे हत्ती एकमेकांबद्दल घ्यायची काळजी दर्शवतात.
सर्वात मुख्य म्हणजे माणूस सोडून निसर्गातील इतर सर्व घटक निसर्गाने घालून दिलेल्या नियमांना धरूनच वागतात. स्वार्थी वृत्ती ही जीवनाला अधोगतीकडे नेते. आपण अगदी आपल्या परिसंस्थेतील सर्वोच्च घटकाचे म्हणजेच वाघाचे जरी उदाहरण घेतले तरी आपल्या हे लक्षात येईल, की प्राणी निसर्गाच्या नियमांचं किती काटेकोरपणे पालन करतात. भूक लागेल तेव्हाच शिकार करणे हा मांसाहारी प्राण्यांचा स्थायीभाव आहे. किंबहुना निसर्गाने आपला समतोल राखून ठेवण्यासाठी घातलेला तो नियम आहे. मी अनेकदा चितळांच्या कळपाशेजारून शांतपणे जाणारा वाघ पाहिला आहे. अशा वेळी भूक लागलेली नसल्याने तो त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्या अनुभवानुसार खूप चांगल्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. बहुतेक वेळा त्या निसर्गाचा आधार घेऊनच सांगितल्या आहेत.
प्राण्यांना त्यांच्या भावना कधीच लपवून ठेवता येत नाहीत. आईचं आपल्या पिलांबद्दल असलेलं प्रेम वादातीत आहे. कुठल्याही प्राणी, पक्ष्याच्या आईकडून आपल्या पिलाचं संगोपन भाव ओतून केलं जातं. तुम्ही धनेश पक्ष्याचं उदाहरण घ्या. धनेश पक्ष्याची मादी, पिलांना जन्म देण्याआधी ढोलीत स्वतःला बंद करून घेते. अंडी उबवणे, पिल्लं बाहेर आल्यावर त्याचं संगोपन करणे, घरट्याची नियमित साफसफाई करणे ही कामं ती ढोलीत राहून करते. तितकंच कौतुक नर धनेश पक्ष्याचं आहे. जितके दिवस मादी ढोलीत राहते, तितके दिवस ती तिच्या अन्नासाठी पूर्णपणे नरावर अवलंबून असते. मादी ढोलीच्या बाहेर येईपर्यंत, नर धनेश पिल्लांबरोबरच मादीलाही अन्न पुरवतो आणि पिल्लं आणि मादी यांची काळजी घेतो.
मार्जारकुळामध्ये तर आईने शिकवल्याशिवाय पिलांना त्यांच्या पुढील आयुष्यात शिकार करता येत नाही. आईजवळ असेपर्यंत पिल्लं संपूर्णपणे आईवर अवलंबून असतात. या काळात त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम पाहण्यासारखं असतं. वाघांच्या अशा आई आणि पिलांचं निरीक्षण करण्यात मी अनेक वेळा तासन् तास घालवले आहेत. पिलांचं एकमेकांबरोबर खेळणं, आईच्या अंगावर उड्या मारणं, आईचं अनुकरण करणं, आईने त्यांची काळजी घेणं हे पाहण्यात जो आनंद मिळतो, त्याची तुलना इतर कोणत्याही गोष्टीशी करता येणार नाही. वाघांमध्ये आईने आपल्या पिलांच्या रक्षणासाठी तिच्यापेक्षा जास्त ताकदीच्या नराशी दोन हात केल्याची उदाहरणंही आहेत.
प्राण्यांमध्ये एक वृत्ती अगदी सहजतेने आढळून येते ती म्हणजे सावधानता. चितळं अगदी मोकळ्या मैदानात चरत असली तरी कमालीची सावध, चौकस असतात. कोणताही धोका दिसला, जाणवला तरी आपल्या इतर बांधवांना सावध करण्याचं काम ती चोख करतात. अशी सावधानता बाळगली तरच आपण टिकून राहू शकू, जगू शकू हे त्यांना पक्कं माहीत असतं. आजूबाजूच्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये आवश्यक बदल करण्याची कला प्राण्यांनी उत्तम राखली आहे. कोणत्याही प्रकारच्या परिस्थितीत स्वतःला ढाळून घेण्याच्या क्रियेत माहीर असणारा बिबट्या त्याचं उत्तम उदाहरण आहे. असे बदल केले नाहीत तर आपली जात टिकून राहणार नाही, ती नामशेष होईल हे प्राण्यांना उमजलं आहे.
पूर्वी आम्ही जेव्हा जंगलात जायचो, तेव्हा त्या पर्यटनाला जंगल पर्यटन यापेक्षा निसर्ग शिबिराचं स्वरूप असायचं. त्यात आम्ही किमान तीन-चार दिवस त्या जंगलात राहत असू. जंगलातील प्रत्येक बाबीवर प्रकाश टाकण्याचा, त्याचा अभ्यास करण्याचा आमचा प्रयत्न असायचा. बर्डिंग सेशन, बोटॅनिकल सेशन, नेचर गेम्स, आकाश दर्शन, जंगल सफारी, इ. अनेक सत्रांनी ही शिबिरं भरलेली असायची. याशिवाय पाणवठ्यावर होणाऱ्या घडामोडींचं निरीक्षण करण्यासाठी एखाद्या पाण्याकाठच्या मचाणावर बसण्याचीही मुभा असे. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे साहजिकच शिबिराला आलेल्या प्रत्येकाचं निसर्गाशी वेगळं नातं तयार होत असे. एकदा का ही नाळ जुळली की त्यातून निसर्ग-अभ्यासक तयार व्हायचे. आता अशा प्रकारचे कार्यक्रम असलेली शिबिरे घेणाऱ्यांची संख्याच कमी झाली आहे. बहुतेक सर्व पर्यटन हे केवळ वाघ दिसण्यावर अवलंबून राहायला लागले आहे.
निसर्ग पर्यटनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर मध्य प्रदेशमधील आणि राजस्थानमधील जंगलं कायमच आघाडीवर होती. निसर्ग पर्यटनाचा विकास या राज्यांत मोठ्या प्रमाणावर आणि काही वर्षांपूर्वीच झाला होता. याउलट निसर्ग पर्यटनाच्या वाढीसाठी आपल्या महाराष्ट्रात थोडे उशिरा प्रयत्न करण्यात आले. मात्र गेल्या काही वर्षांत आपल्याकडेही निसर्ग पर्यटन बहरास आलं आहे. हळूहळू बंद गाड्यांची जागा खुल्या जिप्सींनी घेतली. जंगलाचा आस्वाद पर्यटकांना खुलेपणाने घेता यायला लागला. या खुल्या गाड्यांमधून वाघ पाहण्याची, त्यातील थरार अनुभवण्याची मजा पर्यटकांना कळायला लागली आणि निसर्ग पर्यटन वाढीस लागलं.
या सर्वाचा सर्वात महत्त्वाचा फायदा हा स्थानिक आदिवासी लोकांना झाला. त्यांचं जंगलावर असणारं अवलंबित्व थोड्या प्रमाणावर कमी झालं. त्यांना अधिक रोजगार विविध माध्यमातून मिळायला लागला. गाईड बनून पर्यटकांना जंगलाची ओळख करून देणं, आलेल्या पर्यटकांची राहण्याची आणि खानपानाची व्यवस्था करणं असे अनेक रोजगाराचे पर्याय स्थानिक आदिवासी लोकांसमोर खुले झाले. त्यामुळे साहजिकच वनविभागाला त्यांचं जंगलाबाहेर पुनर्वसन करणं सोपं झालं. या वाढलेल्या पर्यटनाचा हॉटेल व्यवसायालाही तेवढाच फायदा झाला. जंगलाच्या बाहेरच्या भागात नवीन हॉटेल निर्माण झाली आणि यामुळे हॉटेल व्यवसायातही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. भारतातल्या निसर्गाने परदेशातील निसर्गप्रेमींनाही भुरळ घातली आणि हळूहळू त्यांची पावलंही भारतातील जंगलांकडे वळायला लागली. जागतिक पर्यटन वाढीस लागल्यामुळे साहजिकच भारताच्या आर्थिक गंगाजळीतही वाढ व्हायला लागली. आज भारतातले पर्यटक भारतातील व्याघ्र प्रकल्पांना ज्या संख्येने भेट देतात, तेवढेच परदेशी पर्यटकही भारतातील जंगलांना भेट द्यायला लागले आहेत.
महाराष्ट्रातील वाढलेल्या या निसर्ग पर्यटनाचा ओघ काही अंशी इतर बाजूंकडे वळवण्यात वनविभागाला यश आले आहे. ताडोबासारख्या जंगलात मिळणारा पर्यटकांचा प्रतिसाद पाहून कोअर भागाबरोबरच बफर भागातही वनविभागाने पर्यटन सुरू केलं. कोअर झोन म्हणजे एखाद्या अभयारण्याचा अथवा व्याघ्र प्रकल्पाचा मुख्य गाभा तर बफर झोन म्हणजे या भागाबाहेर असलेलं राखीव जंगल. ताडोबासारख्या ठिकाणी कोअर झोन हाउसफुल्ल व्हायला लागल्यावर पर्यटकांची पावलं या बफर भागांकडे वळायला लागली. हळूहळू या भागातील पर्यटनही वाढायला लागलं आहे. वनविभागाने या भागात निसर्ग भ्रमंती, सायकल पर्यटन, वनविभागाच्या हत्तींना तलावावर आंघोळ घालणे असे पर्यटनाचे प्रयोग सुरू केले आहेत आणि यालाही पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
‘पर्यटन’ आणि त्यातून महसूल निर्मिती हा वनविभागाचा निसर्गाकडे पाहण्याचा दुय्यम दृष्टिकोन आहे. ‘निसर्गसंवर्धन’ याच बाबीला आजवर वनविभागाने प्राधान्य दिलं आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास सर्व जंगलांतील पर्यटनाचे दर वनविभागाने समान ठेवले पाहिजेत, असं माझं मत आहे. तसेच हे दर सर्वसामान्य जनतेला परवडतील असेच असायला हवेत. सर्वसामान्य माणसाला आपण जेवढं निसर्गाच्या जवळ नेऊ, तेवढाच तो निसर्ग संरक्षणाचा शिलेदार बनेल.
या वाढत्या पर्यटनाचा अभ्यास केल्यावर माझ्या असं लक्षात आलं, की हे सर्व पर्यटन केवळ आणि केवळ वाघाभोवती फिरत आहे. पर्यटकांचाही जंगलात जाण्याचा दृष्टिकोन वाघ बघायला जायचं हाच व्हायला लागला आहे. पर्यटकांच्या या बदललेल्या मानसिकतेमुळे येणाऱ्या पर्यटकांना वाघ कसा दाखवता येईल, यावरच गाईड आणि जिप्सी चालकांचं लक्ष केंद्रित व्हायला लागलं आहे. त्यामुळे येणाऱ्या अनेक पर्यटकांच्या तोंडून मी अनेकदा अशी वाक्यं ऐकली आहेत, ‘जंगलात वाघ दिसला नाही. कसलं फालतू आहे हे जंगल.’, ‘इतके पैसे खर्च करून जंगलात आलो पण वाघ काही दिसला नाही.’ या पर्यटकांना निसर्गाच्या प्रत्येक बाबीची ओळख करून देण्याचे जास्त प्रयत्न या जंगलांत फिरवणाऱ्या गाईडनी करायला हवेत. तसेच येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाने जंगलाचा पुरेपूर आनंद आपल्याला कसा लुटता येईल हे पाहिले पाहिजे. या बाबतीत पर्यटकांना अधिक ‘साक्षर’ करण्यात वनविभागानेही थोडा पुढाकार घ्यायला हवा. पर्यटकांचं कुठं चुकतं किंवा पर्यटकांनी काय करू नये, हे सांगण्यापेक्षा पर्यटकांनी काय करायला हवं, हे वनविभागाने पर्यटकांना अधिक समजावून सांगायला हवं.
वाढत्या पर्यटनामुळे निसर्गाबद्दल अधिकाधिक प्रचार जनमानसात व्हायला हवा. त्याचा निसर्गाला फायदा व्हायला हवा. व्याघ्रकेंद्रित पर्यटनामुळे निसर्गाला फटकाही बसू शकतो या आधारावर मा. सर्वोच्च न्यायालयाने व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर भागात (गाभा क्षेत्रात) निसर्ग पर्यटन बंद करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी दिला होता. मात्र या पर्यटनावर असलेले स्थानिक लोकांचे अवलंबित्व लक्षात घेऊन हा निर्णय शिथिल करण्यात आला आणि हे पर्यटन किती प्रमाणावर असावे, यावर निर्बंध घालण्यात आले. आज व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्राच्या २०% भागात आपण निसर्ग पर्यटन करू शकतो. व्याघ्र संरक्षणाचं काम वनविभागाने करावं हे जरी खरं असलं तरी ती जबाबदारी केवळ वनविभागावर टाकणं व्यवहार्य नाही. वनविभागाचा या कामात मोठा वाटा असला तरी ती जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. फक्त वनविभागावर हे काम सोडून देणं म्हणजे आपण आपल्या कर्तव्यापासून पाठ फिरवण्यासारखं होईल. पण हे पर्यटन पूर्ण बंद करणंही उचित होणार नाही. या निसर्ग पर्यटनावर अनेक लोकांचे जीवन अवलंबून आहे हे लक्षात घ्यायला हवे. तसंच मला वाटतं, की एक जिप्सी जंगलात गेली तर त्याबरोबर जास्तीत जास्त ६ लोक, १ गाईड आणि १ जिप्सी चालक असे ८ लोक जंगलात जातात. त्यामुळे साहजिकच एका जिप्सीमधील १६ डोळे जंगलावर बारकाईने लक्ष ठेवून असतात. त्यामुळे जंगलात काय चालू आहे याची इत्थंभूत माहिती वनविभागाला मिळत असते. त्यामुळे जंगलात आपोआपच एकप्रकारे गस्त घातली जाते.
निसर्गाकडे बारकाईने पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, की घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला काही तरी अर्थ आहे. निसर्ग आपल्याला वर्तमानपत्रासारखा वाचता यायला हवा. ती दृष्टी घेऊनच आपण कायम निसर्गात फिरलं पाहिजे. ते खरं निसर्ग पर्यटन आहे. आजकाल निसर्ग पर्यटन म्हणजे केवळ आकर्षण, वेड बनलं आहे. निसर्गात फिरताना इथे पूर्वी राहत असलेल्या बैगा, गोंडसारख्या आदिवासींचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. निसर्गाच्या समतोलाला कोणत्याही प्रकारचा धक्का बसणार नाही याची काळजी त्यांच्याकडून पुरेपूर घेतली जात असे. आज हेच लोक आपले खरे मार्गदर्शक आहेत. आज जंगलाबाहेर स्थाईक झालेल्या या लोकांना सोबत घेऊन, त्यांचा आधार घेऊन, त्यांनाही फायदा होईल आणि निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी घेऊन केलेलं पर्यटन हीच जबाबदारीने केलेली भ्रमंती म्हणायला हवी आणि तेच शाश्वत पर्यटन आहे.
भारतात आपल्याला ज्या जंगलात निसर्ग पर्यटन करता येते, त्यापैकी काही जंगलांची माहिती देणारी आमची लेखमाला दै. ‘सकाळ’ने चालवली होती. या वेळी आम्ही भारतातील ५० जंगलांची माहिती या लेखमालेच्या माध्यमातून दिली होती. रविवारच्या ‘सप्तरंग’ पुरवणीमध्ये २०२१मध्ये ही लेखमाला प्रकाशित झाली होती. आता दै. सकाळच्या पुढाकारानेच त्याचे पुस्तकात रूपांतर होत आहे. यात आपण त्या जंगलात गेल्यावर कोणते प्राणी, पक्षी पाहू शकतो याची यादी दिली आहे. येथे दिसणाऱ्या सर्वच प्राणी-पक्ष्यांची यादी देणं काही शक्य नाही. त्यामुळे काही प्राणी-पक्ष्यांचा उल्लेख त्यात केलेला आहे. तसेच पुस्तकात नमूद केलेली व्याघ्र प्रकल्पांची आकडेवारी आणि त्यांचे क्षेत्रफळ नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन ऑथॉरिटी (National Tiger Conservation Authority) या भारतातील व्याघ्र प्रकल्पांच्या कामकाजावर देखरेख ठेवणाऱ्या सर्वोच्च वैधानिक संस्थेच्या आकडेवारीनुसार दिलेली आहे. जशी वर्षं पुढे जातील तसा भारतातील व्याघ्र प्रकल्पांचा आकडाही वाढत जाईल. काही जुन्या व्याघ्र प्रकल्पांच्या क्षेत्रातही वाढ होत आहे. भारतातील व्याघ्र संरक्षणाच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे.
बिनभिंतीच्या या निसर्गशाळेत आपण निसर्ग वाचायलाही शिकतो. निसर्ग समजून घेणं हाच निसर्गवाचनाचा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा आहे. निसर्ग आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं आयुष्यही बेरंगी होऊन जाईल. निसर्ग म्हणजे एक खुला कॅनव्हास आहे. त्याच्या पटलावर आपण जे रंग भरू तसा तो आपल्यालाच अधिक खुलून दिसेल. खरं तर हे रंगही त्याच्यातच दडलेले आहेत. हे रंग वेचण्याची कला अवगत असणं महत्त्वाचं. हे रंग वेचताना, भरताना आपणही समृद्ध होत जातो.

You Ask , We answer

Q. Why is Anveshan Desi Cow Ghee costly as compared to other ghee?

A. Anveshan A2 Desi Cow Ghee is made entirely from the milk extracted from desi cows. The indigenous cow gives around 2-3 litres of milk per day which is more nutritious than foreign breeds that produce more milk. The cows are neither forced nor injected with hormones to enhance milk production. Our ghee is bi-directionally bilona churned with a wooden churner. This is why our A2 cow ghee has a grainy ure thicker consistency tempting aroma superior flavour and is much healthier. Hence A2 Desi Cow Ghee is costlier and better than regular ghee.

Q. What should the consistency of my ghee be?

A. The consistency of pure A2 ghee varies with temperature. It should be grainy and thick at room temperature.

Q. How can we identify pure cow ghee?

A. Pure cow ghee has a distinct grainy texture, rich aroma, and golden color. It solidifies at room temperature and has a natural, authentic taste.