कोकण….कोकण….कोकण कोकण…. भाग २

कोकण….कोकण….कोकण कोकण…. भाग २

Santosh Bobade
देवराई अन् देवमाणूस
ऐकतो तो कान पण ऐकणारा कोण ? बघतात ते डोळे पण बघणारा कोण ?
बोलते ते तोंड पण वदवून घेणारा कोण ? काही अंधश्रद्धा चांगल्या असतात अस ऐकल तर आपण शिकलेल मन उठाव वैगरे करायला लागू शकत. माझी तुझ्यावर श्रद्धा आहे म्हणजे नक्की काय ? तर तू जे काय वागत आहेस त्यातील अनेक गोष्टी मला योग्य वाटतात. म्हणजेच तुझ्यावर माझा विश्वास आहेस.मग विश्वास मोजून घेता येतो का ? माझ्यावर तुझा इतका इतका ग्रॅम विश्वास आहे अस आपण कुठ ऐकल आहे का ? मग आपला विश्वास आंधळा असतो का ? देव मानने न मानने हा पुन्हा प्रत्येकाच्या श्रध्देचा प्रश्न आहे.हे ब्रम्हांड कुणी निर्माण केले हे विज्ञानाला देखील माहिती नाही,कसं निर्माण झालं याची थोडी माहिती आहेच. परंतु या मागे नक्की कोणती तरी ऊर्जा,शक्ती आहे अस मानायला आस्तिक किंवा नास्तिक दोघांचाही नकार नसावा.
                                       
मग आपले पूर्वज त्याच शक्तीला देव अस म्हणत का ? देवाने पृथ्वी तयार केली त्यात जंगल उभारल.मग मागून माणूस आला.
देवाने तयार केलेलं जंगल देवासाठीच किंवा देवाच्या नावाने राखून ठेवायला
कोणत्यातरी माणसाने सुरुवात केली, म्हणून ती देवाची राई म्हणून ती देवराई. जो माणूस निसर्ग संवर्धन किंवा खरतर स्वतःचे रक्षण करण्यासाठी निसर्ग वाचवण्याचा वैगेरे खटाटोप करत आहे त्याला आपण देव माणूस म्हणायला हरकत नाही.कारण माणूस नावाच्या प्राण्याला ही बुध्दी सुचणार नाहीच.
कोकणात अशा असंख्य देवराया आहेत. काही दिवसांनी होत्या अस लिहावं लागेल.
देवराई.कुणीतरी तिकडे बोट दाखवाव.आपल्याला घनदाट झाडांची वस्ती दिसावी.आपल्या मनाने प्रसन्न व्हावं.पक्षांनी चिवचिवाट करावा. मुळात तुम्ही इकडे येऊ नका हेच सांगणं असावं.तरीही मी ही तुमच्यातला एक म्हणून पावल आपोआप त्या राईत जावी.मान वर जाता जाता दुखेल एवढी मोठाली झाड पहावी.
काय वय असेल तुझं, नाव काय तुझं, तुला अजूनही जगण्याची आशा आहे,तुला माझ्याकडुन काय हवयं,तुला माझी भाषा कळते. मी झाडाला विचारावं…..
झाडाने शांत बसाव. एव्हढे उन्हाळे पावसाळे पाहिलेलं, आभाळात जाऊन जमिनीत रुतलेल, अगडबंब वेलीला आधार देणार,अनुभवांनी गच्च भरलेले झाड, बोलण्याइतकं असून सुद्धा गप्पच होत, एखाद्या ज्ञानयोगी तत्वज्ञासारख. न बोलून सुद्धा खुप काही सांगता येत हे झाडांनेच शिकवलं असेल का कोणत्या तरी ऋषीला.
इथली माती पानांनी झाकलेली, खोडांवर वाळवी लागलेली, झाडांवर ऑर्किड फुललेले, दगडांवर शैवालाची चादर,ओढ्यात बेडकाची पिल्ले, भुर्रकन जाणार चतुर,सूर्यदेव इथल्या जमिनीला स्पर्श करायला आतुर,पावसाचा थेंब गातोय,ओढा वाहतोय, वेली झुलतात,साप फिरतोय, सरडा वाट बघतोय,मुंग्या अंडी नेतात, बुरश्या कुजवतात,मधमाशा पराग गोळा करतात,फुले फुलतात अन् आपण भुलतो. चकवा लागावा तसा. एव्हढा उपद्द्याप चालू आहे तरीही एखाद्या योग्याला ब्रह्म उमजू शकेल इतकी निरव शांतता.
देवराई 10 एकर, एक गुंठा ते अगदी एका झाडाची सुद्धा असू शकते.कोकणातील डोंगर पाहिले तर सगळा कोकणचं देवराई वाटेल.
' देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी ' हे लिहताना गदिमांना काय अभिप्रेत असावं. देव कुठेय असा प्रश्न डोक्यात येतो, अन् तुम्ही देवराईच्या मध्यभागी जाता, तुम्ही शैवाल येऊन हिरव्या झालेल्या हिरव्यागार पायऱ्या अनवाणी चढता, 10 बाय 10 च्या छोट्याशा मंदिरात तुम्हाला देव दिसतो. तुमचा अहंकार डोके टेकून देवाला नमस्कार करतो.देवराईच्या संरक्षणासाठी कितीतरी दिवस-महिने-वर्ष एकटा राहणारा देव शांत कसा भासतो ?
देवरातील झाड तोडणे सोडाच, नुसत एक वाळलेल पान जरी देवराईच्या बाहेर नेल तरी देव कोपेल ही भावना कोकणी माणसाच्या मनात होती.
होती म्हणजे ?
कुणीतरी देवराईतल लाकूड बाहेर नेल अन् तो देवघरी गेला अशा असंख्य घटना कोकणात झाल्या आहे किंवा ऐकिवात आहेत.
देवराई एक जिवंत खजिना आहे.पूर्वी आपली पृथ्वी किती समृद्ध होती याची साक्ष.या अशा जागा कायमच्या बंदिस्त असायला हव्यात.वनस्पती शास्त्रज्ञ वा अभ्यासक यांनाच परवानगी द्यावी. पूर्वी कुणालाही देवराईत जाण्याची परवानगी नसायची.
आता कोकणातील देवरायांमध्ये वृक्ष तोड होत असते.तिथे जनावर चरायला जातात. देवराईच्या मध्यभागातून भलेमोठे डांबरी रोड करून जुनी लहान मंदिर तोडून मोठाली मंदिर बांधली आहेत.देवराईत आता पार्ट्या केल्या जातात.तिथला देव, देवराई-मंदिर सोडून कधीच निघून गेला आहे.त्यामुळे तो हल्ली कोपत नाही.
देव वैगेरे काही नसत, देव कोपत तर मुळीच नाही या सगळ्या अंधश्रद्धा आहेत,मग देवराई तरी पाहिजे कशाला हे कोकणी माणसाला कुणी सांगितल ?
कोकणची ' साधी भोळी' माणस,अशा प्रकारे शहाणी करण्याचा डाव कुणी रचला ?
डार्विन म्हणतात त्याप्रमाणे इथे प्रत्येकाला जगायचं आहे.त्यासाठीच तर अट्टाहास चालू आहे.मग झाडाला जगायचं नाही का ? ते का प्रतिकार करत नाही ? की झाड न जगता सुद्धा जगत आहे. झाडाला माहिती आहे का, की मीच संपलो तर हा माणूस संपणारच आहे.अन् तरीही झाड जगणार आहे.कारण उत्क्रंतीमध्ये झाड आपल्याअगोदर लाखों वर्ष जून आहे.त्याच्याकडे खूप संयम आहे.कदाचित देवानेच झाडाला काहीच प्रतिकार न करण्याचे आदेश तर दिले नाहीत ? म्हणजेच अशा प्रकारे माणसाला संपवण्याचा तर देवाचा डाव नसेल ? म्हणजेच देव आपल्यावर कोपला आहे का ?
काही अंधश्रद्धा खरचं चांगल्या असतात का ?
बाकी पुढील भागात |
(इथे देव या शब्दाचा अर्थ शक्ती वा ऊर्जा असा घ्यावा)
Back to blog

Leave a comment