वातव्याधी | Diseases of Vata | Dr Balaji Tambe
Master Ayurvedic techniques to alleviate joint pain, enhance mobility, and restore bodily harmony against the effects of aging and stress
MRP (Incl. of all taxes)
Development by DDSHOPAPPS
मनोगत
'फॅमिली डॉक्टर' ह्या पुरवणीला जवळजवळ आठ वर्षे पूर्ण होत आहेत. आरोग्याची देवता असलेल्या धन्वंतरीजयंतीचा म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवसाचा मुहूर्त धरून सुरू केलेल्या ह्या पुरवणीचे जवळजवळ ४१६ अंक पूर्ण झाले. वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे ह्या अंकांमधील प्रस्तावना, मुखपृष्ठकथा, आयुर्वेद उवाच ह्या सर्व सदरांमध्ये लिहिताना अतिशय आनंद मिळाला, इतकेच नव्हे तर एखाद्या शुक्रवारी सकाळ वर्तमानपत्राच्या कार्यालयाला सुटी असल्याने अंक निघणार नसला तर चुकल्याचुकल्यासारखे होत असे, चैन पडत नसे. आयुर्वेदाचा, आयुर्वेदीय उपचारांचा, एकूणच आयुर्वेदिक पद्धतीचा, औषधांचा सर्वसामान्यांना उपयोगी पडेल असा परिचय सोप्या भाषेत देत असताना आयुर्वेदाच्या तत्त्वांची कास धरूनच सर्व लिखाण करण्याचा पायंडा ठेवला. हे लिखाण करताना सर्वसामान्यांना तसेच वैद्य होऊ इच्छिणाऱ्यांना कळेल व उपयोगी पडेल अशी भाषा वापरण्याचे ठरविले व तसे केले. त्यामुळेच ह्या पुरवणीत असलेल्या लेखांचा सर्वसामान्यांपासून ते अभ्यासू वृत्तीने आयुर्वेद शिकणाऱ्यांपर्यंत सर्वांनाच लाभ झाला.
सुरुवातीच्या दीड-दोन वर्षांनंतर प्रसिद्ध केलेल्या, 'फॅमिली डॉक्टर'मधील महत्त्वाच्या लेखांचा समावेश असलेल्या 'निवडक फॅमिली डॉक्टर' ह्या पुस्तकाला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे. गेल्या ५-६ वर्षांच्या कालावधीत अनेक गावांमध्ये अनेक मंडळी भेटली. त्यांनी शुक्रवारी येणाऱ्या 'फॅमिली डॉक्टर' ह्या पुरवण्यांचा कसा संग्रह केलेला आहे, सर्व पुरवण्या कशा जपून ठेवलेल्या आहेत हे दाखवले. त्यासाठी घरातील कपाटात विशेष योजना केलेली दाखवली. काही व्यक्तींनी त्यांच्याकडे एखादा अंक नसल्यामुळे त्याच्या दुसऱ्या प्रतीबद्दल विचारणा केली. अशा तऱ्हेने 'फॅमिली डॉक्टर' ही एक पुरवणी न राहता 'फॅमिली डॉक्टर'ला लोकांनी संग्राह्य ग्रंथ ह्या रूपाने स्वीकारलेले आहे हे लक्षात आले. आयुर्वेदावर कार्यक्रम, व्याख्याने आयोजित केल्यावर अनेक वेगवेगळ्या विषयांवर बोलले जाते, पण एखाद्याला विशिष्ट रोगाचा त्रास होत असल्यास लोकांना त्यांच्या विशिष्ट रोगाबद्दल व उपचारांबद्दल माहिती हवी असते.
रोग होऊच नये म्हणून आयुर्वेदाचा प्रचार करावा हा उद्देश मी डोळ्यासमोर ठेवलेला आहे. त्या दृष्टीने प्रत्यक्ष रोग होण्यासाठी कोठल्या चुका कारणीभूत होतात हे सांगण्याचा प्रयत्न केला. काळजी घेऊनही एखादा रोग झालाच तर त्यावर कोठले घरगुती उपचार करता येतात, त्या रोगाबद्दलची संपूर्ण माहिती मिळावी, रोगावर कुठला, कसा व किती प्रमाणात उपचार करून घ्यावा, रोग झाला असल्यास कुठले पथ्यापथ्य सांभाळावे हे कळणे आवश्यक असते. त्या दृष्टीने आत्तापर्यंत 'फॅमिली डॉक्टर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन करून रोगानुसार छोट्या छोट्या पुस्तिका प्रकाशित करण्याचे ठरविले.
'फॅमिली डॉक्टर'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वातविकारावरच्या प्रस्तावना, मुखपृष्ठकथा व विषयाला संबंधित आयुर्वेद उवाच ह्या सदरातील लेख संकलित करून 'वातव्याधी' ही पहिली पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे. आजच्या काळात दगदगीमुळे किंवा स्वतःच्या स्वभावामुळे मनुष्य अतिशय धावपळ करतो, निसर्गाला धरून आहार-विहार सांभाळले जात नाहीत, काही वेळा प्रवास, जागरणे अपरिहार्य असतात, अशा वेळी शरीरात पित्त वाढून अनेक प्रकारचे पचनाचे विकार तर होतातच पण बरोबरीने हार्मोन्सचे असंतुलन होते. त्याचबरोबर वातदोषाचे असंतुलन होईल अशा आहार-विहारामुळे वातदोष आणि वातविकार वाढतात. प्रत्येक विकारात होणारे 'दुखणे' व शारीरिक हालचालींवर येणारे बंधन हेच आजारपणात मुख्यतः त्रासदायक ठरते.
तसेही वाढत्या वयाबरोबर म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात प्रकृतीमध्ये वातदोष उत्पन्न होऊ लागतो त्यामुळेही अनेकांना वातविकारांना सामोरे जावे लागते. अशा दृष्टीने वातविकारांची संप्राप्ती, वातविकारांवरचे उपचार समजून घ्यावेत ह्या दृष्टीने ही पुस्तिका प्रकाशित होत आहे. साधारणतः सर्व प्रकारचे, परिचयाचे व सर्वसामान्यपणे आढळणारे सर्व वातविकार याबद्दल माहिती, औषधोपचार, ह्या पुस्तिकेतून मिळू शकेल अशी आशा आहे. वातविकारामुळे त्रास होणाऱ्यांची, विकारातून व दुःखातून मुक्तता मिळावी अशी प्रार्थना.
वात ह्या शब्दाचा साधारणतः अर्थ वायू असा घेतला जातो. त्यामुळे 'हा वातविकार आहे' असे रुग्णाला सांगितले की बऱ्याच वेळेला रोगी म्हणतो 'मला वाताचा काही त्रास नाही, मला पोटात वायू धरत नाही, मला गॅस सरत नाही.' वातदोषात वायू व आकाश ह्या दोन पंचमहाभूतांचा समावेश असला तरी वातदोष म्हणजे केवळ वायू नव्हे. पोटात धरणारा वायू असा वातदोष ह्या शब्दाचा अर्थ नव्हे.
वात, पित्त आणि कफ ह्या आयुर्वेदातील संकल्पना आहेत. शरीरधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या तत्त्वांचा विचार करता जडतत्त्व व त्या जडतत्त्वाचे चलनवलन व्हावे म्हणून असलेले जलतत्त्व ही दोन तत्त्वे मिळून जी संकल्पना तयार होते तिला 'कफ' असे नाव दिलेले आहे. कफदोष असे म्हणत असताना त्याचा अर्थ छातीत होणारा कफ असा नसतो. 'पित्त' ही संकल्पना जल, अग्नी व वायू ह्या तीन पंचमहाभूतांपासून तयार होते. आवश्यक त्या ठिकाणी 'तेज' पोहोचविणे हे पित्ताचे कार्य होय. वात, पित्त आणि कफ ह्यात वयोमान, ऋतुमान व आहारविहार ह्यामुळे बदल व असंतुलन होते म्हणून त्यांना वातदोष वगैरे संज्ञा दिल्या जातात.
शरीराच्या आत व बाहेर होणाऱ्या चलनवलनाला लागणारी संकल्पना म्हणजे वात. हात-पाय जास्त हलणे किंवा अजिबात न हलणे, शरीराला जडत्व येणे किंवा कंप येणे, डोळ्याच्या पापणीची सारखी उघडझाप होणे, सही करताना हात थरथरणे, हातात पेन धरता न येणे, मनगटे वळवता न येणे, हात वर उचलता न येणे किंवा शरीरात कोठेही, विशेषतः सांध्यांमध्ये वेदना होणे अशी सर्व लक्षणे वातदोषाच्या असंतुलनातून तयार होतात, हे लक्षात ठेवले तर पुढे सर्व विषय समजणे सोपे होईल.
प्रत्येक शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या 'फॅमिली डॉक्टर' ह्या पुरवणीसाठी व ह्या पुस्तकासाठी ध्वनिमुद्रित केलेला विषय टाइप करणे हे अवघड काम विजया कोल्हे ह्या करतात, त्यांचे मनःपूर्वक आभार, तसेच डॉ. भाग्यश्री झोपे हिच्या साहाय्याबद्दल तिचे मनःपूर्वक आभार.
बाळाजी तांबे
आत्मसंतुलन व्हिलेज, कार्ला
ऑक्टोबर २०११