गोष्ट मिलेट्सची भाग चार - वरई आणि राळा

गोष्ट मिलेट्सची भाग चार - वरई आणि राळा

Santosh Bobade
कालच आजीची एकादशी होती. आजीने मस्त उपवासाची भगर अर्थात वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी करून खाल्ली, घरातल्यांनाही खिलवली. पाचवीतल्या सईने थोडी नाखुशीनेच ती भगर खाल्ली. “काय गं आजी तुझ्या उपवासाला जरा चमचमीत साबुदाणा वडे, साबुदाणा खिचडी तरी करत जा की. हे काय किती बोअर खाणं- वरईचा भात म्हणे!!” आजी म्हणाली, “सईबाई, वेडाबाई भारतात पुरातन काळापासून उपवासाला चालणारी, पचनाला हलकी असणारी वरई साबुदाण्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. वरईत तुमचं लाडकं प्रोटीनही असतं बरं का, आणि आमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांना पचायला साबुदाण्यापेक्षा भगर केव्हाही सहज-सुलभ. आणि तुला माहितीये का सई, तुझा लाडका साबुदाणा मूळचा भारतीय नाही हं तो परदेशीच, अवघ्या काही शतकांपूर्वी तो भारतात आला आणि चक्क उपवासाच्या पदार्थात मानाचं स्थान मिळवून बसला”
“एवढंच नाही तर वरईची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ऐकायची का सईबाईंना?” गोष्टीचं नाव ऐकताच सईचे डोळे चमकले, गोष्टीसोबत आता तो वरईचा भात सहज पोटात जाईल, खात्री होती तिला. “तर आपले श्री व्यंकटेश भगवान, त्यांच्या पत्नीच्या पद्मावतींच्या शोधात सात डोंगर या जागी गेले. देवी काही सहज सापडेना, भगवान धडपडले, त्यांच्या डोक्याला मोठा खडक लागला आणि ते बेशुद्ध पडले. ही खबर व्यंकटेशांची आई बकुळा देवींना समजताच त्यांनी व्यंकटेश बाळाला वरईची गोड- मधुर खीर करून खाऊ घातली आणि व्यंकटेश भगवानांची जखम त्यानं लवकर भरून आली. तुला सुद्धा करून घालेन हं ही ताकद देणारी खीर मी” आजीने गोष्ट पूर्ण करत आश्वासन दिले.
त्या सोबतच आजीने वरईची बरीच माहिती सांगितली- मराठीत वरई किंवा भगर, हिंदीत सामा किंवा कुटकी आणि इंग्रजीत ज्याला आपण लिटिल मिलेट म्हणून ओळखतो, हे मिलेट जखम भरून येण्यासाठी अगदी उपयुक्त आहे. आणि हे मिलेट भारताशी प्रदेशनिष्ठ (Endemic) आहे. भारतात इसवी सन पूर्व 2600 पूर्वी हडप्पा अणि फर्माणा संस्कृतीत लिटल मिलेट सापडले. यात खूप जाती नाहीएत, आणि जंगली जाती भारताच्या बाहेर सापडल्या आहेत. सध्या भारतात मध्यप्रदेश, उडीसा, झारखंड या राज्यात मोठ्या प्रमाणात वरईचे उत्पादन होते.
मिलेट्समध्ये आकाराने सगळ्यात लहान, थोड्या फार क्रीम रंगाची, याला आफ्रिकन मिलेट देखील म्हणातात. आफ्रिका खंडातील अनेक आदिवासी ही मिलेट मुख्य अन्न म्हणून वापरतात. भारतात सर्वप्रथम पूर्वघाट प्रदेशात ही मिलेट येऊन नंतर संपूर्ण भारतात पसरले गेले. लिटिल मिलेट श्रीलंका, नेपाळ, म्यानमार देशातील आदिवासीच्या आहारातील मुख्य स्त्रोत आहे.
प्रोसो मिलेट आणि तांदुळाप्रमाणे याचा दाणा असून या पिकाचे कणिस तुऱ्यासारखे दिसते. लिटिल मिलेटचा दाणा सगळ्या मिलेटच्या तुलनेत लहान असतो म्हणून याला लिटिल मिलेट नाव पडलंय. समुद्र सपाटीपासून 2000 मीटर उंच आणि 50-70 मिमी पाऊस असणाऱ्या भागात तसेच 20 डिग्री ते 50 डिग्री तापमानात देखील उगवू शकते. खडकाळ , पाणी असणारी, पाणी नसणारी जमीन अशा सगळ्या जमिनीत हे मिलेट उगवून येते.
प्रत्येक प्रकारानुसार उत्पादन बदलत जाते परंतु अंदाजे 20 ते 25 क्विंटल प्रती हेक्टर (अडीच एकर) उत्पादन मिळते.काही राज्यांमध्ये यांत उडीद- सोयाबीन हे मिश्रपीक तर काही ठिकाणी चवळी- घेवडा हे मिश्रपीक घेतले जाते. खरीप आणि रब्बी हंगामात पीक घेतले जाते. साधारण 70-90-120 दिवसात कापणीला येणाऱ्या जाती उपलब्ध आहेत.
वरईची पोषणमूल्ये : 62 ग्रॅम कार्बोदके, 8 ग्रॅम प्रोटीन , 9.8 ग्रॅम तंतुमय पदार्थ , 4.2 ग्रॅम चरबी.
आणि मग आजी म्हणाली “सई, त्याप्रमाणे महाराष्ट्रात राहणारे आपण सगळेजण जाणतोच की, उपवासाला आपण जी वरई खातो ती हीच मिलेट. प्रत्येक मिलेट आपल्या शरीराला ऊर्जा हळूहळू पुरवते म्हणूनच नुसत्या वरईवर आपल्याला संपूर्ण उपवास करता येतो. उत्तर भारतात याला ‘व्रत का चावल’ असेही म्हणतात. काही भागात उपवासाला वरईची भाकरी देखील बनवली जाते. आणि नवरात्रात उपवासाला हमखास वरई वापरली जाते. त्यामुळे ही वरई साबुदाण्यापेक्षा निश्चित गुणकारी आहे बरं का”
               
“ही मिलेट्सची गोष्ट इंटरेस्टिंग आहे आजी, अजून सांग ना माहिती” हातातली भगर आमटीची प्लेट चाटूनपुसून स्वच्छ करत सई म्हणाली. आजी पुढे बोलू लागली, “ऐक तर मग असंच आणखी एक प्राचीन भारतीय आणि जगातही इतरत्र काही देशांत उगवणारे मिलेट म्हणजे- फॉक्सटेल मिलेट. याला हिंदीत कांग, मराठीत राळा आणि संस्कृतमध्ये प्रियांगु, भावज्य, रजिका म्हणतात. जगातल्या मिलेट्समध्ये तिसऱ्या क्रमांकावरचे हे पिक. प्राचीन काळापासून टिकलेले कमी पावसाचे पीक युरोप, आशिया, आफ्रिका , ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणात याचे उत्पादन होते. याला इटालियन मिलेट तसेच जर्मन मिलेट सुद्धा म्हणतात.”
आजी पुढे सांगत होती- साधारण 6600 वर्षांपूर्वी चीनमध्ये ही मिलेट खायला सुरूवात झाली. 4000 वर्षांपूर्वीचं व्यवस्थित राखून ठेवलेल नूडल्सचं भांडं चीनमधल्या लाजिया येथे सापडले, ज्यात राळ्याचा अंश आहे. आपल्या भारतात साधारण हडप्पा संस्कृती अगोदर राळे सापडले आहे. तांदळाप्रमाणे याचा दाणा असून या पिकाची उंची 1 ते 5 फूट पर्यंत असू शकते. पिकाचा तुरा लांब गोलाकार असून कोल्ह्याच्या शेपटीप्रमाणे दिसतो म्हणूनच याला फॉक्सटेल (कोल्ह्याचे शेपूट) मिलेट म्हणतात. हे मिलेट हिरव्या, पिवळ्या, लाल अशा विविध रंगात आढळते.
2000 मीटर उंच आणि 50-70 मिमी पाऊस असणाऱ्या भागात तसेच 20 डिग्री ते 50 डिग्री तापमानात देखिल उगवू शकते. खडकाळ जमिनीतही उगवते. मात्र पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत हे मिलेट तग धरत नाही. चीनमध्ये काही ठिकाणी प्रती हेक्टर (अडीच एकर) क्षेत्रावर 11 हजार किलो इतके फॉक्सटेल मिलेट उगवते. 600 फूट उंचीवर तसेच काळया पोयटा मातीत पाणी कमी असेल त्यावेळी, ज्वारी सोबत मिश्रपीक म्हणून हे घेतले जाते. खरीप हंगामाचे पीक असून 70- 90 दिवसात हे पीक येते. साधारण 70 दिवसात कणिस येऊन 90 व्या दिवशी कापणीला येते.
पोषणमूल्य : 60.1 ग्रॅम कर्बोदके, 12.3 ग्रॅम प्रोटीन असल्याने शाकाहारींना कडधान्यांमधून मिळणाऱ्या प्रोटीनची चिंता करावी लागत नाही, तसेच यात 4.3 ग्रॅम चरबी असते.
“आणि या राळा उर्फ प्रियांगुची कथा ऐकायची आहे का सईला?” सईने मानेने होकार भरताच आजी सांगू लागली “या प्रियांगुबाबत मी पुराणात एक कथा वाचलीये. ऐक हं सई, विष्णूचे तिसरे अवतार वराहस्वामी, जेव्हा सलग दहा दिवस राक्षसांसोबत युद्ध करकरून दमले. त्यामुळे त्यांना श्वसनाला त्रासही होऊ लागला. तेव्हा त्यांचे शिष्य चिंतित झाले. त्यांच्या शिष्यांनी त्यांना काय हवंय? म्हणून विचारलं. तेव्हा वराहस्वामींनी ‘मला प्रियांगु हवंय’ म्हणजेच तुमच्या इंग्रजीत या फॉक्सटेल मिलेटची मागणी केली ”
“वॉव, कसलं भारी आज्जी!! किती जुनं आहे हे मिलेट. पण वराहस्वामींनी ती फॉक्सटेल मिलेट नुसतीच खाल्ली का?” आजी हसत म्हणाली, “नाही गं वेडाबाई त्याचे कितीतरी प्रकार करता येतात, पण वराहस्वामींना राळ्याची खीर देण्यात आली. त्याची रेसिपी मी सांगते. या पद्धतीने वरई आणि राळा दोन्हींचीही खीर बनवता येते.”
वरई/ राळ्याची खीर
साहित्य : वाटीभर राळा/ वरई, दूध, गूळ, तूप, स्वादासाठी वेलचीचे दाणे, चिमूटभर सोडा.
कृती :
वाटीभर राळा किंवा वरई पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून ठेवा. (राळा न भिजवताही करता येईल). सकाळी सगळं पाणी निथळून वरई किंवा राळा तुपात व्यवस्थित परतून घ्या.
मग त्यात दुध आणि पाणी टाकून चांगलं शिजवून घ्या. आणि दहा मिनिटानंतर त्यात चिमूटभर सोडा घालून गूळ टाकून चांगलं हलवून घ्यायचं. सगळ्यात शेवटी वेलची दाण्यांची पूड घालावी. तयार आहे आपली वरई किंवा राळ्याची खीर. या थंडीत मस्त तूप टाकून खाऊन बघा.
Back to blog

Leave a comment