उडीसाने काय दाखवल - भाग 2
Share
पश्चिम बंगालमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. त्यात अस दिसून आल की, मागील 30 वर्षात आमच्यासारख्या शिकलेल्या पिढीने त्यांच्या आजी आजोबा किंवा पणजीसोबत कधीच संवाद साधला नाही. संवाद अर्थात फक्त बरे का ? जेवले का? एवढं नसून निवांत गप्पा मारणे.
याचा काय निष्कर्ष निघतो ते आपण सगळेच जाणतो ?
त्यांना काही कळत नाही ,शिकलेले नाहीत एवढीच आमची शिकलेली बुध्दी आम्हाला सांगते.
तांदूळ किंवा भात हे पीक स्वतःच परागीभवन करते म्हणजेच भात हे भाताच्या इतर कोणत्याही जातीसोबत परागीभवन करत नाही आणि झालेच तर ते 2% (म्हणजेच 100 बियात 2 बिया वेगळ्या) होते. हे आतापर्यंत अनेक देशातील वैज्ञानिकांनी जगाला सांगितले.मात्र भात 82 टक्के पर्यंत परागीभवन करू शकतो हे डॉक्टर देबल देब यांनी जगाला प्रयोगाअंती सिद्ध करून दाखवले.
डॉक्टर देबल देब.भाताच्या 1400 जातीचे जतन करणारा अवलिया.1400 अस ऐकून जर आपल तोंड आ वासून मोठं होत असेल तर भारतात तांदळाच्या 1,10,000 एवढ्या जाती होत्या.त्यातील फक्त 6000 बाकी आहेत. हा सगळा खजिना तुम्ही, मी कायमचा गमावला आहे हे लक्षात आल्यावर तुम्हाला धक्का बसेल का ?
परंतु भाताच्या जाती संपल्या म्हणून एवढं काय झालं अस आपल्याला वाटून जात. खरतर आमच्या शिकलेल्या पिढीला 'त्यात काय एवढं गेलं तर गेलं ' अस वाटतच.
तर उडिसाला येण्याचा मुख्य हेतू देब सरांकडून या जाती का वाचवायला हव्यात,या जातींची शुद्धता कशी राखायची,या जाती कधी लावायच्या,त्यांचे उपयोग काय हे सगळ शिकून त्या जातीतील कमीत कमी 100 जाती मी स्वतः जतन कराव्या या हेतूने येणे झाले.
सरांबद्दल इथे फार लिहायला नको , तुम्हाला गुगल बाबा त्यांची खुप माहिती सांगतील मात्र एखाद्या माणसाच्या नाहीतर विचारांच्या प्रेमात पडावे अस काही सांगणे अनिवार्य आहे. अमेरिकेची नोकरी सोडली. गेले 27 वर्षे स्वतःच्या पैशाने 1400 जातीच जतन करत आहेत. 7600 शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप केले.मात्र त्यातून फक्त 6 शेतकरी ती चळवळ पुढे चालवण्याच काम करत आहेत.
गेली अनेक वर्षे ते भाताचे प्रशिक्षण देतात. तुम्ही शिकण्याच्या हेतूने आलात तर तुमच्या राहण्याची , जेवण्याची सगळी सोय सर स्वतःच्या खिशातून करतात.
भाताचे कोणतेही बियाणे विक्री करायचे नाही,भाताचे बियाणे विक्री करणारा सावकार असतो अन् ते जतन करून वाटप करणारा शेतकरी असतो अस सर ठामपणे सांगतात. अशा माणसाच्या पायाशी बसून नुसतं ऐकत राहाव अन् आपल जगणं सुंदर करावं कारण अशा माणसांची संगती तुम्हाला कशासाठी जगायचं ते शिकवते.
आपण कुत्र्याची, मांजराची, घोड्याची शुद्धता नियंत्रित रहावी , आपण अगदी दारूची शुद्धता नियंत्रित रहावी म्हणून करोडो रुपये खर्च करतो मात्र अन्नाची शुद्धता संतुलित होण्यासाठी काय करतो ?
तुमच्या माझ्या पूर्वजांनी गेले 12 हजार वर्षे एक एक दाणा जमा करत भाताच्या असंख्य जाती विकसित केल्या.त्यांची पद्धती त्यांचे निरीक्षण,त्यांचे विज्ञान समजून घेतले तर मान खाली बसून गप्प राहण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही.
सृष्टीच्या सृजनात (creation) आमच्या पूर्वजांनी दिलेला हातभार अन् तिच्या विनाशात आम्ही देत असलेला हातभार लक्षात घेता पुढच्या पिढीचां जन्म झाला नसता तरी चालले असते असेच आपल्या पूर्वजांना वाटेल याची मला खात्री आहे.
तुम्ही, मी या सृजनात किती हातभार लावला आहे हो ?
मग त्याचा विनाश करण्याचा अधिकार आपल्याला कुणी दिला ?
असो.
जिथे राहण्याची व्यवस्था आहे,तिथून सरांचं शेत 15 किमी असेल.शेताचे नाव वसुधा.
मात्र दोन्ही ठिकाणच्या पावसात प्रचंड तफावत. म्हणजेच काय तर डोंगरावर,डोंगराखाली,डोंगर उतारावर,कमी पाऊस,जास्त पाऊस,कमी वारा,जास्त वारा,काळी माती,लाल माती,पांढरी माती,कमी आद्रता,जास्त आद्रता, संस्कृती, सण,उत्सव, महोसत्व,जखम, हात मोडला,प्रजनन, गर्भधारणा, रक्तवाढ या सगळ्यासाठी भाताच्या लाखो जाती माणसाने तयार केल्या.
अन् आम्ही काय केलं म्हणजेच डॉक्टर स्वामिनाथन कमिटीने आपल्याकडील 66 हजार भाताच्या जाती एकत्र करून फिलिफिन्सला दिल्या अन् त्यांच्याकडून फक्त 2 जाती परत आणल्या आणि तिथून विनाशाला सुरुवात झाली.
जेव्हा हरितक्रांती भारतात आली,त्यावेळी अनेक ठिकाणी झालेली घटना सांगतो. डॉक्टर अजित गोखले यांच्याकडून ऐकलेली.कदाचित विक्रमगड भागातील. भाताची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारमधील काही लोकांनी प्रथम वर्षी संकरित बियाणे,खते,कीटकनाशके मोफत द्यायला सुरुवात केली.शेतकऱ्यांनी ते वापरल अन् उत्पादन वाढलं.असे दोन वर्ष झाले,त्याच्या पुढच्या वर्षी मग बियाणे फुकट दिली.मात्र खते द्यायचे बंद केले.त्याच्या पुढच्या वर्षी काही द्यायचे बंद केले.पण झाले असे की या चार वर्षात कोणत्याच शेतकऱ्याकडे जुने बियाणे शिल्लक राहिले नव्हते.आणि जरी राहिले असेल तरी दोन वर्षापेक्षा बियाणे जास्त जुने झाल्याचं ते जगत नाही. म्हणजे बळीराजा कर्जबाजारी झाला.
एवढं ऐकल्यावर आपल्याला सरकारचा प्रचंड राग येतो.
मात्र सर सांगतात असे प्रसंग येणारच, पण एक शेतकरी म्हणून माझ्यावर कुणी बंदूक ताणली होती का ?
आमच्या पूर्वजांचा खजिना आम्ही का सोडून दिला ?
माझ्या शेतात मी काय लावावे, काय लावू नये हे कुणी ठरवावे ?
जितकं सरकार यासाठी जबाबदार आहे त्यापेक्षा कितीतरी पट मी आम्ही आणि आपण सगळेच यासाठी जबाबदार आहोत हे आपल्याला वाटतंय का ?
असो…..
मला माझ्या मोबाईलचा चार्जर,माझ्या शर्टचा रंग,माझी महागडी गाडी,माझा डोलेजंग बंगला या गोष्टीसमोर माझ्या आजीने मडक्यात जतन केलेली घेवड्याची बी, कणगीत साठवून ठेवलेला भात,ज्वारीची कणस, शेताच्या बांधावरची झाड,स्वच्छ नदी,हिरवेगार डोंगर हे सगळ मला महत्वाचं वाटल नाही ,वाटणार नाही म्हणूनच मी ह्या सगळ्याचा नाश करत आलोय आणि करणार आहे.
मात्र ह्या सगळ्या गुन्ह्याचा जाब माझी येणारी पिढी मला विचारेल तेव्हा माझ्याकडे काय उत्तर असतील ?
हाच विनाश दाखवायचां होता तर जन्म का दिला ?
आमच्यासाठीच शिल्लक राहिलेल कुठे आहे ?
अशा प्रश्नांची उत्तर द्यायला तुमची,माझी मान वर येईल का ?
अजूनही आशा आहेत ?
असो.
तूर्तास निरोप.
कळावे.