कोकण….कोकण….कोकण कोकण भाग १

कोकण….कोकण….कोकण कोकण भाग १

Santosh Bobade
 चित्रगुप्तानी तुमच्या पुण्यांचा हिशोब करता करता दमून जावं, इंद्रदेवांनी त्यांच्या हत्तीवरून तुमची मिरवणूक काढावी, सगळ्या देवांनी तुमच्यावर पुष्प बहार करावा, रंभेने तुमच्या गळ्यात माळ घालावी , ब्रह्मदेवांनी तुमच्या कानात कुर्ररsss कराव अन तुमचा जन्म कोकणात व्हावा. 'गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा' याचा अर्थ गोमूचा नवरा कोकणी नाही,मग तो माझ्यासारखा घाटी असेल का ? शिवाय गोमू सुंदर आहे म्हणून कोकणात जन्माला यावी की कोकणात जन्माला येणारा प्रत्येक माणूस सुंदरच असतो असा प्रश्न मला पडतो.
साताऱ्यातून लालपरीने सांगली, सांगलीतून दोनचाकीने कोल्हापूर तिथून रंकाळा तिथून गगनबावडा.शहराच्या गर्दीतून वाट काढत पुढे जाताना गगनबावडा मार्गावर आजूबाजूला तुमच्या- माझ्यासाठी मोठी झाड कापून झाडांची प्रेत पडलेली दिसतात.डोळ्यांना हे पाहवत नाही तेवढ्यात तुम्ही घाट उतरून खाली जायला लागता.गाडी अन् डोळे दोन्ही थबकतात.समोर उभा असतो अथांग, इकडे तिकडे पसरलेला,ढगाच्या पांढऱ्या कापसात पहुडलेला, फेसाळलेल्या दुधात सैदव नाहणारा, गर्द हिरवागार, डोळ्याचं पारणं फेडणारा सह्याद्री.सह्याद्री पाहिला की मी त्याच्या कुशीत जावं की मी त्याला कुशीत घ्यावं असं होत मला.
मोठ्या बोर्डवर वेंगुर्ला, सिंधूदुर्गनगरी, राजापूर,मालवण अशी नावं दिसू लागतात.गाडीवरून जाताना वर पाहिलं की झाड भेटायला येतात,पक्षी गाणी म्हणत तुमचं स्वागत करतात, चाकापासून कोणत्यातरी जातीचा साप पटकन निघून जातो,मुंग्या इकडे तिकडे अंडी नेत असतात त्यामुळे तुमच्याकडे फार लक्ष देत नाहीत,वारा कानात गुंजन करत असतो,कौलारू घर तुमचं तोंडभरून स्वागत करण्यास तयार असतात,ओढे खळखळ करत रस्ता दाखवत असतात, खरतर तुम्हाला थंड शीतल वाटायला हवे मात्र अचानक तुम्हाला उकडायला लागत अन् तुमच भटकलेल मन तळ कोकणात कधी पोहचत तुम्हाला कळतच नाही.
गाव जांभवडे,तालुका वैभववाडी.नावाप्रमाणेच वैभव.जांभा दगडात बांधलेले कौलारू घर,बाहेर प्रशस्त पडवी,पडवीत माझा अत्यंत प्रिय झोपाळा, झोपाळ्यावर पान,सुपारी अन् तंबाखूची प्लेट,शेणाच्या सुगांधने दरळणारी पायाखालची जमीन , दोन पारदर्शक कौलातून येणारा उजेड, स्वयंपाक घरातून दिसणारा चूलीतला धूर,मागच्या बाजूला बांधलेला डांगी गाईचा गोठा,त्याला लागून सुरू होणारी सुपारी - नारळाची बाग,त्यातून वाहणारा शांत,स्वच्छ पाण्याचा झरा, अगदी थोड्या अंतरावर असलेली निळ्या पाण्याची विहीर, तुम्ही त्यात तुमचा चेहरा डोकावता, स्वतःला विचारता ' हाच आहे का स्वर्ग ? ' तेवढ्यात मागून हाक येते,
काकानू , बराव ना ? अहाहा ! भाषेतला गोडवा. तुम्हाला दिसतो , चेहऱ्यावर हास्य असलेला,साधा शर्ट लेंगा घेतलेला,कष्टी मात्र माझ्यापेक्षा कितीतरी पट समाधानी (सुशेगाद) असलेला,सुख म्हणजे नक्की काय हे कळलेला कोकणी रानमाणूस.कदाचित म्हणूनच कोकणातील शेतकरी कधी आत्महत्या करत नाही.याचं मन एवढं स्वच्छ कसं असू शकेल असा प्रश्न पडणार इतक्यात आठवते आताच पाहिलेली स्वच्छ निळी विहीर. ' पिंडी ते ब्रम्हांडी ' जे बाहेर आहे तेच आत असणार. इथे समृध्दी नांदत आहे,इथे लक्ष्मीने कायमचा वास केला आहे कारण ही परशुरामाची भूमी आहे.
'स्वर्ग नको सुरलोक नको,मज लोभस हा इहलोक हवा' ही कविता गोव्यात राहणाऱ्या बोरकरांनाच का सुचावी हे समजण्यासाठी कोकणात यायला हवंच. इथल्या रानमाणसात कोकणी बनून राहायला हव.कोकणी माणसाला ध्यानाची गरज लागत नसणार,इथल प्रत्येक झाड मोठा योगी आहे.
इतकं सगळ छान छान असल्यावर कोकणात कायमच राहायला जायची इच्छा होतेय का ? पण मला माझा 'स्व' सापडलाय का ?
दोन दिवस रेंज नसलेल्या जागेत राहिल्यावर तुम्ही कंटाळून पुन्हा परत जाण्याची दाट शक्यता आहे. इथल्या माणसाला स्व शेतात अन् निसर्गात आहे. या सगळ्यातून दिवस- महिना - वर्ष कशी सरतात हे त्यालाच कळत नाही किंवा त्याची पर्वा देखील नसते.
सलग तीन दिवस सुट्टी पडल्यावर करायचं काय या विवंचनेत असणारे आपण सगळे स्व कधी शोधणार आहोत ?
एवढं सुंदर गाव असताना कोकणी माणूस शहरात का जात असेल , कुणी सांगितलं त्याला शहरात सुख सापडत ?
कधी तरी वेळ काढून या साध्या भोळ्या माणसाच्या डोळ्यात पहा, त्यांना ब्रह्म कळला आहे, तोच ब्रह्म जो ऋषी जाबाल यांना उमगला होता
बाकी पुढील भागात |
Back to blog

Leave a comment