गोष्ट मिलेट्सची - भाग सहा - मिलेट्स खाऊया, आरोग्य न पर्यावरण जपूया !
Share
''मीना, गरमागरम बाजरीची भाकरी आणि लसणाची चटणी खाऊन घे, आराम पडेल बघ. थंडीत कुणाला ताप आला, सर्दी झाली तर आपल्या शरीराला गरम ठेवणारी बाजरी सगळ्यात उत्तम. '' नुकतीच लग्न होऊन आलेली सून आजारी पडल्यानं माई तिच्या सेवेत गुंतल्या होत्या. तुझ्यासाठी बाजरीचे लाडू पण करू.''
''माई, लाडू बरेच ऐकले आहेत, पण बाजरीचे लाडू ... ते कसे करतात? '' मीनानं विचारलं. माई सांगू लागल्या, ''प्रथम बाजरी रव्याप्रमाणे दळून घ्यायची. त्यानंतर लोखंडी कढईत हळूहळू हे बाजरीचे पीठ गरम करायचं. गरम करताना त्यात तूप घालणं गरजेचं. एक किलो पिठाला अर्धा किलो तूप आणि अर्धा किलो गूळ. पीठ व्यवस्थित भाजल्यानंतर त्यात बारीक केलेला गूळ मिक्स करावा. लाडू खाताना घशाला चिकटू नये म्हणून त्यात तुपात तळलेला आणि बारीक केलेला अंदाजे दहा ग्रॅम खाण्याचा डिंक वापरावा. हे सगळे मिश्रण एकत्र करून लाडू वळून घ्यावे. असा लाडू कमीत कमी महिने दोन महिने आरामात टिकतो. शिवाय सकाळीसकाळी असा एक लाडू खाल्ल्यानंतर भूक भागते.''
''मीना तू नाचणीही सुरू कर'', माईंनी सल्ला दिला.
माईंनी मीनाला बाजरी आणि नाचणी खाण्याचा सल्ला का बरं दिला?
प्रथिनं, लोह,झिंक,फॉस्फरस,मॅग्नेशियम, ब जीवनसत्त्व असलेली बाजरी एकदम पौष्टिक. देशाच्या एकूण बाजरी उत्पादनापैकी महाराष्ट्र,राजस्थान, गुजरात, उत्तरप्रदेश, हरियाणा या राज्यात ९० टक्के बाजरी उगवली जाते. थोडी पांढरी, थोडी पिवळी, थोडी करडी, थोडी निळी अशा विविध रंगांनी नटलेली बाजरी अगदी मोत्यासारखी दिसते म्हणून त्याला इंग्रजीत पर्ल मिलेट असे म्हणतात. साधारण इसवी सन पूर्व ४००० मध्ये आफ्रिकेत सहारा वाळवंटाच्या पश्चिम भागतील सुदान येथे बाजरीची शेती केली जाऊ लागली. भारतात साधारण इसवी सन पूर्व १००० ते २५०० मध्ये उत्तर भारतात हडप्पा संस्कृती तसेच गंगेच्या खोऱ्यात बाजरी पिकवली जात असे. नंतर साधारण इसवी सन पूर्व १५०० च्या काळात ती दक्षिण भारतात पिकवली जाऊ लागली.
नाचणीही प्राचीन काळापासूनचचं धान्य. अगदी डोंगर माथ्यापासून ते हिमालयापर्यंत नाचणी उगवते. जिथे चांगला पाण्याचा निचरा होतो तिथे नाचणी चांगली उगवते. नुसत्या कर्नाटक राज्यात आपल्या देशातील ६० टक्के नाचणी होते. प्रथिने, कॅल्शियम, तंतुमय, पदार्थांनी भरपूर असलेली नाचणी स्त्रियांनी तर जरूर खावी. हाडांची समस्या, दातांची समस्या किंवा रक्ताची समस्या असेल तर नाचणी जरूर खावी. सगळीकडे मोठ्या प्रमाणात लहान मुलांना दिला जाणारा नाचणी सत्व हा एक प्रकार. सहा महिन्याच्या पुढील बाळाला आहार देताना नाचणी सत्व दिले जाते.
नाचणी सत्व बनवण्यासाठी प्रथम नाचणी स्वच्छ पाण्याने दोन-तीन वेळा धुतली जाते. त्यानंतर तिला साधारण बारा तास पाण्यात भिजवून मोड आणले जातात. मोड आणताना नाचणीला सुती कपड्यांमध्ये बांधले जाते. मोड आलेले धान्य साधारण दोन-तीन तास वाळवले जाते. त्यानंतर एखाद्या भांड्यात हलकेसे गरम करून मग त्याचे पीठ केले जाते. असे पीठ लहान बाळ असो व प्रौढ व्यक्ती यांनी गुळातून खाल्ल्यास किंवा खीर बनवून खाल्ल्यास अतिशय उपयुक्त. त्याचप्रमाणे नाचणीचं आंबीलही बहुगुणी.
काही अभ्यासकांच्या मते आफ्रिकेतील टांझानिया पश्चिम भागात किंवा इथोपियाच्या उंच सखल भागात नाचणीचा उदय झाला तिथून ती इतिहास पूर्वकाळातच भारतात आली. नाचणीच्या जंगली जाती अजूनही काही ठिकाणी आफ्रिकेत सापडला जातात. कधीही कीड न लागणारे कोणत्याही पर्यावरणात तग धरून राहणारे असे बियाणे जवळजवळ दशकावर टिकून राहते.महाराष्ट्रात अनेक डोंगराळ भागात नाचणी पिकवली जाते. मुठी बंद असलेली मुटकी, शीत मुटकी, दिवाळीला निघणारी दिवाळी बेंद्री, कळसुबाईला येणारी जाबड अशा विविध स्थानिक जाती आहेत. मुठी बंद केलेली आणि मुठी ही बोटांची बनली जाते म्हणून या मिलेटला इंग्रजीत फिंगर मिलेट म्हणतात.
आजच्या बाजरी आणि नाचणीसोबत वेगवेगळ्या मिलेट्सची ओळख गेल्या काही भागांमध्ये आपण करून घेतली.
२६ हून अधिक वर्षांचा अनुभव असलेल्या पुण्यातील आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर सांगतात, ''मिलेट्समध्ये आपल्याला ज्वारी, बाजरी, नाचणी माहीत आहेत पण राळं, सावा, कोदो ही अत्यंत उपयुक्त आणि प्रामुख्यानं महाराष्ट्र आणि आंध्र मध्ये घेतली जाणारी मिलेट्स फारशी परिचित नाहीत. आपण उपासाला खातो ती वरी किंवा भगर मिलेटच. पण सर्वसाधारण बाजारात असते ती पॉलिश्ड स्वरूपात असते. कुठलंही धान्य पॉलिश्ड स्वरूपात येतं तेव्हा साहजिकच त्याचे गुणधर्म कमी होतात. आम्ही पेशंट्सना अनपॉलिश्ड वरी खायला सांगतो. फायबरचं अधिक प्रमाण, ग्लायसेमिक इंडेक्स कमी असणं यामुळे रक्तात साखर रिलीज होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे शुगर कंट्रोलसाठी, औषधं कमी होण्यासाठी ती नक्कीच उपयुक्त आहेत. सर्वच मिलेट्स अत्यंत उपयुक्त असून ऍसिडिटीपासून अगदी कॅन्सर पेशंटपर्यंत सर्वांसाठी ती गुणकारी आहेत. अर्थात मिलेटसोबत बाकीचा आहार संतुलित असणं, दही/ डाळी, भाज्या योग्य प्रमाणात आहारात असणं, नियमित व्यायाम या गोष्टींचं काटेकोर पालन आवश्यक आहे. आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या धान्यांसाठी रासायनिक कीटकनाशकं, खतं यांची गरज लागत नाही. त्यामुळे ती पर्यावरणपूरक आहेत. ''
मिलेट मॅन ऑफ इंडिया डॉ. खादर वली यांनीही मिलेट्ससोबत काही गाईडलाईन्स आखून दिल्या आहेत.
भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या भारतीय कदन्न (मिलेट्स)संशोधन परिषदेनंही मिलेट्समध्ये मधुमेह, कर्करोग, हायपरटेन्शन रोधी गुणधर्म असल्याचं म्हटलं आहे.
मिलेट्स पोषणासाठी, आरोग्यासाठी, पर्यावरणासाठी कशी महत्त्वाची आहेत, ते आपण या मालिकेतून जाणून घेतलं. बहुतांश करून सेंद्रिय पद्धतीनं पिकवली जाणारी ही पौष्टिक तृणधान्य पशुपक्ष्यांसाठीही उपयोगाची आहेत. रोग आणि किडीची समस्या कमी असल्यानं, पाणी कमी लागत असल्यानं शेतकऱ्यांसाठी ही धान्य फायद्याची आहेत. तेव्हा मिलेट्स पिकवूया, खाऊया आणि आरोग्य न पर्यावरण जपूया !
मालिका समाप्त ...