मनोगत
नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणताः स्म ताम् ।।
प्रकृती किंवा जड याने हे सर्व ब्रह्मांड व्यापलेले आहे. प्रकृतीच्या म्हणजेच मायेच्या मदतीशिवाय परम-संकल्पना, परम-शक्ती, परम-आत्मा व्यक्तच होऊ शकत नाही. अशी जगन्माता देवी सर्वांत मोठी महाशक्ती असून ती सर्व मंगलतेचे प्रतीक व उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील महत्त्वाची आवश्यकता आहे. संपूर्ण सृजनास जबाबदार असणारी संरचना आणि समृद्धीचे, मंगलतेचे कारण असणाऱ्या देवीला नमस्कार असो. असे हे स्त्री देवीचे सर्वशक्तिमान व्यापक स्वरूप. परमचैतन्यातून व्यक्त झालेल्या सातव्या पातळीवरचे स्वर्ग - आकाश व त्यानंतर दुसऱ्या टोकावर असलेली पृथ्वी या गोष्टी आपल्याला समजतात. आकाशात चमकणारी वीज पृथ्वीवर वास्तव्य करते स्त्रीशक्ती म्हणून. स्थूलाचे, जडाचे रूपांतर होते शक्तीत व शक्तीचे रूपांतर होते जडात, परंतु त्यासाठी आवश्यक असलेले माध्यम हे स्त्रीरूपानेच प्रकट होते.
पृथ्वी व जड ही भौतिक तत्त्वे दूषित होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामध्ये अशुद्धी अधिक प्रमाणात साठू शकते. आकाशतत्त्वाची व्यापकता अधिक असल्याने त्यात त्यामानाने अशुद्धी कमी साठते. एखादे अस्तित्व जेवढे छोटे व मर्यादित स्वरूपात असेल तेवढे त्यामध्ये दोष लवकर निर्माण होऊ शकतात. आकाशात किंवा हवेत असलेल्या प्रदूषणामुळे अग्नी दूषित होतो तसेच पृथ्वी व जलातील प्रदूषण आकाशतत्त्वावर वा वातावरणावर परिणाम करते.
स्त्रीला स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी शुद्धतेचे अधिक नियम पाळावे लागतात. सृजनाची संकल्पना पार पाडायची असल्यामुळे स्त्रीचे शरीर अत्यंत नाजूक बनविलेले असते. गर्भाशयात असताना बाळाला कुठल्याही तऱ्हेने काठिण्याचा त्रास होऊ नये किंवा त्याच्यावर दाब येऊ नये अशा तऱ्हेने तिच्या शरीरात गर्भाशयाची योजना केलेली असते. सृजनाची प्रक्रिया पृथ्वी, बीज व अग्नी यांच्या संयोगातून घडत असल्यामुळे अत्यंत गुंतागुंतीची रचना असलेल्या प्रजननसंस्थेची काळजी घेणे अत्यावश्यक असते. या संपूर्ण संस्थेवर नियंत्रण असणारा अग्नी म्हणजेच हार्मोन्स हे मानसिकतेशी जोडलेले असल्यामुळे मुळातच असलेल्या नाजूक भावनांची काळजी घेणे या सर्व गोष्टी ओघानेच बंधनकारक ठरतात. नाजूकपणा, सुवास, सौंदर्य आणि निसर्गाला गतिमान ठेवण्यासाठी प्रजोत्पादनाची शक्यता या सर्व गोष्टी ज्या स्त्रीच्या ठिकाणी असतात ती स्त्री आकर्षणाचे कारण ठरली तर त्यात नवल नाही. यामुळे स्त्रीला जसे महत्त्वाचे स्थान मिळते, तसेच तिला संकटांनाही सामोरे जावे लागते.
विश्वचक्र सतत व व्यवस्थित चालू राहावे अशी आवश्यकता असते. स्त्रीआरोग्य, स्त्रीसंतुलन हा विषय महत्त्वाचा ठरतो तो यामुळेच. स्त्रीसौष्ठव, स्त्रीचे आरोग्य, स्त्री- शरीरातील अग्नीचे संतुलन म्हणजेच तिच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन ठेवण्याकडे सर्वतोपरी काळजी घ्यावी लागते. मासिक धर्म, गर्भधारणा, बालकाला जन्म देणे, बालकाला स्तनपान करून त्याला वाढवणे अशा सर्व जबाबदाऱ्या तिला पार पाडायच्या असल्याने तिचे आरोग्य टिकविण्याची नितांत गरज असते. त्यासंबंधीची माहिती, काळजी व उपचार योजना या पुस्तकात थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
फार प्राचीन काळापासून स्त्रीआरोग्याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केलेले दिसतात. रामायणामध्ये स्त्रीहट्ट पुरविणे, कौसल्येचे डोहाळे पुरविणे, सीता गर्भवती असताना तिच्या इच्छा पुरविणे, तिच्या अग्निसंतुलनासाठी उपयोगी ठरलेले अशोकवन, तसेच महाभारतात स्त्रीच्या इच्छेविरुद्ध उत्पन्न झालेल्या संततीत आलेले दोष आणि द्रौपदीचे महत्त्व वगैरे गोष्टी सर्वांच्या परिचयाच्या आहेत.
कोरफड (कुमारी) व अशोक हे स्त्रीचे जवळचे दोन वनस्पती मित्र. तसेच अनंत आणि शतावरी याही वनस्पती स्त्रीसाठी अत्यंत उपयोगी असतात. स्त्रीच्या गर्भाशयासंबंधीच्या तक्रारी व तिचे अग्निसंतुलन कुमारीने साधता येते, तसेच तिचे मासिक धर्माच्या तक्रारी अशोकाच्या मदतीने दूर करता येतात. तिच्या शरीराचा मऊपणा, सौष्ठव, कांती यासाठी शतावरी व अनंत या वनस्पती उपयोगी ठरतात.
स्त्रीच्या आरोग्याची काळजी म्हणजेच तिच्या भावनांची व मासिक धर्माची काळजी. त्या दृष्टीने प्रथमपासूनच काळजी घेतली तर असंतुलनापासून दूर राहता येते अर्थात रोगांपासून चार हात दूर राहता येते. एखाद्या तरुण स्त्रीचे आरोग्य बरोबर नसल्यास त्याची जबाबदारी काही प्रमाणात तिच्या आईवर, पर्यायाने स्त्रीवरच असू शकते. स्त्रीने स्वतःची काळजी घेतली की तिच्यापासून होणारी संततीही सुदृढ व बुद्धिमान होऊ शकते. तिला मुलगी झाली की तिचे आरोग्य चांगले राहून ती पुढे चांगल्या संततीला जन्म देऊ शकते; आणि मुलगा झाला तर उत्तम प्रतीचे वीर्य व पुंबीज देऊन शूर, बुद्धिमान, सुदृढ अपत्याचा जन्म होऊ शकतो.
एकंदरीत हा विषय खूप मोठा आहे. त्यापैकी दैनंदिन जीवनात समोर येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी आणि साधारणतः स्त्रीचे आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी काय काळजी घ्यावी याची माहिती या पुस्तकात आहे. या पुस्तकाचा स्त्रीला तर फायदा होईलच, पण पुरुषांनीही हे पुस्तक अवश्य वाचावे, जेणेकरून त्यांच्या कुटुंबात समाविष्ट असणाऱ्या स्त्रियांची काळजी घेणे त्यांना अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल.
बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला
एप्रिल २०१२