सोयाबीन... आपल्या माथी मारलं जातंय का?
Santosh BobadeShare
आपण कधी विचार केला आहे का? आपल्या स्वयंपाकघरात अचानक आलेलं हे सोयाबीन इतकं सर्वत्र पसरलं कसं? आपल्या आजीच्या किंवा पणजीच्या काळात कुणी सोयाबीनचं नावही ऐकलं होतं का? नाही. कारण हे पीक आपल्या मातीतलं नव्हतंच. खरं तर, सोयाबीनचा उगम भारतात नाही ते १७६५ मध्ये अमेरिकेत आणि तिथून जगभर पसरलं. आज ब्राझील आणि अमेरिका हे जगातील सर्वात मोठे सोयाबीन उत्पादक देश आहेत. पण सगळ्यात मोठी बाब म्हणजे त्यांच्या शेतातलं १००% सोयाबीन हे “जेनेटिकली मॉडिफाय” (GMO) असतं. म्हणजे निसर्गाने दिलेलं बीज नाही, तर प्रयोगशाळेत तयार केलेलं कृत्रिम बियाणं.
१९६५-६६ मध्ये अमेरिकन एजन्सी USAID आणि भारतातील ICAR (Indian Council of Agricultural Research) यांनी भारतात ‘ब्रॅग’ (Bragg) नावाचं सोयाबीन आणलं. आणि इथून आपल्या मातीत एक प्रयोग सुरू झाला आपल्या पारंपरिक तिळ, मोहरी, भुईमूग यांचं स्थान हळूहळू ‘सोयाबीन तेलाने’ घेतलं. १९७० पासून भारतात ‘आरोग्यासाठी चांगलं तेल’ म्हणून सोयाबीन तेलाचं प्रचारझालय. टीव्हीवर जाहिराती आल्या, पोस्टर लावले गेले, आणि आपण विश्वास ठेवला “सोयाबीन तेल म्हणजे प्रोटीन, एनर्जी, आणि आधुनिकतेचं चिन्ह!” पण खरं काय घडलं? आपल्या शेतीतून पारंपरिक तेलबिया नष्ट होत गेल्या. तिळाचं तेल, भुईमूग तेल, आणि मोहरीचं तेल जी आपल्या मातीत नैसर्गिकरीत्या वाढतात, ज्यात चव आणि औषधी गुण दोन्ही आहेत. त्यांची जागा घेतली एका परदेशी पिकाने. आज आपण लाखो टन सोयाबीन आणि त्याचं तेल ‘आयात’ करतोय. जे अमेरिकेत आणि ब्राझीलमध्ये GMO स्वरूपात तयार होतं, तेच आपण ‘आरोग्यदायी तेल’ म्हणून वापरतो आहोत.
आज बाजारात तुम्हाला व्हेगन मिल्क, टोफू, आणि सोया चंक्स हे सगळं मिळेल. सगळ्यांना सांगितलं जातं की हे “उत्तम प्रोटीनचे स्रोत” आहेत. पण खरी गोष्ट अशी आहे की ही सगळी उत्पादने म्हणजे तेल काढल्यानंतर उरलेली ‘पेंड’. होय तीच पेंड जी आपण गुरांना, जनावरांना खायला देतो. मग प्रश्न उभा राहतो जो देश एकेकाळी देशी तुपातलं जेवायचा, तो आज जनावरांच्या खुराकातली पेंड खातोय का? याहून दुर्दैव काय असू शकतं?
सोयाबीन हे पीक आपल्या भारतीय हवामानात नैसर्गिकरीत्या जुळत नाही. हे जमिनीतील पोषणशक्ती संपवतं, माती कोरडी करतं आणि पुढच्या पिकांची ताकद कमी करतं. रासायनिक खतं आणि कीटकनाशकं वापरल्याशिवाय ते उगवतच नाही. परिणामी, माती थकते, पाणी प्रदूषित होतं, आणि आपण जे खातो ते देखील रसायनांनी भरलेलं असतं. आणि जेव्हा आपण असं तेल, टोफू किंवा “प्रोटीन चंक्स” खातो, तेव्हा आपण फक्त पोट नाही भरत आपण नकळतपणे आपल्या शरीरात रासायनिक अन्न आणि परदेशी प्रयोग भरत असतो.
आपण पुन्हा विचार करायला हवा काय आपल्याला खरंच “सोयाबीन” हवं आहे का? की पुन्हा आपल्या देशी पिकांकडे, आपल्या पारंपरिक तुप, तिळ, भुईमूग, आणि मोहरीकडे वळायला हवं? आपली मातीतली बीजं ती आपल्या आरोग्याशी आणि संस्कृतीशी जोडलेली आहेत. ज्या जमिनीत सोनं उगवतं, तिथं आपण परदेशी पेंड पिकवतोय हे बदलायला हवं. कारण शेवटी, जे संत तुकारामांनी म्हटलंय “तुज आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी.” आपल्याकडे सर्व काही आहे फक्त आपण स्वतःचं विसरलो आहोत.
सोयाबीन फक्त एक पीक नाही, तर एक कल्पकपणे रचलेला व्यापार आहे. आपल्याला परदेशी “प्रोटीन” विकून आपला आरोग्य, आपली माती आणि आपली स्वावलंबन हरवायला लावलं गेलं आहे. आता वेळ आली आहे “मातीकडे परतण्याची.” कारण खरी शक्ती, खरी चव आणि खरं प्रोटीन ते आपल्या जमिनीतच आहे.








Leave a comment