जमीन व्यवस्थापन - Soil Managment | प्रताप चिपळूणकर
जमीन व्यवस्थापन - Soil Managment | प्रताप चिपळूणकर
Couldn't load pickup availability
Check Estimated Delivery Date
Share

Development by DDSHOPAPPS
शेतीविषयक शास्त्रीय माहिती देणारे पुस्तक
- प्रताप चिपळूणकर प्रगतिशील, संशोधक व विज्ञाननिष्ठ शेतकरी
- भू-सूक्ष्मजीवशास्त्राच्या आधारे नव्या शेती पद्धतीचा अभ्यास करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी, पिकाचा दर्जा सुधारण्यासाठी व जमिनीची सुपीकता कायम वाढवत नेण्यासाठी शोधलेल्या अत्यंत उपयुक्त व सोप्या तंत्राची माहिती
- जमिनीची सुपीकता तसेच तिचा कस कसा टिकवावा, तणाचा प्रश्न कसा सोडवावा ? अस्मानी संकटात जमिनीचे व्यवस्थापन कसे करावे आदी शेतकऱ्यांसमोर उभ्या असलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचे निराकरण करणाऱ्या, त्यांना प्रत्यक्ष शेतात सर्वाधिक सहाय्यभूत ठरणाऱ्या बाबींची साध्या-सोप्या भाषेत मांडणी
- विना नांगरणीशिवाय शेती, पिकांवरील विविध रोग व तणनाशकांचा वापर, सेंद्रिय खते याबाबत शेतकऱ्यांच्या मनात असलेल्या विविध गैरसमजांचे निराकरण करणारे मराठी भाषेतील एकमेव पुस्तक
- एका अभ्यासू शेतकऱ्याने शेतकऱ्यांसाठी आपल्या संशोधनातून व प्रत्यक्ष अनुभवातून लिहिलेले पुस्तक
मनोगत
माझे हे सकाळ प्रकाशनतर्फे प्रकाशित होत असलेले तिसरे व एकूण आठवे पुस्तक आपल्यापुढे ठेवत असताना आनंद होत आहे.
२०२२हे वर्ष माझे हे शेतीतील ५२वे वर्ष आहे. कृषिशिक्षण घेऊन शेती करीत असता, करून घेतला तर शिक्षणाचा प्रचंड उपयोग होतो; तसे न केल्यास आपल्या नावापुढे फक्त पदवीची चार अक्षरे येतात, इतकाच शिक्षणाचा उपयोग. महाविद्यालयात सर्व विषयांचे थोडे थोडे ज्ञान तुम्हाला दिले जाते, तुम्ही ज्या क्षेत्रात नाळ, त्या क्षेत्रातील उच्च शिक्षणाचा अभ्यास सतत चालू ठेवणे गरजेचे असते. आता प्रसिद्धी माध्यमे खूप साहित्य प्रकाशित करीत असतात. नाममात्र पैशांत हा ज्ञानाचा खजिना आपल्याकरिता येत असतो, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. हे लिहिण्याचे कारण कृषी पदवीधर अगर बिगर कृषी पदवीधर संबंधित साहित्याचा अभ्यास करीत आहेत, असे चित्र अपवादानेच दिसते.
कृषिक्षेत्रावर सतत संकटांचा भडिमार होत असतो, इतर सर्व क्षेत्रे संकटमुक्त आहेत, असे काही म्हणता येणार नाही. २००५मध्ये महाराष्ट्रात प्रचंड महापूर आला. या महापुराची उंची गेल्या १०० वर्षांतील सर्वांत जास्त होती व महापुराची उच्चपातळी सतत १३दिवस टिकून होती. १९८९, २०१९ व चालू २०२१सालचा महापूर त्यापेक्षाही उच्चपातळीचा होता; परंतु त्याचा टिकून राहण्याचा कालावधी कमी होता. २००५सालच्या महापुराने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. सर्व ऊसपीक महापुराने कुजून गेल्याने पुढील सालातील ऊसपीक उभे करण्यासाठी भांडवलाची तीव्र टंचाई निर्माण झाली. यातून अशी जाणीव झाली, की प्रचलित पद्धतीने शेती करून काही पैलतीर गाठता येणार नाही. काही बदल असे केले पाहिजेत, की शेतीतील खर्च कमीत कमी पातळीवर ठेवता आला पाहिजे, उत्पादन मात्र चांगले मिळाले पाहिजे, तरच शेतकरी अशा संकटांना तोंड देऊ शकेल. हे सर्व करीत असताना सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जमिनीची सुपीकता सतत वाढत गेली पाहिजे.
अपघाताने अशा सोप्या सुलभ तंत्राच्या शोधयात्रेत मी भू-सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाच्या अभ्यासाकडे वळलो. या शास्त्राच्या अभ्यासाने माझे पुढील शेतीतील बहुतेक प्रश्न सोडविले व मला शेतीत स्थिरस्थावर केले. हे शास्त्र आजपर्यंत अंधारात राहिलेले असल्याने शास्त्रीय अगर शेतकरी जगतात त्याचा वापर फारसा केला जात नाही. सूक्ष्मजीवांचा शेतीत फक्त वनस्पतीवर येणाऱ्या रोगांपुरताच संबंध आहे, अशी या विषयाबाबत समजूत आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात सर्वांत जास्त मदत हेच शास्त्र करू शकते. हे मी आता ठामपणे मांडू शकतो. परंतु सर्व साहित्य इंग्रजी भाषेत. या विषयाची एक स्वतंत्र तांत्रिक भाषा, ती अवगत झाल्याशिवाय या विषयाचा अभ्यास केवळ इंग्रजी भाषेच्या ज्ञानातून करता येत नाही. महापुरामुळे आलेल्या आर्थिक विवंचनेने या शास्त्राची गोडी लागली व मिळेल तितका या एकाच विषयाचा अभ्यास, हेच पुढील जीवनाचे ध्येय ठरून गेले. हा विषय शेतकऱ्यांना कसा मदत करणारा आहे. यावर संपूर्ण २०१९ सालात आठवड्याला एक पान लेख करण्याची परवानगी 'ॲग्रोवन'ने दिल्याने हा विषय सविस्तरपणे मांडणे शक्य झाले. शेतीच्या प्रत्येक अंगाशी या विषयाचा अनन्य संबंध असूनही आजही हा विषय बाजूला पडला आहे. या लेखांमार्फत जसा हा विषय मांडला आहे, तसे मला ज्ञान देणारे अनेक ग्रंथ व त्यांचे शास्त्रज्ञ लेखक यांचाही परिचय करून देण्यात आला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या मनात तणनाशकाच्या वापराबाबत गैरसमजुती आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ या शास्त्राच्या अभ्यासामुळे माझी शेती आता ५० वर्षांपूर्वी पिकत होती तशी पिकू लागली आहे. या ज्ञानाचा लाभ सर्वांना व्हावा म्हणून ॲग्रोवनमधून जी लेखमाला लिहिली, त्याचे आता पुस्तक बनत आहे. तुटक तुटक केलेल्या वाचनापेक्षा पुस्तकामुळे विषय एकसंध वाचता येतो. जे समजायला सोपे जाते. एका शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी लिहिलेले हे पुस्तक आहे. यामुळे मागील पुस्तकांप्रमाणेच याही पुस्तकाचे शेतकरी स्वागत करतील अशी अपेक्षा आहे.
चालू २०२१ सालातही आजपर्यंतच्या सर्वांत उच्चांकी महापुराने हजेरी लावलीय, यामुळे शेतकरी कोलमडून पडला आहे. अशी संकटे येतात त्या वेळी शेतकऱ्यांची खरी कसोटी असते. विधात्याने केवळ यासाठीच संकटांचे नियोजन केले असावे. केवळ याचसाठी २००५च्या महापुराला हे पुस्तक मी अर्पण करीत आहे. आज मी महापुराचे आभार मानतो. असे संकट आले नसते, तर मी या शास्त्राचा अभ्यास करू शकलो असतो की नाही, शंका वाटते.
सकाळ प्रकाशनाचे मार्गदर्शक आशुतोष रामगीर, संपादक दीपाली चौधरी, या पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटणारे संदीप देशपांडे, तसेच पुस्तकाची मांडणी करणारे विशाल भगत, मुद्रितशोधक सुनील कापसे यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांनाही मनःपूर्वक धन्यवाद देतो.
प्र. र. चिपळूणकर