गोष्ट मिलेट्सची भाग पाच - कोदो आणि ब्राऊन टॉप मिलेट
Share
“आजी तू परवा बनवलेली वरईची खीर यम्मी होती, या मिलेटसच्या दुनियेविषयी मला अजिबातच काही माहीत नव्हतं बघ. सांग ना मला अजून या मिलेट्सविषयी” सई उत्सुकतेने आजीला विचारत होती. आपल्या आधुनिक आजीबाईंनी ऑनलाईन काही सामान मागविले होते, ते घेत- घेत त्या उत्तरल्या, “अरे वा, भगर न आवडणाऱ्या मुलीला आता मिलेट्स बद्दल जाणून घ्यायचंय तर? थांब तुला एक गंमत दाखवते. मला माहीत होतं, तुला मिलेट्स आवडणार ते म्हणून मी सरप्राईज मागवलंय तुझ्यासाठी. ” ‘सरप्राईज’ हा शब्द ऐकून सईचे डोळे विस्फारले.
असं म्हणत आजीने लालसर- करड्या रंगाची आणि लालसर पोपटी रंगाच्या धान्याची दोन पाकिटं सईसमोर ठेवली. “हे आहेत अनुक्रमे ‘कोदो आणि ब्राऊन टॉप मिलेटस’. तुला क्रमाक्रमाने यांची माहिती सांगते हं. हे पहिल्या पाकिटात जे लालसर करड्या रंगाचं आहे ना, ते कोदो मिलेट, हिंदीत कोद्रा आणि इंग्रजीत कोडो मिलेट म्हणतात याला. कठीण बी असलेला, रंगाने करडा, उगवायला जास्त दिवस घेणाऱ्या या मिलेटला हिमालयन मिलेटदेखील म्हणतात, कारण अर्थातच हिमालयाच्या आसपासच्या परिसरात याचे जास्त उत्पादन होते. कानडीत याला ‘आरगा’ म्हणतात. संस्कृतमध्ये ‘आरगा’ या शब्दाचा अर्थ सूर्य होतो. उन्हाळ्याच्या सुरूवातीला उन्हामुळे हिमालयातील बर्फ वितळून खाली असणारे कोदो मिलेट बी उगवून येत असे, म्हणून हिमालयातील पर्वतरांगा हिरव्या दिसू लागत. भारतात मध्य प्रदेश, छत्तीसगड व झारखंड भागात हे मिलेट आदिवासी शेतकऱ्यांचे मुख्य खाद्य आहे.
आफ्रिकेतील उष्णकटिबंधीय आणि उपउष्णकटिबंधीय भागात हे मिलेट होत असे. साधारण 3000 वर्षांपूर्वी हे भारतात आले. छत्तीसगडमधील मल्हार नावाच्या गावात येथे 1000 वर्षांपूर्वीच्या या कोदो मिलेटचा काही भाग सापडला, परंतु 3000 वर्षापूर्वी हे भारतात कसे आले याचा काहीच सुगावा अद्याप लागलेला नाही.
कोदो मिलेट फिकट लालसर ते गडद करड्या रंगात आढळून येते. कणसाचा आकार सरळसोट उभा असून बिया गव्हाच्या लोंबीप्रमाणे एकमेकांना जोडत जातात. भारतातील ज्या भागात कमी दर्जाची माती आहे अशा भागात कोदो मिलेटचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अगदी शून्य पाणी असलेले, खडकाळ जमीन असलेले जिथे इतर कोणतेही पीक घेता येणार नाही अशा जमिनीत हे आनंदाने येते. पाणी धरून न ठेवणारी जमीन यासाठी सगळ्यात उपयोगी. 40 मिमी - 50 मिमी पाऊस येणाऱ्या भागात देखील हे मिलेट उगवून येते. खरीप हंगामात जून ते जुलै महिन्यात पेरणी केली जाते, तर ऑक्टोबर पर्यंत पीक तयारही होते.
120 दिवसांत हे कोदो पीक कापणीला येते. कोदोच्या काही 90 दिवसात येणाऱ्या जाती आहेत परंतु त्याची फार लागवड केली जात नाही. 90 सेमी म्हणजेच तीन फूट उंच वाढणारे हे पीक जनावरांचा चारा म्हणून उत्तम आहे. मिश्र पिके म्हणून सोयाबीन, उडीद, मूग किंवा चवळी घेतली जाते.
पोषणमूल्य : 64 ग्रॅम कर्बोदके, 9 ग्रॅम प्रोटीन , 6 ग्रॅम तंतुमय पदार्थ
जंगली डुकरांना शेतापासून लांब करण्यासाठी हे मिलेट संरक्षक भिंत म्हणून लावता येते कारण या मिलेट पासून येणारा उग्र वास डुकरांना आवडत नाही. रंगाने थोडे काळपट व त्यातील मूलद्रव्ये पाण्यात विरघळणारी असल्याने धुताना हे मिलेट काळे पाणी सोडते . अनेकदा असा गैरसमज होतो की यात माती किंवा धूळ आहे, परंतु खरं तर हे आहे की जास्त धुतल्याने ह्या मिलेटमधील गुणधर्म नाहीसे होतात. आजी पुढे म्हणाली, “गुरूद्वारामध्ये दिल्या जाणाऱ्या लंगरच्या जेवणात देखील कोदो मिलेटसचा समावेश असतो हं.बरं या कोदो मिलेट्सची खिचडी मस्त होते हं सई. उद्या दुपारच्या जेवणासाठी करणार आहे मी. ही घे रेसिपी”
कोदो मिलेट खिचडी
पदार्थ :
कोदो मिलेट - 1 कप
मूग डाळ - अर्धा कप
मिरची, गाजर, फरसबी, चवळी इतर भाज्या आवडीनुसार
कढीपत्ता , जिरे , कांदा , लसूण , तेल, मीठ .
कृती :
एकदा पाण्याने स्वच्छ धुवून कोदो मिलेट रात्रभर पाण्यात भिजत ठेवा.
लोखंडी कढईत तेल तापवा आणि त्यात चिरलेला लसूण, कांदा, कढिपत्त्याची व्यवस्थित फोडणी द्या, नंतर भाज्या टाकून छान परतून घ्या. आता भिजवलेल्या कोदो मिलेटमधले पाणी निथळून कोदो आणि मूगडाळ या फोडणीत टाका. नीट परतून झालं की त्यात गरजेनुसार पाणी टाका.
मंद आचेवर कोदो मिलेट व्यवस्थित शिजू द्या. तयार झालेली खिचडी वेगळ्या भांड्यात काढून घ्या. गरमागरम कोदो मिलेटची खिचडी तूप टाकून खा.
“ व्वा आजी, म्हणजे या आरोग्यदायी मिलेटसचा आपण रोजच्या आहारात समावेश करू शकतो तर!! अगदी भात, खिचडी, खीर, धिरडं अश्या किती तरी रूपात!!“ सई उत्साहाने म्हणाली. “अगदी बरोबर बेटा, आता मी तुला अश्या एका मिलेटविषयी सांगणार आहे, ज्याची तर पोळी पण करता येते. तुझ्या आईनंच ती मला शिकविली आहे अगं, रेसिपी पण सांगणार पण सगळ्यात शेवटी. तर या मिलेटला मराठीत विशिष्ट शब्द नाही, हिंदीत हरी कांगनी किंवा छोटी कांगनी, तर इंग्रजीत ब्राऊन टॉप मिलेट असे म्हणतात. “
याचे उगमस्थान भारतच आहे परंतु तरीही एकूण भारतात सध्या फक्त आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यात हरिकची लागवड केली जाते, तीदेखील कमी प्रमाणात. भारतातील अनेक भागात हे तण (गवत) म्हणूनच ओळखले जाते. त्यामुळे त्याला खुरपणी करण्याची गरज देखील लागत नाही. अमेरिकेतील फ्लोरिडा आणि अलाबामा येथे गवत आणि कुरणांसाठी दरवर्षी खूप कमी पैशात, सुमारे एक लाख एकरवर याची लागवड केली जाते, तर ब्राऊन टॉप मिलेटच्या बिया कबुतरांना खाद्य म्हणून दिल्या जातात.
इसवी सन पूर्व 3000 वर्षांपूर्वी दक्षिण भारत आणि नैऋत्य भारतात ब्राऊन टॉप मिलेट सापडले, असे अभ्यासक सांगतात. पुढे ते डेक्कन पासून खाली दक्षिणेकडे पसरले आणि गुजरात मधून उत्तरेकडेही. उत्पादन क्षमता कमी असल्याने हळूहळू हे मिलेट मागे पडू लागले, मात्र तरीही इसवी सन सातव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात पैठण येथे ब्राऊन टॉप मिलेटचे उत्पादन होत असे, असे पुरावे मिळतात. 1915 मध्ये भारतातून अमेरिकेत याचा प्रसार झाला जिथे प्रामुख्याने कुरणांसाठी याचा वापर केला जातो.
ब्राऊन टॉप मिलेट फिकट हिरवे व थोडे पोपटी रंगाचे दाणे असून दाण्याचा वरील भाग हलका ब्राऊन असतो म्हणून याला ब्राऊन टॉप (वरचा भाग लाल असलेली मिलेट) म्हणतात. समुद्रसपाटीपासून 8000 फूट उंचीवर देखील हे मिलेट उगवते. सगळ्या प्रकारच्या मातीत हे आनंदाने उगवते मात्र कमी पाणी धरून ठेवणारी, तसेच ज्या भागात पाऊस कमी आहे अशा ठिकाणी हे मिलेट चांगले उगवत नाही. वालुकामय चिकणमाती मातीत हे चांगल्या प्रकारे उगते. ब्राऊन टॉप मिलेट जमिनीतील शिसे आणि झिंक गोळा करण्याचे काम करते म्हणून, माती व जमिनीची प्रत सुधारण्यासाठी ब्राऊन टॉप मिलेटच्या पिकाचा वापर केला जातो.
ब्राऊन टॉप मिलेटचे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या मिलेट मध्ये सर्वात कमी दिवसात हातात येणारे पीक. 60-80 दिवसात हे पीक कापणीला येते. 90 सेमी म्हणजेच 3 फूट उंच वाढणारे हे पीक जनावरांचा चारा म्हणून उत्तम आहे. मात्र इतर मिलेटच्या तुलनेत उत्पादन कमी असते म्हणून याची लागवड कमी प्रमाणात होते. गवत प्रकारात असल्याने याच्या बिया जिथे पडतील तिथे पुन्हा पुन्हा उगवून येतात. शेतातून बी पूर्ण नष्ट होण्यासाठी अक्षरश: काही वर्षे जावी लागतात.
पोषणमूल्ये : 64 ग्रॅम कर्बोदके, 9 ग्रॅम प्रोटीन, 6 ग्रॅम तंतुमय पदार्थ
“आता ऐक तुझ्या आईने सांगितलेली ब्राऊन टॉप मिलेटच्या चपातीची रेसिपी” आजी पुढे सांगू लागली.
ब्राऊन टॉप मिलेटची चपाती
यात असणाऱ्या प्रोटीनमुळे आपला मुख्य आहार असलेल्या चपातीसाठी उत्तम असे हे मिलेट आहे
साहित्य :
ब्राऊन टॉप मिलेटचे पीठ - 1 कप
उडीद डाळ पीठ - पाव कप
एक उकडलेला बटाटा
चवीनुसार मीठ आणि तेल
कृती :
दोन्ही पीठं एकत्र करून हळू हळू पाणी आणि थोडं तेल- चवीनुसार मीठ टाकून चपातीची कणिक मळतो त्याप्रमाणे मळून घ्यावं. याची छान चपाती बनावी असं वाटत असेल तर ही मळलेली कणिक किमान दोनेक तास तेल लावून छान भिजू द्यावी.दोन तासांनी या कणकेचे गोळे करून त्याची चपाती लाटता येतेय का चेक करावं. जर व्यवस्थित लाटता येत नसेल तर त्यात उकडलेला बटाटा टाकून पुन्हा कणीक मळून घ्या जेणेकरून पीठ मऊ होईल आणि चपाती लाटली जाईल.
ज्या लोकांना काही कारणांनी उडीद डाळ चालत नाही, ते फक्त ब्राऊन टॉप मिलेटच्या पीठाची उकड (मोदकांसाठी तांदळाच्या पिठीची कशी उकड काढतो तशी) काढून, ती नीट मळून दोन तास भिजवून ठेवून मग चपात्या करू शकतात.
तुम्हीही करून पाहा मिलेट्सचे नव नवे पदार्थ!!