गोष्ट मिलेट्सची भाग तीन - मुलांना भूक लागत नाही का ?

गोष्ट मिलेट्सची भाग तीन - मुलांना भूक लागत नाही का ?

Santosh Bobade
पाचवीतली सई आज एकदम खुशीत होती. आर्या, पार्थ, सोहम आणि त्यांच्या आईबाबांसोबत ती चालली होती दिनूमामाकडे हुरडा पार्टीसाठी ...सोबत मित्रमंडळी त्यामुळे सई खुश. बर्थ डे पार्टी, ख्रिसमस पार्टी माहीत होतं, पण हुरडा.. ??? तिने विचारलं. मग उमेशकाका सांगू लागले, ''हुरडा म्हणजे ज्वारीचे कोवळे दाणे''. उमेशकाका शेतकरी कुटुंबातले. शहरात आले असले तरी शेतीची आवड आणि अभ्यास होता. आहार, पोषण याबाबतही जागरूक. ''आता तुम्ही मिलेट शब्द ऐकला असेल. एकूण मिलेट किंवा भरड धान्यांच्या उत्पादनाच्या तुलनेत ६० टक्के वाटा ज्वारीचा. गहू , तांदूळ , मका , बार्ली यानंतर घेतलं जाणारं पाचव्या क्रमांकाचं पीक. अनेकांच्या आहारातला प्रमुख घटक असलेल्या ज्वारीत तांदुळाच्या तुलनेत प्रथिनांचं प्रमाण अधिक म्हणजे १०. ४ टक्के आहे.'' काकांनी मग लहानमोठ्या सर्वांनाच ज्वारीची माहिती दिली.
ज्वारीला काही ठिकाणी शाळू, जोंधळा म्हणतात. इंगजीत Sorghum, Great millet म्हणतात.
१०० हून अधिक देशात उगवल्या जाणाऱ्या ज्वारीचं मूळ आफ्रिकेच्या ईशान्य भागात. तिथून साधारण ५०००-८००० वर्षांपूर्वी सगळीकडे पसरू लागली. आफ्रिकेत ज्वारीच्या पिवळी, लाल, केशरी, फिकट लाल अशा अनेक जंगली तसेच लागवड केलेल्या जाती आढळतात. अंदाजे ४५०० वर्षापासून भारतीय उपखंडात सगळीकडे ज्वारी लावली जाते.ज्वारी उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांक तर कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. पावसाळी, हिवाळी, उन्हाळी असे तिचे तीन हंगाम. रब्बी म्हणजे हिवाळ्यातली ज्वारी दगडी, मालदांडी , बेंद्री, झिपरी अशी असंख्य नावाने ओळखली जाते. दगडी ज्वारीला असणारे दाणे कणसाला अगदी दगडासारखे चिकटलेले असतात म्हणून त्याला दगडी ज्वारी म्हणातत. काही ठिकाणी पक्ष्यांसाठी ती राखून ठेवतात. झिप्री ज्वारी ही एखाद्या केस विस्कटलेल्या मुलीसारखी दिसते म्हणून तिला झिप्री म्हणतात. ज्वारीच्या वाणानुसार ज्वारीच्या दाण्यात व रंगात फरक जाणवतो जसे की दगडी ज्वारी पांढऱ्या रंगाची असते. तर मालदांडी ज्वारी फिकट पिवळी.
ज्वारीला चिकण पोयटा जमिन सगळ्यात उत्तम. पाणी धरून ठेवण्याची क्षमता असल्याने एक पाऊस झाला की नुसत्या दवावर ज्वारी उगवते. कर्नाटकातील काही भागात ९०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर ज्वारीचे पीक घेतात. ३० सेमी - १०० सेमी वार्षिक पर्जन्यमान असणाऱ्या कोणत्याही क्षेत्रात ज्वारीचे पीक होते. काही भागात खास प्रजाती नुसत्या जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरल्या जातात.
शरीराची चरबी कमी करण्यासाठी आणि पोषकता वाढवण्यासाठी ज्वारीची भाकरी खावी, परंतु मधुमेही व्यक्तींना फक्त हायब्रीड ज्वारी म्हणजे पावसाळ्यात घेतली जाणारी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात, कारण त्यात साखरेचं प्रमाण अगदी नगण्य. लाह्या करण्यासाठी वेगळी, पापड करण्यासाठीं वेगळी, भाकरीसाठी वेगळी , लाडूसाठी वेगळी अशा विविध प्रकारच्या ज्वारी सातपुडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी होतात.
आपल्या प्रत्येक सणात ज्वारी असतेच परंतु नागपंचमी दिवशी खास लाह्यांच्या ज्वारीच्या लाह्या केल्या जातात, असं सांगून काकांनी मग लाह्या करण्याची त्यांच्या आजीची पद्धत सांगितली.
साहित्य :
लाह्याची ज्वारी १ वाटी
कृती :
१. आदल्या दिवशी ज्वारी एक वाटीत बुडेल अशी भिजून ठेवायची.किंवा लाह्या करण्याअगोदर ज्वारी कोमट पाण्यात तासभर भिजून द्यायची
२.सुती कापडावर सुकेपर्यंत ज्वारी पसरून ठेवायची.
३.लोखंडी कढई तापवून मग त्यात ज्वारीचे दाणे घालायचे
४. सुती रुमालाचा गोल करून मग त्यात हळूहळू फिरवत जावे
५. हळूहळू सुती कपडा जसा फिरवू तसे त्यातून लाह्या निघण्यास सुरुवात होईल.
याशिवाय ज्वारीपासून दोसा इडली, शेव आणि कितीतरी चटपटीत पदार्थ होतात. ''पदार्थ ढीग असतील पण मुलांनी ते खाल्ले पाहिजेत ना''... आर्याची आई म्हणाली. ''आमचा छोटा तर काही खातच नाही.''
''वहिनी, मुलांना भूक लागत नसेल तर साव्याची अंबाली किंवा लापशी आठवड्यातून दोनदा दिली तर फरक पडतो. '' असं सांगून उमेशकाकांनी सावा या आणखी एका मिलेटविषयी माहिती दिली. चवीला गोडसर असल्यानं मुलांचे हे आवडते मिलेट. कुणाही व्यक्तीला आहारात मिलेटची सुरुवात करायची असेल तर हे मिलेट एक उत्तम सुरुवात होऊ शकते. ६४ ग्रॅम कार्बोदके, ९ ग्रॅम प्रथिने, 6 ग्रॅम तंतुमय पदार्थ. शरीर स्वच्छ ठेवण्याचं काम हे मिलेट करतं. आपल्या शरीरातले सगळे महत्त्वाचे अवयव जसे की यकृत , किडणी, हृदय, स्वादुपिंड यांना स्वच्छ ठेवण्यात आणि मधुमेह, मुतखडा वा इतर निगडित आजार लांब ठेवायला साहाय्य हे मिलेट करतं.
सावा किंवा शामूलचे इंग्रजी नाव बानयार्ड मिलेट. सगळ्यात जुने लहान मिलेट. Echinochloa frumentacea ही जात भारतीय सावा तर Echinochloa esculenta ही जात जपान सावा. याला जपानी मिलेटसुद्धा म्हणतात. भारतात प्रामुख्याने ओडिसा, महाराष्ट्र, तमिळनाडू, बिहार , पंजाब , गुजरात या राज्यात उत्पादन होतं. बदलते सामाजिक जीवन आणि शेती पद्धतीमुळे या मिलेट मध्ये असणाऱ्या उपजाती जवळ जवळ नष्ट झाल्या आहेत.
समशीतोष्ण युरेशियातून ४००० वर्षापूर्वी हे मिलेट भारतात आलं. खरीप हंगामातील पीक असून समुद्रसपाटीपासून २००० मीटर उंचीवर देखील हे मिलेट उगवते. पाणी कमी असणाऱ्या जमिनीतही हे येतं. खडकाळ जमिनीत मात्र ते तग धरू शकत नाही. जिथे आदिवासी शेतकरी वर्गाला अजून कोणतेही पीक घेणे शक्य नाही तिथे याची लागवड केली जाते. कणसाच्या सुंदर आकारामुळे पक्षी या पिकाकडे आकर्षित होतात. पक्ष्यांचे सगळ्यात आवडते खाद्य म्हणून विविध पक्षी शेतात येतात तसेच त्यांची विष्ठा शेतात पडते त्यामुळे माती सुधारण्यास प्रचंड मदत होते. साधारण ९० दिवसात कापणीला येणारे. साधारण ४०० किलो ते ६०० किलो बिया आणि १२०० किलो चारा प्रति हेक्टर उत्पादन मिळते. मग काकांनी बानयार्ड मिलेट हालबायची रेसिपी सांगितली.
बानयार्ड मिलेट हालबाय ( गोड दक्षिण भारतीय पदार्थ)
साहित्य : बानयार्ड मिलेट पीठ - १ कप गूळ - अर्धा कपएक पूर्ण किसलेला नारळ तूप ४ वेलची
कृती : १. प्रथम पिठात पाणी ओतून ताकाप्रमाणे पातळ करा
२. गॅस चालू करून मध्यम आचेवर हे मिश्रण ढवळत रहा
३. अंदाजे १० मिनिटानंतर मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होईल.
४. गुळात पाणी टाकून काकवीप्रमाणे पातळ करा.
५. पातळ केलेला गूळ वरील मिश्रणात सोडा
६. मग हळूहळू मिश्रण एकजीव होऊ पर्यंत ढवळत रहा
७. अंदाजे तीस मिनिट हे मिश्रण ढवळावे लागते.
८. हालबाय म्हणजे हलवा आणि बर्फी मधील प्रकार.
९. तयार झालेले मिश्रण एका ताटात ओतून देऊन बर्फीप्रमाणे सगळीकडे समप्रमाणात लावून घ्या.
१०. थोडे थंड झाल्यावर आवडीनुसार कापून खाण्यास तयार
Back to blog

Leave a comment