Skip to product information
1 of 5

Millet Mantra मिलेट मंत्र - आहारापासून औषधापर्यंत | M.D. Ayurved Vaidya Pushkar Wagh

Millet Mantra मिलेट मंत्र - आहारापासून औषधापर्यंत | M.D. Ayurved Vaidya Pushkar Wagh

Regular price Rs. 500.00
Regular price Sale price Rs. 500.00
Sale Sold out
Taxes included. Shipping calculated at checkout.
Check Estimated Delivery Date

View full details
मराठीतील पहिले पुस्तक  

मिलेटची समग्र शास्त्रीय माहिती देणारे

मराठीतले पहिले पुस्तक


लेखकाचे चार शब्द


१९९५ मध्ये महाराष्ट्रात प्रथमच शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेवर आले. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी '१ रुपयात झुणका-भाकर' नावाची योजना सुरू केली. गोरगरिबांच्या पोटाला आधार म्हणून ही योजना सुरू झाली. पण अनेक चांगल्या योजना अंमलबजावणीत फसतात, तसंच या योजनेचं झालं. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पुढच्या काही वर्षात ही योजना बंद पडली. त्यानंतर सत्तेच्या चाव्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हाती गेल्या आणि या योजनेचा सगळ्यांना विसर पडला. २०१४ मध्ये शिवसेना पुन्हा सत्तेत सहभागी झाली. पण यावेळी मात्र त्यांनी 'झुणका-भाकर' ऐवजी ‘शिव-वडापाव’ आणला. १९९५ ते २०१४ ह्या २० वर्षात झुणका भाकरीपासून वडापावपर्यंत झालेला प्रवास आपल्या बदललेल्या खाद्यसंस्कृतीचे प्रतीक आहे. १९९५ मध्ये ज्या जिभेवर झुणका-भाकरीची चव रेंगाळत होती. त्या जिभेला आता वडापावची चटक लागली. आज झुणका-भाकर खायची असेल तर सिंहगड, प्रतापगडावर जावं लागतं. आज २०२३ मध्ये तर वडापाव मागे पडून त्याची जागा बर्गरने घेतलीय. गेल्या २५ वर्षांत आपला आहार झपाट्यानं बदलला आणि त्याचे बरेवाईट परिणाम आज आपण भोगतोय. १९९० च्या दशकात डायबेटीस श्रीमंतांचा आजार होता. कारण हातावर पोट असलेला गरीब मजूर भाकरी खात होता म्हणून निरोगी होता. आता तोच मजूर भाकरीऐवजी पाव खातो आणि म्हणूनच आज त्यालासुद्धा डायबेटीस होतोय. एका आकडेवारीनुसार विकसनशील देशात डायबेटीसमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ८७% लोक गरीब असतात. ११९० च्या शतकात सुरू झालेल्या जागतिकीकरणाने जे अनेक बदल घडले त्यापैकीच हा एक बदल.
जागतिकीकरणाचा वेग डोळे दिपवून टाकणारा आहे. या २५-३० वर्षांत मानवाने विविध क्षेत्रात केलेली घोडदौड पाहता प्रचंड वेगाने पुढे चाललेलं हे जग क्षणभरासाठी थांबेल अशी कुणीही कल्पना केली नसेल. पण तसं घडलं खरं. गंमत म्हणजे अवघ्या जगाला थांबवणारी शक्ती इतकी छोटी होती ही तिला साध्या डोळ्यांनी पाहणं अशक्य होतं. ती शक्ती म्हणजे कोव्हिड व्हायरस. कोव्हिडच्या रूपात जगासमोर एक अनपेक्षित संकट उभं राहिलं. माणसं घरात अडकून पडली. जगातले सर्व व्यवहार थंडावले. लॉकडाऊन, क्वारंटाईन, आयसोलेशन या नव्या शब्दांची ओळख झाली. सुरवातीला गडबडून गेलेली माणसं हळहळू सावरली. मग हळूहळू या अनपेक्षित सुट्टीचा आनंद लुटू लागली. केकपासून पिझ्झापर्यंत सगळे प्रकार घरी बनवले जाऊ लागले. याच काळात अनेक हौशी मंडळींनी युट्यूब चॅनल सुरू केले. ज्यातले ९०% पुढच्या सहा महिन्यात बंद पडले. मीही त्यातलाच एक. व्हिडीओसाठी वेगवेगळ्या धान्यांवर अभ्यास करताना माझे लक्ष तृणधान्य म्हणजे मिलेटकडे आकर्षित झाले. त्यामुळे या विषयावर एक व्हिडिओ बनवला, पण यथावकाश त्याबद्दल विसरून गेलो.
युनायटेड नेशन्सने २०२३ आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले. आणि साहजिकच वेगवेगळ्या ठिकाणी मिलेटवर कार्यक्रमांचे आयोजन सुरू झाले. जानेवारी २०२३ मध्ये एके दिवशी डोंबिवलीतील प्रथितयश बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा कोल्हटकर मॅडमनी 'ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल'मध्ये मिलेटवर व्याख्यान देणार का?' अशी विचारणा केली. त्यांनी माझा युट्युबवरील व्हिडिओ पाहिला होता. या विषयावर व्हिडिओ केलेला असल्याने थोडी माहिती होतीच. आयुर्वेदातले संदर्भदेखील नजरेखालून गेले होते. त्यामुळे मॅडमना लगेच होकार दिला आणि रिलॅक्स झालो. पण एक-दोन दिवसातच डॉ. उल्हास कोल्हटकर सरांचा फोन आला. सर ब्लॉसम शाळेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि ते शाळेचे व्यवस्थापन अत्यंत कार्यक्षम पद्धतीने करत आहेत याबद्दल ऐकून होतो. त्याचा प्रत्यय मला लगेच आला. सरांनी ११ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आणि अक्षरशः दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाचा फ्लायर माझ्या व्हॉटस्अॅपवर आला. हा माझ्यासाठी अनपेक्षित धक्का होता. त्यामुळे आता आपण मागे राहून चालणार नाही, असे ठरवून व्याख्यानाच्या तयारीला लागलो. 'अभ्यासोनि प्रगटावे' हा कटाक्ष आजपर्यंत पाळला असल्याने लगेच या विषयावर वाचन करायला आणि व्हिडिओ बघायला सुरवात केली. तयारी करताना कर्नाटक सरकारने छापलेल्या पुस्तकांची विशेष मदत झाली. एक डॉक्टर म्हणून विषय मांडताना मिलेटचा आरोग्यविषयक विचार सावा असे ठरवले होते. पण जसजसा वाचत गेलो तशी या विषयाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण संबंधित व्याप्ती लक्षात येत गेली. म्हणून हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांपर्यंत मर्यादित नसून आपल्या सर्वांसाठीच आवश्यक आहे हे पटले. मिलेटला जागतिक पटलावर आणण्यामागे प्रमुख योगदान असलेल्या आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीचे आश्चर्य वाटले.
११ फेब्रुवारीचे व्याख्यान झोकात पार पडले. या व्याख्यानाला डोंबिवलीतील अनेक डॉक्टर्स आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या व्याख्यानामुळे अनपेक्षितपणे 'मिलेट एक्स्पर्ट' हे लेबल मला चिकटले. अनेक ठिकाणांहून व्याख्यानासाठी विचारणा होऊ लागली. माझे आयुर्वेदातील गुरू डॉ. महेश ठाकूर या कार्यक्रमाला हजर नव्हते. नंतर त्यांनी युट्यूबवर व्याख्यान पाहिले आणि 'तू या विषयावर पुस्तक लिही' असा बॉम्ब टाकला. आईवडिलांना जसं आपल्या राहून गेलेल्या गोष्टी मुलांनी कराव्या असं वाटतं तशीच ही मागणी होती. त्यांच्या या सूचनेकडे मी चेहऱ्यावर जॉन अब्राहमसारखे भाव आणत (वयस्कर माणसांनी जॉन अब्राहमच्या जागी भारत भूषण असे वाचावे.) जमेल तितका दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण एकदा सरांच्या मनात एखादी गोष्ट आली की ते हात धुवून मागे लागतात. दरम्यान, एकदा कोल्हटकर मॅडमनीदेखील यावर मी पुस्तक लिहावे असे सुचवले.
तासाभराच्या व्याख्यानापर्यंत ठीक होते, पण पुस्तक लिहायला मी काही या विषयातला जाणकार नव्हे, अशी माझी भूमिका होती. त्यामुळे जर पुस्तक लिहायचे असेल तर आणखी अभ्यास करणे भाग होते. आधी हातात ४-५ पुस्तकं होती आता आणखी पुस्तकांची शोधाशोध सुरू झाली.. या शोधात एक गोष्ट लक्षात आली की, या विषयावर इंग्रजीत बरीच पुस्तकं उपलब्ध असली तरी मराठीत मात्र विशेष पुस्तकं नव्हती. जी होती त्यातही मुख्यतः रेसिपीवर भर होता. पण या विषयाचे महत्त्व शास्त्रीय भाषेत उलगडून सांगणारे एकही पुस्तक नव्हते. मग 'कमी तिथे आम्ही' असं समजून सिरीयसली लिखाण करण्याचे निश्चित केले. बघता बघता मिलेटवरील जवळपास पंचवीसेक पुस्तकं गोळा झाली. एखाद दोन महिन्यात लिहून होईल असे वाटले होते. पण प्रत्यक्षात लिहायला सुरवात झाल्यावर इतकी माहिती पुढ्यात येत गेली की, त्यातले काय घ्यावे आणि काय नको हे ठरवताना कासवाच्या पावलांनी लिखाण पुढे सरकू लागले. मिलेटची तोंडओळख, इतिहास, पर्यावरणाशी संबंध आणि त्यानंतर प्रत्येक मिलेटवर एकेक लेख असे साधारण स्वरूप ठरवले होते. पण मजा येत नव्हती. मग अचानक एके दिवशी मनात आलं की, माणूस वयाने कितीही मोठा झाला तरी त्याला गोष्ट ऐकायला आवडते. माझ्या व्याख्यानाच्या सुरवातीलाही मी गोष्ट सांगितली होती. मग प्रत्येक प्रकरणासाठी एक गोष्ट किंवा प्रसंग शोधायला सुरवात झाली. ही भट्टी बऱ्यापैकी जमून आली. असं करत करत हळूहळू पुस्तकाला बाळसे चढू लागले. रेसिपीसाठी पुस्तकात एक स्वतंत्र विभाग करण्यात आलेला आहे. या रेसिपीजची निवड करताना पौष्टिक पण चविष्ट, करायला सोप्या अशा रेसिपी शोधणं हे कठीण काम होतं. या कामात माझी पत्नी डॉ. कविता वाघ हिचा 'सिंहाचा वाटा' आहे. त्यामुळे नाश्त्याला करता येण्यासारख्या, जेवणासाठीच्या, उपवासाला चालणाऱ्या, खाऊ म्हणून चालणाऱ्या अशा विविध पाककृतींनी पुस्तकाला खुमारी आणली आहे. त्यातसुद्धा ज्वारीची उकडपेंडी, कोदोचे मोमोजसारख्या पारंपरिक पदार्थांपासून कटलेट आणि नाचणीच्या केकपर्यंत वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे.
लिखाण बऱ्यापैकी आवाक्यात आल्यावर एके दिवशी डॉ. कोल्हटकर सरांना भीतभीतच माझे हस्तलिखित वाचाल का? असे विचारले. त्यांनी उत्साहात होकार दिला. मग ८-१० लेख त्यांना वाचायला दिले. ते वाचून त्यांनी काही मौलिक सूचना केल्या. सरांची अगोदर काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत म्हणून त्यांच्या सूचनांना वेगळे महत्त्व आहे. मग त्याप्रमाणे बदल करायला सुरवात केली. त्यानंतर ठाकूर सर, आयुर्वेदातील प्रसिद्ध लेखिका डॉ. सुचित्रा कुलकर्णी, डॉ. न. भो. प्रभू सर, डॉ. वसंत भूमकर सर या सर्वांनी पुस्तक नजरेखालून घातले आणि त्यांनी देखील काही बदल सुचवले. आता पुढचा मार्ग खडतर होता. वयात आलेल्या मुलीचा बाप आणि पुस्तकासाठी प्रकाशक शोधणारा लेखक या दोघांपैकी कुणाची परिस्थिती अधिक बिकट असते हे ब्रह्मदेव देखील सांगू शकणार नाही. पुढचे काही दिवस मला आपण होतकरू लेखकांप्रमाणे दाढीचे खुंट वाढवून प्रकाशकांचे उंबरठे झिजवतोय हे एकच स्वप्न पडत होतं. पण डॉ. सुचित्रा कुलकर्णी मॅडमच्या कृपेने या 'स्वप्नाची समाप्ती' लवकरच झाली. त्यांनी केलेल्या शिफारशीमुळे 'व्यास क्रिएशन्स्'सारख्या नामांकित प्रकाशन संस्थेच्या 
नीलेश वसंत गायकवाड यांनी पुस्तक लगेच स्वीकारले. पाच दिवाळी अंकांच्या धामधुमीत त्यांनी या पुस्तकाला उत्तम न्याय दिला. व्यास क्रिएशन्स्च्या अनुप्रिता देशपांडे यांनीही वेळोवेळी बहुमूल्य सहकार्य केले.
या पुस्तकासाठी मोलाचा अभिप्राय देणाऱ्या आयसीटी (ICT)च्या भूतपूर्व संचालिका डॉ. स्मिता लेले मॅडम आणि प्रख्यात मधुमेह तज्ज्ञ डॉ. नितीन पाटणकर यांचे आवर्जून आभार मानले पाहिजेत. प्रत्यक्ष काहीही परिचय नसताना या दोघांनी कोणतेही आढेवेढे न घेता सहकार्य केले. तसेच पुस्तकाबाबत आपले मत प्रांजळपणे मांडले. विशेषतः डॉ. स्मिता लेले मॅडमनी उपयुक्त बदलसुद्धा सुचवले. ज्यामुळे पुस्तक अधिक नेटके व्हायला मदत झाली.
शेतीचा शोध मुळात स्त्रियांनीच लावला आहे. या शोधामुळे अन्नामागे वणवण फिरणाऱ्या माणसाच्या आयुष्याला स्थैर्य मिळाले. आजही या जुन्या धान्यांच्या बियाणांचं संरक्षण करण्यात स्त्रिया आघाडीवर आहेत. मिलेट संस्कृती टिकवून ठेवण्यात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय आहे. स्त्रियांमध्ये X क्रोमोझोम असतात तर पुरुषांमध्ये X आणि Y हे दोन्ही क्रोमोझोम्स असतात. म्हणजेच X क्रोमोझोमच्या रूपात प्रत्येक पुरुषात काही प्रमाणात स्त्रीचा अंश असतोच. म्हणूनच अवघं ब्रह्मांड व्यापून चार अंगुळे शिल्लक राहणाऱ्या स्त्रीशक्तीला मी हे पुस्तक अर्पण केले आहे.
पुस्तकाला 'मिलेट मंत्र' हे नाव का? असा प्रश्न अनेक जणांनी विचारला. मंत्र शब्दाची संस्कृतमधील व्याख्या 'मननात् त्रायते इति मंत्र:' अशी आहे. म्हणजेच ज्या शब्दाचे सतत स्मरण केल्याने संकटाचे निवारण होते त्याला मंत्र असे म्हणतात. या ठिकाणी सातत्याला फार महत्त्व आहे. मंत्रांचे शब्द साधेच असतात, पण सातत्याने होणाऱ्या उच्चारणामुळे त्यांना सामर्थ्य प्राप्त होते. ‘राम राम' ऐवजी 'मरा मरा' शब्दाचा जप करणाऱ्या वाल्याचा वाल्मीकी होतो. म्हणूनच सातत्य महत्त्वाचे. मिलेट हजारो वर्षांपासून आपली सोबत करणारी साधी सोपी धान्ये आहेत. त्यांना ना फार मशागत लागते ना सुपीक जमीन. पण या साध्या सोप्या धान्यांचे सातत्याने सेवन केल्यास आजार दूर जातात आणि आरोग्य प्राप्त होते. थोडक्यात मिलेट हा आरोग्य प्राप्त करून देणारा मंत्र आहे. फक्त मंत्रोच्चारणाप्रमाणे मिलेटदेखील नियमित आहारात असली पाहिजेत. मिलेट इयर संपले आणि मिलेटचा विसर पडला असे व्हायला नको. हा 'मिलेट मंत्र' आपल्या सर्वांना आरोग्याकडे घेऊन जावो हीच भगवान धन्वंतरी चरणी प्रार्थना.
- डॉ. पुष्कर पुरुषोत्तम वाघ एम.डी. (आयुर्वेद)

Customer Reviews

Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)