तुमच्या ताटातलं 'प्रोटीन' गायब झालंय? वाचा काय म्हणतंय ICMR!

Santosh Bobade

"तुमच्या जेवणात प्रोटीनच नाही!"
हे विधान माझं नाही, तर खुद्द Indian Council of Medical Research (ICMR) ने केलेल्या एका अभ्यासाचं आहे. आणि ही खरंच चिंतेची बाब आहे. कारण जर आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता निर्माण झाली, तर अनेक गंभीर आजारांना आमंत्रण मिळू शकतं.

पण हे ऐकल्याबरोबर आपल्या मनात लगेच एक प्रश्न येतो— "अहो, आपल्या आजी-आजोबांनी तर हेच अन्न खाल्लं, ते तर ठणठणीत १०० वर्षे जगले ना? मग आताच काय झालं?" हा प्रश्न बरोबर आहे, पण त्याचं उत्तर आपल्या बदललेल्या जीवनशैलीत आणि आहारात दडलेलं आहे. आजी-आजोबांच्या ताटातलं गुपित...मी जेव्हा शाळांमध्ये जातो आणि मुलांना त्यांच्या आहाराबद्दल विचारतो, तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर येतं.

आजची मुले जेवणात सरासरी फक्त ५ प्रकारचे पदार्थ खातात. त्यांचे आई-बाबा साधारण १० प्रकारचे पदार्थ खातात. पण त्यांचे आजी-आजोबा त्यांच्या काळात तब्बल २० विविध प्रकारचे पदार्थ खात होते याचा अर्थ काय? तर त्यांच्या ताटात 'विविधता' (Diversity) होती. ते एकाच प्रकारचे धान्य किंवा भाजी खात नव्हते, तर ऋतूंनुसार आणि उपलब्धतेनुसार वेगवेगळ्या गोष्टींचा आहारात समावेश करत होते.

आयुर्वेद काय सांगतं? आपला आयुर्वेद सांगतो की, आहार हा 'परिपूर्ण' तेव्हाच असतो जेव्हा त्यात सहा रस (Six Tastes) असतात: १. गोड (Sweet) २. आंबट (Sour) ३. खारट (Salty) ४. कडू (Bitter) ५. तिखट (Pungent) ६. तुरट (Astringent) आपले पूर्वज हे सहाही रस असलेला आहार घेत होते. कडू कारल्यापासून ते तुरट आवळ्यापर्यंत आणि गोड गुळापासून ते तिखट मसाल्यांपर्यंत सगळं त्यांच्या पोटात जात होतं. त्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या सर्व पोषक तत्त्वे आणि प्रोटीन मिळत होतं.

आज आपण काय खातोय? आता आपल्या ताटाकडे बघा. आज आपल्या आहारात काय वाढलंय? मैदा, पांढरा भात (White Rice), केमिकलयुक्त रिफाइंड तेल,  डालडा आणि बेकरी प्रोडक्ट्स जेव्हा आपण निसर्गापासून दूर जाऊन अशा प्रक्रिया केलेल्या (Processed) अन्नावर अवलंबून राहतो, तेव्हा शरीराला 'सत्त्व' कुठून मिळणार? म्हणूनच ICMR जे सांगतंय, त्यात १००% सत्यता आहे. आपल्या आधुनिक आहारातून पोषण आणि प्रोटीन दोन्ही हद्दपार होत चाललंय.

मग उपाय काय? घाबरून जाऊ नका, पण सावध नक्की व्हा! प्रोटीन मिळवण्यासाठी डब्यातल्या पावडरची गरज नाही. आपल्या निसर्गातच असे अनेक खजिने आहेत जे तुम्हाला भरपूर प्रोटीन देऊ शकतात.

Back to blog

Leave a comment