जमिनीची सुपीकता - Jaminichi Supikata | प्रताप चिपळूणकर
जमिनीची सुपीकता - Jaminichi Supikata | प्रताप चिपळूणकर
Couldn't load pickup availability
Check Estimated Delivery Date
Share

Development by DDSHOPAPPS
शेतीविषयक शास्त्रीय माहिती देणारे पुस्तक
जमिनीची सुपिकता सर्वत्र कमी कमी होत चालली आहे. उत्पादनपातळीत सतत घसरण होत आहे. उत्पादनखर्चात होणाऱ्या वाढीमुळे शेती दिवसेंदिवस तोट्याची ठरत चालली आहे.
एक ना अनेक प्रश्न आहेत.....
या साऱ्या प्रश्नांवर एका सर्वसामान्य शेतकऱ्याने सूक्ष्मजीवशास्त्राच्या माध्यमातून मात केली. परंपरागत मार्गापेक्षा सूक्ष्मजीवशास्त्राच्या मार्गाचा अवलंबून करत शेती फायदेशीर केली. गेल्या वीस वर्षांमध्ये त्याने अनेकविध प्रयोग करून पाहिले. त्यातून त्याला जमिनीची सुपिकता आणि त्याद्वारे फायद्याची शेती कशी करता येईल याचे सूत्र गवसले. त्याचबरोबर उपलब्ध साधनसामुग्रीच्या साहाय्याने शेतीपूरक व्यवसाय करून शेतकरी आपले जीवन कसे समृद्ध करू शकतो, याचाही मार्ग त्यांनी शोधला.
गेल्या वीस वर्षांतील अभ्यासावर आणि प्रयोगावर आधारित त्यांचे हे किफायतशीर विवेचन इतरांना निश्चितच उपयुक्त ठरेल. कमी खर्चिक शेतीतंत्राद्वारे उत्पादनात वाढ करून शेतकऱ्याला समृद्ध बनविण्यास साहाय्य करणारे उपयुक्त पुस्तक.
मनोगत
मी १९७० मध्ये पुण्यातील कृषी महाविद्यालयातून शेतीची पदवी घेऊन शेतीला प्रारंभ केला. सुरवातीला मोकळा वेळ भरपूर मिळायचा. या काळात आमच्याबरोबर शिकून शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. शेती पदवीधर शेतकरी व सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या शेतीच्या विचार करण्याच्या पद्धतीत काही फरक आहे का, हा इथे अभ्यासाचा विषय होता. नगर जिल्ह्यात एका मोठ्या बागायतदाराच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी गेलो असता त्यांच्याकडे बरीच पुस्तके दिसली. जगभरातून अनेक नियतकालिके येत. उपयुक्त माहिती वेगळी करून स्वतंत्र ठेवली जायची. त्यांच्याकडील ऊस पीकविषयक फाइल चाळण्यासच माझे अनेक दिवस गेले. इथे तांत्रिक ग्रंथ व साहित्य अभ्यासाची गोडी लागली. आज ३०-३५ वर्षे वाचनाचे बेड चालूच आहे. सुरवातीला काही ग्रंथ विकत घेऊन हा छंद जोपासला. चार वर्षे जे अभ्यासक्रमात शिकलो त्याचा शेतीमध्ये काही उपयोग आहे का म्हणून परत सर्व उजळणी केली. सुरवातीपासून दृष्टिकोन असा ठेवला, की जे शास्त्र महाविद्यालयांत शिकविले जाते, जे चर्चासत्रांतून सांगितले जाते; त्याचा व प्रत्यक्ष शेती आणि समस्या यांचा योग्य समन्वय आहे का? कृषी शिक्षणक्रमात सर्व शास्त्रांचे एका ठराविक पातळीपर्यंत शिक्षण दिले जाते. पुढे आपण ज्या क्षेत्रात काम करू त्यानुसार आपण आपला पुढील अभ्यास चालू ठेवणे गरजेचे असते.
लौकिक अर्थाने चार वर्षांतील अभ्यास व परीक्षेनंतर शिक्षण संपवून मी शेतीला प्रारंभ केला होता, परंतु आता लक्षात आले की खरी विद्यार्थिदशा शेतात प्रवेश केल्यानंतरच सुरू झाली आहे. गेल्या ४० वर्षांत
चालू आहे, असे भासते. या शास्त्राचा आवाका प्रचंड आहे. त्यातील फार थोड्या गोष्टी शास्त्रज्ञांना ज्ञात झाल्या आहेत. फार थोडा भाग आपण अभ्यासला आहे. माझ्यासारख्या कृषी पदवीधर शेतकऱ्याची ही स्थिती, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय असेल?
शेतीशास्त्राच्या पूर्व प्राथमिक वर्गातच आपले शिक्षण
माझ्या ३७ वर्षांच्या शेती आयुष्यात मी किमान चार-पाच वेळा आर्थिक गटांगळ्या खाल्ल्या व पुढे शास्त्राच्या मदतीने आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावरही झालो. १९९०मध्ये जी गटांगळी खाल्ली तिने मला भू-सूक्ष्मजीव शास्त्र (सॉईल मायक्रोबायोलॉजी) या विषयाकडे वळविले. जमिनीत डोळ्यांना न दिसणारे असंख्य सजीव काम करीत असतात. त्यांच्या कामकाजावर हे शास्त्र विकसित झाले आहे. शेतीसाठी हे एक पायाभूत शास्त्र आहे. या शास्त्राच्या अभ्यासाशिवाय शेती शास्त्राच्या अभ्यासाची सुरवातच होऊ शकत नाही. पायाभूत शास्त्रात म्हणावे तसे काम केले जात नाही. उपयोजित शास्त्रातच काम जास्त होते, यामुळे
शास्त्राचा विकास खुंटतो, अशी अखिल भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील वरिष्ठ तक्रार करतात. पायाभूत शास्त्रात काम करणे अवघड, क्लिष्ट व बऱ्याच वेळा अपयश देणारे असते. यामुळे असे काम करण्याची इच्छा असणाऱ्याला मार्गदर्शक मिळणेही अवघड होते.
आता मुख्य विषयाकडे म्हणजे जमिनीची सुपीकता या विषयाकडे वळू या विषयाचा अभ्यास पायाभूत भू-सूक्ष्मजीव शास्त्र या विषयांतर्गत न करता कृषी विद्या शास्त्र व कृषी रसायन शास्त्र या विषयांतर्गत केला जातो. रसायन शास्त्र हा एक पायाभूत विषय मानला जातो, परंतु, कृषी रसायन शास्त्र हा विषय पायाभूत नाही. जमिनीत तयार होणारी बहुतेक रसायने ही सूक्ष्म जीव तयार करीत असतात, यामुळे जैव रसायन शास्त्र हा पायाभूत विषय आहे. आता अशा त्रुटीच्या विचारसरणीने शास्त्र तयार करणे, शिकविणे व एकतर्फी विस्तार करणे यात विस्तार करून घेणारा शेतकरी अज्ञानी असल्याने यावर फारशी चर्चा होत नाही. यामुळे शेती व शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे.
मला या लेखमालेतून जमिनीची सुपीकता हा विषय भू-सूक्ष्म-जीव शास्त्र या विषयाच्या माध्यमातून वाचकांपुढे मांडावयाचा आहे. सूक्ष्म जीव उघड्या डोळ्यांनी पाहता येत नाहीत. त्यांनी केलेले काम दिसते, परंतु करणारे दिसत नसल्याने हा विषय समजावून सांगण्याला मोठ्या मर्यादा पडतात. विषय पूर्णपणे तांत्रिक आहे. लेखन शेतकरी हा मध्य धरूनच करणार आहे, तरीही शास्त्रज्ञ, तंत्रज्ञही वाचक असल्याने थोडी क्लिष्टता येणे स्वाभाविक आहे. तरीही हा गहन विषय प्रत्येक शेतकऱ्याने अभ्यासलाच पाहिजे, असे मला सुचवावेसे वाटते. सुधारित शेतीतील अनेक नवीन गोष्टी आपण क्लिष्ट असूनही गरजेपोटी पचविल्या, ऑइल इंजिन, ट्रॅक्टर, मोटारपंप, औषधे, तणनाशके यातील तांत्रिकता आपण आत्मसात केली. मग जमिनीची सुपीकता या विषयातील तांत्रिकता आपण आत्मसात का करू नये ?
शेती जमिनीची सुपीकता हा मध्य धरून केली पाहिजे असे अल्बर्ट हॉवर्ड हे कृषिशास्त्रज्ञ म्हणतात. त्यांच्या मतांकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम आज आपण भोगत आहोत. पहिल्या हरितक्रांतीचे अपयश हे त्याचेच फलित आहे. आज शेती फक्त उत्पादन व पैसे हा मध्य धरून केली जात आहे, पण अखेर उत्पादन पैसे व जमिनीची सुपीकता हा पाया भक्कम असल्याशिवाय कायमस्वरूपी कसे मिळणार? मला या शास्त्राच्या अभ्यासाने जी एक वेगळी दिशा दिली, त्यांपैकी अनेक गोष्टी या प्रचलित विचारसरणीच्या परस्परविरुद्ध आहेत.
ही माझी स्वतःची मते नाहीत. शास्त्रीय ग्रंथातील संदर्भ व ते शेतात उतरविण्यात झालेले प्रयोग यातून ही चाकोरीबाह्य विचारसरणी तयार झाली आहे. आता हे विचार वाचकांसमोर आणताना प्रसंगी प्रचलित विचारसरणीवर टीका होणे स्वाभाविक आहे. इथे कोणावरही वैयक्तिक टीका करणे अगर एखाद्याचे मत खोडून काढणे असा हेतू नाही.
काळ बदलेल तसे अनेक गोष्टीत बदल होत जातात याला काळसापेक्षता असे म्हटले जाते. काळानुरूप शेती करण्याच्या पद्धतीत अनेक बदल होणे गरजेचे आहे. परंतु असे बदल होताना दिसत नाहीत. परंपरा सोडून नवीन प्रकाराने एखादी गोष्ट करणे हे तसे खुप अवघड आहे. ज्यष्ठ शास्त्रज्ञ श्री. रघुनाथ माशेलकर म्हणतात, विज्ञानाच्या प्रगतीत नव्या गाष्टी सुचणे ही प्रमुख अडचण नसून जुन्या कल्पना डोक्यातून बाजूला सारणे ही मुख्य अडचण आहे. शेतीत हा विचार तंतोतंत लागू पडतो. तसे शेतीत अजिबात बदल झालेच नाहीत असे म्हणता येणार नाही. मोटा जाऊन इंजिने आली, बैल जाऊन ट्रॅक्टर आले, खते, औषधे, नवीन जाती असे बदल शेतीने स्वीकारले. अशी नवी तंत्रे स्वीकारीत असता जुन्या काम करण्याच्या पद्धतीपेक्षा नवीन पद्धत सुलभ, उत्पादन वाढविणारी, कमी वेळात करता येणारी म्हणून स्वीकारली गेली. हे बहुतेक बदल व्यापार वाढविणारे होते. बदलत्या परिस्थितीनुसार योग्य जाहिरातबाजी व प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा हा बदल स्वीकारण्यास प्रामुख्याने कारणीभूत आहेत. शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणारी तंत्रे ज्यातून व्यापाराला कोणतेही प्रोत्साहन मिळत नाही, उलट काही बाजारातून खरेदी कराव्या लागणाऱ्या निविष्ठेपासून शेतकऱ्याची मुक्तता होते अशा तंत्राची जाहिरात व विस्तार कोण करणार? यातून एखाद्याने अशी तक्रार केली तर ती बाजूला पडतात. शेतीत नांगरणी करू नका, चांगले कुजलेले खत टाकू नका, जिवाणू खते, गांडूळ खते वापरू नका अशी माझी काही मते योग्य विस्ताराअभावी प्रसारित होण्याला मर्यादा पडतात. 'अॅग्रोवन'चे श्री. मंदार मुंडले यांनी वरिष्ठाकडे पाठपुरावा करून मला माझे विचार मांडण्याची संधी मिळवून दिली. त्यावेळचे उपसंपादक श्री. सुनील चव्हाण साहेबांनी १ वर्षासाठी ५२ भागात जमिनीची सुपिकता या विषयावर लेखनाची परवानगी दिली. त्यावेळी हे आव्हान आपल्याला कितपत पेलता येईल अशी शंका मनात होती. प्रयत्न करून पाहू म्हणून सुरुवात केली व पुढे ८० भागापर्यंत लेखन करीत गेलो. त्याचे पुढे पुस्तक करावे अशी अनेक वाचकांनी इच्छा पदर्शित केली त्याला मूर्त स्वरूप येत आहे.
जमिनीची सुपिकता हा विषय दुर्लक्षित आहे य
त्याकडे प्रसिद्धी माध्यमे दुर्लक्ष करतात. 'ॲग्रोवन' ही त्याला अपवाद नाही. अशी टीका असलेले पत्र 'अॅग्रोवन'कडे पाठवले होते. ते प्रसिद्ध होणार नाही असे वाटत असता प्रसिद्ध झालेच व तत्परतेने त्यावेळचे संपादक श्री. निशिकांत भालेरावसों यांनी दूरध्वनीद्वारे त्रुटी दाखवून दिल्या त्याबद्दल आभार मानले. हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. पुढे या विषयावर प्रदीर्घ लेखन करता आले व त्याचे पुस्तक होत आहे. या वाटचालीत श्री. प्रमोद राजे भोसले मुख्य व्यवस्थापक, श्री. आदिनाथ चव्हाण संपादक, श्री. आशुतोष रामगिर मुख्य व्यवस्थापक पुस्तक विभाग या सर्वांनी वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन व केलेल्या मदतीबाबत वरील सर्वांच आभार मानून मनोगत संपवितो.
- प्रताप चिपळूणकर







