गोष्ट मिलेट्सची भाग एक – देवधान्य
Share
“मधुमेहामुळे चिघळत असलेली पायाची जखम हे धान्य खाल्ल्यान बरी झाली.” कोणतं तरी पिवळ्या रंगाचं बारीक धान्य माझ्या हातात देत पेंडसे काका मला म्हणाले.
हे नक्की कोणतं धान्य आहे, मी विचारलं.
याला मिलेट, तृणधान्य किंवा देवधान्य असं म्हणतात, काका म्हणाले.
म्हणजे नक्की काय हो?
अशी धान्य जी फार पूर्वीपासून आपल्याकडे घेतली जातात, जी जमिनीचं, आपलं आणि एकूण पर्यावरणाचं आरोग्य चांगले ठेवतात.
याचा तुम्हाला नक्की कसा फायदा झाला?
तांदूळ आणि ज्वारी मध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने मधुमेह बळावण्याची शक्यता असते, परंतु हे पिवळ्या रंगाचे धान्य म्हणजेच फॉक्सटेल मिलेट किंवा राळं. हे धान्य खाल्ल्याने माझ्या रक्तातली साखरेची पातळी कमी झाली आणि हळूहळू इन्सुलिन घ्यायचं बंद झालं आणि शिवाय मधुमेहात होणारी जखम देखील बरी झाली.
अरे वा! हे फारच जादुई धान्य आहे की…
हो. म्हणून याला मॅजिकल मिलेट असं देखील म्हणतात. हे घे पुस्तक आणि यातून याची माहिती वाच. पेंडसे काकांनी मला एक पुस्तक दिलं आणि मी वाचू लागलो.
शेतीची सुरुवात झाली आणि हे धान्य सर्वप्रथम मानवाने आपल्या जवळ केले. आशिया आणि आफ्रिका खंडात सापडलेले धान्य हळूहळू जगातील असंख्य संस्कृती सोबत नांदू लागले. इंग्रजीत यांना मिलेट (Millet) म्हणतात. मिनी म्हणजेच लहान आकाराच्या एका दाण्यापासून असंख्य दाणे मिळवता येतात. भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी यांना रामधान्य, देवधान्ये, जादुई धान्य, श्रीधान्य अशी नावे आहेत. मराठीत याला भरडधान्य म्हणतात. परंतु हे नाव मिलेटला शोभत नाही. ही नावं कशी पडली असतील बरं?
एकदा तांदूळ आणि नाचणीचे (Finger Millet) भांडण लागते. नाचणी म्हणते मी सगळ्यात चांगली. तांदूळ म्हणतो मी महान. ती दोघे न्यायासाठी धर्मराजाकडे जातात. राजा दोघांना तुरुंगात टाकतो. काही महिन्यांनी जेव्हा दोन्ही धान्यांना बाहेर काढलं जातं तेव्हा तांदूळ खराब झालेला असतो, मात्र नाचणी आहे तशीच असते. ह्या गोष्टीतून कळतं की, नाचणी जास्त काळ टिकणारं धान्य आहे म्हणजेच लोकांचं धान्य आहे. म्हणून ह्या वर्गातील धान्यांना रामधान्ये म्हणतात. कारण राम हा लोकांचा राजा होता. भारतातील काही राज्यांमध्ये मिलेटला देवधान्ये किंवा श्रीधान्ये (समृद्धी देणारी) म्हणतात.
मिलेट्सबाबत दुसरीही अशीच एक रंजक गोष्ट ऐकायला मिळते. ती अशी -
एकदा इंद्राच्या एकुलत्या एक मुलीचं पृथ्वीवरील एका मुलावर प्रेम जडतं. इंद्राने नकार देऊनही मुलगी ऐकत नाही. शेवटी एकुलत्या एक मुलीसमोर इंद्र हार मानतो. मुलगी पृथ्वीवर जाणार म्हटल्यानंतर मुलीसोबत काय द्यायचं हा प्रश्न त्याला पडतो. इंद्रदेव मुलीसोबत सात वेगवेगळी मडकी भरून देतो. त्या मडक्यात असतात भिन्न भिन्न प्रकारची मिलेट. देवांनी दिलेलं हे धान्य म्हणून याचं नाव देवधान्य. अगदी यजुर्वेदामध्येही या धान्याचा उल्लेख आढळतो. याचाच अर्थ भारतीय कास्ययुगापासून मिलेट खाल्लं जातं. (इ.स.पूर्व ४५००). भारताव्यतिरिक्त आफ्रिका, चीन, जपान, कोरिया आदी देशांमध्ये फार पूर्वी पासून मिलेट खाल्ले जात असल्याचे पुरावे आढळतात. थोडक्यात काय तर आपले पूर्वजही मिलेट खात होते.
मिलेटमध्ये प्रमुख, मोठे मिलेट व धाकटे मिलेट अशी वर्गवारी करतात. मोठे मिलेटम्हणजे ज्वारी (Sorghum), बाजरी (pearl millet) हे तर धाकटे मिलेट म्हणजे नाचणी(finger millet), वरई(barnyard millet), राळा(foxtail millet), सावा (little millet), कोदो (kodo millet), ब्राऊन टॉप मिलेट, प्रोसो मिलेट अशी एकूण नऊ मिलेट आहेत.
या व्यतिरिक्त सकारात्मक मिलेट म्हणजेच अशी धान्य जी आपल्याला आजारात गुणकारी ठरतील. यात वरई(barnyard millet), राळा(foxtail millet), सावा (little millet), कोदो (kodo millet), ब्राऊन टॉप मिलेट. दुसरा प्रकार तटस्थ धान्य अशी धान्य ज्यामुळे आपले निरोगी शरीर निरोगी राहण्यास मदत होईल यात ज्वारी, नाचणी, बाजरी अशी धान्य येतात. भारतीय कदान्न (मिलेट) अनुसंधान संस्था (Indian Institute of Millets Research) हैदराबाद मध्ये कार्यरत आहे. २०२३ हे वर्ष जागतिक मिलेट वर्ष आहे. Odisha Millets Mission अंतर्गत ओडीसा सरकार शिधापत्रिकेवर (Ration Card) नाचणीचे वाटप करते.
दक्षिण भारतातील डॉ. खादर वली यांना मिलेट मॅन ऑफ इंडिया असं म्हणतात. त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून मिलेट संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे.
जगाची वाढती लोकसंख्या, पर्यावरणाचे होत असलेले नुकसान, बदलते वातावरण, शेती समस्या, आरोग्याच्या समस्या या सगळ्याकडे उत्तर म्हणून मिलेटकडे पाहिलं जातं. तर या मिलेटमधून शरीराला काय मिळतं, मिलेट का खावं हे सगळं पाहू पुढच्या काही भागांमध्ये.