Skip to product information
1 of 2

नांगरणीशिवाय शेती - No Tillage Farming | प्रताप चिपळूणकर

नांगरणीशिवाय शेती - No Tillage Farming | प्रताप चिपळूणकर

Regular price Rs. 240.00
Regular price Sale price Rs. 240.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Size: 1 Book
Check Estimated Delivery Date

View full details
शेतीविषयक शास्त्रीय माहिती देणारे पुस्तक   

नांगरणीशिवाय शेती
• शेतीपद्धती अधिक सुलभ, सोप्या व कमी खर्चाच्या करणे, उत्पादन पातळी वाढवणे, उत्पादनाचा दर्जा वाढवणे, जमिनीची सुपीकता वाढवणे या वाटचालीचा एक भाग म्हणून उपयोगी ठरणारे तंत्र शेतकऱ्यांसाठी सोप्या भाषेत.
• नांगरणीशिवाय केल्या जाणाऱ्या संवर्धित शेतीच्या तंत्राचे स्वरूप, शास्त्रशुद्ध विवेचन.
• शून्य मशागत तंत्र, त्यासाठीचे तण व्यवस्थापन, उपयुक्त सूक्ष्मजीव व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन या सर्वांची माहिती.
• छायाचित्रे, रेखाचित्रे, कोष्टके यांची जोड देऊन केलेली आकलनसुलभ मांडणी.
• लेखक प्रताप रघुनाथ चिपळूणकर कृषिशास्त्रात बी.एस्सी. असून १९७० पासून पूर्ण वेळ शेतकरी म्हणून काम करत आहेत. १९९० पासून भू-सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाच्या अभ्यासास प्रारंभ. विज्ञाननिष्ठ शेतकरी. शेतीसंबंधित शास्त्रीय ग्रंथ वाचणे, आवश्यक टिपणे काढणे, शेतात प्रयोग करणे व शेतकरी उपयोगी तंत्रे विकसित करणे, त्यांचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करणे अशा कामात गेली अनेक वर्षे व्यग्र.

मनोगत

१९७० मध्ये शेतीतील पदवी घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. त्याला आता ४२ वर्षांचा कालावधी लोटला आहे. हे माझे चौथे पुस्तक वाचकांपुढे ठेवत असताना मला या ४२ वर्षातील वाटचालीतील अनेक स्थित्यंतरांची आठवण होते. तसे पाहता माझी शेतीची सुरुवात डोक्यावर प्रचंड आर्थिक बोजा असताना झाली. आर्थिक चणचण माणसाला अनेक नवनवीन गोष्टी शिकवत असते. प्रचलित कृषि विज्ञानाने मला फार थोड्या कालावधीत या आर्थिक अडचणीतून बाहेर काढले. सतत नवनवीन प्रयोग करण्याच्या प्रवृत्तीमुळे गेल्या ४२ वर्षांत किमान ३-४ वेळा आर्थिक गर्तेत जाणे व परत सुस्थितीत येणे असे घडले. या नागमोडी वाटचालीमुळे भरपूर नवीन गोष्टी शिकण्यास मिळाल्या व प्रयोगांची वाटचाल सुरूच राहिली. शेतीत संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा प्रत्यक्ष शेत व शेतीशी कमी संबंध असतो; तर शास्त्रीय वाचन करून शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा फारच कमी कल असतो. ४०-५० वर्षांपूर्वी बराचसा शेतकरी समाज अंगठेबहाद्दर होता. आताची पिढी लौकिक अर्थाने साक्षर आहे. परंतु व्यावसायिक साक्षरतेबाबत विचार केल्यास पूर्वी इतकीच निरक्षरता अद्यापही असावी. काळ बदलेल तशा शेतीतील समस्या बदलत जातात. बदलत्या परिस्थितीनुरूप शेती करण्याच्या पद्धतीत बदल होत जाणे गरजेचे आहे. यासाठी व्यावसायिक साक्षरता महत्त्वाची ठरते. १९९० मध्ये पूर्वीप्रमाणे चांगले कुजलेले खत टाकणे भावी काळात शक्य होणार नाही. याला पर्यायी मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. या वाटचालीत वनस्पतींचे अवशेष व प्राण्यांच्या त्याज्य पदार्थांचे आच्छादन करून जमीन सुपीक करण्याच्या आच्छादन तंत्राचा अभ्यास झाला. आच्छादन तंत्राचा सविस्तर खोलवर जाऊन अभ्यास केल्यानंतर आच्छादनातील पदार्थ थेट शेतात कुजत असताना त्या जमिनीची आपोआप मशागत होते असे संदर्भ थेट पुस्तकात वाचवयास मिळाले. त्याची प्रचिती प्रत्यक्ष शेतात आजमावता आली. त्याचबरोबर अमेरिकेत भू-सूक्ष्मजीवशास्त्र विषयात विद्यावाचस्पती पदवी घेऊन भारतात परतलेल्या बंगळुरूस्थित शास्त्रज्ञाने प्रत्यक्ष भेटीत याला दुजोरा दिला. जमिनीतील सूक्ष्म जीव जर मशागत करत असेल तर आपण मशागत करण्याची गरजच काय? या अभ्यासातून शून्य मशागत तंत्राची माझ्या शेतीत वाटचाल सुरू झाली. १९९० ते २००५ या काळात मी ५०% मशागत बंद केली व २००५ पासून १००% मशागत बंद करून शेती करू लागलो. त्या काळात यासाठी कोणीही मार्गदर्शक नव्हते. कल्पना सुचतील तशी वाटचाल सुरू होती. जीवाणूंकडून मशागत करून उत्तम प्रकारे शेती करता येऊ शकते याची खात्री पटली होती. आर्थिक अडचणीच्या काळात उधारी उसनवारी करून मशागत करावी लागत असे. याचे भरपूर चटके मी सोसले आहेत. पुढे मी मशागतीसाठी पॉवर टीलर खरेदी केला व दुसऱ्यांच्या शेतीची भाड्याने मशागत करून देण्याचा धंदाही केला. आज माझ्याकडे मशागतीसाठीचे हे अवजार आहे. भाडयाचा धंदा केव्हाच बंद केला आहे. आता घरची मशागत करणेही बंद झाले आहे. मशागत बंद करून शेती करण्याचे जमिनीला, पिकाला, शेतकऱ्याला, पर्यावरणाला व राष्ट्राला भरपूर फायदे होतात. असे असूनही २००९ पर्यंत हे तंत्र माझ्या शेतीतच प्रायोगिक स्वरूपात वापरले जात होते. ४ ते ७ फेब्रुवारी २००८ या कालावधीत जागतिक संवर्धित शेतीवरील अधिवेशन नवी दिल्ली येथे पार पडले. त्याची माहिती 'दै. अॅग्रोवन'मुळे समजली. संवर्धित शेती (कॉन्झर्वेशन अॅग्रीकल्चर) मध्ये मशागत बंद करणे अगर अगदी गरजेपुरतीच मशागत करणे हे मुख्य तत्त्व असल्याने या अधिवेशनातील शोधनिबंधांवरील साहित्य मिळवणे गरजेचे होते. डायरेक्ट जनरल (सीड) या उच्चपदावर भारतीय कृषि अनुसंधान संस्था नवी दिल्ली येथे कार्यरत असणारे माझे मित्र श्री. एन. डी. जांभळे यांनी वरील परिषदेशी संबंधित सर्व साहित्य उपलब्ध करून दिले यासाठी त्यांचे आभार मानावेत तितके थोडे ठरतील. हे जवळपास मोठ्या आकारातील ११०० पानांच्या साहित्याचा अभ्यास करण्यात सुमारे दीड वर्षांचा कालावधी लोटला.
मशागत बंद करून आपण शेती करत आहोत. त्याचप्रमाणे जगभरातील अनेक देशांत यासंबंधीचे प्रयोग चालू आहेत. यासंबंधी जागतिक पातळीवरील संघटना आहेत व त्यांच्यासह एकत्र बसून झालेल्या कामावर व पुढे करावयाच्या कामासंबंधी चर्चा करण्यासाठी अधिवेशने होतात. ही सर्व माहिती आपण करत असलेल्या कामाला वैचारिक बळ देणारी होती. एका बाजूला नांगरणीची प्रथा शेतीत कशी चालू झाली असेल, केव्हा चालू झाली असेल याचाही अभ्यास सुरू होता.
पौराणिक काळात श्रीकृष्णाचा भाऊ बलराम याच्या खांद्यावर नांगर असल्याचे दिसते. इतके हे तंत्र मागे जाते. प्रश्न असा होता की जर नांगरणीशिवाय शेती होऊ शकते; तर ही परंपरा आजपर्यंत चालू कशी राहिली? चिंतनाने या प्रश्नाचे उत्तरही सापडले. आता ही सर्व माहिती शेतकन्यांच्या उपयोगाची असल्याने ती त्यांच्यापर्यंत पोचवणे गरजेचे वाटले. २०११ साली माझी 'नांगर सोडा' ही मालिका 'ॲग्रोवन'ने २७ भागांत प्रसिद्ध केली. वाचकांनी तिला भरभरून प्रतिसाद दिला. 'जमिनीची सुपीकता' या मालिकेचे ज्याप्रमाणे पुस्तक झाले, त्याप्रमाणे या मालिकेचेही पुस्तक तयार करावे अशी इच्छा अनेक वाचकांनी व्यक्त केली. सकाळ पुस्तक प्रकाशनाचे विभागप्रमुख श्री. आशुतोष रामगीर यांनी त्वरीत पुस्तकाचे काम पूर्णत्वाला नेले. सर्वांच्या आशीर्वादाने आज हे पुस्तक तयार होत आहे. पुस्तक तयार होईपर्यंत अनेकांचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचे एकत्रित आभार मानतो.

पुस्तकाचे स्थूलमानाने तीन भाग पडतात.

१) मी स्वीकारलेली नांगरणीशिवायची शेती

२) जगभर चालू असलेली नांगरणीशिवाय शेती

३) ही पद्धत स्वीकारल्यानंतर आलेले अनुभव

आपण ज्या तत्त्वापोटी या पद्धती स्वीकारल्या त्यांचा जगभरच्या शेती पद्धतीशी काही समन्वय आहे का? हे पाहणे हा जगभरची शेती अभ्यासण्यामागचा खरा हेतू होता. हा पद्धती स्वीकारण्यात भरपूर तात्त्विक तफावत आढळली. यामागे तुलना करण्याचा उद्देश नाही. हा जिज्ञासेपोटी केलेला अभ्यास आहे. शेतकरी बंधूंनी सर्वच पद्धतींचा अभ्यास करून आपल्या परिस्थितीनुरूप त्यात योग्य सुधारणा कराव्यात. सर्वच शेतकऱ्यांना पुस्तक उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे. परंतु जास्ती करून सर्वसामान्य अल्पभूधारक, सर्व संसाधनांची कमतरता असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काही खास तंत्रे उपलब्ध होतील हा विचार मनात ठेवून लेखन केले आहे. यात थोडेफार यशस्वी होता आले, तरीही ती एक मोठी समाधानाची बाब ठरेल.
धन्यवाद.
प्र. र. चिपळूणकर कोल्हापूर
नांगरणीशिवाय शेती