उडीसाने काय दाखवल - भाग १
Share
काही कामानिमित्त रविवारपर्यंत उडिसा दर्शन करण्याचा योग आलाय खरा,नक्की काम कोणत ते उद्याच्या भागात सांगतो. तूर्तास काल जे अनुभवल, ते मांडतो.
पश्चिम महाराष्ट्रात राहणारे आपण जेव्हा एकदम पूर्वकडे जातो तेव्हा मनाने अन् तनानेदेखील 1600 किमी प्रवास पार केलेला असतो. इकडे काय वेगळं दिसतय, इकडे काय भारी दिसतय हे शोधण्याला मन आतुर होऊन जात. महाराष्ट्र पार करून छत्तीसगडमध्ये जाताच आजूबाजूला वेगळ्या भाषेचे दुकान बोर्ड दिसू लागतात. आजूबाजूला हळूहळू मोठाली जंगल अन् अणुकुचीदार (triangle Shape) डोंगर दिसू लागतात. डोंगरावर कुठेही मोकळी जागा नजरेत दिसत नाही.
हिरवीगार निळाई डोळ्याला प्रसन्न करते. ट्रेनमधून जाताना एकाच झाडावर कमीत कमी 15 मधाची पोळी असावीत असे वाटले. म्हणजेच इथे निसर्ग प्रेमाने नांदत असणार.रात्री 11.30 वाजता मुनिगुडा स्टेशनवर पोहचून इच्छित स्थळी जाण्याच्या वाटेत एक पट्टेरी मण्यार अन् दोन कोल्ह्याची जोडी दिसली.हे दृश्य पाहून मनातल्या निसर्ग प्रेमीला गुदगुद्या झाल्या.यांनी सुखाने नांदाव अशा जागा माणसाने ठेवल्या नाहीतच, कदाचित इथे तरी त्यांना राहता येत आहे या भावनेने मन सुखावल.
पाउस फारसा पडत नाहीये. जिथे राहण्याची व्यवस्था केली तिथे पंख असलेले हजारो मुंगळे मरुन पडले होते. प्रणय झाला की निसर्गाला नराची फार गरज उरत नाही याचं ते उत्तम उदाहरण. अन् पावसाची सुरुवात आताच झाली होती याच देखील.आपल्याकडे सह्याद्री सोडला तर अस जंगल इतर कुठे पाहायला मिळणार नाही.मात्र आपल्यासारखीच विकासाची कीड या राज्याला लागली आहे हेच पदोपदी जाणवत.
सकाळी जंगलाकडे पाहून छान वाटणार अन् तो छानस मन काही वेळाकरता प्रसन्न होणार इतक्यात सर म्हणाले, जरी हे जंगल आता हिरवगार वाटत असेल तरी अजून काही वर्षात ते पूर्ण कापल जाईल. त्याच कारण काय तर ?
खाणकाम !
मग खाणकाम कुणासाठी ? हा प्रश्न जसा मी स्वतःला विचारला तसा तुम्ही देखील स्वताला विचारून पहा. हे संपल की मग त्यांची पाऊल सह्याद्रीकडे वळतील.
जंगल कापून कोळसा बनवणे, त्या जागेवर निलगिरी लावणे, नाहीतर आता बी टी कापूस लावणे हा उद्योग इकडे चालू झाला आहे. दुःखाची गोष्ट ही की हे सगळे इथला शेतकरी करत आहे.
मे महिन्यात देखील वाहणारे झरे आता डिसेंबरमध्येच सुकून जातात.याच कारण एकच जंगल तोड.त्या जोडीला झऱ्यात, ओढ्यात मोठ्या प्रमाणात साचत असलेलं प्लास्टिक.
अस सगळ ऐकल, पाहिलं की मन खिन्न होत.
इकडे भरणारा बाजार पाहण्याचा योग आला. कालच्या दिवशी फार भरला नव्हता मात्र पाहता आली ती एक अमूल्य अन् पवित्र गोष्ट , गोंड आदिवासी स्त्रिया अन् त्यांचा पोशाख
इकडे स्त्रिया सगळ्या बाबतीत अग्रेसर आहेत.भाजी विकणे,निर्णय घेणे,बाजार करणे, मुलांना सांभाळणे ही कामे स्त्रियाच करतात.
त्यांच्या वेणीच्या बांध्यात एक चाकू असतो. संरक्षणासाठी. त्यांच्या कानात,नाकात ,गळ्यात,पायात वेगवेगळ्या प्रकाराचे दागिने असतात.
खास करून पितळ अन् लोखंडाचे बनलेले. या स्त्रिया ब्लाऊज वापरत नाहीत.त्यांच शरीर एखाद्या कपड्याने झाकलेल असत.पूर्वी ते ही वापरले जात नसे. मोठं मोठं दागिने शरीर झाकण्याचे काम करत. स्त्रियांनी किती कपडे घालावी म्हणजे अस तस यावर डोकं फोड करणाऱ्या अनेक जणांनी या ताठ मानाने संस्कृती घेऊन चालणाऱ्या स्त्रियांना जाऊन हा प्रश्न करेल का ?
इकडे गोष्टी खूप स्वस्त आहेत असे जाणवले म्हणजे 100 रुपयाला चार अननस, 40 रुपये किलो आंबा अन् बरेच काही…
परंतु जशी जुनी पिढी नाहीशी होते चालली तशी नवीन पिढी हे सगळ सोडून देत आहे. जिथे त्यांच्या कोणत्याच पिढीने प्लास्टिक काय असत हे पाहिलं देखील नसेल तिथे त्यांच्या पिशवीत प्लॅस्टिकमधील चिवडे,बिस्कीट,साबण, कपडे धुण्याची पावडर हे सगळ दिसत होत.
हे सगळ घेण्याला त्यांना कुणी भाग पाडल ?
मग हे सगळ घेण्यासाठी पैसे आले.
म्हणजे पिढ्यान् पिढ्या ज्यांनी पैसा कधीच पहिला नव्हता मुळात त्यांना त्याची गरज नव्हती अशा रान माणसांच्या हाती पैसे देऊन त्यांना गुलाम कुणी केले ?
हे सगळ पाहताना गॉड मस्ट बी क्रेझी या चित्रपटातील एक दृश्य आठवते.
एका आफ्रिकी आदिवासींने जंगल फिरण्यास मदत केली म्हणून शास्त्रज्ञ त्याला पैसे देतो.त्याला या कागदच करायचं काय हेच कळत नाही.एक दोन वेळा तो आलटून पालटून बघतो अन् मग त्या नोटा फेकून देतो.
मग पैशांसाठी नोकरी आली,अननससारखी पीक आली, जंगल तोडणी आली,निलगिरी आल्या,रस्ते आले,प्लॅस्टिक आल.
सुशेगाद जीवन जगणाऱ्या या रानमाणसांना सुद्धा आपण आपल्यासारखेच काँक्रिट जंगलात रहायला भाग पडणार आहोत का ?
जवळजवळ 67 आदिवासी जाती, त्याच्या 74 भाषा त्यांची संस्कृती,त्यांची शेती, त्यांची वेशभूषा,त्यांचे देव हे सगळ नाश पावत आहे, पावणार आहे कारण जंगल संपत आहेत.
यासाठी तुम्ही,मी आणि ते स्वतः जबाबदार आहेत ही खूणगाठ मनाला बांधून घ्यायला हवी का ?