सह्याद्री - निसर्गाचा अनमोल ठेवा | Sahyadri: Nature's Invaluable Treasure | Purnima Fadke & Sharmila Dev

Soul of the Sahyadris through this immersive guide that transforms nature education into a hands-on journey of conservation and wonder

| 35 Reviews
₹ 490.00

MRP (Incl. of all taxes)

Check Delivery Availability
USP badge
USP badge
USP badge
USP badge
सह्याद्री - निसर्गाचा अनमोल ठेवा | Sahyadri: Nature's Invaluable Treasure | Purnima Fadke & Sharmila Dev
सह्याद्री - निसर्गाचा अनमोल ठेवा | Sahyadri: Nature's Invaluable Treasure | Purnima Fadke & Sharmila Dev ₹ 490.00
1 / 5
प्रस्तावना

लेखक व शास्त्रीय माहितीचे संकलक अशा दुहेरी भूमिकेतून आम्ही या पुस्तकाची मांडणी केली आहे. पश्चिम घाटाच्या महाराष्ट्रातील डोंगर-पर्वतरांगांना आपण सह्याद्री म्हणतो. सह्याद्री परिसरात अनेकजण पर्यावरण संवर्धन व त्याची जपणूक या विषयांशी संबंधित काम शाळांमधून किंवा गावकऱ्यांसोबत करू इच्छितात. अशा इच्छुकांना डोळ्यांसमोर ठेवून हे पुस्तक तयार केले आहे. प्रत्यक्ष निसर्गातच राहणारे रहिवासीच तिथल्या निसर्गाला जपूं शकतील, त्याची काळजी घेऊ शकतील, असे आम्हाला तीव्रतेने जाणवत होते. त्यांना लहानपणापासून इतर शिक्षणाबरोबरच पर्यावरणाचे शिक्षण देणे गरजेचे आहे, हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणायचा ठरवला.
जिथे निसर्ग अजूनही थोड्या प्रमाणात टिकला आहे अशा भीमाशंकर येथील अभयारण्याच्या जवळील टोकावडे व तेरुंगण येथील आश्रमशाळेत जून २००८ साली काम सुरू केले. प्रत्यक्ष मुलांबरोबर काम करायचे व त्याचबरोबर तिथल्या स्थानिक, जरा मोठ्या मुलांना प्रशिक्षक म्हणून तयार करायचे - ज्यायोगे हे काम प्रकल्प संपल्यावर पुढे चालू राहील, अशी योजना होती.
शहरापासून दूर, एका जंगलातील आश्रमशाळेत तीन वर्षे काम करताना निरनिराळे अनुभव आले, विचारांची देवाणघेवाण झाली. त्यातून प्रशिक्षकांसाठी काही साहित्य तयार केले गेले व नंतर हे लिखाण आणखी इतरांना, जे या पर्यावरण-जागृती व पर्यावरण शिक्षण क्षेत्रात काम करू इच्छितात त्यांना पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावे अशी कल्पना मनात आली. पर्यावरणाबद्दल जनजागृती म्हणजे नक्की काय करायचे, मुलांबरोबर कुठले विषय चर्चेला घ्यायचे, कुठली शास्त्रीय माहिती कार्यकर्त्यांना असायला हवी, त्यांचा क्रम काय असावा, त्यात किती खोलवर जायचे; ही उत्तरे शोधायला हे पुस्तक मदत करेल असे आम्हाला वाटते. आपल्या देशात सुरू झालेल्या पर्यावरण चळवळीला या पुस्तकाचा हातभार लागेल अशी आशा आहे.
भीमाशंकरच्या आश्रमशाळेत काम करायला लागल्यावर हळूहळू अनेक गोष्टी लक्षात यायला लागल्या. शहरांमधील शाळेतील मुले व आश्रमातील मुले यांची बुद्धिमत्ता, आकलनशक्ती यादृष्टीने काहीच फरक नव्हता. पण बाह्यजगातील विचार, समस्या इत्यादींशी त्यांचा अजून फारसा संबंध आला नव्हता. त्यांची ही पार्श्वभूमी आम्ही लक्षात ठेवली. शिक्षणाच्या ज्या नव्या पद्धती आम्ही वापरणार होतो, त्या अंगवळणी पडायला वेळ लागणार होता. त्यांच्यात मिसळणे, त्यांना आपलेसे करणे हे एक आव्हान होतेच; पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ही मुले जंगलात राहत होती. जातायेता रोजच त्यांचा संबंध जंगल, ओढे, नद्या, पक्षी-प्राणी यांच्याशी येत होता. या सर्वांवाबतची आपुलकी, त्यांच्या अस्तित्वाचे महत्त्व व त्यांच्या जपणुकीची आवश्यकता, अशी दृष्टी त्यांच्यात निर्माण करायची, हेही एक आव्हान होते.
मुलांना पारंपरिक शिक्षणपद्धतीची सवय होती. आमच्या पद्धतीत त्यांचा सहभाग मोठा व जास्त महत्त्वाचा ठरणार होता. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळणार होती. शिवाय खेळ-गाणी-चित्रे अशा वेगळ्या माध्यमांशी त्यांचा परिचय होणार होता. या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही कामाची आखणी केली.
भाषा :  प्रथम ठरवले भाषेबद्दल. भाषा अगदी सोपी, शक्यतो बोलीभाषा वापरायचे ठरवले. शास्त्रीय माहिती देताना शास्त्रीय शब्द 'ज्ञान' म्हणून दिले; पण त्या कल्पना सोप्या शब्दात मांडल्या.
पद्धत : माहिती म्हणून महत्त्वाचा कुठलाच मुद्दा वगळला जाऊ नये याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष काम करताना आपण सांगतो ते मुलांना समजते का त्याची पडताळणी केली. सर्व विषयांची माहिती संवादाच्या माध्यमातून दिली. खेळ, गाणी, कोडी, फिल्म्स, स्लाइड्स, भटकंती इ. मार्गांनी त्यांना अनुभव द्यायचा, निरीक्षण करायला प्रवृत्त करायचे ठरवले.


पुस्तकाची रचना


विभाग १ : पहिल्या विभागात पर्यावरणाच्या मूलभूत कल्पना स्पष्ट केल्या आहेत.
विभाग २ : दुसऱ्या विभागात सह्याद्री परिसरासंबंधित पर्यावरणाच्या दृष्टीने निरनिराळ्या मुद्द्यांची चर्चा केली आहे. ही चर्चा करताना सह्याद्री परिसरातील उदाहरणे निवडली आहेत. 'सह्याद्रीचा परिसर' ही या पुस्तकाची पार्श्वभूमी ठरते. आवश्यक वाटेल तिथे मात्र भारताच्या परिस्थितीचा उल्लेख केला आहे. उदाहरणार्थ, परिसंस्थेसंबंधी चर्चा करताना भारतातील इतर ठिकाणच्या परिसंस्थांचा जरी उल्लेख आला असला तरी जंगल आणि नद्यांसारख्या परिसंस्थांबाबत सह्याद्रीतील परिस्थिती लक्षात घेऊन अधिक माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे जीवविविधतेला असलेले धोके आणि जीवविविधता संवर्धन हे जरी पहिल्या विभागातले मुद्दे असले तरी त्या मुद्द्यांबाबत सखोल माहितीसाठी सह्याद्रीची विविधता या विषयाची चर्चा करून मगच ही प्रकरणे घेतली आहेत. या पुस्तकात केस स्टडी म्हणून भीमाशंकरची उदाहरणे दिली आहेत. प्रत्येक प्रकरणानंतर कृती करण्यासाठी काही खेळ, कोडी दिली आहेत. त्यावरून प्रशिक्षकाने आपल्या कल्पनेनुसार नव्या कृती करून घेणे अपेक्षित आहे.
विषयाची निवड : स्थानिक विषयांना प्राधान्य दिले. उदाहरणार्थ, भीमाशंकरचे जंगल, तिथल्या नद्या-ओढे, तिथले पक्षी, वन्य प्राणी इत्यादी. त्याचबरोबर पुढची पायरी म्हणून या सर्वांचा आपल्या राज्यातील, देशातील व जगातील निसर्गाशी कसा संबंध आहे ते सूचित केले. पण सुरुवात मात्र त्यांच्या अनुभवविश्वाशी घट्ट निगडित ठेवली. निसर्गाबद्दल ज्ञान होईल असे विषय तर निवडलेच, शिवाय त्याच्या अस्तित्वाचे महत्त्व अधोरेखित केले, त्याची जपणूक करणे गरजेचे आहे ही जाणीव निर्माण करण्याचे ध्येय समोर ठेवले.
२१ व्या शतकातील जगाच्या नागरिकाचे व्यक्तिमत्त्व कसे असावे, त्याला कुठल्या जाणिवा असायला हव्यात याचे उत्तर देताना त्याने पर्यावरण जपण्यासंबंधी जागरूक असावे हा महत्त्वाचा मुद्दा ठरतो. ही काळाची गरज आहे. जागृत तर असायला हवेच, पण कृतिशीलतेला आम्ही तितकेच महत्त्व देतो; हे जाणीवपूर्वक नमूद करावेसे वाटते.
या पुस्तकाचा वापर करणाऱ्यांकडून आमची अपेक्षा : पर्यावरण शिक्षण देताना 'पास-नापास, कमी-जास्त गुण' या चक्रात मुलांना न अडकवता त्यांच्यात पर्यावरणाबद्दलची आपुलकी, निसर्ग जपणुकीची दृष्टी निर्माण करायची हे ध्येय असावे. आपण निसर्गसंवर्धनात सहभागी व्हावे, अशी प्रेरणा त्यांना मिळायला हवी. 'पर्यावरण-शिक्षण' या उपक्रमाचे मूल्यमापन नेहमीपेक्षा वेगळे असेल. विद्यार्थी निसर्गाचा मित्र व रक्षक झाला आहे का ते त्याच्या वागण्यातून, व्यवहारातून, जीवनशैलीतून पारखावे लागेल. निसर्गाच्या अस्तित्वाला, निसर्गचक्रांना बाधा येईल असे रोजच्या जीवनातील छोटेछोटे प्रसंग निवडून मुलांना विचार करायला सांगावे : 'या परिस्थितीत आपण एक निसर्गमित्र म्हणून काय करायला हवं?' त्यांच्यात एकत्र काम करायची, पुढाकार घ्यायची वृत्ती निर्माण करावी, हीदेखील एक अपेक्षा आहे. पुढच्या जीवनात व्यवहार करताना ते निसर्गाचे मित्र, रक्षक म्हणूनच राहतील व आपली जीवनशैली निसर्गसंवर्धनाला अनुसरून ठेवतील, हेच आमचे लक्ष्य आहे.
पूर्णिमा फडके आणि शर्मिला देव