वराहमिहिरांचे भूजलविज्ञान | The Groundwater Science of Varahamihira | Dr Ranji Joshi

Insightful exploration of ancient Indian groundwater science through the lens of Varahamihira's Brihat Samhita, modernly interpreted by Dr. Rajni Joshi to assist farmers and researchers in locating sustainable water sources

| 35 Reviews
₹ 160.00

MRP (Incl. of all taxes)

Check Delivery Availability
USP badge
USP badge
USP badge
USP badge
वराहमिहिरांचे भूजलविज्ञान | The Groundwater Science of Varahamihira | Dr Ranji Joshi
वराहमिहिरांचे भूजलविज्ञान | The Groundwater Science of Varahamihira | Dr Ranji Joshi ₹ 160.00
1 / 9
मनोगत

पाण्याच्या क्षेत्रात मौलिक कामगिरी केलेले एक तज्ज्ञ विचारवंत होते. सूर्योपासक कुलात जन्मलेल्या वराहमिहिरांना शास्त्रीय विचारांची मांडणी कशी करावी, याबद्दलचा आदर्श मानता येईल. 'पंचसिद्धांतिका' आणि 'बृहत्संहिता' हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ. सृष्टी चमत्काराची आणि निसर्गातील घटनाक्रमांची संगती लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. बृहत्संहितेमध्ये त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे ही त्यांच्या शास्त्रीय दृष्टीची द्योतक आहेत. वराहमिहिरांच्या संशोधनापैकी जमिनीखालील पाण्याबद्दलच्या लेखनाची ओळख सोप्या भाषेत मराठी वाचकांना करून देण्यासाठी डॉ. रजनी रामचंद्र जोशी यांनी लिहिलेला शोधनिबंध ग्रंथरूपाने आज प्रसिद्ध होत आहे. या त्यांच्या प्रयत्नामुळे आपल्या परंपरेतील एक महत्त्वाचे उपयुक्त ज्ञान संस्कृत न जाणणाऱ्या मराठी वाचकाला उपलब्ध होत आहे, याबद्दल लेखिकेचे मन:पूर्वक अभिनंदन केले पाहिजे.
डॉ. रजनी जोशी यांनी केवळ पारंपरिक संस्कृत संज्ञांचा वापर करून वराहमिहिर यांच्या ग्रंथांचा अनुवाद केलेला नाही. त्याऐवजी आज भूगर्भजलविज्ञानात वापरल्या जाणाऱ्या नव्या संज्ञा व पद्धती यांचाही योग्य त्या ठिकाणी उल्लेख केला आहे. त्यामुळे वाचकांना हा विषय समजणे अधिक सुलभ झाले आहे. त्यांची भाषा वाचकांना समजावून सांगणारी आहे आणि काही ठिकाणी दिलेले ताजे संदर्भ पुस्तकाचे मूल्य वाढवणारे आहेत.
डॉ. रजनी जोशी या संस्कृतच्या प्राध्यापिका आहेत. संस्कृत शिक्षकांनी केवळ भाषा शिक्षणावर लक्ष केंद्रित न करता संस्कृतमधील उपयुक्त ज्ञानभांडार मराठी व इतर लोकभाषा जाणणाऱ्या वाचकांना खुले करून देण्याचेही कर्तव्य कसे पार पाडावे, याचे उदाहरण डॉ. जोशी यांनी या पुस्तकाद्वारे सादर केले आहे. वाचकांना ते उपयुक्त ठरेल, असा मला विश्वास आहे.
न्या. नरेंद्र चपळगावकर
निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय


टीप : या पुस्तकाचा उद्देश आचार्य वराहमिहिर यांनी संशोधित केलेल्या भूगर्भाखालील जलशोधक लक्षणांचा परिचय शेतकऱ्यांना व सर्वसामान्य वाचकांना करून देणे, हा आहे. येथे नमूद लक्षणांच्या आधारे जमिनीखालील पाण्याचा शोध घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी काम सुरू करण्यापूर्वी भूवैज्ञानिकांचा सल्ला अवश्य घ्यावा.
आचार्य वराहमिहिर यांनी प्रदीर्घ निरीक्षणांनंतर, परीक्षणांनंतर अनुभवसिद्धतेने 'बृहत्संहिता' या ग्रंथातील दकार्गलाध्यायात भूगर्भातील पाण्याविषयी विचार मांडले आहेत. दकार्गलाध्यायात वराहमिहिरांनी भूगर्भातील जलप्रवाह, त्यांच्या दिशा, भूमीत पाण्यापर्यंत गेलेली झाडे, वारूळे, मातीचे प्रकार, वेली, वनस्पती, खडक, पाणी या सर्वांचाही साकल्याने विचार केला आहे. याबरोबरच जमिनीत पाणी मुरल्यानंतर या पाण्याच्या वेगवेगळ्या चवी, पाण्याची साठवण, पाणी शुद्धीकरणाचे उपाय, या सर्वांचा मूलभूत विचारही केला आहे. प्रस्तुत 'जमिनीखालील पाण्याचा शोध' या पुस्तकात मी वराहमिहिरांनी दिलेल्या सूत्रांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. वराहमिहिर यांचा भूगर्भातील पाण्याचा प्रत्येक सिद्धांत विज्ञानाधिष्ठित आहे. जोपर्यंत या विश्वात माती, वनस्पती, पाणी, झाडे, प्राणी आहेत, तोवर 'दकार्गलाध्याय' शाश्वत राहणार आहे. त्यामुळे या ग्रंथाच्या अभ्यासाला अत्यंत महत्त्व आहे.
आपल्या भूजल संशोधकांना, शेतकऱ्यांना, भूजल अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना आणि जिज्ञासू चिंतकांना या अभ्यासाचा भूजल शोधण्यासाठी निश्चितच उपयोग होईल असे दिसून येते.
आज एकविसाव्या शतकात वराहमिहिर यांचे भूगर्भविज्ञान पूर्णपणे शास्त्रीय असून जमिनीखालील पाण्याचा (भूजलाचा) शोध लावण्यासाठी सिद्ध आहे, असे अनेक पाश्चात्य व पौर्वात्य शास्त्रज्ञांनी व जलसंशोधकांनी मान्य केले आहे. त्यानुसार आधुनिक जलशोधन पद्धती व वराहमिहिराची Geo-botanical Prospecting Method वापरून भूगर्भातील पाण्याचे साठे शोधण्याचे काम सुरू केले गेले आहे. या सर्व गोष्टींचा विस्ताराने या पुस्तकात विचार केला आहे.
भूजल अभ्यासाच्या या प्रयत्नामध्ये मला ज्यांचे सहकार्य लाभले, त्यांचा उल्लेख येथे करणे मला महत्त्वाचे वाटते - डॉ. वसंतराव गोवारीकर, न्या. नरेंद्र चपळगावकर, श्री. मुकुंद घारे, श्री. माधवराव चितळे, श्री. दि. मा. मोरे, डॉ. रमेश आगाशे, डॉ. रविशंकर मेनन, वेदाचार्य कै. नानाजी काळे, श्री. रानडे, श्री. प्रतापराव चिपळूणकर, डॉ. वाय. एल. नेने, श्री. आदिनाथ चव्हाण, आचार्य सुभाषचंद्र, डॉ. रा. ल. जोशी, जलपुरुष राजेंद्रसिंह, श्री. मारुती चितमपल्ली, डॉ. आर. एस. मोरवंचीकर, श्री. विजय लेले, श्री. सतीश कुलकर्णी, डॉ. अजित वर्तक, डॉ. उदय कुलकर्णी, डॉ. खान, डॉ. मच्छिंद्र घाडगे, श्री. अनंत भालेराव, डॉ. कल्याण काळे, डॉ. बी. वाय. यादव, कै. मधुकर फरताडे, श्री. मनोज देशपांडे, श्री. महेश देशपांडे, श्री. मंगेश देशपांडे, अॅड. रामचंद्र जोशी व परिवार, श्री. नारायणराव महानोर, प्रा. मिलिंद जोशी, श्री. चिन्मय वालवडकर, डॉ. बाळासाहेब देशपांडे, श्री. प्रभाकर पडतुरे, डॉ. श्रीकृष्ण माढेकर व श्री. रवींद्र देशपांडे.
वराहमिहिर यांच्या या शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास करून आधुनिक जलशोधनाची पद्धती वापरून जर कोणाला भूगर्भातील पाणी मिळवता आले, तर हे पुस्तक लिहिण्याचे सार्थक झाले, असे वाटते. हे पुस्तक वाचून जर एखाद्या शेतकऱ्याला भूजलाची प्राप्ती झाली तर ते या पुस्तकाचे यश आहे, असे मी मानेन.
- डॉ. रजनी जोशी


प्रस्तावना


ज्या राष्ट्रांना प्रदीर्घ सांस्कृतिक इतिहास असतो, त्या राष्ट्रांनी विविध कला आणि शास्त्रे यांचा उन्नतकाळ कधी ना कधी अनुभवलेला असतो. ज्ञानक्षेत्रात नवा विचार, नवे संशोधन, नवी मांडणी नेहमी होत असते. या विकासक्रमातसुद्धा भूतकाळाच्या इतिहासाला काही स्थान असते. सांस्कृतिक क्षेत्रातले नवे हे जुन्या मातीत पाय रोवून उभे असेल, तर ते अधिक सकस बनू शकते. साहित्यशास्त्र, शिल्प आणि संगीत यांसारख्या कला, ज्योतिष, खगोल, तर्कशास्त्र, न्यायासारखी दर्शने या सर्व क्षेत्रांत भारतीय परंपरेने विकसित केलेल्या वारशाला दुर्लक्षून या क्षेत्रात भारतीय विचार होऊच शकणार नाही. कित्येक वेळा हे सर्व विसरून नवा शास्त्रीय विचार मांडण्याचा प्रयत्न होतो. परंतु तो चुकीच्या मार्गाने जाण्याचा संभव असतो.
पाणी हा पूर्वी विपुल असलेला आणि आता दुर्मिळ होऊ पाहणारा परिचित पदार्थ आहे. पाण्याचा शोध, पाण्याची सुलभ वाहतूक, पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर, शुद्धीकरणाचे उपाय, पाण्याचा वापरावर नियंत्रण ठेवण्याची शासनाची जबाबदारी अशा अनेक गोष्टींच्या संदर्भात आज गांभीर्याने विचार केला जात आहे. यातल्या काही बाबींसंबंधी तरी प्राचीन भारतीय विचारवंतांनी केलेले विचार उपलब्ध आहेत. या वैचारिक साठ्याकडे केवळ एक अभिमानाचा विषय म्हणून पाहण्याची गरज नाही, पण तो आजही काही मर्यादेपर्यंत उपयोगी पडू शकणारा असेल तर त्याकडे लोकांचे लक्ष वेधले पाहिजे.
सुमारे १५०० वर्षांपूर्वी म्हणजेच इ. स. च्या पाचव्या शतकाच्या अखेरीस जन्मलेले आणि सहाव्या शतकात आपले लेखनकार्य केलेले 'वराहमिहिर' हे पाचव्या शतकात वराहमिहिर नावाचा प्रकांड ज्योतिषी व पर्यावरण शास्त्रज्ञ होऊन गेला. भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्याविषयी त्याने स्वतः संशोधन केलेच, शिवाय अन्य ऋषींचे संशोधनही आपल्या 'बृहत्संहिता' या ग्रंथात संस्कृत भाषेत लिहून ठेवले आहे. बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील अधिव्याख्याता डॉ. रजनी जोशी यांना हे संशोधन शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटले. आजच्या काळात त्याची सुसंगत जोड देता येईल किंवा सध्याच्या संशोधनात त्यातील काही सिद्धांतांचा, नियमांचा उपयोग होऊ शकेल असा त्यांना विश्वास आहे.


विषयप्रवेश


निसर्गातील अनेक सत्यांपासून आपण अजूनही अनभिज्ञ आहोत. कोणतेही नव्याने पुढे येणारे विषय हे आजही आपल्याला विचारप्रवृत्त करतात. नजीकच्या दशकांपर्यंत प्राचीन भारतीय विषयांवर मंथन होण्याची प्रक्रिया सुरू होती. या मंथनातून अशा विषयांचे पुनर्शोध संशोधन केले जात असे. याकरिता अनेकांचे संपूर्ण आयुष्य व्रतस्थपणे खर्ची पडे. आज ही प्रक्रिया पुन्हा थांबल्यासारखी वाटते. नवयुगातील शोध आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने मांडले जात असल्याने या प्राचीन सत्यशोधनाला खीळ बसली. परंतु प्रा. डॉ. रजनी जोशी या याला अपवाद ठरल्या आहेत.
बार्शीतील शिवाजी महाविद्यालयात संस्कृतच्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. जोशी यांच्या 'वराहमिहिराचे जलसंशोधन' या शोधनिबंधावर आधारित सदर पुस्तक तयार करण्यात आले आहे. प्रा. डॉ. रजनी जोशी यांनी 'ॲग्रोवन'च्या माध्यमातून संस्कृतमधील हा खजिना मराठीत आणला. या मालिकेमुळे शेतकऱ्यांसह या क्षेत्रात काम करणारे संशोधक, अभ्यासक यांच्यात मंथनास सुरुवात झाली. लातूरमधील शेतकरी प्रकाश पाटील-वांजरखेडकर यांनी यातील लक्षणे आपल्या शेतातील साम्यस्थळांशी प्रत्यक्ष पडताळून पाहिली. ती बरोबर निघाल्याने उत्साही पाटलांनी लगेच तिथे बोअर खणायला घेतली. आज लाखो रुपये खर्च करूनही जमिनीखालील पाणी शोधणे अवघड होत चालले आहे. भूगर्भातील पाणी मिळवण्याला या अभ्यासामुळे चालना मिळाली आहे. उजाड माळरानावर साडेतीन इंच पाणी लागल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाचव्या शतकातील प्रकांड ज्योतिषी व पर्यावरण शास्त्रज्ञ 'वराहमिहिर' यांनी भूगर्भातील पाण्यावर संशोधन केले. अन्य ऋषींच्या संशोधनालाही आपल्या 'बृहत्संहिता' या ग्रंथात स्थान देऊन एक अमूल्य ठेवा त्यांनी उपलब्ध करून दिला. या शास्त्राचा सखोल अभ्यास प्रा. डॉ. रजनी जोशी यांनी केला. दीड हजार वर्षांपूर्वीच्या या लक्षणांचा आज झालेला उपयोग निश्चितच आशादायक आहे. आपल्या प्राचीन कृषिमुनींचे संशोधन निसर्गाधिष्ठित व आयुर्वेदावर आधारित होते. वनस्पतींच्या मुळांपासून ते देठांपर्यंतच्या विविध घटकांचे गुणधर्म, त्यांचा केवळ मानवच नव्हे तर पशुप्राण्यांवर होणारा प्रभाव, विविध वनस्पतींचे एकत्रित गुणधर्म आणि त्यांचा उपयोग व उपचार आयुर्वेदाने स्पष्ट केले आहेत. आयुर्वेदाचे महत्त्व आधुनिक जगाला पटू लागले आहे, याचे कारणही निसर्गाधिष्ठित संशोधन हेच आहे.
वराहमिहिर यांनी भूगर्भातील पाणी शोधण्यासाठी भूपृष्ठावरील लक्षणांना आपल्या संशोधनाचा आधार दिला. भूगर्भातील जलशिरामुळे भूपृष्ठावरील वनस्पती, माती आदींचा रंग, रूप लक्षणांवरून अंतर्गत जलशिरा शोधण्याचा मंत्र दिला. लक्षणे सहजगत्या लक्षात येणारी असली तरी त्यांच्या संशोधनासाठी वराहमिहिर यांना आपले आयुष्य खर्च करावे लागले. दीड हजार वर्षांपूर्वी आणि आज नैसर्गिक स्थितीत बराच बदल झाला आहे. अगदी पाणी, माती, यांच्या चव व रंगापासून ते समकालीन झाडांच्या संदर्भातही मोठा फरक आढळून येऊ शकतो. वराहमिहिर यांच्या लक्षणांचा पुनराभ्यास व सरकारी पातळीवर सर्वेक्षण होणे अपेक्षित आहे.
पाणी ही मानव, प्राणी व वनस्पती यांची प्राथमिक गरज आहे. त्यामुळे भूगर्भातील जलप्रवाहांचे संवर्धन व त्यांचा योग्य वापर यासाठी आचार्य वराहमिहिर यांचे संशोधन उपयुक्त ठरू शकते. जल पुनर्भरणच्या शासकीय योजनांमध्ये भौगोलिक रचनेनुसार येथे नमूद केलेल्या लक्षणांचा समावेश केल्यास पाणी टंचाईचे संकट कमी होण्यास मदत होऊ शकते. आज जरी नैसर्गिक स्थितीत बदल झाला असला, तरी भूपृष्ठावरील पाणी अडवताना वराहमिहिर यांच्या लक्षणांचा आधार घेतल्यास भूगर्भातील जलस्रोतांचा शोध घेणे शक्य आहे. आपल्या पूर्वजांनी निसर्गाधिष्ठित संशोधन करून भारतीय संस्कृतीचे वेगळेपण जपले. या परंपरेची काळानुरूप जपणूक व वृद्धी होणे आवश्यक वाटते.
पावसाचा थेंब न् थेंब कसा साठवता येईल, भूजल पातळीत कशी वाढ करता येईल, या विषयाकडे आता गंभीरपणे पाहण्याची वेळ आली आहे. पाचव्या शतकात वराहमिहिर नावाचा प्रकांड ज्योतिषी व पर्यावरण शास्त्रज्ञ होऊन गेला. भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्याविषयी त्याने स्वतः संशोधन केलेच, शिवाय अन्य ऋषींचे संशोधनही आपल्या 'बृहत्संहिता' या ग्रंथात संस्कृत भाषेत लिहून ठेवले आहे. बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील अधिव्याख्याता डॉ. रजनी जोशी यांना हे संशोधन शेतीच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटले. आजच्या काळात त्याची सुसंगत जोड देता येईल किंवा सध्याच्या संशोधनात त्यातील काही सिद्धांतांचा, नियमांचा उपयोग होऊ शकेल असा त्यांना विश्वास आहे.