शेतकऱ्याशी भाव करू नका, कारण शेती सोन्याहून मौल्यवान आहे

Santosh Bobade

आपण एखाद्या पेट्रोल पंपावर जाऊन कधी म्हणतो का “भाऊ, १० रुपये कमी करा”? नाही ना? मग शेतकऱ्याच्या मालात घासाघीस करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आजच्या काळात सर्व गोष्टींचे भाव वाढतात मग ते डिझेल, खते, बियाणं, पाण्याचे पंप, ट्रॅक्टर, मजुरी किंवा नांगरणीचं काम असो. दरवर्षी २५%, ५०%, कधी १००% पर्यंत वाढ होते. पण विचार करा शेतकऱ्याच्या पिकांचे भाव किती वाढले? गहू, तांदूळ, तूर, मूग, भुईमूग, भाजीपाला यांचे दर वर्षानुवर्षे फक्त ५–७% एवढेच वाढतात. हा अन्याय नाही का?

महिन्याभरापूर्वीचं उदाहरण घ्या १२ लाखांच्या गाडीत बसलेला माणूस भाजीवाल्याला म्हणतो, “मेथीची जुडी २० ऐवजी १० ला दे ना!” तेव्हा विचार करावा लागतो ही आपली समाजमान्यता किती विसंगत आहे! शेती करणारा माणूस चार महिने घाम गाळतो. सूर्याखाली, पावसात, कीड-रोगांशी लढतो. त्याच्या हातातला प्रत्येक दाणा त्याच्या श्रमाने पिकतो. पण विकायला बाजारात गेला की पहिला प्रश्न “कितीला देतोस?” आणि पुढचं वाक्य “जरा कमी कर ना भाऊ.” हा भाऊ शब्द तेव्हा टोचतो. कारण ज्याच्या घामाने आपला घास मिळतो, त्याच्याशी भावाची नाही तर भावनेची गरज असते.

आपल्याला वाटतं शेतमाल महाग आहे, पण खरं काय तो कधीच महाग नसतो. भात ५० रुपये किलो, पण पिझ्झा ४०० रुपये हे आपल्याला परवडतं. भुईमूग तेल २०० रुपये लिटर महाग वाटतं, पण कोल्ड ड्रिंक ५० रुपयांना घेताना विचार येत नाही. हेच आपल्या प्राधान्याचं चित्र आहे. अन्न हेच जीवनाचं मूळ आहे. शेती नसती तर आपण नसतो. मग अन्न उगवणाऱ्याला योग्य किंमत देणं ही आपली जबाबदारी नाही का?

शेतकऱ्याच्या अंगावर सोन्याचे दागिने नसतील, पण त्याच्या हातात सोन्याहून मौल्यवान मातीचा स्पर्श आहे. तो जमिनीतून जीवन उगवतो, आपल्यासाठी धान्य तयार करतो. त्याचा माल विकत घेताना भाव करतो आपण, पण त्याच्या घामाच्या किमतीचं सोनं आपण ओळखत नाही. जगातील प्रत्येक सरकारमध्ये आणि व्यवस्थेत, शेतकऱ्याला “जास्त नफा मिळू नये” असा एक मूक नियम आहे. कारण जर शेतकरी समृद्ध झाला, तर मध्यमवर्गाच्या स्वस्त जीवनशैलीचं समीकरण बिघडेल. पण प्रश्न असा आहे हे बदलणार कोण? उत्तर सोपं आहे, आपणच.

शेतकऱ्याच्या मालात भाव करू नका. तो तुम्हाला फसवत नाही, तर पोसत असतो. त्याच्या मालात दर कमी करण्याऐवजी त्याच्या मेहनतीला सलाम करा. कारण सोन्याचा भाव नेहमी जास्त असतो, पण शेतीत पिकणारं सोनं अन्नधान्य त्याहूनही मौल्यवान असतं. जेव्हा आपण शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव देऊ, तेव्हा त्याला बँकेचं कर्ज लागणार नाही, आणि आपल्या थाळीतलं अन्नही अधिक पवित्र होईल. तुम्ही सोनं विकत घेता, पण शेतकरी सोनं पिकवतो फरक इतकाच की, त्याचं सोनं चमकत नाही, ते पोटभर अन्न बनून जग जिवंत ठेवतं.

Back to blog

Leave a comment