सण बैलांचा, अभिमान महाराष्ट्राच्या संस्कृतीचा

सण बैलांचा, अभिमान महाराष्ट्राच्या संस्कृतीचा

Santosh Bobade

महाराष्ट्रातले सण म्हणजे केवळ पूजा किंवा गोड पदार्थांचा उत्सव नाही, तर त्या मागे एक खोल सामाजिक, नैसर्गिक आणि भावनिक अर्थ दडलेला असतो. बैलपोळा हे त्याचं अत्यंत सुंदर उदाहरण, हा सण म्हणजे एका अशा सोबतीला केलेलं वंदन, जो न बोलता आपल्या आयुष्याला आकार देतो तो म्हणजे बैल.

 

शेतीच्या जगात, शेतकऱ्याचं पहिलं पाऊल जिथं पडतं, तिथं त्याच्या जोडीला असतो त्याचा बैल. मळ्यावरची माती असो किंवा नांगरावरची धार या सगळ्याचं ओझं पेलणारं, शांतपणे आणि अखंड मेहनतीनं राबणारं हे प्राणिमात्र शेतकऱ्याचं केवळ ‘पशू’ नसून, त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो. त्यामुळेच पोळा म्हणजे एक सण न राहता, तो एक कृतज्ञतेचा दिवस बनतो.

 

पोळ्याच्या दिवशी संपूर्ण गावात एक वेगळीच ऊर्जा असते. बैलांना अंघोळ घालून त्यांना झूल, गोंडे, टिळे, रंग, घंटा आणि फुलांचे हार घालून सजवलं जातं. प्रत्येक शेतकरी आपल्या बैलाला जणू एखाद्या आप्तस्वकियासारखं, जिवाभावाच्या माणसासारखं जपत असतो. ओवाळणी केली जाते, त्यांच्या भोवती फेर धरले जातात, आणि त्यांच्या कपाळावरून प्रेमाने हात फिरवून त्यांना आशीर्वाद दिला जातो. या सगळ्याच्या मागे एक अव्यक्त भावना असते — "तू माझा साथीदार आहेस, आणि आज मी तुझं मान राखतो."

 

शहरीकरणाच्या झपाट्यात आपण कधी बैल पाहतो, कधी शेती पाहतो, हेही आठवत नाही. पण अन्नाचा प्रत्येक घास त्यांच्याच श्रमांनी पोसलेला असतो. त्यामुळे पोळा केवळ शेतकऱ्यांचा सण नाही, तो आपल्यासारख्या प्रत्येक व्यक्तीचा आहे, जो अन्न खातो, पोषण घेतो, आणि सजीव निसर्गावर जगतो.

 

या दिवशी जे जेवण बनतं, तेही खास असतं. साजूक तुपातली पुरणपोळी, ताक, भाकरी, पिठलं. हे केवळ जेवण नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अनुभव असतो, जिथं गोडवा, पोषण आणि परंपरा एकत्र मिसळतात. यात आहे मातीतली माया, बैलाच्या श्रमाची किंमत आणि शेतकऱ्याच्या हातातली जपलेली चव.

 

PIP Agro मध्ये आम्ही मानतो की पोळा केवळ शेतकऱ्याच्या अंगणात साजरा होणारा सण नसून, तो आपल्या प्रत्येक उत्पादनामागे असलेल्या मेहनतीला दिलेला सलाम आहे. आमचं तूप असो, गूळ असो, ताक असो ते सगळं त्या सजीव नात्यांपासून प्रेरित आहे, जिथं मेहनत, शुद्धता आणि परंपरा हातात हात घालून चालतात.

 

आजच्या काळात, जेव्हा सण फक्त सोशल मीडियावर स्टोरीसाठी उरतात, तेव्हा पोळा आपल्याला पुन्हा एकदा आपल्या मूळांशी जोडतो. तो आपल्याला विचार करायला लावतो. आपण अन्नासाठी फक्त रक्कम देतो, पण ते तयार करणार्या आणि ते आपल्या ताटात पोहोचवणाऱ्या श्रमिकांचं आपण काय देणं लागतो?

 

निसर्गाचं, श्रमाचं आणि सजीवाच्या सन्मानाचं स्मरण हीच खरी पोळ्याची शिकवण आहे.

 

या वर्षीचा पोळा नव्याने साजरा करा. केवळ सण म्हणून नाही, तर मनापासूनच्या नम्रतेने, आणि नव्या जाणिवेने.

Back to blog

Leave a comment